भगतसिंग खरंच 'त्या' क्रांतिकारक महिलेच्या प्रेमात पडले होते का?

- Author, जय शुक्ला
- Role, बीबीसी प्रतिनिधी
“जोपर्यंत प्रेमाच्या नैतिक पातळीचा संबंध आहे, मी असे म्हणू शकतो की, ते आवेगापेक्षा अधिक काही नाही. पण ती कोणतीही पाशवी अंत:प्रेरणा नाही, ती एक अतिशय गोड मानवी भावना आहे. प्रेम कधीही क्रूर असू शकत नाही. प्रेम माणसाचे चारित्र्य वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवते. खरे प्रेम कधीच अपयशी होत नाही. ते आपापल्या पद्धतीने होते. पण कधी होते, हे कुणीच सांगू शकत नाही.”
“मी म्हणू शकतो की एक तरुण आणि तरुणी एकमेकांवर प्रेम करू शकतात. ते त्यांच्या आवेगांवर नियंत्रण ठेवू शकतात आणि प्रेमाच्या सहाय्याने स्वत:चे पावित्र्य टिकवून ठेवू शकतात."
भगतसिंग यांनी संसदेत बॉम्ब फेकण्यापूर्वी सुखदेव यांना हे पत्र लिहिले होते. दिल्लीतील सीताराम बाजार येथील घरातून हे पत्र लिहिले होते. शिव वर्मा (भगतसिंग यांचे क्रांतिकारक मित्र) यांनी हे पत्र सुखदेव पर्यंत पोहोचवले. .
सुखदेवला अटक करण्यात आली तेव्हा हे पत्र त्याच्याकडून जप्त करण्यात आले होते आणि लाहोर कट प्रकरणात पुरावा म्हणून न्यायालयात सादर करण्यात आले.
'मी भगतसिंग बोलतोय' या पुस्तकात लेखक आणि ज्येष्ठ पत्रकार राजशेखर व्यास लिहितात, "भगतसिंग यांच्यामुळेच एक सुंदर क्रांतिकारी महिला पक्षात कार्यरत झाली. संसदेवर बॉम्ब फेकण्याची योजना आणि त्यासाठी कार्यकर्त्यांची निवडीची बैठक सुरू असताना पक्षाला क्रांतिकारकांची कशी गरज आहे हे पटवून देत भगतसिंग यांनी बॉम्ब फेकण्याची जबाबदारी नाकारली. तेव्हा भगतसिंग यांचा जवळचा मित्र असलेल्या सुखदेव यांने भगतसिंगला टोमणा मारला की 'त्या 'महिले'वरील प्रेमामुळे तो मरणाला घाबरतो."
“सुखदेव यांच्या आरोपांनी भगतसिंग यांचे हृदय पिळवटून टाकले. त्यांनी पुन्हा क्रांतिकारकांची बैठक बोलावली आणि संसदेत बॉम्ब फेकण्याची जबाबदारी घेतली."
सुखदेव यांच्या आरोपांवर भगतसिंग यांची काय प्रतिक्रिया होती?
भगतसिंग यांच्यावर संशोधन करणाऱ्या संशोधकांच्या म्हणण्यानुसार, सुखदेव यांनी ज्या प्रकारचे आरोप केले होते, त्यामुळे भगतसिंग नाराज झाले होते. भगतसिंग यांना राग आला होता आणि ते अनेक दिवस सुखदेवशी बोलले नाही.
यानंतर त्यांनी सुखदेव यांना उद्देशून पत्र लिहिले. हे पत्र पुढे 'प्रेम आपल्याला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवतं' (Love lifts us high) या शीर्षकाने प्रसिद्ध झाले.
सुखदेव यांना लिहिलेल्या या पत्रात भगतसिंग यांनी लिहिले आहे की, "माझे मोकळेपणाने वागणे चुकीचे समजले गेले. माझ्या आत्म-स्वीकृतीला दुबळेपण समजलं गेलं.”
“या आनंदी वातावरणात मला हे सांगावेच लागेल की ज्या प्रश्नावर आपण वाद घातलोय त्यावर मी माझी भूमिका मांडल्याशिवाय राहू शकत नाही. माझ्या भरपूर आशा आणि आकांक्षा आहेत. जीवनातील आनंदी क्षणांनी मी भारावून गेलो आहे. पण गरज पडली तर मी हे सगळं सोडायला तयार आहे. हा खरोखरच एक यज्ञ आहे.”

