लैंगिक हेतूशिवाय फक्त 'आय लव्ह यू' म्हटल्यानं 'लैंगिक छळ' होत नाही – हायकोर्ट

लैंगिक हेतूशिवाय फक्त 'आय लव्ह यू' म्हटल्यानं लैंगिक छळ होत नाही – हायकोर्ट

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, भाग्यश्री राऊत
    • Role, बीबीसी मराठीसाठी

कुठल्याही लैंगिक हेतूशिवाय फक्त आयलव्हयू म्हटल्यानं लैंगिक छळाचा उद्देश स्पष्ट होत नाही असं म्हणत मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठानं पोक्सोअंतर्गत दाखल असलेला गुन्हा रद्द केला आहे.

न्यायमूर्ती उर्मिला जोशी फाळके यांनी हे निरीक्षण नोंदवलं आहे.

पण, हे प्रकरण नेमकं काय आहे? कोर्टानं निकाल देताना यामध्ये आणखी काय निरीक्षणं नोंदवली आहेत? पाहुयात.

नेमकं प्रकरण काय आहे?

हायकोर्टाच्या आदेशात दिलेल्या माहितीनुसार, पीडित अल्पवयीन मुलगी ही नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्यातील खापा गावात राहत होती. 23 ऑक्टोबर 2015 मध्ये ती शाळेतून आपल्या चुलत बहिणीसोबत घरी परतत असताना आरोपीनं एका शेताजवळ तिच्यासोबत बोलण्याचा प्रयत्न केला.

यावेळी आरोपीनं तिचा हात पकडला आणि तुझं नाव सांगत नाही तोपर्यंत हात सोडणार नाही असं म्हटलं. तसेच तिला तिथेच तो 'आय लव्ह यू' देखील म्हणाला. त्यानंतर मुलीनं घरी जाऊन घडलेला सगळा प्रकार आपल्या वडिलांना सांगितला. त्यानंतर वडिलांनी काटोल पोलीस ठाणे गाठून आरोपीविरोधात तक्रार दाखल केली.

लैंगिक हेतूशिवाय फक्त 'आय लव्ह यू' म्हटल्यानं 'लैंगिक छळ' होत नाही – हायकोर्ट

फोटो स्रोत, Getty Images

हा आरोपी सुद्धा त्याच गावातला रहिवासी होता. पोलिसांनी आरोपीविरोधात 354 अ, 354 ड आणि पोक्सो कायद्याच्या कलम 8 अंतर्गत गुन्हा दाखल केला. तसेच साक्षीदारांची साक्ष गोळा करून प्रकरणाचा तपास करून पोलिसांनी आरोपीविरोधात आरोपपत्र दाखल केलं. त्याआधारे सत्र न्यायालयानं 18 ऑगस्ट 2017 रोजी आरोपीवर आरोप निश्चित करून त्याला तीन वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा, पाच हजार रुपयांचा दंडाची शिक्षा ठोठावली होती.

परंतु, आरोपीनं सत्र न्यायालयाच्या आदेशाला हायकोर्टात आव्हान दिलं.

हायकोर्टात काय घडलं?

आरोपीसोबत आधीच वाद झाला होता. त्यामुळे त्याला या प्रकरणात गोवण्यात आल्याचा युक्तीवाद आरोपीच्या वकील सोनाली खोब्रागडे यांनी केला होता. तसेच कलम 354 अ अंतर्गत गुन्हा सिद्ध करण्यासाठी पक्षाकडे कुठलेही पुरावे नाहीत.

आरोपीनं लैंगिक हेतून किंवा लैंगिक संबंधाची मागणी किंवा विनंती किंवा सेक्शुअल टिप्पणी करत शरीराला स्पर्श केला होता का? हे फिर्यादी पक्षाला सिद्ध करावे लागेल. पण, या प्रकरणात असं काहीच नाही. तसेच पीडितेनं नकार दिल्यानंतर आरोपी तिच्या वारंवार मागे लागला, असंही काही घडलं नाही.

लैंगिक हेतूशिवाय फक्त 'आय लव्ह यू' म्हटल्यानं लैंगिक छळ होत नाही

फोटो स्रोत, Getty Images

त्यामुळे कलम 354 ड अंतर्गत देखील आरोप सिद्ध होत नाहीत. कोणत्याही लैंगिक हेतूशिवाय घडलेली कृती केवळ भावनात्मक संवाद होता. हा गुन्हा नव्हता, असा युक्तीवाद आरोपीच्या वकील सोनाली खोब्रागडे यांनी केल्याचं बीबीसी मराठीला सांगितलं.

तसेच हायकोर्टानं फिर्यादी पक्षाचीसुद्धा बाजू ऐकून घेतली. फिर्यादी पक्षानं साक्षीदाराचे जबाब सादर केले होते.

दोन्ही बाजूंचे युक्तीवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायमूर्ती उर्मिला जोशी फाळके यांनी निकाल दिला.

हायकोर्टानं निकाल देताना काय म्हटलं?

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

हायकोर्टाच्या ऑर्डर कॉपीत म्हटल्यानुसार, 'एखाद्या व्यक्तीच्या मनात काय आहे, त्याचा नेमका उद्देश काय आहे हे समजून घेण्यासाठी आजूबाजूच्या परिस्थितीचा आढावा घ्यायला लागतो.'

जर एखादी व्यक्ती प्रेमात असल्याचं सांगत असेल किंवा आपल्या भावना शब्दातून व्यक्त करत असेल तर त्याचा हेतू लैंगिक हेतू आहे असं म्हणता येणार नाही. एखादी व्यक्ती लैंगिक हेतूनं कुठले शब्द म्हणत असेल तर त्याला लैंगिक छळाच्या श्रेणीत जोडता येईल. पण, कायद्यानं अपेक्षित असलेल्या लैंगिक हेतूशिवाय फक्त आयलव्हयू म्हणणे हे लैंगिक छळाच्या हेतूनं म्हटलेलं आहे असं म्हणता येणार नाही.

