झोपेत वीर्यपतन होणं हे वंध्यत्वाचं लक्षण आहे का? जाणून घ्या वैज्ञानिक सत्य

    • Author, ए नंदकुमार
    • Role, बीबीसी तमिळ

झोपेत असताना वीर्यपतन होणे याला स्वप्नदोष किंवा इंग्रजीत 'वेट ड्रीम्स' असं म्हणतात.

अनेक पुरुषांना असं वाटतं की, झोपेत होणारं स्खलन हे त्यांच्या वंध्यत्वाचं पहिलं लक्षण असू शकतं किंवा यामुळे त्यांच्या शरीरातील शुक्राणूंची संख्या कमी होऊ शकते.

डॉक्टरांना मात्र झोपेत होणारं वीर्यपतन ही एक सामान्य घटना असल्याचं वाटतं.

जागतिक आरोग्य संघटनेचं असं म्हणणं आहे की, तरुण मुलं वयात येतात तेव्हा त्यांच्या शरीरातील टेस्टेस्टेरॉनची पातळी वाढते, यामुळे झोपेत स्वप्नदोष होऊ शकतो.

याबाबत विज्ञान आणि संशोधनात नेमकं काय सांगितलंय?

लैंगिक स्वप्नं

'सेक्स ड्रीम्स, वेट ड्रीम्स आणि नॉक्टर्नल एमिशन्स' असं शीर्षक असणाऱ्या एका अभ्यासात हाँगकाँगमधील शु येन विद्यापीठातील संशोधकांनी स्वप्नदोष नेमका का होतो? यावर संशोधन केलं.

या अभ्यासात सहभागी झालेल्यांपैकी 80 टक्के लोकांनी असं सांगितलं की, झोपेत असताना लैंगिक स्वप्नं पडल्यामुळं वीर्यपतन होतं. असं मानलं जातं की, शाळकरी किंवा कॉलेजवयीन मुलांना वारंवार अशी स्वप्नं पडू शकतात. पण या अभ्यासातून असं दिसून आलं की, त्यांना वर्षातून सरासरी 9 वेळा अशी स्वप्नं पडतात.

तुम्ही रोज जो विचार करता, तुमच्या ज्या काही इच्छा असतात त्यावरच तुम्हाला कोणत्या प्रकारची स्वप्नं पडतात हे ठरतं असा एक रूढ समज आहे. पण या अभ्यासाने याच समजुतीला आव्हान दिलं आहे.

सेक्स हा माणसांच्या आयुष्याचा महत्त्वाचा भाग असला, तरी सेक्सशी संबंधित स्वप्नं फारशी पडत नाहीत, असं यात सांगितलं गेलंय.

सेक्सोलॉजिस्ट डॉ. कामराज म्हणतात, "पुरुषांचं शरीर नैसर्गिकरित्या सतत शुक्राणूंची निर्मिती करत असतं. लैंगिक संभोग किंवा हस्तमैथुनाद्वारे स्खलन न झाल्यास, शरीरात साठवलेले शुक्राणू झोपेच्या वेळी आपोआप बाहेर पडतात. ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे."

डॉ. भूपती जॉन म्हणतात, "ज्याप्रमाणे स्त्रियांना मासिक पाळी येते, त्याचप्रमाणे पुरुषांनाही स्खलन होतं. पण काळानुसार पसरलेल्या मिथकांमुळे वीर्य आणि पुरुषांच्या शक्तीचा संबंध जोडला गेला आहे आणि यामुळे अनेक अफवा पसरतात."

पुरुषांना वंध्यत्व येऊ शकतं का?

चीनमधील टोंगजी मेडिकल कॉलेजच्या संशोधकांनी यूएस नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिन या वेबसाईटवर प्रकाशित केलेल्या अहवालात एका अभ्यासाचा दाखला देण्यात आलाय. या अभ्यासात इडिओपॅथिक एनेजॅक्युलेशन असलेल्या पुरुषांच्या वीर्य नमुन्यांची तुलना निरोगी पुरुषांच्या वीर्य नमुन्यांशी करण्यात आली.

इडिओपॅथिक अ‍ॅनेजॅक्युलेशन म्हणजे एखाद्या पुरुषाला वीर्यपतनात अडचण येते आणि त्याचं मानसिक किंवा शारीरिक कारण सापडत नाही.

या अभ्यासात असं म्हटलंय की, इडिओपॅथिक अ‍ॅनेजॅक्युलेशनमुळे 72 टक्के पुरुषांना वंध्यत्वाची समस्या उद्भवते. इडिओपॅथिक एनेजॅक्युलेशनचा त्रास असणाऱ्या पुरुषांना लैंगिक संभोग करताना किंवा लैंगिक उत्तेजनाच्या वेळी वीर्यपतनात अडचण येते. मात्र झोपेत असताना त्यांना स्वप्नदोष होऊ शकतो.