फोटो स्रोत, Others
भगतसिंग या पत्रात पुढे लिहितात, "एखाद्याच्या चारित्र्यावर आरोप करण्यापूर्वी, एखाद्याने विचार केला पाहिजे की प्रेमाने कोणत्याही व्यक्तीला मदत केली आहे का? तर माझे उत्तर होय आहे, मॅझिनी (इटालियन क्रांतिकारक आणि लेखक ज्यांनी इटलीला एकत्र करण्याचा प्रयत्न केला) तुम्ही वाचलेच असतील. त्यांच्या पहिल्या बंडाच्या अपयशानंतर ते एकतर वेडे झाले असते किंवा त्यांनी आत्महत्या केली असती. पण त्यांच्या मैत्रिणीच्या एका पत्राने त्यांना आणखी बळ दिलं.
“मी एका व्यक्तिचे प्रेम नाकारले. ते एक आदर्शवादी वयही होते. पण प्रेमाची भावना मजबूत असली पाहिजे, जी एका व्यक्तीच्या पलिकडे जाऊन संपूर्ण जगासमोर मांडता आली पाहिजे."
हे पत्र वाचून भगतसिंग यांच्या व्यक्तिमत्वाची संवेदनशील बाजू समजून घेता येऊ शकते. ते क्रांतिकारक होते पण मानवी भावनांपासून अलिप्त नव्हते.
मात्र, त्या महिलेवर त्यांचे प्रेम होते की नाही, याचा उल्लेख या पत्रात कुठेही केलेला नाही.
शिवाय त्या महिलेचे नावही लिहिलेले नाही. परंतु क्रांतिकारकांमध्ये प्रेमभावना असणे चुकीची नाही, असंही ते ठामपणे सांगतात.
सुखदेवने जिच्यावरून भगतसिंगला टोमणा मारला होता, ती महिला कोण होती?
दिवंगत पत्रकार आणि लेखक कुलदीप नय्यर त्यांच्या 'सरफरोशी की तमन्ना-भगतसिंग यांचे जीवन आणि खटला' या पुस्तकात लिहितात, "सुखदेव यांनी भगतसिंग यांचे मन खूप दुखावले. ते म्हणाले की, आता तुझा क्रांतीसाठी काहीच उपयोग होणार नाही कारण तू आता एका महिलेच्या प्रेमात कैद झाला आहेस.
ते लिहितात, “सुखदेव यांचा इशारा दुर्गादेवीकडे होते. सॉंडर्सच्या हत्येनंतर भगतसिंग यांना पोलिसांच्या नजरेतून वाचवण्यासाठी जिने लाहोर ते कलकत्ता रेल्वेने प्रवास केला होता.
कुलदीप नय्यर लिहितात, “दुर्गादेवीचे लग्न झाले होते हे खरे आहे. तिला एक मुलगाही होता. मात्र दोघेही पक्षासाठी एकत्र काम करत होते. पक्षात चांगले-वाईट क्षण एकत्र शेअर करायचे. त्यामुळे दोघांमध्ये आणखी काही संबंध होते का? भगतसिंग यांनी याबाबत कधीच खुलासा केला नाही.
कुलदीप नय्यर पुढे लिहितात, “सुखदेव ज्या गोष्टीकडे बोट दाखवत होते, त्याबाबत इतर कोणत्याही क्रांतिकारकांनी कधीही ब्र देखील काढला नाही. एवढंच कशाला चंद्रशेखर आझाद यांनीदेखील नाही, जे त्यांच्यासाठी वडिलांसारखे होते. कदाचित आझाद यांनाही असेच वाटत असेल की प्रेम हे असे नाते नाही ज्यावर टीका केली जाऊ शकते किंवा त्याची खिल्ली उडवली जाऊ शकते.”
"सुखदेवच्या आरोपांनंतर भगतसिंग कोणत्या परिस्थितीतून जात असतील हे आझाद यांना समजत होते."
कुलदीप नय्यर यांनी दुर्गादेवी यांची भेट घेतली होती. परंतु या संदर्भात त्यांच्याशी कोणते संभाषण झाले किंवा त्यांच्या बाजूने कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आल्याची माहिती या पुस्तकात नाही.
