IND vs NED : विराटची गोलंदाजी, श्रेयस आणि राहुलची ‘फटाके’बाज शतकं, भारताचा सलग नववा विजय

विराट कोहली विकेटचा आनंद साजरा करताना

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, विराट कोहली विकेटचा आनंद साजरा करताना

आयसीसी वन डे विश्वचषकाच्या अखेरच्या साखळी सामन्यात भारतानं नेदरलँड्सला 160 धावांनी हरवलं आणि या स्पर्धेतला सलग नववा विजय साजरा केला.

भारतीय क्रिकेट टीमनं यापूर्वी 2003 साली एकाच विश्वचषक स्पर्धेत सलग आठ विजय मिळवले होते. रोहित शर्माच्या टीमनं 20 वर्षांपूर्वीचा तो रेकॉर्ड आता मोडला आहे.

भारतासमोर आता पहिल्या सेमी फायनलमध्ये न्यूझीलंडचं आव्हान असेल. मुंबईत वानखेडे स्टेडियमवर 15 नोव्हेंबर रोजी हा सामना होणार आहे.

बंगळुरूमध्ये चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या लढतीत नेदरलँड्ससमोर विजयासाठी तब्बल 411 धावांचं आव्हान होतं. पण भारतीय गोलंदाजांसमोर त्यांचा डाव 47.5 षटकांत 250 रन्समध्ये आटोपला.

भारतीय गोलंदाजांनी यापूर्वीच्या दोन सामन्यात प्रतिस्पर्धी टीमना 100 धावाही करू दिल्या नव्हत्या. नेदरलँड्सनं या सामन्यात चांगला प्रतिकार केला.

सायब्रँड एंजलब्रेख्तनं 45 धावा काढल्या. तर भारतीय वंशाचा फलंदाज तेजा निदामानरूनं धावांची 54 खेळी केली.

भारताकडून जसप्रीत बुमरा, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, रविंद्र जाडेजा यांनी प्रत्येकी 2 तर विराट कोहली आणि रोहित शर्मानं प्रत्येकी 1 विकेट घेतली.

विराट आणि रोहितला विकेट

विराट कोहली, शुबमन गिल सूर्यकुमार यादव आणि कर्णधार रोहित शर्मा या प्रमुख फलंदाजांनी केलेली गोलंदाजी हे भारतीय बॉलिंगचं मुख्य वैशिष्ट्य ठरलं.

न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात हार्दिक पंड्या जखमी झाल्यानंतर भारतानं सहावा गोलंदाज वापरला नव्हता. पण, सेमी फायनल आणि फायनलमध्ये ही गरज भासू शकते. त्याची तयारी म्हणून रोहितनं हा प्रयोग केला.

विराट कोहलीनं 3 ओव्हर्समध्ये फक्त 13 धावा देत नेदरलँड्सचा कर्णधार स्कॉट एडवर्ड्सला बाद केलं.विराटनं 31 जानेवारी 2014 नंतर पहिल्यांदाच वन-डे क्रिकेटमध्ये विकेट घेतलीय.

न्यूझीलंविरुद्धच्या सामन्यात हार्दिक पंड्या जखमी झाल्यानंतर रोहितनं पहिल्यांदाच सहावा गोलंदाज वापरला आहे. अभिनेत्री आणि विराटची पत्नी अनुष्का शर्मा त्याच्या विकेटचं सेलिब्रेशन करताना दिसली.

Instagram पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

Instagram पोस्ट समाप्त

कर्णधार रोहितनं सामन्याच्या शेवटच्या टप्प्यात 48 व्या ओव्हरमध्ये बॉल हाती घेतला. त्यानं फक्त 5 बॉलमध्ये 7 धावा देत नेदरलँड्सचा या इनिंगमधील सर्वात यशस्वी फलंदाज तेजा निदामानरूला बाद केलं.

शुबमन गिल आणि सूर्यकुमार यादव यांनीही प्रत्येकी 2 ओव्हर गोलंदाजी केली. टीम इंडियाच्या कामचलाऊ गोलंदाजांनी 7.5 ओव्हर्समध्ये 48 धावा देत 2 विकेट्स घेतल्या.

मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमरा, कुलदीप यादव आणि रवींद्र जाडेजा यांनी प्रत्येकी दोन विकेट्स काढल्या.

त्याआधी टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारताच्या श्रेयस अय्यर आणि के एल राहुलनं शतकं ठोकली. तर शुबमन गिल, रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी अर्धशतकी खेळी केल्या.

त्या जोरावर भारतानं 50 षटकांत 4 बाद 410 धावांची मजल मारली.

अखेर श्रेयसचं शतक

चौथ्या क्रमांकावर आलेल्या श्रेयस अय्यरनं के.एल. राहुलससह चौथ्या विकेटसाठी 128 बॉलमध्ये 208 धावांची भागिदारी केली.

श्रेयसनं शतक 94 बॉलमध्ये 10 चौकार आणि 5 षटकारांच्या मदतीनं नाबाद 128 धावा केल्या. त्याचा वन-डे कारकिर्दीमधील हा सर्वोच्च स्कोअर आहे.

श्रेयस अय्यर शतक साजरं करताना

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, श्रेयस अय्यर शतक साजरं करताना

श्रेयसनं यापूर्वी या विश्वचषकात श्रीलंकेविरुद्ध 82 आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 77 धावांच्या महत्त्वपूर्ण खेळी केल्या होत्या. पण शतकाची वेस त्याला ओलांडता आली नव्हती.

अखेर, नेदरलँड्सविरुद्ध विश्वचषकातील पहिलं शतक झळकावण्यात त्याला यश आलं.

के.एल. राहुलनं फक्त 62 बॉलमध्ये शतक झळकावलं. विश्वचषक स्पर्धेत भारतीय फलंदाजानं केलेलं हे सर्वात जलद शतक आहे.

राहुल या स्पर्धेतील भारताच्या पहिल्या सामन्यात 97 धावांवर नाबाद राहिला होता.

Shreyas Rahul

फोटो स्रोत, Getty Images

राहुल 63 बॉलमध्ये 102 धावा काढून बाद झाला. श्रेयस – राहुलच्या वेगवान भागिदारीमुळेच भारतानं 4 बाद 410 धावा केल्या. भारताचा या विश्वचषक स्पर्धेतील हा सर्वोच्च स्कोअर आहे.

नेदरलँड्सकडून पॉल वॅन मीकरेन आणि रॉलॉफ वॅन देर मर्वनं प्रत्येकी 1 तर बास दी लीडेनं प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.

रोहितची टीम गांगुलीचा विक्रम मोडणार?

टीम इंडियानं या स्पर्धेत सलग 8 सामने जिंकलेत. भारत हा या स्पर्धेतील एकमेव अपराजित संघ आहे. एकाच विश्वचषक स्पर्धेत सलग सामने जिंकण्याच्या आपल्याच रेकॉर्डची सध्या टीम इंडियानं बरोबरी केलीय.

यापूर्वी 2003 मधील स्पर्धेत सौरव गांगुलीच्या कॅप्टनसीमध्ये भारतीय संघानं सलग आठ सामने जिंकले होते. तो विक्रम मोडण्याची संधी रोहित ब्रिगेडला आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)