प्रेग्नन्सी टूरिझम : 'केवळ गरोदर राहण्यासाठी या महिला आमच्याकडे येतात'

फोटो स्रोत, RAJESHJOSHI/BBC
- Author, दीपक शर्मा
- Role, बीबीसी प्रतिनिधी
जर्मनीची एक महिला लडाखला येते आणि स्थानिक पुरुषासोबत संबंध ठेवल्याने तिला दिवस जातात.
ती केवळ गरोदर राहण्यासाठी इथे आलेली असते. आपल्या देशातून इतक्या लांब एखाद्या परक्या पुरुषाशी संबंध ठेवण्यासाठी ती का आली होती?
याचं कारण इथले ब्रोक्पा समुदायाचे लोक.
लडाखच्या सिंधू नदीच्या खोऱ्यात बियामा, दाह, हनु आणि दारचिक नावाची गावं आहेत. इथं राहणारे ब्रोक्पा समुदायाचे तब्बल 5000 लोक स्वतःला ‘शुद्ध’ आर्य वंशाचे समजतात.
इंटरनेटच्या प्रचार आणि प्रसारामुळे या ब्रोक्पा लोकांविषयीची माहिती जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचली. परदेशी लोक इथं 'प्रेग्नन्सी टूरिझम'साठी येतात असं म्हटलं जातं.
बरेच जण असं म्हणतात की, हे ब्रोक्पा लोक ‘आर्य’ आहेत. त्यामुळे परदेशी महिला गर्भवती होण्याच्या उद्देशाने इथं येतात, जेणेकरून इथल्या पुरुषांशी संबंध ठेवून त्या शुद्ध आर्य मुलांना जन्म देतील.
पण, ब्रोक्पा लोकांना याबद्दल फारसं बोललेलं आवडत नाही. यामुळे आपल्या समाजाची बदनामी होईल, असं त्यांना वाटतं.
'द एट्थ बेबी... इन सर्च ऑफ प्युरिटी' या माहितीपटात संबंधित पुरावे मिळतात. 2007 मध्ये संजीव सिवन यांनी ही डॉक्युमेंट्री तयार केली होती.
बटालिक गावातील एका दुकानदाराने नाव न घेण्याच्या अटीवर माहिती सांगितली होती.
'काही वर्षांपूर्वी मी जर्मनीतील एका महिलेसोबत लेहच्या हॉटेलमध्ये दिवस घालवले होते. यानंतर ती गरोदर झाली. आणि काही वर्षांनी तिच्या मुलासोबत मला भेटायला आली.'
या समुदायाची वैशिष्ट्यं काय?

फोटो स्रोत, RAJESHJOSHI/BBC
हा समुदाय स्वतःला ‘शुद्ध आर्य’ समजतो.
ब्रोक्पा समुदायातील ल्हामो नावाची मुलगी सांगते, "आम्ही आर्य आहोत हेच ऐकत लहानाचे मोठे झालोय. तुम्ही ऐकलं असेल की, आर्य लोक उंचेपुरे असतात. आमच्या समुदायातील सगळे पुरुष अंगकाठीने असेच आहेत. आम्ही निसर्गाची पूजा करतो आणि आम्ही ‘शुद्ध आर्य’ असल्याचाच हा पुरावा आहे."
उर्वरित लडाखच्या तुलनेत पाहिलं तर बियामा, गारकोने, दार्चिक, दाह आणि हानू या गावांतील लोकांचे चेहरे खूप वेगळे दिसतात.
काही वर्षांपूर्वी एका जनुकीय संशोधनाअंती असं दिसून आलंय की, आर्य लोक बाहेरून भारतीय उपखंडात आले असावेत.
ब्रोक्पा लोकांवर वैदिक संस्कृतीचा प्रभाव असल्याचं त्यांच्या विधींमधून दिसून येतं.

