You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
उत्तर प्रदेश : चोरीच्या संशयावरून दलित व्यक्तीला झाडाला उलटं टांगून मारहाण, नेमकं प्रकरण काय?
- Author, गौरव गुलमोहर
- Role, बीबीसी हिंदीसाठी, उत्तर प्रदेश, फतेहपूरहून
उत्तर प्रदेशच्या फतेहपूरमध्ये एका दलित व्यक्तीला झाडाला उलटं टांगून मारहाण झाल्याची घटना घडली आहे.
10 जुलैच्या रात्री ही घटना घडली. नरेश पासी नावाच्या एका दलित व्यक्तीला चोरी केल्याच्या आरोपावरून मारहाण करण्यात आली.
एका स्थानिक व्यक्तीने पोलिसांनी ही माहिती दिली.
या प्रकरणी विजय सिंह लोधी नावाच्या व्यक्तीने आरोप केला आहे की, त्यांनी संबंधित व्यक्तीला वाचविण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांनाही मारहाण करण्यात आली.
लोधी यांनीच या प्रकरणी एफआयआर दाखल केला आहे. त्याची प्रत बीबीसीकडेही आहे.
पोलिसांनी या प्रकरणी सहा आरोपींना अटक केली आहे.
या संपूर्ण घटनेबद्दल जाणून घेण्यासाठी आम्ही नरेश पासी यांच्या घरी पोहोचलो. ते खाटेवर झोपले होते. त्यांना वेदना होत होत्या, ते कण्हत होते.
10 जुलैच्या रात्री फतेहपूरच्या पिपरहा पुरवा गावातील 42 वर्षांच्या नरेश पासी यांना काही लोकांनी चोरी केल्याच्या संशयावरून झाडाला उलटं टांगून लाठ्या-काठ्यांनी मारहाण केली.
घटनेबद्दल पोलिसांना माहिती कशी मिळाली?
या घटनेची माहिती पोलिसांना देणारे विजय सिंह लोधी व्यवसायाने वकील आहेत.
विजय लोधी यांनी बीबीसीशी बोलताना म्हटलं की, "मी घरात झोपलो होतो. सरपंच नरेंद्र सिंह लोधी यांचा मला फोन आला. त्यांनी सांगितलं की काही लोक नरेश पासीला झाडाला बांधून मारहाण करत आहेत. तो मरून जाईल."
"मी तिथे जाऊन पाहिलं. नरेश पासीला झाडाला उलटं बांधून मारहाण केली जात होती. नरेशला बऱ्याच जखमा झाल्या होता. मी या घटनेचा व्हीडिओ करून सोशल मीडिया एक्सवर पोस्ट केला. फतेहपूर पोलीस आणि डायल 112 ला टॅग केलं."
या प्रकरणामुळे सामाजिक असंतोष उफाळून येऊ नये यासाठी पोलिसांनी हा व्हीडिओ त्यांच्या सोशल मीडियावरून हटवल्याचं विजय सिंह लोधींचं म्हणणं आहे.
पोलिसांनी काय सांगितलं?
या प्रकरणी पोलिसांनी सात ज्ञात आणि पाच अज्ञात लोकांविरोधात एससी/एसटी ॲक्ट आणि भारतीय न्याय संहितेच्या कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
खागा पोलिस ठाण्याचे प्रभारी राजेश सिंह यांनी बीबीसीशी बोलताना म्हटलं की, "आरोपींचे नातेवाईक पीडित इसमाला चोर म्हणत असले तरी पोलीस रेकॉर्डमध्ये तशी कोणतीही नोंद नाहीये. या प्रकरणी आतापर्यंत सहा जणांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणातील प्रमुख आरोपी राजेश लोधी मात्र फरार आहे."
खागामधील भाजप आमदार कृष्णा पासवान यांनी बीबीसीशी बोलताना म्हटलं की, आम्ही घटनेची माहिती घेतली आहे. एफआयआर दाखल करण्यात आला आहे. जे लोक यात सहभागी झाले होते, त्यांच्यावर या प्रकरणी कारवाई करण्यात आली आहे."
काय आहे संपूर्ण प्रकरण?
