लहान मुलांना डायबेटिस आणि लठ्ठपणा होऊ नये यासाठी काय करायचं? महत्त्वाची माहिती

फोटो स्रोत, Getty Images
- Author, ओंकार करंबेळकर
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
एकेकाळी श्रीमंतांचा आजार किंवा शहरी भागातला आजार म्हणून ओळखला जाणारा मधुमेह अर्थात डायबेटिस आता सर्वतोमुखी झाला आहे.
कुटुंबामध्ये किंवा मित्रमंडळीत ज्येष्ठांना होणारा आजार म्हणूनही याची ओळख होती. मात्र गेल्या पंचवीस वर्षात हे चित्र वेगानं बदललं आहे.
आर्थिक उत्पन्न गट कोणताही असो, कोणत्याही सामाजिक स्थितीतली व्यक्ती असो हा आजाराचा सर्वत्र शिरकाव झालेला दिसतो.
इन्शुलिन, डायबेटिस हे शब्द सहज सर्वत्र ऐकायला, वाचायला मिळतात तसेच इन्शुलिन रेझिस्टन्स, प्री डायबेटिस हे शब्दही आता नवे राहिलेले नाहीत.
एकेकाळी भारतासारख्या देशात लहान मुलांमध्ये टाइप वन म्हणजे जन्मतःच असणारे मधुमेहाचे बालरुग्ण दिसायचे. आता मात्र टाइप टू या डायबेटिसनं आपला वयोगट खालपर्यंत आणून कमी वयोगटातही प्रवेश केला आहे.
लठ्ठपणा आणि मधुमेह या आजारांना कमी वयातच सामोरं जावं लागत आहे. त्याचीच माहिती येथे घेऊ.
डायबेटिसचे दोन प्रकार
- टाइप वन डायबेटिस- या प्रकारात इन्शुलिन निर्मिती करणाऱ्या पेशींवर शरीरातील प्रतिकारक्षमता हल्ला करते.
- टाइप टू डायबेटिस- यामध्ये शरीर पुरेसं इन्शुलिन तयार करू शकत नाही किंवा शरीरातील पेशी इन्शुलिनला प्रतिसाद देत नाहीत. या प्रकाराचे रुग्ण मोठ्या संख्येने आढळत असतात.
- गरोदरपणामध्ये काही महिलांच्या रक्तात ग्लुकोजची पातळी वाढल्यामुळे त्यांचे शरीर ते सामावून घेण्यासाठी पुरेसं इन्शुलिन तयार करू शकत नाही. त्याला जेस्टेशनल डायबेटिस (Gestational Diabetes) म्हटलं जातं.
अनेक लोकांच्या रक्तातील साखरेची पातळी सामान्य पातळीपेक्षा दिसते. परंतु त्याला डायबेटिस म्हणण्याइतकी ती वाढलेली नसते. या अवस्थेला प्री-डायबेटिस असं म्हणलं जातं.

फोटो स्रोत, Getty Images
जर सामान्य पातळीपेक्षा तुमची साखरेची पातळी जास्त असेल तर तुम्हाला पूर्णपणे डायबेटिस होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे योग्यवेळीच त्याची कल्पना आल्यास त्या व्यक्तीला मदत होते जर उशीर झाल्यास त्याचे परिणाम गंभीर होत जातात.
जेव्हा अन्नाचं पचन होतं. तेव्हा त्याचं रुपांतर ग्लुकोजमध्ये होऊन ते रक्तप्रवाहात जात असतं. इन्शुलिन ग्लुकोजला रक्तात, पेशींपर्यंत पोहोचवत असतं. तिथं त्याचं ऊर्जेत रुपांतर होत असतं.
परंतु डायबेटिस झाला असल्यास शरीराला ग्लुकोजचं ऊर्जेत रूपांतर करता येत नाही. कारण ग्लुकोज वहनासाठी योग्य प्रमाणात इन्शुलिन नसतं किंवा इन्शुलिन योग्यप्रकारे काम करत नसतं.

