You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कुर्नूल बस अपघातात दुचाकीस्वारासह 20 जणांचा मृत्यू, नक्की काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं काय माहिती दिली?
(सूचना – या बातमीतील काही तपशील तुम्हाला विचलित करू शकतो.)
आंध्र प्रदेशातील कुर्नूल येथे शुक्रवारी (24 ऑक्टोबर) एका प्रवासी बसची दुचाकीला धडक बसून झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वारासह 20 जणांचा मृत्यू झाला.
हा अपघात 24 ऑक्टोबरला पहाटे 3 च्या सुमारास कुर्नूल शहराच्या बाहेरील कल्लूर मंडळातील चिन्ना टेकुरू भागात राष्ट्रीय महामार्ग 44 वर घडला.
ही प्रवासी बस हैदराबादहून बंगळुरूकडे जात होती, दरम्यान दुचाकीशी झालेल्या धडकेनंतर बसने पेट घेतला. कुर्नूल रेंजचे डीआयजी प्रवीण कोया यांनी दिलेल्या माहितीनुसार या अपघातानंतर घटनास्थळाहून 19 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.
कुर्नूल जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातावेळी बसमध्ये एकूण 46 प्रवासी प्रवास करत होते. काही प्रवाशांनी जीव वाचवण्यासाठी बसमधून उड्या मारून आपले प्राण वाचवले.
अपघातातील पीडित आणि त्यांच्या कुटुंबियांच्या मदतीसाठी जिल्हाधिकारी कार्यालय, रुग्णालय आणि पोलीस पातळीवर नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी ए. सिरी यांनी दिली.
या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती कुर्नूलचे पोलीस अधीक्षक विक्रांत पाटील यांनी दिली.
पीटीआय वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, बसचालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
बसचालकाने परिस्थितीचे योग्य मूल्यमापन केले नाही आणि आग लागल्यावर खिडकीतून उडी मारून पळ काढल्याचा आरोप त्याच्यावर आहे.
काय घडलं?
कुर्नूल जिल्हा पोलिसांनी या दुर्घटनेबद्दल सविस्तर माहिती दिली आहे.
एसपी विक्रांत पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, "अपघाताच्या वेळी दुचाकीवर दोघेजण होते. मागे बसलेल्या व्यक्तीचे नाव एरिस्वामी उर्फ नानी असे आहे.
एरिस्वामीकडून चौकशीत पोलिसांना अपघाताचे तपशील मिळाले. एसपी पाटील यांच्या म्हणण्यानुसार एरिस्वामीने सांगितलं की, "तो आणि त्याचा मित्र शिवशंकर (जो दुचाकी चालवत होता) रात्री दोनच्या सुमारास लक्ष्मीपुरम गावातून निघाले. शिवशंकर त्याला टुग्गली गावापर्यंत सोडायला जात होता."
पहाटे अडीचदरम्यान दोघे कार मोटर्स शोरूमजवळील पेट्रोल पंपावर थांबले. तिथे 300 रुपयाचे पेट्रोल भरून ते पुढे निघाले.
दरम्यान, थोड्याच वेळात चिन्ना टेकुरुजवळ शिवशंकरची दुचाकी घसरली आणि रस्त्याच्या उजव्या बाजूच्या दुभाजकाला जाऊन धडकली.
एसपी म्हणाले, "यात शिवशंकरचा मृत्यू जागीच झाला, तर मागे बसलेला एरिस्वामी किरकोळ जखमी झाला."
एरिस्वामीने शिवशंकरला रस्त्याच्या कडेला ओढून ठेवले तेव्हा त्याला जाणवले की त्याच्या मित्राचा मृत्यू झाला आहे.
एरिस्वामीने सांगितलं, "मी बाइक बाजूला करण्याचा प्रयत्न करत असतानाच समोरून येणाऱ्या बसने बाइकला जोरदार धडक दिली आणि काही अंतरापर्यंत घासत घेऊन गेली."
ही दुचाकीस्वाराची चूक होती का?
द इंडियन एक्सप्रेसमधील एका वृत्तानुसार, पोलिसांनी मिळवलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये पेट्रोल पंपावरून बाहेर पडताना मोटारसायकल घसरून पडताना दिसत आहे.
थोड्याच वेळात समोरून येणारी बस दुचाकीला धडकली आणि ती काहीशे मीटरपर्यंत घसरत गेली.
जिल्हाधिकारी ए. सिरी यांच्या मते, एरिस्वामी म्हणाले की, बसच्या खालून आगीच्या ज्वाळा उठू लागल्या. त्यामुळे ते घाबरले आणि ते घटनास्थळावरून तुग्गली येथे पळून गेले.
