You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
अभ्यासाचा वाढता ताण आणि वाढती स्पर्धात्मकता ठरतेय का शाळकरी मुलांच्या आत्महत्येचं कारण?
- Author, डॉ. हमीद दाभोलकर
- Role, बीबीसी मराठीसाठी
शाळेच्या दिवसांच्या विषयी आपल्यातील बहुतांश जणांच्या मनात एक हळवा कोपरा असतो. आपल्या आयुष्यातील ते सगळ्यात छान दिवस होते असे अनेक जणांना वाटते. अशा पार्श्वभूमीवर जेव्हा आपल्या देशात दहा हजार पेक्षा जास्त शाळकरी मुलांनी आत्महत्या केल्याची बातमी आपल्याला एकदम धक्कादायक वाटू शकते.
गेली तीन चार वर्षे सातत्याने राष्ट्रीय क्राईम रेकोर्ड ब्युरोच्या रिपोर्ट मध्ये ही संख्या इतकी राहत आहे. दिल्ली मधल्या एका खाजगी शाळेत शिक्षकांच्या त्रासाला कंटाळून एका शाळकरी मुलाने आत्महत्या केल्याची घटना नुकतीच घडली आहे.
पालकांनी मोबाईल दिला नाही म्हणून किंवा भावाशी टीव्ही रिमोट कंट्रोल वरून भांडण झाल्याने शाळकरी मुलांनी आत्महत्या केल्याच्या घटना देखील नुकत्याच घडल्या आहेत.
वृत्तपत्रात शाळकरी मुलांच्या आत्महत्येची बातमी आपल्या मधील बहुतांश जणांनी कधीना कधी वाचलेली असते. काही वेळा पुरती त्या विषयी आपल्याला हळहळ वाटते आणि आपण ही गोष्ट आपण विसरून जातो. ज्या वयात अजून मुलांना जीवनाचे पुरेसे आकलन देखील झालेले नाही, त्या वयातील मुले जर आत्महत्या करत असतील तर समाज म्हणून आपल्या सगळ्यांना गंभीर विचार करणे आवश्यक आहे.
पालक,शिक्षक,शिक्षण संस्था आणि शिक्षण खाते या सर्वांनी गांभीर्याने समजून घेऊन तातडीने कृती करायला पाहिजे असा हा विषय आहे.
जीवघेणी वाढती स्पर्धात्मकता
शाळकरी मुले आत्महत्या का करतात याच्या कारणाचा विचार केला तर केवळ शिक्षण पद्धती, केवळ पालक किंवा केवळ शिक्षक यांच्या पैकी एकाच घटकाला जबादार धरून त्या वर बोलणे हे त्या प्रश्नाचे योग्य आकलन होणार नाही.ह्या प्रश्नाचा सर्वांगीण विचार करणे आवश्यक आहे.
यामध्ये त्या मध्ये अभ्यासाचा वाढता ताण हे एक महत्वाचे कारण दिसून येते. समाजातील वाढती स्पर्धात्मकता ही शाळकरी मुलांच्यासाठी शब्दश: जीवघेणी ठरते आहे.
'एखाद्या परीक्षेत अपयश येणे म्हणजे संपूर्ण आयुष्यात अपयशी ठरणे' अशी जी समाजधारणा आपण तयार केली आहे. त्याचा खूप मोठा नकारात्मक प्रभाव ह्या मुलांच्या मानसिकतेवर पडत आहे.
कोव्हिडच्या कालखंडात शालेय शिक्षणत ज्या अडचणी निर्माण झाल्या त्या मधून देखील अनेक मुले अजून पूर्ण सावरू शकलेली नाहीत. त्याचा ताण स्वाभाविकपणे मनावर राहतो.
मैत्री-प्रेम-आकर्षण ह्या मधला फरक लक्षात न येणारे वय
मुळातच वयात येतानाचा कालखंड हा आयुष्यातला अत्यंत आव्हानात्मक अवस्था असते. शालेय मुलामुलींना या वयात अनेक आव्हानांना ला सामोरे जावे लागत असते.
शरीरात आणि मनात होणारे बदल,मित्रमैत्रिणीच्या नात्यातील ताण,पालकांच्या सोबत बदलणारे नाते संबंध,करियर विषयी अनिश्चितता आणि त्या मधून निर्माण होणारे ताण, प्रेम-आकर्षण, जोडीदाराची निवड ह्या विषयीच्या मनातील गोंधळाच्या मधून निर्माण होणारे पेच असे अनेक पदर ह्या ताणतणावाना असतात.
