अथर्व सुदामे : हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश असलेली रील बनवली म्हणून व्हावे लागले ट्रोल

कंटेट क्रिएटर अथर्व सुदामे याने गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर केलेल्या एका रिलवरुन सध्या जोरदार चर्चा सुरु आहे.

एका मुस्लीम मूर्तिकाराकडून मूर्ती विकत घेण्यासंदर्भात असलेलं हे रिल धर्मनिरपेक्षता आणि सर्वधर्मसमभावाला प्रोत्साहन देणारं होतं.

त्याने शेअर केलेल्या या रिलवर ब्राह्मण महासंघासहित काहींनी आक्षेप घेतला, शिवीगाळ केली आणि धमकीही दिली.

त्यानंतर, अथर्व सुदामे याने एका व्हीडिओच्या माध्यमातून माफी मागत आपण ते रिल डिलीट केल्याचं सांगितलं.

नेमकं हे रिल काय होतं, त्यावर आक्षेप कुणी आणि का घेतला आणि हिंदू-मुस्लीम ऐक्याचा पुरस्कार करणाऱ्या कलाकृतींना विरोध का होतोय, ते पाहूयात.

अथर्व सुदामेच्या रिलमध्ये काय होतं?

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कंटेट क्रिएटर अथर्व सुदामे याने 'मूर्ती एक, भाव अनंत' अशा शीर्षकाचं एक रिल शेअर केलं होतं.

एका मुस्लीम मूर्तिकाराकडून गणपतीची मूर्ती विकत घेण्याचा प्रसंग या रिलमध्ये चित्रित करण्यात आला आहे.

मुस्लीम मूर्तिकाराकडून मूर्ती खरेदी करण्यात काहीही हरकत का असायला हवी, असा या रिलचा आशय आहे.

धर्मनिरपेक्षता आणि सर्वधर्म समभावाचा संदेश या रिलमधून देण्यात आला आहे.

रिलवर का आणि कुणी घेतला आक्षेप?

खरंतर संविधानातील धर्मनिरपेक्षता या मूल्याचा प्रसार करणारं हे रिल आहे. वरकरणी त्यामध्ये काहीच आक्षेपार्ह दिसत नाही.

मात्र, अथर्व सुदामेला या रिलवर ट्रोलिंगचा सामना करावा लागला. अनेकांनी या रिलला विरोध केला. काहींनी शिविगाळ तर काहींनी धमक्याही दिला.

ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनीही या रिलला विरोध करत म्हटलंय की, "अथर्व सुदामेचा एक व्हीडिओ व्हायरल झाला असून तो हिंदू-मुस्लीम ऐक्याचं काहीतरी अक्कल शिकवतोय. आमचं एवढंच म्हणणं आहे की, तू करमणूक कर. लोकांना हसव आणि स्वत:चं पोट भर. यापेक्षा वेगळ्या अभ्यास नसलेल्या गोष्टीत पडू नको."

पुढे याच रिलमधील एका संवादाच्या पार्श्वभूमीवर ते म्हणाले आहेत की, "दुधात टाकलेली साखर ही साखरेचं काम करते की विषाचं काम करते, हे गेली सातशे-आठशे वर्षे हिंदू भोगतोय. त्यामुळे, हिंदू-मुस्लीम ऐक्य, गणपती कसे बसवायचे, ते कुणाकडून घ्यायचे, हे तुझे विषय नाहीयेत. तू त्याच्यामध्ये लक्ष देऊ नकोस."

त्यानंतर अथर्व सुदामे याने आज एक व्हीडिओ प्रसिद्ध करुन माफी मागितली आहे.

अथर्वने म्हटलंय की, "हा व्हीडिओ मी दुपारी डिलीट केलाय. बरेच लोकांना तो आवडला नाहीये. ते लोक नाराज झालेत. कुणाच्या भावना दुखावण्याचा माझा अजिबातच उद्देश नव्हता. मी आतापर्यंत आपल्या हिंदू सण-समारंभांवर, मराठी संस्कृतीवर आणि भाषेवर खूप व्हीडिओ केलेले आहेत. त्यामुळे, माझ्या मनात कुणालाही दुखावण्याचा अजिबात उद्देश नव्हता."

'अथर्व सुदामेने पाठीचा कणा ताठ ठेवायला हवा होता.'

यासंदर्भात आम्ही चित्रपट अभिनेत्री प्राजक्ता हनमघर यांच्याशी चर्चा केली.

त्यांनी एकाबाजूला ठाम भूमिका घेण्यास नकार देणाऱ्या अथर्व सुदामेची बाजू घेण्यास नकार दिला तर दुसऱ्या बाजूला या रिलला विरोध करणाऱ्यांवरही टीका केली.

