एका मंदिरावरून थायलंड-कंबोडियामध्ये सुरू झाला वाद, नेमकं प्रकरण काय?

फोटो स्रोत, Getty Images
थायलंड आणि कंबोडिया हे दोन शेजारी देश सध्या सीमावादाच्या संकटात अडकले आहेत. एका जुन्या मंदिरावरून सुरू झालेला हा वाद आता लष्करी संघर्षात बदलल्याचे दिसत आहे.
दोन्ही बाजूंनी गोळीबार, हवाई हल्ले आणि आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरू असून परिस्थिती दिवसेंदिवस तणावपूर्ण होत आहे.
थायलंड-कंबोडिया सीमेवर सुरू असलेल्या लष्करी चकमकीत आतापर्यंत किमान 12 जणांचा मृत्यू झाला असून 14 जण जखमी झाले आहेत.
या चकमकीत लष्कराचा एक सैनिक आणि 11 सामान्य नागरिकांचा मृत्यू झाला आहे, असं थायलंडच्या आरोग्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. दोन्ही देशांनी एकमेकांवर पहिल्यांदा गोळी झाडल्याचा एकमेकांवर आरोप केला आहे.
ही घटना अशा वेळी घडली, जेव्हा एक दिवस आधी सीमेजवळ भूसुरूंग स्फोटात थायलंडचा एक सैनिक जखमी झाला होता. त्यानंतर थायलंडने कंबोडियातून आपला राजदूत परत बोलावला होता.
24 जुलैच्या सकाळपासूनच सीमेवर दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये गोळीबार सुरू आहे. थायलंडने कंबोडियाच्या लष्करी तळावर हवाई हल्ले केल्याचे सांगितलं आहे.
24 जुलैच्या सकाळी जेव्हा गोळीबार सुरू झाला, तेव्हा दोन्ही देशांनी एकमेकांवर पहिली गोळी झाडल्याचा आरोप केला आहे.
थायलंडने कंबोडियावर आरोप केला आहे की, त्यांनी थायलंडच्या गावांवर आणि रुग्णालयांवर रॉकेट हल्ले केले. तर थायलंडने कंबोडियाच्या काही ठिकाणी हवाई बॉम्बहल्ले केले आहेत.
कंबोडियाने थायलंडसोबतचे राजनैतिक संबंध कमी केले आहेत आणि थायलंडवर गरजेपेक्षा जास्त ताकद वापरल्याचा आरोप करत संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेकडे तातडीची बैठक बोलवण्याची मागणी केली आहे.
चीनने दोन्ही देशांना चर्चेद्वारे वाद मिटवण्याचं आवाहन केलं आहे आणि दोघांमध्ये निष्पक्ष मध्यस्थीची भूमिका निभावण्याची तयारी दर्शवली आहे.
कंबोडियाच्या संरक्षण मंत्रालयाचा आरोप
कंबोडियाच्या संरक्षण मंत्रालयाच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, 24 जुलैला सकाळी सुमारे 6.30 वाजता (स्थानिक वेळेनुसार) संघर्ष सुरू झाला.
थायलंडच्या सैनिकांनी पूर्वीच्या कराराचा भंग करत सीमेजवळ असलेल्या एका हिंदू मंदिराकडे हालचाल वाढवली आणि मंदिराभोवती काटेरी तारांचं कुंपण टाकलं, तेव्हा सीमेवर तणाव वाढला.
त्यानंतर थायलंडच्या सैनिकांनी सुमारे 7 वाजता एक ड्रोन सोडलं आणि सुमारे 8.30 वाजता हवेत गोळीबार केला.
कंबोडियाच्या संरक्षण मंत्रालयाच्या प्रवक्त्या माली सोचेटा यांनी 'फनम पेन्ह पोस्ट' या वृत्तपत्राला सांगितलं की, सकाळी 8.46 वाजता थायलंडच्या सैनिकांनी गोळीबार सुरू केला, ज्यामुळे कंबोडियन सैनिकांकडे आत्मसंरक्षणाशिवाय दुसरा कोणता पर्यायच उरला नाही.

फोटो स्रोत, Getty Images
सोचेटा यांनी थायलंडवर खूप मोठ्या संख्येने सैनिक तैनात केल्याचा, अवजड शस्त्रांचा वापर केल्याचा आणि कंबोडियाच्या हद्दीत हवाई हल्ले केल्याचा आरोप केला आहे.
कंबोडियाचे पंतप्रधान हुन मानेट यांनी त्यांच्या हातात आता प्रतिउत्तर देण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय उरलेला नसल्याचं म्हटलं आहे.
एका सोशल मीडिया पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं की, "कंबोडिया नेहमीच सर्व प्रश्न शांततेत चर्चा करून सोडवण्याच्या विचारावर विश्वास ठेवत आलं आहे. परंतु, सध्याच्या परिस्थितीत लष्करी आक्रमकतेला उत्तर देण्यासाठी लष्करी ताकद वापरण्याशिवाय आमच्याकडे दुसरा पर्यायच उरलेला नाही."
थायलंडचं म्हणणं काय आहे?
थायलंडच्या नॅशनल सिक्युरिटी काऊन्सिलच्या प्रवक्त्यांनी सांगितलं की, गुरुवारी सकाळी स्थानिक वेळेनुसार 7:30 वाजता कंबोडियाच्या सैन्याने सीमा भागात थायलंडच्या सैनिकांवर नजर ठेवण्यासाठी ड्रोन तैनात केले होते.
थोड्याच वेळात आरपीजीसह सुसज्ज कंबोडियन सैनिक सीमेजवळ जमा झाले. थायलंडच्या सैनिकांनी त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला, आरडाओरड करून बोलायचा प्रयत्न केला, परंतु तो प्रयत्न अयशस्वी ठरला.
प्रवक्त्यांनी सांगितलं की, सुमारे 08:20 वाजता कंबोडियन सैनिकांनी गोळीबार सुरू केला, त्यामुळे थायलंडच्या सैनिकांनाही प्रत्युत्तर म्हणून कारवाई करावी लागली.

