You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
‘साप, अस्वल, वाघ सगळंच या जंगलात आहे; पण आम्ही न भिता इथे शेती करत आहोत’
- Author, विशाखा निकम
- Role, प्रतिनिधी, बीबीसी मराठी
‘साप, अस्वल, वाघ सगळंच या जंगलात आहे. पण आम्ही त्यांना भीत नाही’, असं अमरावतीच्या शेतकरी बहिणी आत्मविश्वासाने सांगतात.
जंगलातील भागात शेती करणे ही अत्यंत अवघड गोष्ट मानली जाते. जंगली श्वापदांची भीती तर क्षणोक्षणी असते त्यातही दोन बहिणी कुणाच्याही मदतीशिवाय शेती करत आहेत. त्यांच्या संघर्षाची आणि जिद्दीची ही गोष्ट आहे.
सुशीला बिडकर आणि बेबी बिडकर या दोघी बहिणी गेली 23 वर्षं अमरावती जिल्ह्यातील पंढरीच्या जंगलात आपली वडिलोपार्जित शेती करतायत.
अमरावती जिल्ह्यात पुसला हे त्यांचं मूळ गाव. गावाची लोकसंख्या 25 हजारांच्या घरात आहे. याच गावापासून 8 किलोमीटर लांब जंगलात त्यांची शेती आहे.
एकूण 4 एकर जमिनीवरचा सातबारा त्यांच्या नावावर आहे. हे महेंद्री पंढरीचं हे 10 हजार हेक्टरचं संरक्षित जंगल आहे. सध्या त्यांच्या शेतात कपाशी, तूर, एरंडी आणि संत्र्याचं पीक आहे.
सुशीला आणि बेबी दोघीही मोठ्या हिमतीनं शेती करतात.
शेतापर्यंतचा त्यांचा 8 किलोमीटरचा प्रवास सोपा नाही आहे.
त्या सांगतात, "हे पंढरी, महेंद्रीचं अभयारण्य आहे. हे खूप घनदाट जंगल आहे. याच जंगलातून आम्ही रात्रीही प्रवास करतो. साप, अस्वल, विंचू, वाघ, पट्टेदार रोही, डुकरं सगळंच या जंगलात आहे. दिवसा फार काही वाटत नाही पण रात्री खूप भीती वाटते."
या जंगल परिसरात एकूण 5 पट्टेदार वाघ असल्याची माहिती वन विभागानं आम्हाला दिली. याशिवाय अस्वल आणि बिबट्यांनी रहिवाशांवर हल्ले केल्याच्याही घटना इथे घडलेल्या आहेत. सुशीला आणि बेबी यांना देखील वाघ दिसल्याचं त्या सांगतात.
सुशीला सांगतात की "वाघाशी प्रत्यक्षात आमचा दोनदा सामना झाला. आमचा इकडे एक झोपा आहे, आम्ही इथे शेतात रात्री रोही किंवा डुकरांसाठी फटाके फोडतो, फटाका फोडायला आम्ही एकदम शेवटी गेलो तेव्हा आम्हाला माहिती नव्हतं की वाघ आमच्यावर निशाणा धरुन होता.
"आम्ही गेलो आणि सुतळीबॉम्ब फोडला. त्या आवाजानं तो चवताळला. आम्हाला काहीच सुचलं नाही. आम्ही तसंच हातातली पर्स घेऊन बिना चप्पलचं घराकडे पळत निघालो. त्यावेळी काही वाटत नाही सगळं सुचतं, पण घरी गेल्यावर काहीच कळत नाही. आपण आपलं मरण स्वत:च्या डोळ्याने पाहिलेलं असतं," सुशीला सांगतात.
पाटबंधारे विभागानं दिलेला रस्ता लांब पडतो शिवाय या रस्त्यावर अधिक धोका जाणवतो, असं या बिडकर बहिणींनी बीबीसीशी बोलताना सांगितलं. त्यामुळे त्या शॉर्टकटचा वापर करतात. मात्र या शॉर्टकटमध्ये कमी धोका नाहीये.
जवळच्या मार्गाने त्यांचं हे शेत घरापासून 8 किलोमीटर आहे. 5 किलोमीटरचा प्रवास त्या रिक्षानं करतात आणि 3 किलोमीटर त्या चालत निघतात. कधीकधी रात्री पूर्ण 8 किलोमीटर चालत जावं लागतं, असं त्या सांगतात.
या वाटेत सुशीला आणि बेबी यांना प्राण्यांची भीती तर आहेच मात्र मोठमोठे ओढे, नाले पार करत त्यांना रोज आपलं शेत गाठावं लागतं.
"आम्ही जेव्हा हा 3 किलोमीटरचा जंगल परिसर पार करतो तेव्हा असे 3-4 नाले लागतात. यातला 1 नाला खूप खोल आहे त्यात अनेकदा अपघात झाले आहेत. पुरातून जाताना यातून बरेचजण वाहून गेलेले आहेत. आता मी ज्या पद्धतीनं तुम्हाला आणलं तो रस्ता 3 किंवा 4 किलोमीटर जवळ पडतो त्यामुळे मी तुम्हाला शॉर्टकटने आणलं," त्या सांगतात.