या संशोधनासाठी झोपेत स्खलनाची समस्या असणाऱ्या किंवा इडिओपॅथिक अ‍ॅनेजॅक्युलेशनचा त्रास असणाऱ्या 91 व्यक्तींचं वीर्य गोळा करण्यात आलं.

या अभ्यासात असं दिसून आलं की, झोपेत झालेल्या स्खलनामध्ये आढळून आलेले शुक्राणू 30.6 टक्के अधिक गतिशील होते आणि इतर प्रक्रियेतून मिळालेल्या शुक्राणूंपेक्षा त्यांचा आकार 61.4 टक्क्यांनी मोठा होता.

या अभ्यासातून असं आढळलं की, इडिओपॅथिक एनेजॅक्युलेशन असलेल्या पुरुषांमध्ये निरोगी शुक्राणू असतात आणि ते झोपेच्या वेळी नैसर्गिकरित्या बाहेर पडतात.

झोपेत होणाऱ्या स्खलनाची वेळ निश्चित नसल्याने या प्रयोगात भाग घेतलेल्या पुरुषांना तीन महिन्यांसाठी झोपताना कंडोम घालून झोपण्यास सांगितलं गेलं होतं, असं या अहवालात स्पष्ट करण्यात आलं आहे.

अमेरिकन कॉलेज ऑफ ऑब्स्टेट्रिशियन्स अँड गायनॅकॉलॉजिस्टनं ऑनलाइन प्रकाशित केलेल्या एका अभ्यासात सायकोजेनिक इरेक्टाइल डिसफंक्शन असलेल्या पुरुषांच्या झोपेतून बाहेर पडणाऱ्या वीर्याची त्यांच्या जोडीदाराला फलित करण्याची क्षमता तपासण्यात आली.

झोपेच्या वेळी बाहेर पडणाऱ्या वीर्याची गुणवत्ता वेगवेगळी असू शकते. या अभ्यासातून असं सूचित होतं की, हे वीर्य कृत्रिम गर्भधारणा उपचारांमध्ये (आर्टिफिशियल प्रेग्नन्सी ट्रीटमेंटमध्ये) वापरलं जाऊ शकतं आणि यामुळे इलेक्ट्रोइजॅक्युलेशन किंवा अंडकोषातून थेट शुक्राणू काढण्याची वेदनादायक प्रक्रिया टाळता येऊ शकते.

डॉ. कामराज म्हणतात, "12 वर्षांच्या मुलांपासून ते वृद्धांपर्यंत कुणालाही स्वप्नदोषाचा त्रास होऊ शकतो. अशाप्रकारे वीर्यपतन झाल्याने पुरूषाला वंध्यत्व येते किंवा शुक्राणूंची संख्या कमी होते असं म्हणणं अवैज्ञानिक आहे."

"वीर्यपतनानंतर, शरीरात नवीन शुक्राणू तयार होतात. झोपेत वीर्यपतन किंवा हस्तमैथुन केल्याने गर्भधारणेवर परिणाम होत नाही."

स्वप्नदोष का होतो?

डॉ. भूपती जॉन म्हणतात, "व्यक्तीच्या शरीरात तयार होणारे शुक्राणू सेमिनल व्हेसिकल नावाच्या भागात साठवले जातात. ज्याला मराठीत वीर्यकोश किंवा शुक्राशय असं म्हणतात. शुक्राणूंच्या निर्मितीचा दर व्यक्तीपरत्वे बदलतो. ज्याप्रमाणे पाण्याची टाकी भरल्यावर त्यातून पाणी बाहेर पडते, त्याचप्रमाणे स्खलन होते."

डॉ. कामराज यांच्या मते स्वप्नदोषामुळे एखाद्या व्यक्तीच्या शरीरात काही आजार असेलच असं नाही. ते पुढे म्हणतात, "या विषयावर अनेक अभ्यास करण्यात आले, पण स्वप्नदोष होण्याची कारणं अजूनही समजू शकलेली नाहीत."

"एखाद्या व्यक्तीला पडलेल्या लैंगिक स्वप्नामुळे किंवा अचानक तयार झालेल्या शारीरिक उत्तेजनेमुळे असं घडू शकतं. स्वप्नदोषामुळे पुरुषाची शारीरिक शक्ती कमी होते. त्यांच्या शुक्राणूंच्या संख्येवर किंवा सेक्स करण्याच्या क्षमतेवर परिणाम होतो, असं काहीही नाही."

कामराज म्हणतात, "हस्तमैथुन किंवा स्वप्नदोषामुळे वीर्य बाहेर पडतं आणि खरंतर तुमचं शरीर सामान्य पद्धतीने काम करत आहे याचंच हे देखील एक लक्षण म्हणता येईल."

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)