फोटो स्रोत, Getty Images
थायलंडने कंबोडियावर बीएम-21 रॉकेट लाँचर आणि तोफखान्यासारखी अवजड शस्त्रं तैनात केल्याचा आरोप केला आहे.
या हल्ल्यामुळे सीमेजवळ असलेल्या घरांचं आणि सार्वजनिक इमारतींचं मोठं नुकसान झालं आहे, असं थायलंडचं म्हणणं आहे.
कंबोडिया-थायलंड सीमावादाचा इतिहास
या वादाचं मूळ शंभर वर्षांहून जुनं आहे. त्यावेळी फ्रेंच राजवटीनंतर कंबोडियाच्या सीमा ठरवण्यात आल्या होत्या.
जेव्हा कंबोडियाने वादग्रस्त भागात असलेल्या 11व्या शतकाच्या मंदिराला 2008 मध्ये युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साइट म्हणून नोंदवण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी दोन्ही देशांमधील परिस्थिती औपचारिकरित्या तणावपूर्ण झाली.
थायलंडने या निर्णयाला कडाडून विरोध केला. त्यानंतर दोन्ही देशांमध्ये अनेक वेळा चकमकी झाल्या, ज्यात सैनिकांसह सामान्य नागरिकांचाही मृत्यू झाला.

फोटो स्रोत, Royal Thai Army/Facebook
मे महिन्यात झालेल्या एका झटापटीत कंबोडियन सैनिकाचा मृत्यू झाल्यानंतर तणावात आणखी वाढ झाली. त्यानंतर दोन्ही देशांचे संबंध मागील दशकातील सर्वात खालच्या पातळीवर पोहोचले.
गेल्या दोन महिन्यांत दोन्ही देशांनी एकमेकांवर सीमा संबंधित काही निर्बंध लादले आहेत. कंबोडियाने थायलंडमधून फळं-भाज्यांसारख्या वस्तूंच्या आयातीवर बंदी घातली, तसेच वीज आणि इंटरनेट सेवा घेणंही बंद केलं आहे.
गेल्या काही आठवड्यांत दोन्ही देशांनी सीमेजवळील सैनिकांची संख्याही वाढवली आहे.
पुढे काय होऊ शकतं?
बीबीसीचे दक्षिण आशियाचे प्रतिनिधी जोनाथन हेड यांचं म्हणणं आहे की, हा संघर्ष पूर्ण युद्धात बदलेल यावर कोणाचाही विश्वास नाही. पण सध्या दोन्ही देशांमध्ये असा नेता दिसत नाही, ज्याच्याकडे हा तणाव कमी करण्याची ताकद आणि आत्मविश्वास आहे.
कंबोडियाची अर्थव्यवस्था सध्या गंभीर संकटात आहे. तेथील पंतप्रधान हे माजी सत्ताधारी नेत्यांचे पुत्र आहेत, आणि अद्याप त्यांची स्वतःची कोणतीही ठोस राजकीय पकड निर्माण झालेली नाही.
त्यांचे वडील हुन सेन आजही प्रभावशाली आहेत आणि असं वाटतं की, ते आपली राष्ट्रवादी भूमिका अधिक ठामपणे दाखवण्यासाठी हा संघर्ष पुढे नेण्यास तयार आहेत.
थायलंडकडे आपण पाहिलं, तर तिथं एक अस्थिर आघाडी सरकार आहे, ज्यामागे शक्तिशाली नेते ताकसिन शिनावात्रा आहेत.

फोटो स्रोत, Getty Images
ताकसिन शिनावात्रा आणि हुन सेन यांच्या कुटुंबांमध्ये वैयक्तिक संबंध आहेत. परंतु, हुन सेन यांनी खासगी संवाद उघड केल्यामुळे त्यांचा विश्वासघात केल्यासारखं वाटत आहे.
खासगी संवाद बाहेर पडल्यामुळे त्यांची मुलगी आणि पंतप्रधान पंतोगटर्न कॉर्नवाँग यांना घटनात्मक न्यायालयाने निलंबित केलं. त्यामुळे थायलंडच्या बाजूने प्रचंड नाराजी निर्माण झाली आहे.
आता आसियानमधील इतर सदस्य देश या तणावात हस्तक्षेप करतात का आणि दोन्ही देशांना तणाव कमी करण्यासाठी समजावून सांगतात का, हे पाहावं लागेल.
आसियानचं मुख्य उद्दिष्ट म्हणजे आपल्या सदस्य देशांमधील संघर्ष टाळणं. थायलंड आणि कंबोडियामधील वाद मिटवणं, हीच सध्या काही सदस्य देशांसाठी प्राथमिकता असेल.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.