पोलिसांना फसवण्यासाठी दुर्गादेवी यांनी भगतसिंग यांच्यासोबत केलेल्या लाहोर ते कलकत्ता या रोमांचक रेल्वे प्रवासाची माहिती त्यांनी दिली होती, एवढाच उल्लेख त्यांनी केला.
'भगतसिंग यांच्या प्रेमप्रकरणाचा कोणताही पुरावा नाही'
भगतसिंग यांची भाची वीरेंद्र सिंधू यांनीही ‘युगदृष्टा भगतसिंह और उनके मृत्युंजय पुरखे’ या त्यांच्या पुस्तकातही याबाबत कोणताही उल्लेख केलेला नाही.
वीरेंद्र सिंधू यांनी आपल्या पुस्तकात लिहिले आहे की, संसदेवर बॉम्बफेक करणाऱ्या क्रांतिकारकांच्या गटात भगतसिंग यांचे नाव नसल्यामुळे भगतसिंग आणि सुखदेव यांच्यात भांडण झाले होते आणि सुखदेवने त्यांना 'भ्याड' म्हटले होते, पण त्यांनी याचा उल्लेख केला नाही की सुखदेव यांनी भगतसिंगांवर असा आरोप लावला होता ते मरणाला घाबरतात कारण ते एका ‘महिले’वर प्रेम करतात.
मात्र, भगतसिंग यांनी सुखदेव यांना लिहिलेल्या पत्राचा उल्लेख त्यांनी केला आहे, ज्यात भगतसिंग यांनी प्रेमाच्या पावित्र्याबद्दल लिहिले होते.
जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे माजी प्राध्यापक, भगतसिंग यांच्यावर संशोधन करणारे आणि त्यांच्यावर पुस्तक लिहिणारे चमन लाल बीबीसी गुजरातीशी बोलताना म्हणतात, याचा (प्रेम प्रकरणाचा) कोणताही पुरावा नाही. याबाबतही अधिकृत माहिती नाही. जे जिवंत होते ते या प्रकरणावर प्रकाश टाकू शकले असते.

चमनलाल म्हणतात, “हे खरे आहे की काही पुस्तकांमध्ये या मुद्द्यावर सुखदेव आणि भगतसिंग यांच्यात भांडण झाल्याचा उल्लेख आहे. सुखदेव कठोर स्वभावाचे होते. ते धारदार शब्द वापरायचे. पण भगतसिंगांचे दुर्गादेवीशी प्रेमसंबंध होते असा संदर्भ लावणे योग्य नाही.
ते पुढे म्हणतात, “अनेक क्रांतिकारक महिलांवर भगतसिंग यांचा प्रभाव होता. भगतसिंग हे एक प्रभावी, कुशल, तर्कशुद्ध, बुद्धिमान आणि संयमी व्यक्ती होते, ते महिलांशी नम्रपणे वागायचे आणि सभ्य होते.
त्यांच्या विचारांनी लोक आकर्षित होत असत. त्यामुळे महिला क्रांतिकारकांना भगतसिंग यांच्याशी संवाद साधणे आणि काम करणे अधिक सोयीचे वाटत असे. याचा अर्थ सर्व महिलांचे भगतसिंग यांच्याशी विशेष नाते होते असे नाही. सुखदेव यांनाही असेच वाटले असेल आणि त्यांनी भगतसिंग यांच्यावर असे आरोप केले असतील.”
चमनलाल प्रश्न विचारतात, "जर भगतसिंग यांनी इतर क्रांतिकारक बटुकेश्वर दत्त आणि जयदेव कपूर यांच्या बहिणींनाही पत्रे लिहिली असतील, तर ज्यांच्याशी त्यांनी पत्रव्यवहार केला त्यांच्याशी त्यांचे प्रेमसंबंध होते, असा अर्थ घ्यावा का? नाही, कदापी नाही, असं नाहिए. अजिबात नाहीए.”
चमनलाल यांचा आरोप आहे की याचा उल्लेख अनेक पुस्तकांमध्ये करण्यात आला आहे पण याचे कारण म्हणजे काही लोकांनी त्यांची कथा रंजक आणि रोचक बनवण्यासाठी अशी खळबळजनक माहिती दिली आहे जी अत्यंत आक्षेपार्ह आहे.