फोटो स्रोत, Getty Images
तज्ज्ञांच्या माहितीनुसार, मधुमेहाचं निदान म्हणजे, स्वादुपिंडाची इन्शुलीन तयार करण्याची क्षमता 50 टक्के कमी झालेली असते. उरलेली 50 टक्के क्षमता मधुमेह नियंत्रण आणि जीवनशैलीमधील बदल यावर अवलंबून असते.
ज्या लोकांच्या घरामध्ये डायबेटिसने मागच्या पिढ्यांमध्येच प्रवेश केला केला आहे अशा लोकांना डायबेटिसचा धोका जास्त असतो. त्यांनी अधिक काळजी घेण्याची गरज आहे.
मुंबईमध्ये हिंदुजा हेल्थकेअरमध्ये कार्यरत असणारे डॉ. शशांक शहा यांच्यामते "आई-वडिलांपैकी कोणालाही डायबेटिस असेल तर घरामध्ये साखर, बाहेरचे खाणे, गोड पदार्थ यांच्यात आधीपासूनच 50 टक्के कपात करता येईल. अशामुळे डायबेटिसचं येणं लांबवता येईल."
मधुमेहतज्ज्ञ डॉ. किरण शहा यांच्या मते, "डायबेटिसचा इतिहास असणाऱ्या कुटुंबांनी मुलांच्या हालचालींवर विशेष लक्ष दिलं पाहिजे. अशा मुलांनी आधीपासूनच वजन कमी ठेवणं, व्यायाम करणं गरजेचं आहे."
मोबाईल, संगणकापेक्षा मुलांनी मैदानी खेळ, व्यायाम यावर भर दिला पाहिजे असं डॉ. किरण शहा सांगतात.
लठ्ठपणाचा वेगानं वाढणारा त्रास
गेल्या दोन दशकामध्ये लहान मुलांमध्ये लठ्ठपणा असलेले रुग्ण मोठ्या संख्येनं वाढीला लागलेले दिसतात.
यासाठी अनेक गोष्टी कारणीभूत आहेत. स्क्रीन म्हणजे मोबाईल, टीव्ही, संगणक, टॅबलेटचा वाढलेला वापर, त्यामुळे कमी झालेली शारीरिक हालचाल, भरपूर कॅलरी असलेले पाकिटबंद खाणं आणि पोषणमूल्य कमी असलेलं प्रक्रिया केलेलं खाणं अशी अनेक कारणं त्यामागे आहेत.
तसेच या काळामध्ये लगेच खाता येतील असे पाकिटबंद पदार्थ, भरपूर साखर,मेद असलेले तयार पदार्थ सगळीकडे मिळू लागले आहेत.
मुलांच्या खाण्याच्या सवयीकडे पालकांचं दुर्लक्ष किंवा कधीकधी विचित्र सवयींना मिळणारं प्रोत्साहनही याला कारणीभूत ठरतं. लठ्ठपणा आणि डायबेटिस हे हातात हात घालून लहान मुलांपर्यंत पोहोचल्याचं दिसतं.

फोटो स्रोत, Getty Images
मुंबईतल्या कोकिलाबेन धिरुभाई अंबानी रुग्णालयातील पेडिअट्रिक एंडोक्रोनॉलॉजिस्ट डॉ. आकांक्षा जैन सांगतात, "भारतातील साधारणपणे 20 टक्के लहान मुलांचं वजन हे गरजेपेक्षा जास्त किंवा ते लठ्ठ आहेत."
भारतातल्या मुलांबद्दल हीच काळजी नवी मुंबईतल्या अपोलो रुग्णालयातील इन्स्टिट्यूट ऑफ क्लिनिकल ओबेसिटी अँड मेटॅबॉलिझमचे संचालक डॉ. संजय खरेही व्यक्त करतात.
