You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
राजकोट किल्ल्यावर शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ जमीन खचली, महिन्यापूर्वीच झालेलं उद्घाटन
- Author, मुश्ताक खान
- Role, बीबीसी मराठीसाठी
सिंधुदुर्गच्या मालवणमधील ऐतिहासिक राजकोट किल्ल्यावरचा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
महिनाभरापूर्वी उद्घाटन झालेल्या या पुतळ्याच्या चबुतऱ्याजवळची जमीन खचली आहे. त्यामुळं पुन्हा याच्या कामावरून चर्चा सुरू झाली.
सोशल मीडियावर या चबुतऱ्याच्या बाजूला पडलेल्या भगदाडाचे फोटो आणि व्हीडिओ व्हायरल झाले आहेत. त्यामुळं स्थानिकांच्या आणि शिवप्रेमींच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत.
राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने निवेदन प्रसिद्ध करत म्हटले आहे की, पुतळ्याला काहीही झाले नसून चबुतऱ्याच्या बाजूची जमीन खचली आहे.
तसेच, त्याची दुरुस्तीदेखील सुरू झाल्याचे त्यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे.
गेल्यावर्षी पावसाळ्यात, म्हणजे 26 ऑगस्ट 2025 रोजी, मुसळधार पावसात याच ठिकाणचा छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळला होता. त्यानंतर सरकारवर मोठ्या प्रमाणात टीका झाली.
त्यानंतर सरकारनं तातडीनं दुसरा पुतळा बसवून महिनाभरापूर्वीच त्याचं अनावरण केलं होतं.
मात्र, आता पुन्हा या ठिकाणची जमीन खचल्याचं समोर आल्यानं नव्या वादाला सुरुवात होण्याची शक्यता आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाने याबाबत 'केवळ बाजूचा मातीचा भराव खचल्या'चं सांगत स्पष्टीकरण दिलं आहे. तसंच, दुरुस्तीचं कामही सुरू झालं आहे.
नेमके काय झाले?
राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा जुना पुतळा कोसळल्यानंतर सरकारच्या वतीनं याठिकाणी नवीन पुतळा बसवण्यात आला होता.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 11 मे रोजी या नवीन पुतळ्याचं पूजन करण्यात आलं होतं. त्यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजप नेते नारायण राणे यांचीही उपस्थिती होती.
पण नुकतेच या पुतळ्याच्या चबुतऱ्याच्या शेजारील जमीन खचल्याचे काही फोटो आणि व्हीडिओ सोशल मीडियावर समोर आले. त्यामुळं यावर पुन्हा चर्चा सुरू झाली.
पावसाळ्यात अगदी सुरुवातीलाच या ठिकाणची अशी परिस्थिती झाल्यामुळं शिवप्रेमींकडून याच्या कामावर प्रश्नचिन्हं उपस्थित करण्यात आलं.
रविवारी या ठिकाणी आलेले शिवप्रेमी देवानंद लुडबे यांनी या प्रकारावरून काम किती निकृष्ट दर्जाचे असेल, असं म्हणत टीका केली होती. तसंच दर्जेदार काम होणं गरजेचं असल्याचं, म्हटलं होतं.
असा आहे नवा पुतळा
सरकारच्या माहिती व जनसंपर्क विभागाच्या वेबसाईटवरील माहितीनुसार, 31 कोटी 75 लाख रुपये खर्च करून सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत हा नवा पुतळा उभारण्यात आला होता.
ज्येष्ठ मूर्तिकार राम सुतार यांच्या कंपनीमार्फत हे काम पूर्ण करण्यात आलं होतं. पुतळ्याचं पूजन करण्यात आलं तेव्हा राम सुतार यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचा सत्कारही करण्यात आला होता.
'सार्वजनिक बांधकाम विभागाने विक्रमी वेळेत पुतळ्याचे काम पूर्ण करुन महाराजांच्या कर्तृत्वास साजेसा भव्य पुतळा उभारला,' असं त्यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले होते.
या उभ्या पूर्णाकृती पुतळ्याची उंची 60 फूट असून संपूर्ण पुतळा ब्राँझ धातूमध्ये उभारण्यात आला. आधीचा पुतळा कोसळला होता त्यामुळं यावेळी आधारासाठी स्टेनलेस स्टील सपोर्ट फ्रेम करण्यात आली होती.
तसंच चौथऱ्यासाठी M50 या उच्च दर्जाचे काँक्रीट व स्टेनलेस स्टील सळईचा वापर करण्यात आला. पुतळ्याचं संकल्पन आयआयटी मुंबईकडून तपासून घेण्यात आल्याचंही यात म्हटलं होतं.
त्यामुळं हा पुतळा आणि त्याचं काम अतिशय भक्कम असल्याचं वारंवार सांगण्यात आलं. मात्र, या प्रकारानं पुन्हा प्रश्न उपस्थित होत आहेत.
सार्वजनिक बांधकाम विभागाने काय सांगितले?
जमीन खचल्याच्या मुद्द्यावर पुतळ्याचं काम करणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीनं लगेचच प्रतिक्रियाही देण्यात आली. स्थानिक वृत्तपत्रानं याबाबत दिलेल्या वृत्तावरच्या खुलाशाच्या माध्यमातून ही प्रतिक्रिया समोर आली आहे.
नव्याने उभारण्यात आलेला पुतळा आणि त्याचा चबुतरा पूर्णपणे सुस्थितीत असून त्याचं कोणतंही संरचनात्मक नुकसान झालं नसल्याचं विभागाने प्रसिद्धी पत्रकात स्पष्ट केलं.
सिंधुदुर्ग जिल्हा आणि मालवण तालुक्यातील मुसळधार पावसामुळं चबुतऱ्याच्या बाजुनं भरलेल्या मातीचा भराव काही प्रमाणात खचला असल्याचं त्यात म्हटलं आहे.
हा खचलेला भाग दुरुस्त करण्याच्या कामाला सुरुवात झाली असून तत्परतेनं ते काम केलं जात असल्याचंही त्यात म्हटलं आहे.
हा पुतळा, त्याभोवतीचा परिसर याची नियमितपणे देखभाल आणि सुरक्षा परीक्षण केलं जात असल्याचंही सार्वजनिक बांधकाम विभागानं सांगितलं आहे.
आधीच्या पुतळ्याबाबत काय घडले होते?
मालवणच्या समुद्रकिनारी असलेल्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा 26 ऑगस्ट 2024 रोजी वादळी वारा आणि पावसामुळं कोसळला होता.
विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्याच्या आठ महिन्यांपूर्वीच या पुतळ्याचं उद्घाटन केलं होतं. म्हणजे उद्घाटनानंतर आठ महिन्यांत हा पुतळा कोसळला होता.
या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्रासह देशभरातून शिवप्रेमींचा संताप समोर आला होता. त्यावनंतर तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही माफी मागितली होती.
त्यानंतर पुतळ्याचे शिल्पकार जयदीप आपटे यांना अटकही करण्यात आली होती. यावरून बरंच राजकारण पेटलं होतं.
सरकारनं शिवाजी महाराजांच्या नावाचा वापर राजकारणासाठी करता यावा म्हणून घाई-गडबडीत हे स्मारक उभारल्याचा आरोपही झाला.
माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी याबाबत त्यापूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून शंकाही उपस्थित केली होती.
तर सत्ताधाऱ्यांनी विरोधक निवडणुका डोळ्यासमोर ठेवून याबाबत राजकारण करत असल्याची टीका केली होती.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.