दुर्गादेवी 'भगतसिंगची पत्नी' बनली आणि त्यांना पळून जाण्यास मदत केली
30 ऑक्टोबर 1928 रोजी सायमन कमिशन लाहोरला पोहोचले होते. भगतसिंग यांनी कमिशनला विरोध करण्यासाठी लाला लजपत राय यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. आंदोलकांवर पोलिस अधीक्षक जे. ए. स्कॉटने लाठीचार्ज करण्याचे आदेश दिले. लालाजींना लाठ्याकाठ्याने बेदम मारहाण करण्यात आली. जखमी लालाजींचा १७ नोव्हेंबर 1928 रोजी मृत्यू झाला.
10 डिसेंबर 1928 च्या रात्री क्रांतिकारकांची बैठक झाली. दुर्गादेवी सभेच्या अध्यक्षस्थानी होत्या. लालाजींच्या 'मृत्यूचा सूड’ घ्यायचे ठरले. दुर्गादेवींनी विचारले की, स्कॉटच्या हत्येची जबाबदारी कोण घेणार, सुरुवातीला त्यांनी स्वत:च हात वर केला, पण क्रांतिकारकांनी भगतसिंग, चंद्रशेखर आझाद, राजगुरू आणि जयगोपाल या चार जणांवर जबाबदारी सोपवली.
17 डिसेंबर 1928 रोजी स्कॉटला मारण्याची योजना आखण्यात आली होती, परंतु जयगोपालच्या चुकीमुळे स्कॉटऐवजी सहाय्यक पोलीस अधीक्षक जे. पी साँडर्स मारला गेला. क्रांतिकारक पळून गेले, त्यांचा पाठलाग करणारा एक वरिष्ठ भारतीय हवालदारही गोळीबारात ठार झाला.

लपतछपत भगतसिंग दुर्गादेवींपर्यंत पोहोचले. त्या क्रांतिकारकांचे सहकारी भगवती चरण वहोरा यांच्या पत्नी होत्या. सुखदेवने योजना आखली की दुर्गादेवी त्यांची 'पत्नी' बनेल आणि भगतसिंगांना पळवण्यात त्यांची मदत करेल.
दुर्गादेवी यांचे पती आधीच एका प्रकरणात पोलिसांपासून फरार होते आणि काँग्रेसच्या परिषदेत सहभागी होण्यासाठी कलकत्त्याला गेले होते. दुर्गादेवी 'सुजाता' झाली आणि भगतसिंग 'रणजित' बनले. दुर्गादेवींचा तीन वर्षांचा मुलगा शचीही त्यांच्यासोबत होता. राजगुरू त्यांचे सेवक झाले. 'नव-याने’ युरोपियन पोशाख घातला होता आणि 'बायको’ने महागडी साडी आणि उंच टाचांच्या सँडल घातल्या होत्या.
दोघेही ट्रेनमध्ये बसले पण दुर्गादेवींने त्यांना कानपूरला उतरण्याचा सल्ला दिला. दोघेही कानपूरला उतरले आणि एका हॉटेलमध्ये थांबले.
दुर्गादेवीने आपल्या पतीला तार पाठवली की, 'ती आपल्या भावासोबत कलकत्त्याला येत आहे.’ दुर्गादेवीचे पती भगवती चरण यांना तार मिळाल्यानंतर आश्चर्य वाटले कारण दुर्गादेवीला भाऊ नव्हता.
कुलदीप नय्यर लिहितात की 'भगतसिंग यांनी दुर्गादेवींसोबतच्या दोन दिवसांच्या सहवासात काहीतरी वेगळे अनुभवले. दुर्गादेवी उत्तम श्रोता होत्या. भगतसिंग यांनी दुर्गादेवींना त्यांचे आयुष्य, श्रद्धांबद्दल सर्व काही मोकळेपणाने सांगितले.
कुलदीप नय्यर लिहितात, “असे वाटत होते की त्यांना आपले विचार, भावना आणि भीती देवी दुर्गासोबत शेअर करायची होती. भगतसिंगांच्या व्यक्तिमत्त्वाचे वेगळे पैलू ऐकल्यानंतर दुर्गादेवीही थक्क झाल्या. यापूर्वी त्या भगतसिंगांना क्रांतिकारक म्हणून ओळखत होत्या जो केवळ डोक्याने विचार करतो, हृदयाने नाही.
