युरोपमधील उत्तर मॅसेडोनियातील नाईट क्लबमध्ये लागलेल्या आगीत 59 जणांचा मृत्यू

फोटो स्रोत, Social media
- Author, रेचल हेगन
- Role, लंडनहुन वार्तांकन
युरोपमध्ये असलेल्या उत्तर मॅसेडोनिया देशातील एका नाईट क्लबला लागलेल्या आगीत किमान 59 जण ठार झाले असून 155 हून अधिक होरपळून जखमी झाल्याची माहिती स्थानिक अधिकाऱ्यांनी दिली.
ही आग आज (16 मार्च) पहाटे 3 (02:00 GMT) च्या सुमारास कोचानी शहरातील पल्स क्लबमध्ये लागल्याचं सांगितलं जात आहे. हे शहर राजधानी स्कॉपिएच्या पूर्वेस सुमारे 100 किमी (60 मैल) अंतरावर आहे.
उत्तर मॅसेडोनिया किंवा द रिपब्लिक ऑफ नॉर्थ मॅसेडोनिया या देशाची सीमा ग्रीसला लागून आहे. या देशाची लोकसंख्या अंदाजे 19 लाख आहे.
सोशल मीडियावर प्रसारित व्हिडिओंमध्ये आगीचे रौद्र रूप दिसून येतं. या भीषण घटनेत संपूर्ण इमारत आगीच्या ज्वाळांनी वेढलेली दिसत आहे.
या क्लबमध्ये त्या वेळी देशातील लोकप्रिय हिप-हॉप स्टारजोडी एडीएन (AND) चा कॉन्सर्ट सुरू होता. यात जवळपास 1500 लोकांची उपस्थिती होती, अशी माहिती आहे.


स्थानिक माध्यमांच्या माहितीनुसार, ही आग कदाचित पटाखे किंवा इतर आतशबाजींमुळे लागली असण्याचा अंदाज आहे.
सदर व्हिडिओ फुटेजमध्ये स्टेजवरून उठलेल्या ठिणग्या छताला लागून आग वेगानं पसरल्याचं दिसत आहे. घटनेप्रकरणी काहींना अटक करण्यात आल्याचं गृहमंत्री पांसे तोस्कोवस्की यांनी सांगितलं.

फोटो स्रोत, Reuters
पंतप्रधान ख्रिस्तियान मिकोसकी यांनी फेसबुक पोस्टद्वारे एक पोस्ट करत म्हटलं की, "सरकार सतर्क असून या दुर्घटनेच्या कारणांचा तपास करण्यासाठी आणि परिस्थिती हाताळण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करेल."
'देशासाठी हा अत्यंत कठीण आणि दु: खद दिवस', असल्याची भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली. या घटनेत देशानं अनेक तरुण होतकरू युवक गमावले', असंही त्यांनी नमूद केलं.
दरम्यान, 90 जखमी रुग्णांना कोचानी येथील रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आलं असून यापैकी अनेकजण गंभीररीत्या होरपळले आहेत. तर, काही जखमींना पुढील उपचारांसाठी स्कॉपिए येथील रुग्णालयात हलवण्यात आलं आहे.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.











