You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
नांदेडमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के; भूकंप आला तर काय करायचं?
नांदेड शहर आणि अर्धापूर, मुदखेड, नायगाव, देगलूर, बिलोली या तालुक्यातून गुरुवारी 21 मार्चला सकाळी 06:09, 06:19 आणि 6:24 मिनिटांनी तीन वेळा भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले असल्याची माहिती नांदेड जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली आहे.
जिल्हा आपत्ती व्यवस्थापनानं दिलेल्या माहितीनुसार, या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर अनुक्रमे 4.5, 3.6 आणि 1.8 अशी तीव्रता नोंदवण्यात आलेली आहे.
दरम्यान, नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क रहावे, असं आवाहन नांदेडचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केलं आहे.
“नागरिकांनी घाबरुन न जाता सतर्क रहावं. तसंच गावात ज्या लोकांच्या घराचं छत पत्र्याचं आहे आणि त्यांनी पत्र्यावर आधारासाठी दगड ठेवले आहेत त्यांनी त्वरित दगड काढून घ्यावेत,” असं आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केलं आहे.
भूकंपाचा केंद्रबिंदू हिंगोलीत
या भूकंपाचा केंद्रबिंदू हिंगोलीतील रामेश्वर तांडा हे ठिकाण आहे. नांदेड जिल्ह्यात जाणवलेले धक्के सौम्य स्वरुपाचे असून कुठेही नुकसान झालेलं नाही.
21 मार्च रोजी सकाळी 06:08:30 वाजता 4.5 रिश्टर स्केलचा भूकंप झाल्याची नोंद राष्ट्रीय भूकंप मापण यंत्रणेवर दिसून आली.
हिंगोली जिल्ह्य़ातील वसमत तालुक्यात असलेल्या कुरुंदा आणि दांडेगावच्या उत्तर भागातील रामेश्वर तांड्याच्या उत्तर भागात भूकंपाचे केंद्र असल्याचे दिसून आले. याची खोली 10 किलोमीटर असल्याचे दिसत आहे.
लगेचच दुसरा हलका धक्का पहिल्या धक्क्यानंतर अकरा मिनिटांनी म्हणजे सकाळी 06:19:05 वाजता 3.6 रिश्टर स्केल चा भूकंप झाल्याची नोंद राष्ट्रीय भूकंप मापण यंत्रणेवर दिसून आली.
मात्र या भूकंपाचे केंद्र तीन किलोमीटर दक्षिणेला असलेल्या कुरुंदा आणि दांडेगावच्या रामेश्वर तांड्याच्या दक्षिण भागात असल्याचं दिसून आलं. याही भूकंपाची खोली 10 किलोमीटर असल्याचे दिसत आहे.
याआधीही हिंगोली जिल्ह्यात अनेकदा भूकंपाचे सौम्य धक्के बसले आहेत.
यावेळेस हिंगोलीसह नांदेड, परभणी जिल्ह्यातील अनेक ठिकाणी या भूकंपाचे धक्के बसल्याचे नागरिकांनी सांगितले आहे.
भूकंप कशामुळे येतात?
पृथ्वीचं कवच एकसंध नाही तर अनेक टेक्टॉनिक प्लेट्स म्हणजे भूपट्टांनी मिळून बनलं आहे. या भूपट्टांच्या सीमा जिथे एकमेकांना भिडतात, तिथे भूगर्भीय हालचालींची तीव्रता जास्त असते.
या प्लेट्स एकमेकांशी घासतात, एकमेकांपासून दूर जातात किंवा कधी एक प्लेट दुसऱ्या प्लेटवर चढते.
वर्षाला जास्तीत जास्त 1 ते 10 सेंटीमीटर एवढ्या मंद गतीनं ही हालचाल होत असते. पण कधीकधी त्यातही अडथळा येऊन दबाव निर्माण होतो. मग अचानक तो दबाव मोकळा होतो, तेव्हा त्यातून मोठा भूकंप येऊ शकतो.
