You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
अर्शद नदीमः म्हैस, ऑल्टो आणि 15 कोटी रुपये, ऑलिंपिकवीराला काय काय मिळालं?
अर्शद नदीम हे नाव आता सर्वांनाच ठाऊक झालं आहे. भालाफेकीच्या अनेक जागतिक स्पर्धांमध्ये नीरज चोपडा जिथे पहिल्या क्रमांकवर असायचा, तिथेच पाकिस्तानचा अर्शद नदीम हा अनेकदा दुसऱ्या किंवा तिसऱ्या क्रमांकावर असायचा.
मात्र पॅरिस ऑलिंपिकमध्ये अर्शद नदीमने यंदा नीरज चोपडालाही मागे टाकलं, आणि थेट 92.97 मीटर दूर भाला फेकून जागतिक विक्रम प्रस्थापित केला. सोबतच जवळजवळ चार दशकांनंतर पाकिस्तानसाठी सुवर्णपदक पटकावलं.
म्हणूनच जेव्हा अर्शद पाकिस्तानात परतला, तेव्हा त्याचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं. विमानतळावर प्रचंड गर्दी तर होतीच, पण त्याच्या घरीही अनेक मोठ्या नेत्यांनी आणि मान्यवरांनी भेट देऊन त्याचा सत्कार केला.
पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी नदीमच्या सन्मानार्थ पंतप्रधान निवासात आयोजित एका कार्यक्रमात त्याचा सत्कार केला. तिथे त्याला 15 कोटी पाकिस्तानी रुपयांचे जाहीर केले.
यासोबतच शाहबाज शरीफ यांनी आणखी दोन मोठ्या घोषणा केल्या. “इस्लामाबादच्या F9 आणि F10 मधील रस्त्याला अर्शद नदीम रोड असे नाव देण्यात येत आहे. आणि मी जिना स्टेडियममध्ये अर्शद नदीम हाय परफॉर्मन्स अकादमी बांधण्याची घोषणा करतो.”
त्यापूर्वी, ज्या पंजाब प्रांताचा अर्शद नदीम मूळचा आहे, तिथल्या मुख्यमंत्री मरियम नवाज यांनीही अर्शदच्या घरी भेट देऊन त्याला 10 कोटी पाकिस्तानी रुपयांचे बक्षीस जाहीर केलं.
याशिवाय सिंध प्रांताच्या सरकारने अर्शद नदीमसाठी 5 कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर केलं आहे.
आता या कोटीच्या कोटी उड्डाणांशिवायही अर्शद नदीमवर बक्षिसांचा वर्षाव झाला आहे.
मरियम नवाज यांनी अर्शद नदीमला एक महागडी होंडा सिव्हिक गाडीही भेट दिली आहे. त्या गाडीची नंबर प्लेट खास अर्शदच्या विक्रमाच्या सन्मानार्थ 9297 अशी तयार करण्यात आली आहे.
शिवाय मरियम नवाज यांनी अर्शदचे प्रशिक्षक सलमान इकबाल यांच्यासाठीही 50 लाख रुपयांच्या बक्षिसाची घोषणा केली.
अर्शद नदीमच्या कामगिरीवर खुश होऊन अली शेखानी नावाच्या एका पाकिस्तानी अमेरिकन उद्योजकानेही त्याला एक सुझुकी ऑल्टो गाडी भेट देण्याची घोषणा केली आहे. मात्र या घोषणेनंतर अनेकांनी त्या उद्योजकाला ट्रोल केलं आहे.
आणि हो, आणखी एक खास गिफ्टही अर्शद नदीमला आल्याची बातमी आहे. अर्शद नदीमचे सासरे मुहम्मद नवाज यांनी ऑलिंपिक पदक विजेत्या जावई बापूला एक म्हैस भेट दिली आहे. आमच्या संस्कृतीत म्हैस ही अत्यंत मौल्यवान आणि सन्मानाची भेट समजली जाते, असं त्यांनी स्थानिक माध्यमांना सांगितल्याचं PTI वृत्तसंस्थेने म्हटलंय.
अर्शद नदीम याचं मुहम्मद नवाज यांची सर्वांत धाकटी मुलगी आएशा यांच्याशी 6 वर्षांपूर्वी लग्न झालं होतं.
अर्शद नदीमच्या या कामगिरीमुळे पाकिस्तानला पॅरिस ऑलिंपिक स्पर्धेत फक्त एकच पदक पटकावता आलं, ज्यामुळे अंतिम पदक तालिकेत पाकिस्तान 62व्या क्रमांकावर होता तर भारत सहा पदकांसह 71व्या क्रमांकावर.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.