You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
अमेरिकेला भारताकडून गवारीची शेंग का हवी आहे? गवार गम काय असतं?
- Author, जान्हवी मुळे
- Role, बीबीसी प्रतिनिधी
गवारीच्या शेंगांची भाजी तुम्हीही खात असाल. पण गवार भारताला करोडो डॉलर्स मिळवून देते आणि अमेरिकेत त्याची मोठ्या प्रमाणात निर्यात होते, हे तुम्हाला माहिती आहे का?
गवार म्हणजेच क्लस्टर बीन्स भारतात भाजीसाठी वापरले जातात. पण या शेंगांमधल्या बियांपासून गवार गम हे उत्पादन तयार केलं जातं.
पावडरच्या स्वरुपातल्या गवार गमला मोठी मागणी आहे कारण वेगवेगळ्या उद्योगांत द्रावणाला घट्ट करणारं स्टॅबिलायझर आणि बाइंडर म्हणून याचा वापर होतो.
गवार गमचा सर्वाधिक वापर जीवाष्म इंधनाच्या उत्खननामध्ये होतो. विशेषतः शेल प्रकारच्या खडकांमधून फ्रॅकिंगद्वारा म्हणजे हायड्रॉलिक फ्रॅक्चरिंग प्रक्रियेद्वारा जमिनीतून गॅस आणि कच्चं तेल काढण्यासाठी याचा वापर होतो.
या प्रक्रियेत गवार गमसह अन्य पदार्थांचं मिश्रण दगडाच्या भेगांमध्ये सोडलं जातं, ज्यामुळे त्यातून तेलाचा प्रवाह सुरळीतपणे बाहेर येऊ शकतो.
पेट्रोलियम उद्योगाशिवाय अन्न, औषध, कागद आणि कापड उद्योग आणि सौंदर्य प्रसाधनांच्या उत्पादनात याचा वापर होतो. आणि भारत या गवार गमचा मोठा स्रोत आहे.
पाकिस्तान, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, चीन आणि आफ्रिकेतही गवारीची लागवड होते आहे. पण गवारीचं 80 टक्के उत्पादन भारतातहोतं, असं Apeda ची आकडेवारी सांगते. भारतातलं 72 टक्के गवार उत्पादन राजस्थानात होतं.
गुजरात, राजस्थान आणि हरियाणात तसंच महाराष्ट्रातही गवारीची लागवड केली जाते. तामिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटक, उत्तर प्रदेश आणि पंजाबमध्येही हे पीक घेतलं जातं.
गवारीला भरपूर सूर्यप्रकाश आणि मध्यम स्वरुपाच्या पावसाची गरज असते. भरपूर पाऊस पडला, तर झाडाला जास्त पानं येतातआणि शेंगांचा आणि बियांचा आकार मोठा होत नाही.
त्यामुळे मान्सूनच्या मध्यावर पावसाचा जोर थोडा कमी होतो तेव्हा, म्हणजे जुलै-ऑगस्टमध्ये गवारीची लागवड केली जाते आणि ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये त्याचं उत्पादन घेतलं जातं.
भारतातून वेगवेगळ्या स्वरुपात गवार आणि गवार गमची निर्यात होते.
APEDA च्या वेबसाईटवरील आकडेवारीनुसार 2023-24 साली भारतातून 4,17,674 मेट्रिक टन गवार गमची निर्यात झाली, ज्याची किंमत होते 54.165 कोटी अमेरिकन डॉलर्स.
भारत हा गवार गमचा सर्वात मोठा निर्यातदार आहे, तर अमेरिका हा सर्वात मोठा आयातदार आहे. त्याशिवाय जर्मनी, रशिया, नॉर्वे आणि नेदरलँड्समध्येही भारतातून गवारीची निर्यात होते.
2023-24 मध्ये भारतानं अमेरिकेला निर्यात केलेल्या गवार गमची किंमत होती 10.6 कोटी अमेरिकन डॉलर्स.
डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा सत्तेवर आल्यावर अमेरिकेतील तेल आणि नैसर्गिक वायू उद्योगांवरचे निर्बंध हटवले. त्यामुळे गवार गमला मोठी मागणी येईल अशी अपेक्षा केली जात होती.
पण ट्रम्प यांनी भारतावर टॅरिफ लावण्याचा निर्णय घेतल्यानं दोन्ही देशांमधल्या व्यापाराचं काय होणार, याविषयी संभ्रम निर्माण झाला आहे. गवार गमच्या बाजारपेठेवरही याचा परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जाते आहे.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.