डॉ. खरे बीबीसी मराठीशी बोलताना म्हणाले, "आपल्याकडच्या परंपरागत प्रक्रियामुक्त धान्य, ऋतूनुसार येणाऱ्या भाज्या, ताजी फळं याची जागा फास्ट फूड, पाकिटबंद खाणी, भरपूर साखर असलेली पेयं यांनी फारच वेगानं घेतली आहे.
शिक्षणातील स्पर्धात्मकता, त्यामुळे येणारा ताण, अनेक तास चालणारी शाळा, वाढलेला स्क्रीन टाइम यामुळे मुलांचा खेळाचा वेळ कमी झाला आहे.
यामुळे पोटावर मेद साठणं, वजनवाढ याला आदर्श स्थिती तयार होते. या वयात आवश्यकतेपेक्षा थोडसं वाढलेलं वजनही चयापचयासंबंधी आजारांचा धोका वाढवतं."
अरिंदम मदर अँड चाइल्डकेअर रुग्णालयामध्ये बालरोगतज्ज्ञ म्हणून कार्यरत असणारे डॉ. हेमराज इंगळे म्हणाले, "लॅन्सेटमध्ये प्रकाशित झालेल्या एका शोधनिबंधात भारतामध्ये 2022 साली 1.25 कोटी मुलं ओव्हरवेट या गटात होती. 1990 मध्ये ही संख्या केवळ 4 लाख एवढी होती. यातून भारतात लहान मुलांमधल्या लठ्ठपणाचं वाढतं प्रमाण दिसून येतं."
टाइप टू डायबेटिसचा शिरकाव
डॉ. आकांक्षा जैन सांगतात, "एकेकाळी टाइप टू डायबेटिस लहान मुलांमध्ये दुर्मिळ असायचा. आता मात्र तो 10 ते 18 या वयोगटातल्या मुलांमध्ये होत असल्याचं दिसत आहे.
काही अहवालांत, रक्तातील Hba1c पाहाता पौगंडावस्थेतील प्रत्येक पाच मुलांमागे एका मूल प्री डायबेटिक किंवा डायबेटिक असू शकतं.
वाढलेल्या वजनामुळे शरीराच्या वाढलेल्या इन्शुलिनची पूर्तता त्यांच्या स्वादुपिंडाला करणं कठीण जातं. जीवनशैलीशी संबंधित लठ्ठपणामुळे मुलांमध्ये टाइप टू डायबेटिस वाढल्याचं दिसतं."

फोटो स्रोत, Getty Images
डॉ. संजय खरे सांगतात की, "आजकाल डायबेटिसच्या रुग्णांमध्ये लहान मुलांचं वाढलेलं प्रमाण काळजी करायला लावणारं आहे. ते सांगतात, एकेकाळी मध्यमवयीन लोकांना होणारा हा आजार आता अगदी 8 ते 9 वय असलेल्या मुलांमध्ये दिसू लागला आहे. यामागे मुख्य कारण हे मुलांच्या पोटावर साठलेलं फॅट म्हणजे मेद आहे."
डॉ. खरे म्हणाले, "या मेदामुळे इन्शुलिन रेझिस्टन्स तयार होतो आणि इन्शुलिन योग्यप्रकारे काम करत नाही.
सुरुवातीच्या काळात स्वादुपिंड जास्त इन्शुलिन तयार करुन परिस्थिती आटोक्यात आणायचा प्रयत्न करतं परंतु एका मर्यादेनंतर ते थकतं आणि मग रक्तातील साखरेची पातळी वाढलेली राहाते. प्रौढांच्या तुलनेत लहान मुलांमध्ये हा बदल वेगानं आणि अधिक आक्रमक पद्धतीनं घडतो."
"आमच्यासमोर कमी वयातच मूत्रपिंड निकामी झालेले रुग्ण, फॅटी लिव्हर, हायपरटेन्शन अशा आजारांचे टीनएजर्स रुग्ण यायला लागले आहेत."
मुलांकडे वेळीच लक्ष का दिलं पाहिजे?