आपले कुटुंबीय, मित्र मैत्रिणी हे अशा कालखंडात आपले महत्वाचे आधार असतात. जर ताणाची तीव्रता जास्त असेल किवा पुरेसे आधार देणारे नाते संबंध नसतील तर त्या मधून मानसिक अस्वास्थ्य निर्माण होऊ शकते ते अस्वास्थ्य टोकाला गेले तर मग स्वत:ला हानी करण्याचे विचार मनात येऊ लागतात.
अनेकवेळा नकार पचवता आला नाही म्हणून देखील शाळकरी मुलांच्या आत्महत्या होताना दिसतात. 'पालकांनी मोबाईल देण्यास नकार दिला किंवा मित्र/मैत्रिणींनी प्रेमाच्या भावनेला हवा तसा प्रतिसाद दिला नाही', अशा कारणांच्या मधून देखील शाळकरी मुलांच्या आत्महत्या झालेल्या दिसतात.
मैत्री-प्रेम-आकर्षण ह्या मधील फरक लक्षात न येणारे हे वय आहे. सिनेमा आणि सोशल मीडिया यांच्या प्रभावातून ह्या विषयी खूप सारी चुकीची माहिती देखील मुलांच्या पर्यंत पोचते. त्यामधून देखील मनात गोंधळ होऊन टोकाचे निर्णय घेतले जातात.
हेल्पलाइनची माहिती आवश्यक
पालकांच्या बरोबरच्या नात्यामधील ताण हे देखील एक महत्वाचे कारण आहे. शालेय व्यवस्थापन आणि शिक्षक यांच्या कडून टाकला गेलेला दबाव हे देखील एक महत्वाचे कारण आहे
आत्महत्या टाळण्यासाठी अनेक प्रभावी पद्धती आपल्याकडे उपलब्ध आहेत. त्यांचा आपण वापर करणे आवश्यक आहे. आत्महत्या प्रतिबंध हेल्पलाईन ही त्यामधील एक महत्वाचे मध्यम आहे. शासनामार्फत देखील अशी हेल्प लाईन चालवली जाते.
टेली मानस ही केंद्र शासनाची सर्व भाषांमध्ये मोफत उपलब्ध हेल्प लाईन आहे स्वयंसेवी संस्थांच्या हेल्पलाईन देखील आहेत.समाजात त्यांच्या विषयी पुरेशी माहिती नाही.समाजातील प्रत्येक माणसाला जसा 100 हा पोलीस स्टेशनचा नंबर माहित असणे आवश्यक आहे तसे त्यांच्या फोनबुकमध्ये एका आत्महत्या प्रतिबंध हेल्पलाईनचा नंबर असणे अत्यावश्यक गोष्ट आहे.
'गेट कीपर' ही संकल्पना समजून घ्या
आत्महत्येचा प्रयत्न करण्याच्या आधीच्या आठवड्यात असा प्रयत्न करणाऱ्या बहुतांश व्यक्ती या जवळच्या कोणाशी तरी या विषयी बोललेले असतात. अशा वेळी योग्य हस्तक्षेप झाला तर त्यामधून पुढील आत्महत्या टाळता येवू शकते. ह्या व्यक्तींना 'गेट कीपर' म्हणतात.
गेटकीपर म्हणजे आत्महत्येचे विचार आलेल्या व्यक्तीला भावनिक प्रथमोपचार देवून योग्य तज्ञाच्या कडे पाठवणारी व्यक्ती! केवळ दोन तासाच्या प्रशिक्षणाच्यामध्ये हे कौशल्य ऑनलाईन पद्धतीने देखील घेता येवू शकते.
या प्रशिक्षणामध्ये आत्महत्येच्या विषयी असलेले अनेक गैरसमज दूर करण्यावर भर असतो.आत्महत्या करणारी व्यक्ती नाटक करत आहे असा समज आपल्याकडे मोठ्या प्रमाणात दिसून येतो.
या गैरसमाजातून त्या व्यक्तीच्या भावनिक अस्वस्थतेकडे दुर्लक्ष होते.
प्रत्यक्ष जेव्हा त्या व्यक्तीला आधाराची गरज असते तेव्हा मदत मिळत नाही. या स्वरूपाचे गैरसमज जर दूर झाले तरी अनेक जीव वाचू शकतात.
जवळच्या व्यक्तीची आत्महत्या हा मनावर खोलवर चरा उमटवणारी घटना असते. जरी ती व्यक्ती लहान मुल किंवा युवा असेल तर त्या अस्वस्थतेचा दाह अनेक पटींनी वाढतो.
अशावेळी ज्या कुटुंबातील व्यक्तीच्या मनावर दीर्घकाळ त्याचा परिणाम राहतो. समाजात ह्या विषयी मोकळेपणाने बोलले जात नसल्याने मनातल्या मनात घुसमट होत राहते.