त्या म्हणाल्या की, "जर अथर्व सुदामे याने काही ठाम भूमिकाच घेतलेली नसेल, तर त्याच्या समर्थनार्थ मी काही बोलू इच्छित नाही. कारण आधी भूमिका घेणं आणि नंतर आपलं आर्थिक उत्पन्नाचं साधन वा लोकप्रियता नष्ट होईल, या भीतीपोटी त्यापासून फारकत घेणं याला मी समर्थन देऊ शकत नाही."

मात्र, एक कलाकार म्हणून वैयक्तिक आयुष्यात वा कलेच्या माध्यमातही व्यक्त होण्याची भीती वाटत असेल, तर कला ही गोष्टच बंद करायला हवी ना, असा उद्विग्न सवालही त्या करतात.

ज्येष्ठ सिने अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांच्याशीही आम्ही चर्चा केली. बीबीसीशी बोलताना त्या म्हणाल्या की, "त्या रिलमध्ये दुखावणारं काहीही नव्हतं. हे रिल त्याने डिलीट करायला नको होतं. त्या व्हीडिओमध्ये अथर्व सुदामेने जे मांडलय ते आपल्या संविधानाला धरुनच आहे, तर मग आक्षेप का असावा? कलाकार कोणत्याही धर्माचा असू शकतोच ना? कलेच्या हातांना कधीच धर्म नसतो. जर एखाद्या नव्या कंटेट क्रिएटरने एक असा भाबडा व्हीडिओ बनवला ज्यामध्ये काहीही अवहेलना, तुच्छता, द्वेष नाहीये, त्यामध्ये शिव्याशाप नाहीयेत, उलट एकीची भावना आहे, तर त्याला हरकत का असावी?"

डॉक्युमेंट्री फिल्ममेकर वरुण सुखराज यांनीही 'अथर्व सुदामेने आपल्या पाठीचा कणा ताठ ठेवायला हवा होता,' असं विधान केलं.

संवैधानिक चौकटीत जर कुणी संवैधानिक मूल्यावर क्रिएटीव्हली व्यक्त होत असेल तर त्याला असा विरोध होण्याचा पायंडा पडणं घातक असल्याचंही ते म्हणाले.

बीबीसी मराठीसोबत बोलताना ते म्हणाले की, "त्याने माफी मागण्यासारखं काहीही केलेलं नाहीये. एकदा त्याने माफी मागितली तर मग हा पायंडा पडत जातो."

पुढे ते म्हणतात की, "धर्मनिरपेक्षतेसारख्या संवैधानिक मूल्याचा पुरस्कार करणं, याला विरोध होणं आणि त्या विरोधाला घाबरुन माफी मागणं, हे गंभीर आणि लाजीरवाणं आहे. तसेच, भयंकरही आहे."

'खालिद का शिवाजी'लाही झाला आहे विरोध

वरुण सुखराज 'खालिद का शिवाजी' या चित्रपटाचाही उल्लेख करतात. प्रदर्शनापूर्वीच त्यावर आक्षेप घेतला गेल्यामुळे त्याचं प्रदर्शन लांबणीवर पडलं आहे.

त्यातले काही संवाद कमी करण्याचा निर्णय निर्मात्यांनी घेतला आहे.

वरुण सुखराज म्हणतात की, "आंतरराष्ट्रीय स्तरावर अशी एखादी कलाकृती पोहोचून आपलं नाव मोठं होतं आणि इथे अशा लोकांमुळे कलेवर बंधनं यावीत, ही परिस्थिती समाज म्हणून किती लाजीरवाणी आहे?"

मूळात, या देशामध्ये कायदा आणि संविधान सोडून इतर कशाची तरी भीती असताच कामा नये, असंही ते म्हणतात.

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी म्हणतात की, "असा बंधुतेचा संदेश देणारे अनेक चित्रपट, जाहीराती, व्हीडिओ याआधीही येऊन गेलेले आहेत. मग आता विरोध का व्हावा? त्यामध्ये संताप येण्यासारखं काही आहे, असं मला तरी वाटलं नाही. उलट मला ते रिल फारच गोड वाटलं."

प्राजक्ता हनमघर देखील कलेच्या स्वातंत्र्यावर येणाऱ्या बंधनाबाबत काळजी व्यक्त करताना दिसतात.

त्या म्हणतात की, "आपण कलेला समाजाचा आरसा म्हणतो. जे कलेतून प्रकट होतो, तसा समाज असतो, किंवा कलेतून तसा समाज घडण्याची शक्यता असते. या पूरक गोष्टी आहेत. त्यावर इतकी बंधन यायला लागली तर कलाकार म्हणून ही गळचेपी आहे."

