चंद्रकांत पाटील यांच्यानंतर आणखी एका भाजप आमदारावर शाईफेक

चंद्रकांत पाटील विजय देशमुख

फोटो स्रोत, Getty Images

आज विविध वृत्तपत्र आणि वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा..

1. चंद्रकांत पाटील यांच्यानंतर आणखी एका भाजप आमदारावर शाईफेक

राज्यात गेल्या दोन दिवसांपूर्वी पुण्यात भाजपचे मंत्री आणि ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक करण्यात आली होती.

हे प्रकरण ताजे असतानाच आणखी एका भाजप आमदारावर शाईफेक झाल्याचे प्रकरण घडले आहे.

विजयकुमार देशमुख असं या भाजप आमदारांचं नाव असून ते सोलापूर शहर उत्तर मतदारसंघातून विधानसभेत निवडून गेलेले आहेत.

विजयकुमार देशमुख यांच्यावर भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांनी शाई फेकण्याचा प्रयत्न केला. त्यांना पोलिसांनी तत्काळ अटक करण्यात आली आहे.

आमदार विजयकुमार देशमुख हे काल (13 डिसेंबर) एका विवाहाला गेले होते. त्यावेळी विवाहस्थळीच भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांकडून विजयकुमार देशमुख यांच्यावर शाई फेकण्यात आली. मात्र, सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलिसांमुळे देशमुख यांच्यावर शाई पडली नाही.

ही बातमी टीव्ही 9 मराठीने दिली.

2. भीमा-कोरेगाव प्रकरण : फादर स्टॅन स्वामींच्या कॉम्प्युटरमध्ये हॅकर्संनी टाकले कथित पुरावे

स्टॅन स्वामी
फोटो कॅप्शन, स्टॅन स्वामी

भीमा-कोरेगाव हिंसाचार प्रकरणातील आरोपी फादर स्टॅन स्वामी यांच्या कम्प्युटरमध्ये अनेक आक्षेपार्ह कागदपत्रे हॅकर्सद्वारे टाकण्यात आल्याचं समोर आलं आहे.

एका अमेरिकन फॉरेन्सिक कंपनीच्या नव्या अहवालात ही माहिती समोर आली आहे.

भीमा-कोरेगाव हिंसाचार प्रकरणाची चौकशी करणाऱ्या राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) आरोपांवर अमेरिकन फॉरेन्सिक फर्मने या अहवालावर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.

NIAने आपल्या चौकशीत फादर स्टॅन स्वामी आणि कथित माओवादी नेत्यांमध्ये कथित इलेक्ट्रॉनिक संवादाचे गंभीर आरोप केले होते.

फादर स्टॅन स्वामी यांच्या वकिलांनी सांभाळलेली बोस्टनस्थित फॉरेन्सिक संस्था आर्सेनल कन्सल्टिंगच्या अहवालानुसार, “तथाकथित माओवादी पत्रांसह सुमारे 44 कागदपत्रे अज्ञात सायबर हॅकरने स्टॅन स्वामी यांच्या कम्प्युटरमध्ये टाकली होती.” ही बातमी ई-सकाळने दिली.

3. नागपुरात CBI कडून इन्कम टॅक्सच्या 9 कर्मचाऱ्यांना अटक

सीबीआय

फोटो स्रोत, MANJUNATH KIRAN

नागपुरात CBI ने एका कारवाईअंतर्गत इन्कम टॅक्स अर्थात आयकर विभागाच्या 9 कर्मचाऱ्यांना अटक केली आहे. CBI तब्बल चार वर्षांपासून या प्रकरणाचा तपास करत होती.

हे प्रकरण परीक्षा घोटाळ्याशी संबंधित असून यामध्ये काल अटकेची कारवाई करण्यात आली.

अटक करण्यात आलेल्या उमेदवारांनी डमी उमेदवार परीक्षेत बसवून स्टाफ सिलेक्शनमधू नोकरी मिळवली, असा त्यांच्यावर आरोप आहे.

2012 ते 2014 दरम्यान ही परीक्षा झाली होती. 2018 मध्ये प्रकरणचा या प्रकरणाचा तपास CBIने सुरू केला होता. तपासाअंती पुरावे सापडल्याने अखेर 9 जणांवर अटकेची कारवाई करण्यात आली.

अटक झालेले सर्व कर्मचारी आयकर विभागात स्टेनोग्राफर आणि MTS या पदांवर 2014 पासून कार्यरत होते. या संदर्भातील गुन्हा CBIने 2018 मध्ये दाखल केला होता. ही बातमी झी 24 तासने दिली.

4. राज्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या, नांगरे-पाटील यांना पदोन्नती

विश्वास नांगरे पाटील

फोटो स्रोत, FACEBOOK/VISHWAS NANGRE PATIL

राज्यातील वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या असून त्यासंबंधित शासन आदेश जारी करण्यात आला आहे. बृहन्मुंबई सहपोलिस आयुक्त विश्वास नांगरे यांना पदोन्नती मिळाली असून त्यांच्याकडे आता राज्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अपर पोलिस महासंचालकपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

तसंच पुण्याचे आयुक्त अमिताभ गुप्ता यांची बदली झाली असून त्यांच्या जागी आता रितेश कुमार नवे आयुक्त म्हणून काम पाहतील. 

मिरा भाईंदरचे पोलिस आयुक्त सदानंद दाते यांची बदली झाली असून ते आता राज्याच्या दहशतवादी विरोधी पथकाचे अपर पोलिस महासंचालक असतील

विनय कुमार चौबे हे आता पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्त असतील. तर अमिताभ गुप्ता हे आता कायदा आणि सुव्यवस्था अपर पोलिस महासंचालक असतील.

विशेष पोलीस महानिरीक्षक मिलिंद भारंबे यांची बदली आता नवी मुंबईचे पोलिस आयुक्तपदी झाली आहे. तर वाहतूक पोलिस सह आयुक्त राजवर्धन यांची पदोन्नती झाली असून अपर पोलिस महासंचालक, सुरक्षा महामंडळ या ठिकाणी झाली आहे. ही बातमी महाराष्ट्र टाईम्सने दिली.

5. जयदेव उनाडकटला 12 वर्षांत टीम इंडियात संधी

भारत आणि बांगलादेश यांच्यात दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेला 14 डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे.

या मालिकेत दुखापतग्रस्त मोहम्मद शमीच्या जागी जयदेव उनादकटला स्थान देण्यात आलं आहे. या निमित्ताने उनादकटला तब्बल 12 वर्षांनी टीम इंडियात संधी मिळाली आहे.

डिसेंबर 2010 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिली आणि शेवटची कसोटी खेळली होती. नुकतेच झालेल्या विजय हजारे वनडे स्पर्धेत उनादकटच्या नेतृत्वाखाली सौराष्ट्र संघाने विजय मिळवला होता.

यानंतर आता संघात स्थान मिळाल्याची आणखी एक आनंदाची बातमी त्याला मिळाली आहे. भारतीय संघातील समावेशानंतर जयदेवने एक इमोशनल पोस्ट शेअर केलीच पण आता त्याच्या पत्नीनेही एक भावूक पोस्ट केली आहे. यातून जयदेवच्या भारतीय संघात पुनरागमनाचा पत्नी रिनीला फारच आनंद झाल्याचं दिसून येत आहे. ही बातमी एबीपी माझाने दिली.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)