ते लिहितात, “भगतसिंग यांच्यासाठी दुर्गादेवींची पहिली ओळख ही त्यांच्या सहकारी क्रांतिकारकाची पत्नी अशीच होती.
नंतर लाला लजपत राय यांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी स्कॉटच्या हत्येचा ऐतिहासिक निर्णय घेणार्या क्रांतिकारकांच्या बैठकीचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले. त्यानंतर त्या एका वेगळ्या रुपात दिसल्या ज्यात त्यांनी एक संरक्षक म्हणून भगतसिंग यांना ब्रिटीश पोलिसांच्या तावडीतून वाचवले. पण आता या अनोख्या नात्याचं रूपांतर जवळीक आणि आत्मीयतेत झालं होतं. हे जितकं रोमांचक होतं तितकंच ते भयावह होतं. हा एक नवीन अनुभव होता जो याआधी कधीही आला नव्हता.”
सुखदेव यांच्यावर या संबंधांबद्दल 'खोटे पसरवल्याचा' आरोप लावण्यात आला
संसदेत बॉम्ब फेकायला कोण जाणार यावर भगतसिंग आणि सुखदेव यांच्यात जोरदार वादावादी झाली हे खरं आहे, पण क्रांतिकारक आणि त्यांच्याबद्दल पुस्तके लिहिणारे लेखक यांच्यात यावरून मतभेद आहेत की, सुखदेव यांनी भगतसिंग कुठल्यातरी महिलेच्या प्रेमात वेडे झाल्यामुळे क्रांतिकारक मार्गापासून भरकटले गेले, असे आरोप लावले होते की नाही.
‘सरदार भगतसिंग - व्यक्ती आणि विचार’ या शीर्षकाच्या पुस्तकात लेखक विश्व प्रकाश गुप्ता आणि लेखिका मोहिनी गुप्ता लिहितात की भगतसिंग आणि दुर्गादेवी यांच्यात प्रणय झाला नाही, परंतु दोघांमध्ये घनिष्ट नाते नक्कीच निर्माण झाले.
काही लेखक दुर्गा देवीचा उल्लेख ‘एक महिला’ असा करतात. त्यांनी कोणाचेही नाव घेणे टाळले. पण काही लेखक हे मान्य करतात की भगतसिंग संसदेवर बॉम्बफेक करणाऱ्या संघाचा भाग नसल्यामुळे सुखदेव रागावला होता आणि त्याचा आता उपयोग नाही असा टोमणा मारला होता, पण त्यांनी हे लक्षात घेतले नाही की यात कोणत्याही महिलेचा किंवा दुर्गादेवीचा उल्लेख आहे किंवा नाही.

फोटो स्रोत, Harper collins
भगतसिंग यांच्या क्रांतिकारी संघाचे सदस्य शिव वर्मा यांनी त्यांच्या 'संस्मृतीयन' या पुस्तकाच्या पान 106 आणि 107 वर लिहिल्याप्रमाणे, भगतसिंग आणि सुखदेव यांच्यात भांडण झाले होते पण त्यात कोणत्याही महिलेचा उल्लेख नाही.
या प्रकरणाचा संदर्भ देताना सुखदेव यांचे धाकटे भाऊ मथरादास थापर त्यांच्या 'मेरे भाई शहीद सुखदेव' या पुस्तकात लिहितात, "सुखदेव यांनी आपला युक्तिवाद मांडताना सांगितले की, भगतसिंग यांच्याशिवाय दुसरा कोणीही क्रांतिकारक त्यांचे उद्दिष्ट पूर्ण करू शकला नसता.”
'त्यांनी भगतसिंगांविरोधात कठोर भाषा वापरली आणि तुम्ही भ्याड आहात, मृत्यूला घाबरत आहात. त्यामुळे भगतसिंगांना वाईट वाटले आणि त्यांनी आपल्या पक्षाच्या केंद्रीय समितीला पटवून दिले की संसदेत जाऊन बॉम्ब फेकण्यास मीच कसा योग्य आहे.