हे शब्द जर लैंगिक हेतूनं उच्चारलेले आहेत असं मानायचं असेल तर असा हेतू फक्त शब्दातून नव्हे तर वर्तवणुकीतूनही दिसणं गरजेचं आहे.

फिर्यादी पक्षानं दाखल केलेल्या पुराव्यावरून आरोपीचा कुठलाही लैंगिक हेतू होता हे दिसत नाही. आरोपीच्या डोळ्याच्या हालचाली किंवा शरीराच्या हालचालीवरून लैंगिक छळाचा हेतू होता असं पुराव्यावरून दिसत नाही. तसेच संबंधित शब्द हे वारंवार म्हटलेले नाहीत. फक्त एकदाच त्या शब्दांचा उच्चार केलेला आहे.

लैंगिक हेतूशिवाय फक्त 'आय लव्ह यू' म्हटल्यानं लैंगिक छळ होत नाही

फोटो स्रोत, Getty Images

पॉक्सो कायद्याच्या कलम 8 अंतर्गतही गुन्हा दाखल होऊ शकत नाही.कारण, अशी कुठलीही तक्रार नाही की आरोपीनं लैंगिक हेतूनं पीडितेच्या खासगी अवयवांना स्पर्श केला आहे, असंही हायकोर्टानं म्हटलेलं आहे.

सत्र न्यायालयानं पोक्सो कायद्यातील कलम 7 अंतर्गत दिलेल्या लैंगिक छळाच्या व्याख्येचा विचार केला नाही, तसेच कलम 8 अंतर्गत दिलेल्या शिक्षेचा अर्थ न समजता आरोपीला दोषी ठरवलं आहे जे की चुकीचं आहे. त्यामुळे आरोपीविरोधात भारतीय दंडसंहिता कलम 354 अ आणि 354 ड तसेच पॉक्सो कलम 8 अंतर्गत कुठलाही गुन्हा सिद्ध होत नाही, असं म्हणत हायकोर्टानं आरोपीविरोधातील गुन्हा रद्द केला.

याबद्दल आम्ही पीडितेची बाजू मांडणारे सरकारी वकील एम. जे. खान यांच्यासोबत संपर्क साधला. आता या प्रकरणात हायकोर्टाच्या आदेशात काय त्रुटी आहेत हे बघून सुप्रीम कोर्टात आव्हान करायचं की नाही हे आम्ही ठरवत आहोत.

आरोपीनं हात धरून आय लव्ह यू म्हटलं होतं. त्यामुळे त्याचा काहीतरी वाईट हेतू होता. त्याचे पुरावेसुद्धा आम्ही हायकोर्टात दिले. पण, हायकोर्टाला ते पुरावे पुरेसे वाटले नाही. हायकोर्टानं हे प्रकरण इतकं गांभीर्यानं घेतलं नाही, असंही ॲड. एम. जे. खान म्हणाले.

कायदेतज्ज्ञांना काय वाटतं?

या प्रकरणात अश्लील कृती नाहीये, तर त्यानं फक्त शब्दांमधून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत, असं सुप्रीम कोर्टाचे वकील राकेश राठोड यांना वाटतं.

ते म्हणतात, आम्ही कायद्यानं बांधलेलो असतो. या प्रकरणात कोर्टाचं म्हणणं असं आहे की फक्त 'आय लव्ह यू' असे शब्द त्या तरुणानं वापरले आहेत. आयलव्हयू हे प्रेम व्यक्त करण्यासाठी वापरतात. इथे कुठलीही अश्लील गोष्ट घडलेली नाही.

लैंगिक हेतूशिवाय फक्त 'आय लव्ह यू' म्हटल्यानं लैंगिक छळ होत नाही

फोटो स्रोत, Getty Images

त्यानं शब्दांद्वारे आपल्या फक्त भावना व्यक्त केलेल्या आहेत. जर एफआयआरमध्ये असतं की त्या तरुणानं अश्लील कृत्य केलं किंवा तिच्या खासगी अवयवांना स्पर्श केला असं असतं तर मग गुन्हा होऊ शकला असता. पण, त्या तरुणानं अशी कुठलीही कृती केलेली नाही, फक्त 'आय लव्ह यू' म्हणाला. त्यामुळे हायकोर्टानं असा निर्णय दिलेला आहे. अशा प्रकरणांमध्ये पोलिस एफआयआरमध्ये कुठले सेक्शन लावतात त्यावर पुढच्या सगळ्या गोष्टी अवलंबून असतात.

तर पोक्सोच्या अनेक प्रकरणांमध्ये कायदेशीर बाजू मांडणाऱ्या ॲड. भाग्येशा कुरणे म्हणतात, एखाद्याला 'आय लव्ह यू' म्हटलं तर लैंगिक छळ होत नाही हे अगदी बरोबर आहे. कारण, त्यानं फक्त भावना व्यक्त केली. 'आय लव्ह यू' म्हणतो तेव्हा फक्त भावना व्यक्त करतो. प्रत्येकवेळी त्याला लैंगिक हेतूच्या दृष्टीनं बघणं बरोबर नाही. लैंगिक हेतूनं त्यानं काही म्हटलेलं नाही हे निरीक्षण बरोबर आहे. पण, एखाद्या मुलीचा तिची परवानगी न घेता हात पकडणं हा सुद्धा गुन्हा आहे. त्यामुळे थोडी शंका वाटते.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)