पुढे त्या म्हणतात की, "ट्रोल्सना चेहरा नाहीये. ही झुंड आहे. या व्यक्ती नाहीयेत, तर ती प्रवृत्ती आहेत. त्यांनी प्रवृत्ती निर्माण केलेल्या आहेत. आणि या प्रवृत्तींना मेंदू नाहीये."

ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी अथर्व सुदामेला उद्देशून 'लोकांना हसव आणि स्वत:चं पोट भर. यापेक्षा वेगळ्या अभ्यास नसलेल्या गोष्टीत पडू नको', असं विधान केलंय.

याविषयी बोलताना वरुण सुखराज म्हणाले की, "मुळात, कंटेट हे फक्त मनोरंजनाचंच साधन असतं, ही समजच कुठून आली? कंटेट हे समाजप्रबोधनाचं आजवरचं सर्वांत मोठं साधन राहिलेलंय. आणि कुणी काय करावं, हे ठरवण्याचा अधिकार त्यांना कुणी दिला?" असा सवालही ते करतात.

तर सोनाली कुलकर्णी म्हणतात की, "सगळ्यांना ही स्वायत्तता दिली आहे की कुणी काय करावं. प्रत्येक जण आपापल्या शहाणपणाला धरुन सुचणाऱ्या गोष्टी करत असतं, तर त्याच्यासाठी कुणीच कुणाला सुनावू शकत नाही."

प्राजक्ता हनमघर वारकरी परंपरेतील संत शेख महंमद यांचा उल्लेख करुन म्हणतात की, "जे या रिलला विरोध करत आहेत, त्यांना आपली संस्कृती पुरेशी माहिती आहे का? शेख महंमद माहिती आहेत का? आपल्याकडे वारकरी पंथापासून असे अनेक संप्रदाय होऊन गेले ज्यामध्ये सगळ्या जातीधर्माचे संत होऊन गेलेत."

अस्मितांच्या नावाखाली संवैधानिक चौकटीतलं मांडणंही धोक्याचं बनत चाललंय का? असा सवाल त्या उपस्थित करतात.

सोनाली कुलकर्णी म्हणतात की, "राग येण्यासारखे बरेचसे विषय आजूबाजूला आहेत. त्यामुळे, जर कुणी समानता आणि एकीबद्दल अत्यंत छोटा प्रयत्न करत असेल, तर त्यात चिडण्यासारखं काही आहे, असं मला वाटत नाही."

सोशल मीडियावर काय उमटल्यात प्रतिक्रिया?

या साऱ्या प्रकरणावर सोशल मीडियावर विविध प्रकारच्या प्रतिक्रिया पहायला मिळत आहेत.

ते म्हणतात की, "सुदामेच्या व्हिडिओत केविलवाणा मुस्लीम मूर्तिकार म्हणतो, आमच्यातलं चालत नसेल तर पुढे दुकानं आहेत. पूर्वी दलित म्हणायचे- आमच्यातलं पाणी चालत नाही तुम्हाला."

"म्हणजे बेसिकली स्वतःहून अस्पृश्यता ओढवून घेणारा मुस्लीम-दलित चांगला असतो आणि मोठं मन करून त्यांच्या अस्पृश्यतेला नाकारणारा हिंदू उच्चवर्णीय त्याहून श्रेष्ठ असतो. आणि अश्या श्रेष्ठ हिंदू उच्चवर्णीय लोकांच्या समर्थनार्थ आज फेसबुक पुरोगामी मंडळ भरभरून पोस्ट करतय. आणि ते बघून आमचे डोळे भरून वाहायला लागलेत!" असं ते उपरोधिकपणे या पोस्टमध्ये म्हणतात.

ज्येष्ठ विधितज्ज्ञ असीम सरोदे यांनी म्हटलंय की, अथर्व सुदामेने तो व्हीडिओ डिलीट करायला नको होता.

"राज ठाकरे यांनी अथर्वचे जाहीर कौतुक केले होतं, तेव्हापासून अथर्वने अधिक जबाबदारीने अनेक विषय हाताळले असे सुद्धा दिसते. एका उत्तम व्यंगचित्रकाराने दिलेल्या कौतुकाच्या शब्दांनी अथर्वला प्रोत्साहन मिळाले. पण आता काही सुमार धर्मवादी अथर्वला धमक्या देत असतांना राज ठाकरेंनी व मनसेने अथर्वच्या सोबत उभे राहावे असे आताच माझे राज साहेबांसोबत बोलणे झाले. अथर्वने तो व्हिडिओ पुन्हा अपलोड करावा. कोण काय करतंय ते बघूया."

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)