भगतसिंग यांचे एक क्रांतिकारी साथीदार सुखदेव राज (सुखदेव आणि सुखदेव राज हे दोघे वेगवेगळे क्रांतिकारक होते) यांनी लिहिलेल्या 'जब ज्योत जागी' या पुस्तकाचा संदर्भ देऊन ते म्हणतात, “फाशीपूर्वी भगतसिंग यांनी दुर्गा भाभींना एक पत्र लिहिले होते, त्यात लिहिले होते की माझ्या मृत्यूनंतर तू रडणार नाहीस, हे लिहिताना माझी लेखणी थांबते. तुला पाहून माझे मन हलके झाले. आपण ज्या समाजात राहतो तो समाज माझं आणि तुझं नातं समजू शकणार नाही, कारण तू माझ्या मित्राची पत्नीही आहेस.

फोटो स्रोत, Others
मात्र, या पत्राची भाषा व शैली दिशाभूल करणारी व बनावट असल्याचे मत मथरादास मांडतात.
यशपाल त्यांच्या सिंहवलोकन या पुस्तकाच्या पान क्रमांक 180 वर लिहितात, 'सुखदेव यांनी भगतसिंग यांना सांगितले की ते एका महिलेबद्दलच्या प्रेमाच्या आडून पक्षाप्रती असलेली जबाबदारी विसरले आहेत', परंतु यात कोणत्याही महिलेचे नाव घेतलेले नाही.
मथरादास लिहितात, "यशपाल आणि सुखदेवराज सारख्या लेखकांनी सुखदेवसाठी खोटा प्रचार केला, तसेच भगतसिंग आणि दुर्गा देवी यांच्यातील पवित्र नातेसंबंधावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले."
सुखदेव राजवर आरोप करताना त्यांनी लिहिले, "त्यांच्या 'जब ज्योत जली' या पुस्तकात त्यांनी सुखदेवचे वर्णन दुर्गा भाभीसाठी असंयमी किंवा अनियंत्रित प्रचारक म्हणून केले होते." सुखदेव राज हे क्रांतिकारी पक्षाचे सदस्य आणि क्रांतिकारक चंद्रशेखर आझाद यांचे सहकारीही होते.
मथरादास यांनी त्यावर लिहिले की, "संसदेतील बॉम्बस्फोटाच्या घटनेत सुखदेव राज आणि यशपाल यांनी कोणतीही भूमिका पार पाडली नव्हती, मग त्यांना कसे कळले की दुर्गा भाभी आणि भगतसिंग यांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवणारा सुखदेवच होता."
तसेच सुखदेव राजच्या पुस्तकाचा संदर्भ देत मथरादास लिहितात, “भगतसिंग यांना सुखदेवचे एक पत्र आले होते, हे पत्र लिहिण्यामागे सुखदेवचा हेतू भगतसिंग यांना एक संदेश देण्याचा होता की ते एका महिलेच्या नादी लागून क्रांतीच्या मार्गापासून दूर जात आहेत. ते आता देशासाठी काहीही करू शकत नाहीत.
यावर भाष्य करताना मथरादास लिहितात, "सुखदेवने असे कोणतेही पत्र लिहिल्याचा पुरावा नाही."
मथरादास लिहितात की, मी शिव वर्मा (भगतसिंग यांचे सहकारी क्रांतिकारक) यांच्याशी या विषयावर सांवाद साधला. ते म्हणाले की दुर्गा भाभी भगतसिंग आणि सुखदेव या दोघांनाही समान वागणूक देत असे.
ते लिहितात की, “पी. किशोरलाल एका मुलाखतीत म्हणाले होते, भगवती चरण (दुर्गादेवीचे पती) हे विद्वान होते आणि वहिनी त्यांची पत्नी होती, ती राजकीय महिला नव्हती.
शिववर्मा यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की सुखदेव राजांनी लिहिलेल्या कोणत्याही गोष्टीवर विश्वास ठेवणे चुकीचे आहे कारण सुखदेव राजांना दुर्गादेवींबद्दल काहीच माहिती नव्हती.
सुखदेव राज यांनी लिहिलेल्या एका घटनेचा दाखला देत मथरादास लिहितात, “भगतसिंग सुखदेवचे हे पत्र घेऊन दुर्गा वहिनींच्या घरी गेले. हे पत्र त्यांच्या हातात दिले गेले आणि ते रडू लागले. त्यांना दुर्गादेवीचे पती भगवती चरण यांच्याशी बोलायचे होते पण ते झोपले होते त्यामुळे भगतसिंग त्यांच्याशी न बोलता निघून गेले.