फोटो स्रोत, RAJESHJOSHI/BBC
ब्रोक्पा समुदायातील स्वांग हे कारगिलमधील एका कॉलेजमध्ये शिक्षक आहेत. ते ब्रोक्पा कॉम्प्लेक्सवर संशोधन करतात.
ते सांगतात, "आमची संस्कृती वैदिक संस्कृतीशी संबंधित आहे. आमच्या भाषेवर संस्कृतचाही प्रभाव आहे. उदाहरण म्हणून बघायचं झालं तर आम्ही घोड्याला अश्व म्हणतो. आम्ही देवदेवतांची पूजा करतो."
काही इतिहासकारांनी यावर संशोधनही केलंय. ए.एच. फ्रँकी या इतिहासकाराने त्यांच्या ‘हिस्ट्री ऑफ वेस्टर्न तिबेट’ या पुस्तकातही या ‘शुद्ध आर्य’ लोकांचा उल्लेख केलाय.
स्वांग सांगतात,"आम्ही ‘अलेक्झांडर द ग्रेट’चे वंशज असल्याचा दावा बरेच लेखक करतात."
दुसरीकडे, पाकव्याप्त काश्मीरमधील कलश जमातीचे लोक, हिमाचल प्रदेशातील मलाना आणि बडा भंगाल गावातील लोक देखील स्वतःला अलेक्झांडरचे वंशज म्हणवून घेतात.

फोटो स्रोत, Getty Images
'ब्रोक्साकात' या त्यांच्या बोलीभाषेत ‘स्वांग ओ’ नावाचा शब्दकोश तयार करण्यात आला आहे. संस्कृत आणि त्यांच्या भाषेत मोठ्या प्रमाणात साम्य असल्याचं ब्रोक्पा लोक सांगतात.
ब्रोक्पा लोकांच्या लोककथांवर नजर टाकल्यानंतर काही गोष्टींचा उलगडा होतो. त्यांचे पूर्वज सातव्या शतकात पश्चिम हिमालयातून गिलगिट-बाल्टिस्तानच्या प्रदेशात आले. सध्या हा भाग सध्या पाकव्याप्त काश्मीरमध्ये आहे.
ब्रोक्पा लोक दरवर्षी ऑक्टोबर महिन्यात बोनोना नावाचा उत्सव आयोजित करतात. जिथं जिथं ब्रोक्पा लोक राहतात त्या प्रत्येक गावात हा उत्सव साजरा केला जातो. पण सीमेपलीकडे म्हणजेच पाकिस्तानात राहणाऱ्या आर्यांनी आता इस्लाम स्वीकारलाय. त्यामुळे तिथं हा उत्सव साजरा केला जातो का याविषयी शंका आहे.
ब्रोक्पा हा समुदाय शेतीवर अवलंबून होता, तर काहीजण सैन्यात नोकऱ्या करायचे. पण त्यांच्या पुढच्या पिढ्यांना शिकायचं आहे.
स्मार्ट फोन आल्यापासून त्यांचं जीवनमान सुधारलं आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून ते सीमेच्या पलीकडे असणाऱ्या आपल्या समाजातील लोकांशी सुद्धा संपर्क ठेऊन असतात.

फोटो स्रोत, RAJESHJOSHI/BBC
ल्हामो सांगते, "आम्ही आमच्या बोलीभाषेतच संवाद साधतो. त्यांनाही आर्य असल्याचा अभिमान आहे." नोकरीसाठी पाटण्याला जाल का? या प्रश्नावर सेवांग म्हणतात, "आपली ओळख जपत नोकरी मिळवणं मोठं आव्हान आहे." 21 व्या शतकातले हे शुद्ध आर्य राज्यासाठी नाही, तर रोजगार मिळावा म्हणून लढत आहेत. पण रोजगारासाठी आपली ओळख सोडायलाही ते तयार नसल्याचं सांगतात.
(ही बातमी पहिल्यांदा बीबीसी तेलुगूवर 2018 मध्ये प्रसिद्ध झाली होती.)
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