गेली 23 वर्षं सुशीला आणि बेबी या शेती करतात, आई-वडिलांच्या मृत्यूनंतर शेतीचा पूर्ण भार या दोघींवर आला. सुशिक्षित असून या दोघींनी पूर्णवेळ शेती करण्याचा निर्णय घेतला. सुशीला यांनी इंग्लिश लिटरेचरमध्ये बी.ए. पूर्ण केलं आहे. बेबी या 12 वीपर्यंत शिकल्या आहेत.
सुशीला आणि बेबी 3 एकरच्या संपूर्ण शेतात फवारणी, ओलीत, कापणी, शेतीची मशागत अशी सगळी कामं स्वत: करतात.
इथे मजूर मिळायला अडचणी असल्याचं बेबी सांगतात.
बेबी सांगतात, "शेती करताना अनेक अडचणी असतात. ऐनवेळी मजूर मिळत नाहीत किंवा साधनं मिळत नाहीत. त्यावेळी प्रत्येक गोष्ट चिकाटीनं आपल्यालाच करावी लागते. त्यामुळे मी स्वत:च पाठीवर पंप घेऊन फवारा मारते, माझी बहीण बाकी कामं करते. पाणीसुद्धा रात्रीच्यावेळी आम्हीच ओलतो, दिवसाने पण ओलतो. जशी लाईन असते तसं."
शेताला लागणारं पाणी वीजेवर अवलंबून असल्याने त्यांना वेळी अवेळी जंगलातून जावं लागतं. नियमित वीज पुरवठा नसल्यानं शेतीला फटका बसतो असं सुशीला यांनी सांगितलं.
शेती करण्यासाठी पाणी लागतं त्यामुळे जेव्हा इलेक्ट्रिक सप्लाय असतो तेव्हा या दोघींना शेतात यावं लागतं.
शेतात रात्री आपल्या बचावासाठी आणि पिकाचं नुकसान होऊ नये म्हणून सुशीला आणि बेबी रात्रभर शेतात फटाके फोडतात. शेतात पहारा देऊन झाला की दोघी पहाटेच्या सुमारास आपल्या घराच्या दिशेनं चालत निघतात.
"आता सध्या शेतात कपाशी, तूर, एरंडी, मोठी संत्र्याची झाडं आहेत. लहान संत्र्याची झाडं आहेत. पण रोही ते मोठी होऊ देत नाही. या शेतामधून आपण 5 एक लाखाचं उत्पन्न घेतो, त्यात आपल्याला 2.5 ते 3 लाख खर्च येतो. बाकी आमची दोघींनी मेहनत निघते.
आणि बरंच काही करता आलं असतं पण प्राण्यांमुळे पीकाची हानी होतेय, नुकसान होतंय. इलेक्ट्रिक बोर्डामुळे जे नुकसान होतंय त्यामुळे आम्ही भरघोस उत्पन्न घेऊ शकत नाहीये.
"आठवड्यात 4 दिवस रात्री पाणी पुरवठा होतो आणि 3 दिवस दिवसा. वेळेवर कधीच शेतीला पाणी मिळत नाही आणि त्यामुळे भरघोस उत्पन्न होऊ शकत नाही," असं बिडकर भगिनी सांगतात.
आपल्या शेतात रासायनिक खतांचा वापर करायचा नाही असा त्यांचा आग्रह आहे, पण त्याची किंमतही त्यांना मोजावी लागते. जैविक शेती करणं, सेंद्रिय शेती करणं, याला फार मेहनत आहे कष्ट करावे लागतात. पण सध्या याची गरज आहे, असं त्यांना वाटतं.
महिला सर्व क्षेत्रात अव्वल कामगिरी करू शकतात यावर या दोन्ही बहिणींचा विश्वास आहे. मात्र महिला आहोत म्हणून कधीकधी भीती मनात असते. समाजानं आपला दृष्टीकोन बदलायला हवा असंही त्या म्हणतात.
केवळ दोघी बहिणीच शेती करतो याचा देखील काही लोकांना त्रास होत असल्याचं सुशीला यांनी सांगितलं. पुरुषप्रधान समाजामुळे अनेक अडचणी येत असल्याचं त्यांच्या बोलण्यातून जाणवतं.
सुशीला सांगतात, "समाजाचा एक दृष्टिकोन आहे की रात्री शेतात पाणी ओलायला जातात. मग काय करत असतील? बरं, कुठेही गेलो आणि असं सांगितलं की आम्ही शेती करतो, तुम्ही शेती करता, मग कोण आहे सोबत. आई काय करते, वडील काय करतात. इतके सगळे प्रश्न निर्मीण होते.
"अक्षरशः बगिचातील संत्री विकण्यापर्यंत वेगळा संघर्ष असतो, खरेदी करायला पुरुषमंडळी येतात. व्यापारी येतात. त्यांच्याशी बोलणं होतं. कधी-कधी त्यांना वाटतं यांना काही कळत नाही. ते कमी भाव मागतात, हा महिलांचा संघर्ष जास्त आहे, म्हणजे महिला कितीही हुशार असली तरी ती कष्ट करत असली तरी ती दुसऱ्याच्या नजरेत तुच्छ असते," असं सुशीला सांगतात.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)