बाहेरच्या इन्शुलिनवर अवलंबून राहाणं कमी होण्यासाठी तसेच मूत्रपिंडाचे आजार, हृदयरोग, मज्जासंस्थेचे आजार किंवा अंधत्व असे प्रकार टाळण्यासाठी मुलांकडे वेळीच लक्ष दिलं पाहिजे.
प्री डायबेटिक स्थितीत नियोजनबद्ध प्रयत्न केल्यास अनेक त्रास टाळता येतात. योग्य समतोल आहार, व्यायाम, योग्य सवयी यामुळे परिस्थिती सुधारू शकते. त्यासाठी डॉक्टर आणि तज्ज्ञांचीच मदत घ्यावी.

फोटो स्रोत, Getty Images
डॉ. संजय खरे म्हणतात, "लठ्ठपणा आणि लहान मुलांमधला टाइप टू डायबेटिस यात सुरुवातीलाच उपाय सुरू केले तर आयुष्यभर होणारे अनेक त्रास कमी करता येतात."
ते म्हणतात, "मेटॅबॉलिक मेमरी नावाची एक संज्ञा आहे. यानुसार जर आपल्या चयापचयातील मार्गात कधी अडथळा आला असेल, कधी थोड्या काळासाठी अतिसाखरेचं प्रमाण रक्तात असेल, तर त्याचे रक्तवाहिन्या आणि अवयवांवर दीर्घकाळ विपरित परिणाम होतात.
जर अगदी सुरुवातील आहारात बदल, शारीरिक हालचालीत वाढ आणि योग्यवेळेस औषधांची मदत घेतली तर हृदय, मूत्रपिंड, यकृत यांचं पक्षण करता येतं."
ज्या लोकांच्या घरामध्ये डायबेटिसने मागच्या पिढ्यांमध्येच प्रवेश केला केला आहे अशा लोकांना डायबेटिसचा धोका जास्त असतो. त्यांनी अधिक काळजी घेण्याची गरज आहे.
डॉ. शशांक शहा यांच्यामते "आई-वडिलांपैकी कोणालाही डायबेटिस असेल तर घरामध्ये साखर, बाहेरचे खाणे, गोड पदार्थ यांच्यात आधीपासूनच 50 टक्के कपात करता येईल. अशामुळे डायबेटिसचं येणं लांबवता येईल."
मधुहेमहतज्ज्ञ डॉ. किरण शहा यांच्यामते, "डायबेटिसचा इतिहास असणाऱ्या कुटुंबांनी मुलांच्या हालचालींवर विशेष लक्ष दिलं पाहिजे. अशा मुलांनी आधीपासूनच वजन कमी ठेवणं, व्यायाम करणं गरजेचं आहे."
लठ्ठ, डायबेटिक मुलांची काळजी कशी घ्यायची?
- सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुलांना भरपूर साखर असलेली पेय, पाकिटबंद ज्यूस, पाकिटबंद पदार्थ, प्रक्रिया केलेले पदार्थ यांच्यापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करावा.
- मुलांनी दररोज 45 ते 60 मिनिटे व्यायाम केला पाहिजे. फळांच्या रसाऐवजी फळं, मोड आलेली कडधान्यं, नट्स यांचा समावेश करता येईल
- भारतीय जेवणात कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण जास्त आहे. त्या आहारात प्रथिनांनाही जागा दिली पाहिजे. भाज्या- फळं अशा कच्च्या आहाराचं प्रमाण वाढवलं पाहिजे. साखर आणि गोड पदार्थ, चॉकलेट्सचं प्रमाण कमी केलं पाहिजे.
डॉ. हेमराज इंगळे सांगतात, "मुलांना विविध प्रकारची फळं आणि भाज्या खाण्याची सवय लावली पाहिजे. पण किती खातोय याकडे लक्ष दिलं पाहिजे. पालकांनी मुलांबरोबर जेवायला सुरुवात केली पाहिजे. त्यावेळेस टीव्ही किंवा कोणत्याही स्क्रीनचा वापर करू वये. फळं, भाज्या, दही असे पर्याय आहारात "ठेवता येतील. मुलांनी गोड पेयांऐवजी भरपूर पाणी प्यायलं पाहिजे, याकडे पालकांनी लक्ष द्यावं."