10 जुलैच्या रात्री सुमारे दहा वाजण्याच्या सुमारास नरेश पासी गावाबाहेरच्या आपल्या शेतात भात लावणीसाठी पाणी भरून परत येत होते. तेव्हाच त्यांना चार-पाच लोकांनी मागून पकडले.
नरेश पासी सांगतात, "ते लोक 'चोर-चोर' असं ओरडत होते. मला झाडाला बांधून मारहाण केली जात होती. मला जास्त आठवत नाही कारण मी बेशुद्ध पडलो होतो. मी हाता-पाया पडलो, पण त्यांनी मला सोडलं नाही."
"जेव्हा त्यांना वाटलं की मी मेलो आहे, तेव्हा त्यांनी मला सोडून दिलं."
नरेश पासी आरोप करतात, "आम्ही बउहाई का पुरवा गावातून इथे पिपरहा पुरवा गावाबाहेर शेतात राहायला आलोय, तेव्हापासून लोधी समाजाचे लोक आमच्यावर नाराज आहेत. काही तरुण आमच्या घरासमोर गाड्या घेऊन येतात आणि शिव्या देऊन निघून जातात."
नरेशची पत्नी अनिताचं काय आहे म्हणणं?
नरेश पासी हे खंडाने घेतलेलं शेत कसून आणि मजूरी करून घरखर्च चालवतात.
त्यांच्या पत्नी अनिता देवी सांगतात, "त्या दिवशी पोलिस माझ्या नवऱ्याला घेऊन घरी आले तेव्हा मी त्यांना ओळखूच शकले नाही. ते बेशुद्ध अवस्थेत होते. काय करावं तेच मला समजत नव्हतं. फतेहपूर जिल्हा रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर ते आता सात दिवसांनी घरी आले आहेत."
"गावात राहणाऱ्यांमध्ये लोधी जातीच्या लोकांचं प्रमाण जास्त आहे. तीन वर्षांपूर्वीही अशाच पद्धतीनं माझ्या नवऱ्याला मारहाण करण्यात आली होती आणि मला शिव्याही देण्यात आल्या होत्या. आमचं डुक्कर त्यांच्या शेतात गेलं एवढंच कारण त्यामागे होतं," असा आरोप अनिता देवी करत होत्या.
"त्यानंतर आम्ही डुक्कर पाळणं बंद केलं. त्यांच्या घराजवळ पासी लोकांनी राहू नये असं त्यांना वाटतं," त्या पुढे म्हणाल्या.
फतेहपूर लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेले समाजवादी पक्षाचे खासदार नरेश उत्तम पटेल बीबीसीशी बोलताना म्हणाले, "सरकारच्या निष्काळजीपणामुळेच संपूर्ण भागात दलितांविरोधात अशा घटना घडत आहेत. सरकारकडून आरोपींना शिक्षा दिली जात नाही. सरकार पक्षपाती वागणूक देत आहे."
नरेश पासी सांगतात की, गावातल्या तलावात त्यांच्या नावे मत्स्यपालनाचा पट्टा आहे. पण तलावाच्या पाण्यावरून रोजच वाद होत असतो.
"तलावाचं पाणी काढून ते शेतीसाठी वापरतात, मासे काढून घेऊन जातात. मी काही बोललो तर मला शिव्या देऊ लागतात. तलावातून पाणी काढलं तर मासे कसे जिवंत राहतील?"
समाजवादी पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र सिंह यादव आरोप करतात की, "हा पट्टा मिळाल्यानेच काही लोकांना नरेश यांचा हेवा वाटत होता. फरार आरोपीवर 25 हजारांचं बक्षिस जाहीर केलं गेलं आहे."
आरोपीचे कुटुंबीय काय सांगतात?
या प्रकरणामध्ये अर्जून लोधी यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्या पत्नी निर्मला लोधी सांगतात की, "नरेश पासी चोरी करत असताना लोकांनी त्याला पकडलं. गावातील लोकांनी मारहाण केली. माझा नवराही गावातल्या लोकांसोबत होता. पण त्यांना यात फसवून अडकवलं गेलं."