आत्महत्या करण्याच्या कारणाच्या मध्ये एक भाग अनुवांशिक असल्यामुळे त्या कुटुंबातील व्यक्ती आत्महत्या करण्याचा धोका देखील जास्त असतो.
ज्याच्या कुटुंबात आत्महत्या झाली आहे. त्या कुटुंबाला भावनिक आधार देणारी यंत्रणा विकसित करणे पण फार आवश्यक आहे. हे केवळ मानसोपचारतज्ज्ञांवर सोडता येऊ शकत नाही. आपल्यामधील प्रत्येकाला हे कौशल्य शिकणे आवश्यक आहे. प्रशिक्षित मानसमैत्र/मैत्रिणी ह्या स्वरूपाचे आधार नक्कीच देऊ शकतात.
त्यासाठी अनेक छोटी पाऊले आपण उचलू शकतो. अशीच एक छोटी पण महत्वाची गोष्ट म्हणजे आत्महत्येविषयी पेपर मध्ये येणाऱ्या बातमी खाली आत्महत्या प्रतिबंधक हेल्पलाईनचा नंबर छापणे होय. ही वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने सुचवलेली एक प्रभावी पद्धत आहे.
एकत्रित प्रयत्न गरजेचे
ह्या आत्महत्या थांबवायच्या असतील तर पालक, शाळा आणि शिक्षण संस्था या सगळ्यांनी एकत्र प्रयत्न करणे आवश्यक आहे. आपल्या शालेय अभ्यासक्रमात जसे मानवी शरीराच्या विषयी माहिती असते तसेच मानवी मन आणि त्याला येणारे ताणतणाव आणि ते हाताळण्याचे सोपे मार्ग या विषयी धडे समाविष्ट करणे काळाची गरज आहे.
मुलांना येणारे ताण-तणाव कसे ओळखायचे आणि त्याला कशा प्रकारे हाताळता येऊ शकते या विषयी सर्व शिक्षकांचे प्रशिक्षण होणे आवश्यक आहे.
पालकसंघांनी देखील या कामी पुढाकार घ्यायला पाहिजे.शाळेमध्ये समुपदेशक असणे हो गोष्ट आपल्या कडे फार कमी शाळांच्या मध्ये दिसून येते.
शाळकरी मुलांना त्यांच्या वयात पडणारे प्रश्न हे बोलण्यासाठी असे समुपदेशक शाळेत असणे अत्यंत महत्वाचे आहे. वयात होताना होणारे बदल, लैंगिकता, मोबाईलचा वापर, पालकांशी नातेसंबंध अशा विषयांच्या वर घरात आणि शाळेत मनमोकळा संवाद होईल असे वातावरण निर्माण करणे ही तातडीची गरज झाली आहे.
शाळकरी मुलांच्यामध्ये देखील अनेक वेळा मानसिक आजारांची सुरुवातीची लक्षणे दिसून येतात अशा वेळी समाज काय म्हणेल? असा विचार न करता मोकळेपणाने मनोविकार तज्ञांची मदत घ्यायला हवी.
देशाचे भविष्य त्याच्या शाळांच्या खोल्यांच्या मध्ये घडत असते असे म्हटले जाते. मानसिक दृष्ट्या आनंदी आणि ताणतणावाना सामोरे जावू शकणारी पिढी घडवण्यासाठी आपण सर्वांनी हे करायलाच हवे.
महत्त्वाची सूचना
औषधोपचार आणि थेरपीच्या मदतीने मानसिक आजारांवर उपचार शक्य आहेत. यासाठी तुम्ही मानसोपचारतज्ज्ञांची मदत घेणं गरजेचं आहे.
तुम्हाला किंवा एखाद्या परिचित व्यक्तीमध्ये अशा प्रकारच्या मानसिक आजारांची लक्षणं दिसल्यास या हेल्पलाईन नंबरवर संपर्क साधून मदत मिळवू शकता.
हितगुज हेल्पलाईन, मुंबई - 022- 24131212
सामाजिक न्याय आणि सशक्तीकरण मंत्रालय -1800-599-0019 (13 भाषांमध्ये उपलब्ध)
इंस्टिट्यूट ऑफ ह्यूमन बिहेवियर अँड एलाइड सायन्सेस - 9868396824, 9868396841, 011-22574820
नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड न्यूरोसायन्स - 080 - 26995000
विद्यासागर इंस्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड एलाइड सायन्सेस, 24X7 हेल्पलाइन-011 2980 2980
लेखक स्वतःमानसोपचारतज्ज्ञ आहेत. परिवर्तन ही त्यांची संस्था आहे. लेखातील विचार हे त्यांचे वैयक्तिक मत आहे.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.