आहार आणि व्यायामाबरोबर झोपही तितकीच महत्त्वाची आहे असं डॉ. हेमराज इंगळे सांगतात. ते सांगतात, "झोपेची आणि सकाळी उठण्याची वेळ नियमित असावी. तसेच अगदी सुटीच्यादिवशीही त्यात बदल करू नये. झोपण्याआधी एक तास सर्व स्क्रीन्स बंद केल्या पाहिजेत. चांगली झोप येण्यासाठी मुलांना वाचन किंवा गरम पाण्याने अंघोळ अशा सवयी लावता येतील." तसेच डॉक्टरांचीही वेळीच मदत घ्यावी असं ते सांगतात.
जीवनशैलीमध्ये कोणताही महत्त्वाचा बदल करायचा असेल, आहारात बदल करायचा असेल तसेच शारीरिक व्यायामाची सुरुवात करायची असेल तर डॉक्टरांचा आणि योग्य प्रशिक्षकांची मदत घेणं आवश्यक आहे.
आपल्या शरीराची तसेच लक्षणांची योग्य तपासणी डॉक्टरांकडून करुन घेऊन त्यांच्या सल्ल्यानेच जीवनशैलीत बदल करणं योग्य आहे.
मुलांच्या शारीरिक मानसिक आरोग्यासाठी काय करायचं?
शाळा, क्लासेस, प्रवास तसेच इतर गोष्टींमुळे मुलांच्या खेळण्याचा वेळ कमी झाला आहे. शारीरिक हालचाल कमी होऊन मोबाईल आणि स्क्रीन वापरामुळे एकाच जागी बसून राहाणं, बैठी जीवनशैली वाढली आहे.
शालेय मुलांच्या आयुष्यात खेळ, शारीरिक व्यायाम यांचं अनन्यसाधारण महत्त्व आहे. यासाठी स्पोर्टस व्हिलेज या क्रीडासंस्थेशी आम्ही संपर्क केला.
या संस्थेचे सीईओ सौमिल मजमुदार म्हणाले,"केवळ बंद खोलीतच शिक्षण होतं असं नाही. मनोरंजनाचे खेळ, व्यायाम, प्रवास अशा विविध गोष्टींनीही मुलांचं शारीरिक, मानसिक विकास होत असतो."

फोटो स्रोत, Getty Images
सौमिल मजमुदार सांगतात, "जर योग्य शारीरिक मानसिक विकास नसेल तर विविध प्रकारची कौशल्यं विकसित होत नाहीत.
त्याचा आयुष्यावर दीर्घकाळ परिणाम होतो. शरीराची अयोग्य ठेवण असल्यामुळे होणारे आजार, टाईप टू डायबेटिस, लठ्ठपणा असे आजारही लहान मुलांमध्ये दिसू लागले आहेत."
ते पुढे म्हणाले,"मुलांच्या शारीरिक हालचाली, व्यायाम वाढावा यासाठी शाळांचीही विशेष भूमिका असते. खेळाचा तास आवश्यक असूनही अनेक शाळांमध्ये क्रीडा शिक्षक नसतात किंवा तेवढे महत्त्व त्याला दिले जात नाही.
शाळांनी त्यांचं वार्षिक वेळापत्रक ठरवताना या क्रीडा तासांचा विचार करुन नियोजन केलं पाहिजे. प्रत्येक मुलाची दररोज 40 मिनिटं शारीरिक हालचाल- व्यायाम होईल असं पाहिलं पाहिजे.
पालक-शिक्षकांच्या बैठकांमध्ये योग्य जीवनशैली, समतोल आहार आणि व्यायामाचं महत्त्व यावर चर्चा झाली पाहिजे. तसेच स्क्रीन टाइम कमी करण्याबद्दल चर्चा झाली पाहिजे."
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)