“भगतसिंग दुर्गा भाभींना म्हणाले, “हे ते लोक आहेत (सुखदेवसह) जे विनाकारण रात्रंदिवस चिखलफेक करण्यात मग्न आहेत. दुसरीकडे, तो (भगवती चरण) असा देवमाणूस आहे जो अशा संबंधांबद्दल ऐकूनही कधी दुःखी होत नाही.
या लेखणीवर आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना मथरादास लिहितात, “सुखदेवराजांच्या या मनोरंजक कथेचा मानसशास्त्रीय अभ्यास केला पाहिजे. लोक आपलं प्रेम समाजापासून लपवतात हे स्वाभाविक आहे. 1929 साली भारत इतका प्रगतीशील नव्हता की प्रेमप्रकरण सामान्य लोकांमध्ये चर्चेचा विषय बनू शकेल.
खरंतर या दोघांमध्ये असे काही झाले असते तर संसदेवर बॉम्ब फेकण्यापूर्वी भगवती चरण दुर्गा भाभींसोबत भगतसिंगांना भेटायला का गेले असते?
मथरादास पांचजन्यचे संपादक बचनेश त्रिपाठी दुर्गा भाभींच्या एका मुलाखतीचा दाखला देत म्हणतात, “या मुलाखतीत दुर्गा भाभींनी स्पष्टपणे सांगितले की यशपाल आणि त्यांच्यासारखे लोक गरीब आहेत, त्यांच्याकडे साधनांची कमतरता आहे. त्यांना इतर क्रांतिकारकांपेक्षा कमी लेखण्याचा कोणताही अधिकार नाही. अशा प्रकारची चिखलफेक करणे अशोभनीय आहे.”
'भाभी' या नावाने प्रसिद्ध असलेल्या दुर्गादेवींचा जन्म गुजराती कुटुंबात झाला होता
दुर्गा भाभी या नावाने प्रसिद्ध असलेल्या दुर्गादेवी यांचा जन्म 7 ऑक्टोबर 1907 रोजी अलाहाबाद येथे एका गुजराती कुटुंबात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव बांका बिहारी भट्ट होते. त्यांच्या आईचे नाव यमुनादेवी होते. त्यांचे पूर्वज गुजरातमधून आग्रा येथे स्थायिक झाले होते. बिहारी हे बांका येथे जिल्हा न्यायाधीश म्हणून कार्यरत होते. ते गुजरातमधील वडनगर येथील नागर ब्राह्मण होते.
दुर्गादेवीचा विवाह लाहोरमध्ये राहणारा गुजराती ब्राह्मण भगवतीचरण वोहरा यांच्याशी झाला होता. त्यांचे लग्न झाले तेव्हा ते केवळ 11 वर्षांचे होते. भगवती चरणांचे पूर्वज विसनगरी ब्राह्मण होते जे गुजरातमधून आग्रा आणि नंतर लाहोर येथे स्थलांतरित झाले.
त्यांच्या मुलाचा जन्म 3 डिसेंबर 1925 रोजी झाला. त्याचे नाव शची ठेवले गेले.
शहीद भगतसिंग यांचे भाऊ आणि मेहुणे - भागवत चरण व्होरा आणि दुर्गा भाभी यांच्या चरित्रात मालविंदरजीत सिंग बराइच लिहितात, "दुर्गा भाभींनी त्यांना भगतसिंगबद्दल सांगितले होते की मी एवढेच सांगू शकते की ते माझा स्वतःचा भाऊ आणि मुलापेक्षाही अधिक प्रिय होते."
“दुर्गा भाभी सांगतात, मी त्यांना 1921 पासून ओळखते जेव्हा ते त्यांच्या गावातील डेअरीतून दूध आणायचे. त्यांनी आपल्या कार्याने आपल्या सर्वांच्या हृदयात विशेष स्थान निर्माण केले आहे असे म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही.

फोटो स्रोत, National Book Trust
8 एप्रिल 1929 रोजी जेव्हा मी त्यांना शेवटचा भेटलो तेव्हा त्यांच्या डोळ्यात भीती नव्हती. त्यांच्या फाशीने ब्रिटीश साम्राज्याचा पाया हादरवला.”
"तिने नेहमीच तिचे क्रांतिकारी पती भगवती चरण व्होरा यांना पाठिंबा दिला."