घटनास्थळापासून काही अंतरावर राहणाऱ्या रामकली म्हणतात, "गोंधळ सुरू असल्याचा आवाज आल्यावर त्या रात्री मीही तिथे गेले. गावातले अनेक लोक तिथे आले होते. नरेश पासी भिंतीतून पेटी बाहेर काढत होता. तेवढ्यात खटपट आवाज झाला आणि सगळे उठले. मग तो पकडला गेला."
रामकलीही अर्जून लोधी यांच्याच नातेवाईक आहेत.
पण जी विटांची भिंत फोडल्याचा दावा लोधी परिवाराशी संबंध असलेले करत आहेत ती जागा पेटी बाहेर काढता येईल एवढी मोठी नाही.
गावाचे सरपंच नरेंद्र सिंह लोधी सांगतात, "नरेश पासी याला चोरी करताना पकडलं गेलं आहे. यापूर्वीही अनेकदा त्याला चणे, लाह्या आणि गहू चोरी करताना पकडलं गेलं आहे. यावेळी पकडला गेला तेव्हा लोक अतिशय रागात होते. काही जण तर नशेत होते."
पण नरेश यांच्या नावे पोलिसांकडे कोणताही गुन्हा नोंदवला नसल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे.
सरकारी योजनांचाही मिळाला नाही लाभ
नरेश पासी यांच्या कुटुंबात पाच सदस्य आहेत. उज्ज्वला योजनेतंर्गत मिळणारा गॅस सिलेंडर सोडला तर इतर कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ त्यांना मिळालेला नाही.
वीज जोडणीसाठी अर्ज केला असल्याचं नरेश सांगत होते. पण अजूनपर्यंत वीज आली नाही. अनिता देवी यांना त्यांचा मोबाईल चार्ज करायला दुसऱ्या गावी जावं लागतं.
"आत्तापर्यंत आम्हाला कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ मिळालेला नाही. शौचालयही मिळालं नाही आणि हातपंपही नाही," अनिता देवी सांगत होत्या.
"पाणी आणण्यासाठी आम्ही अर्धा किलोमीटर दूर चालत जातो आणि दुसऱ्या गावात जाऊन मोबाईल चार्ज करून आणतो. कर्ज काढून ट्रॅक्टर घेतला आहे. पण आता तो चालवणार कोण? आम्ही कर्ज कसं फेडणार?"
"आत्तापर्यंत आवास योजनेतून एखादं घरही मिळालेलं नाही. गावाचे सरपंच लोधी आहेत. आम्ही दलित आहोत. त्यामुळे सरकारकडून आलेला कोणताही लाभ ते आम्हाला मिळू देत नाहीत," असा आरोप नरेश पासी करतात.
गावाचे सरपंच नरेंद्र सिंह लोधी सरकारी लाभ न मिळण्यामागे माजी सरपंच आणि नरेश पासी यांना जबाबदार धरतात.
बीबीसीशी बोलताना त्यांनी म्हटलं, "माजी सरपंचांनी कोणताही सरकारी लाभ दिला नाही त्यामुळे तो मिळाला नाही. त्यात नरेश पासी जंगलात जाऊन रहात होते. तिथे लाभ कसा मिळणार?"
'हर घर नल' या पाणी योजनेतंर्गत त्यांच्या घरापर्यंत आली आहे, त्यांनी कनेक्शन घेतलं नसेल. राहता राहिला घराचा प्रश्न. तर त्यासाठी नरेश पासीने कधीच प्रयत्न केलेला नाही."
आकडेवारी काय सांगते?
उत्तर प्रदेशमध्ये दलितांवर होणाऱ्या अत्याचारांच्या संख्येत सतत वाढ होताना दिसत आहे.
राष्ट्रीय गुन्हे अन्वेषण विभागानुसार (एनसीआरबी) अनुसूचित जातीच्या लोकांवर होणाऱ्या अत्याचारांची संख्या वाढली आहे.
उत्तर प्रदेशात 2022 साली अनुसूचित जातींविरोधातल्या अत्यांचारांची 15,368 प्रकरणं नोंदवण्यात आली होती.
उत्तर प्रदेशात नोंदवलेली ही आकडेवारी इतर सर्व राज्यांपेक्षा सर्वाधिक आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)