"असे दिसते की बसच्या इंजिनखाली अचानक आग लागली. सुरुवातीला आम्हाला असे वाटले की, आग बसच्या इंधन टाकीत आहे," असं मत कर्नूलचे जिल्हाधिकारी डॉ. ए. सिरी यांनी व्यक्त केलं.
द हिंदूच्या मते, अपघाताचे प्रत्यक्षदर्शी एरिस्वामी यांनी पोलिसांना सांगितले की, त्यांनी बसला आग लागलेली पाहिली आणि प्रवाशांचे ओरडणे दूरवरून ऐकले.
पोलीस आणि अग्निशमन विभाग येईपर्यंत ते घटनास्थळीच होते आणि नंतर ट्रॅक्टरने तुग्गली गावाकडे निघून गेले, असं त्यांनी सांगितलं.
या वृत्तानुसार, जेव्हा पोलिसांना कळले की, एरिस्वामी गुरुवारी (23 ऑक्टोबर) संध्याकाळी शिवशंकरच्या घरी गेले होते, तेव्हा त्यांना या घटनेत एरिस्वामीचा सहभाग असल्याचा संशय आला.
नंतर, पोलिसांनी त्याला तुग्गली गावातून अटक केली आणि त्याची चौकशी सुरू केली. त्यामुळे अपघाताबद्दल अधिक माहिती मिळाली.
एनडीटीव्हीच्या वृत्तानुसार, या घटनेचा एक व्हीडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर होत आहे. त्यामुळे दुचाकीस्वाराच्या भूमिकेबद्दल प्रश्न उपस्थित होत आहेत.
तथापि, बीबीसीने या व्हीडिओची स्वतंत्रपणे पडताळणी केलेली नाही.
त्यामध्ये, दोघे जण पहाटे 2:23 वाजता पेट्रोल पंपावर येतात. परंतु त्यांना कोणताही मदतनीस न सापडल्याने ते तिथे मदतनीसाचा शोध घेतात.
त्यानंतर गाडीचालक अस्वस्थ होऊन स्टँडवर पार्क केलेली बाईक स्टँड वर न घेता वळवतो आणि निघून जातो. पुढे त्याच्या बाईकचं संतुलन बिघडलेलं दिसतं.
एनडीटीव्हीच्या वृत्तानुसार, सूत्रांचे म्हणणे आहे की, दुचाकीस्वाराच्या या कृत्यानंतर, पोलिसांना संशय आला की तो दारूच्या नशेत बाईक चालवत होता.
'हायड्रॉलिक दरवाजे निकामी'
अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, बसचे दरवाजे न उघडणे हे अपघातातील मृतांच्या संख्येत वाढ होण्याचे एक कारण आहे.
जिल्हाधिकारी ए. सिरी यांनी बीबीसी न्यूज तेलुगूशी बोलताना सांगितले, "सुरुवातीला असे मानले जात आहे की, बसच्या इंजिनला आग लागली आणि तारा जळून दरवाज्यांच्या हायड्रॉलिक सिस्टीमचे नुकसान झाले. यामुळे दरवाजे उघडू शकले नाहीत आणि काही प्रवासी बाहेर पडू न शकल्याने त्यांचा मृत्यू झाला."
पीटीआय या वृत्तसंस्थेच्या मते, अपघातात काही मृतदेह इतके जळाले होते की, त्यांची ओळख पटवणे अशक्य झाले होते. त्यामुळे अधिकाऱ्यांनी डीएनए नमुने गोळा करण्यासाठी फॉरेन्सिक टीमला बोलावले.
दुसऱ्या अधिकाऱ्याने सांगितले की, अनेक प्रवासी रात्री झोपेत असताना अपघात झाल्यामुळे त्यातून वाचू शकले नाहीत.
पंतप्रधान आणि राष्ट्रपतींनी व्यक्त केले दुःख
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी अपघाताबद्दल शोक व्यक्त केला. पंतप्रधानांनी मृतांच्या कुटुंबियांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून 2 लाख आणि जखमींना 50 हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे.
आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री ए. रेवंत रेड्डी यांनीही या घटनेवर दुःख व्यक्त केले.
अपघातानंतर आंध्र प्रदेशचे परिवहन मंत्री रामप्रसाद रेड्डी यांनी सांगितले की, प्रवाशांची सुरक्षा ही सरकारची प्राथमिकता आहे.
राज्य सरकारने मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 5 लाख रुपये आणि जखमींना प्रत्येकी 2 लाख रुपये देण्याची घोषणा केली आहे, अशी माहिती परिवहन मंत्री रामप्रसाद रेड्डी यांनी दिली.
सर्व खासगी बसेसचे फिटनेस प्रमाणपत्र आणि परवाने तपासण्याचे आदेश देण्यात आल्याचंही त्यांनी नमूद केलं.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.