पृथ्वीवर असे तीन मुख्य प्रदेश आहेत जिथे मोठ्या भूपट्टांच्या हालचाली मोठ्या प्रमाणात होत आहेत. पॅसिफिक रिंग ऑफ फायर, मिड अटलांटिक रिज आणि अल्पाईड बेल्ट म्हणजे आल्प्सपासून हिमालयापर्यंतचा पट्टा.
अल्पाईड बेल्टच्या पूर्व भागात भारतीय भूपट्ट ही युरेशियन प्लेटखाली जाते आहे, त्यातून हिमालय पर्वत आणि उत्तर भारताचा भाग, अंदमान आणि कच्छचं रण तसंच तिबेट, पाकिस्तान, अफगाणिस्तानमध्ये भूकंप होतात.
युरोपचा दक्षिण भाग, तुर्की, सीरिया, इराण हे देशही याच अल्पाईड बेल्टमध्ये आहेत.
पण भूपट्टांच्या हालचाली कमी असलेल्या ठिकाणीही भूकंप येऊ शकतात. उदाहरणार्थ, महाराष्ट्रात लातूर आणि कोयनानगरला झालेले भूकंप.
खडक आणि मातीतले बदल, ज्वालामुखी आणि लाव्हा रसाच्या हालचाली, जमिनीखालचे पाण्याचे प्रवाह अशा गोष्टींमुळे असे भूकंप निर्माण होऊ शकतात.
कधीकधी अणुस्फोट खाणकाम, तेलासाठी केलं जाणारं उत्खनन, मोठ्या धरणांमुळे तयार झालेले तलाव अशा मानवनिर्मिती गोष्टींमुळे भौगोलिक रचनांवर परिणाम होऊन भूकंप येऊ शकतात.
भूकंप आला तर काय करायचं?
भूकंप सुरू झाला की तडक घराबाहेर पडा, असा सल्ला अनेकजण देतात.
पण यूएस जिऑलॉजिकल सर्व्हे या अमेरिकेतील सरकारी वैज्ञानिक संस्थेचे तज्ज्ञ सांगतात, की जमिनीचं थरथरणं थांबेपर्यंत तुम्ही असाल तिथेच सुरक्षितरित्या थांबलात इजा होण्याचा धोका कमी होतो.
'ड्रॉप, कव्हर अँड होल्ड ऑन' असा मंत्र ते देतात. हात आणि गुडघे खाली टेकून राहा - म्हणजे तुम्ही स्वतः पडणार नाही.
टेबलासारख्या वस्तूंखाली आश्रय घ्या आणि टेबल वगैरे नसेल तर डोकं कव्हर करून कंपनं थांबेपर्यंत फार हालचाल न करता स्थिर राहायचा प्रयत्न करा.
काहीजण दरवाजात उभं राहायचा सल्ला देतात, पण सगळेच दरवाजे सुरक्षित नसतात.
भूकंप थांबल्यावर काय करायचं?
तुम्ही ज्या इमारतीत आहात ती मजबूत असेल तर तिथेच थांबा, पण झुंबरं, खिडक्या किंवा गॅलरीपासून दूर राहा कारण असे भाग लवकर कोसळण्याची शक्यता असते.
इमारत धोकादायक झाली असेल तर कंपनं थांबल्यावर लवकरात लवकर मैदानात किंवा अशा उघड्या जागी जा. कारण अनेकदा मोठ्या भूकंपानंतर आफ्टरशॉक म्हणजे छोटे भूकंप येण्याची शक्यता असते.
पण उंच इमारती, इलेक्ट्रिक तारा, झाडं किंवा कुठल्या पिलर्स किंवा पोल्सपासून दूर राहा. भूकंपादरम्यानही तुम्ही रस्त्यावर किंवा कुठे मोकळ्या जागी असाल, तर या गोष्टींपासून दूर राहायचं लक्षात ठेवा.
भूकंपानंतर गॅसपाईपलाईन फुटून गळती होण्याचा धोकाही असतो. तसंच आगीचा धोका असलेल्या जागांपासून दूर राहा.