बीबीसी गुजरातीने मलविंदरजीत सिंग यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. त्यांनी भगतसिंग यांच्यावर संशोधन केले असून एक पुस्तकही लिहिले आहे. प्रकृती खालावल्याने त्यांनी सहकाऱ्यामार्फत बीबीसी गुजरातीशी संवाद साधला.
ते म्हणतात. "दुर्गादेवी भगतसिंगांना आपला लहान भाऊ मानत होत्या. अशा बाष्कळ गोष्टींवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी देशाच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी केलेल्या बलिदानाचे कौतुक करूया. हिंदुस्तान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशन, एक क्रांतिकारी पक्ष ज्याचे नाव भगतसिंगांनी ठेवले होते, त्याचे सर्व क्रांतिकारक दुर्गादेवींना 'भाभी' म्हणून हाक मारायचे.
क्रांतिकारकांसाठी त्यांच्या घराचे दरवाजे सदैव खुले असायचे.
चमन लाल यांनी बीबीसी गुजरातीला हेही सांगितले की, “क्रांतिकारकांचा नैतिक स्तर उच्च असला पाहिजे. कारण त्यांच्या क्रांतिकारी कारवायांदरम्यान त्यांना कुठेही थांबावे लागत असे. जर तुमच्यात नैतिकता नसेल तर लोकांनी तुम्हाला घरात का ठेवायचे? आणि दुर्गादेवीचे पती भगवती चरण व्होरा यांचे घर सर्व क्रांतिकारकांसाठी नेहमीच खुले असायचे.
दुर्गादेवीं क्रांतिकारकांचे संदेशही घेऊन जात असत.
‘शहीद भगतसिंग - एव्हिडन्स ऑफ रिव्होल्यूशन’ या पुस्तकाचे संपादक सुधीर विद्यार्थी दुर्गादेवींच्या आठवणींचे निरीक्षण करताना लिहितात की, त्या शस्त्रे आणि बॉम्ब द्यायलाही जायच्या. त्या एकदा मुलतानला बॉम्ब आणायला गेल्या होत्या आणि पिस्तूल आणायला जयपूरलाही गेल्या होत्या.

त्यांना पिस्तूल कसे ठेवायचे एवढेच नाही तर ते कसे वापरायचे हे देखील माहित होते.
त्यांचे पती भगवती चरण व्होरा यांचा बॉम्ब चाचणीदरम्यान मृत्यू झाला होता. दुर्गादेवींना भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त यांना तुरुंगातून सोडवायचे होते.
भगतसिंगांची फाशी थांबवण्यासाठी तिने गांधीजींचीही भेट घेतली.
पतीच्या निधनानंतर दुर्गा भाभी क्रांतिकारकांच्या कार्यात पूर्णपणे सक्रिय झाल्या. पतीच्या मृत्यूनंतर आणि भगतसिंगांच्या फाशीनंतर, चंद्रशेखर आझाद यांनी ब्रिटिशांकडून बदला घेण्याच्या उद्देशाने त्यांना बॉम्बेला (मुंबई) पाठवले.
त्यांनी मुंबईचे पोलीस आयुक्त लॉर्ड हेली यांना ठार मारण्याची योजना आखली. मात्र दुर्गा भाभींनी झाडलेल्या गोळीने सार्जंट टेलर आणि त्यांची पत्नी जखमी झाले.
त्या तिथून पळून गेल्या.
पोलिसांपासून लपण्यासाठी त्या कधीकधी बुरखा घालत असत आणि एकदा तर स्वतःला लपविण्यासाठी मुस्लिम महिलादेखील झाल्या होत्या.
आझादच्या मृत्यूनंतर त्यांनी पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. चौकशीच्या बहाण्याने त्यांना सुमारे 6 महिने मारेकऱ्यांसह तुरुंगात ठेवण्यात आले होते, पोलिसांकडे त्याच्याविरुद्ध कोणतेही पुरावे नव्हते म्हणून नंतर त्यांची सुटका करण्यात आली परंतु तीन वर्षांसाठी लाहोर सोडण्यास बंदी घालण्यात आली.
त्यांनी दिल्लीत काँग्रेस पक्षातही काम केले, पण नंतर त्यांनी स्वत:ला शैक्षणिक कार्यात झोकून दिले.
15 ऑक्टोबर 1999 रोजी उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथे त्यांचे निधन झाले.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








