You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
हायपरटेन्शन किंवा उच्च रक्तदाब म्हणजे काय? हा त्रास कसा टाळायचा?
- Author, ओंकार करंबेळकर
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
काही वर्षांपूर्वी डायबेटिस आणि उच्च रक्तदाब हे त्रास ठराविक वयानंतर होणारे आजार मानले जात. हृदयरोग, उच्च रक्तदाब, मधुमेह असे आजार साठीनंतरच्या लोकांना होतात असं दिसून यायचं.
मात्र, गेल्या दोन ते तीन दशकात भारतासह जगभरात ही स्थिती वेगानं बदलली आहे. या तिन्ही आजारांची सुरुवात वयाच्या अगदी कमी टप्प्यापासून सुरू होताना दिसत आहे.
बदलती जीवनशैली आणि इतर अनेक बदलांमुळे हे आजार दिवसेंदिवस कमी वयाच्या रुग्णांना होत असल्याचं दिसत आहे.
17 मे हा दिवस वर्ल्ड हायपरटेन्शन डे म्हणून पाळला जातो. त्या निमित्ताने आपण याची माहिती घेऊ.
हायपरटेन्शन याचाच अर्थ हाय ब्लड प्रेशर म्हणजेच उच्च रक्तदाब होय.
रक्तदाब हा दोनप्रकारे नोंदवला जातो. यात सिस्टॉलिक प्रेशर म्हणजे उच्च पातळीवरील दाब. रक्तदाब सुरक्षित पातळीच्या वर जातो, त्याला हाय ब्लडप्रेशर म्हणजेच वैद्यकीत भाषेत हायपरटेन्शन म्हटलं जातं.
आणि डायस्टोलिक प्रेशर म्हणजे कमी पातळीवरील दाब. हे दोन्ही मिलिमिटरमध्ये मोजले जातात.
युनायटेड किंग्डमच्या एनएचएस आरोग्यसेवेच्या माहितीनुसार जर तुमची रक्तदाबाची नोंद 140-90 अशी आली तर त्याला उच्च रक्तदाब म्हटले जाते.
जर तुमचे वय 80 च्या पुढे असेल तर 150-90 पासून उच्च रक्तदाब म्हटले जाते.
उच्च रक्तदाबामुळे कोणते धोके संभवतात?
जर तुमचा रक्तदाब सतत जास्त असेल तर रक्तवाहिन्यांवर त्याचा सतत ताण येत राहातो. त्याचा परिणाम हृदय, मेंदू, मूत्रपिंड, डोळे अशा अवयवांवर होत राहातो. आणखी हे प्रमाण कायम राहिले तर हृदयरोग म्हणजेच हार्ट अटॅक येण्याची शक्यता किंवा हृदय बंद पडण्याची शक्यता वाढते.
स्ट्रोकची शक्यता वाढते. किडनीसंदर्भातील आजार सुरू होतात किंवा किडनीचं काम बंद पडू शकतं.
अनेक रुग्णांच्या डोळ्यातील रेटिनामधील रक्तवाहिन्या खराब झाल्यामुळे दृष्टी जाऊ शकते.
रक्ताची गुठळी होण्याचा धोका संभवतो तसेच चयापचयासंबंधित आजार लठ्ठपणा, उच्च कोलेस्ट्रॉलकडे वाटचाल होऊ शकते.
हायपरटेन्शनची कारणं
आता या हायपरटेन्शनची कारणं काय असू शकतात याकडे पाहू. उच्च रक्तदाबाची अनेक कारणं सांगितली जातात. तसेच त्याचे एकमेव असे कारण सांगता येत नाही. तरीही काही बाबतीत उच्च रक्तदाबाचा त्रास सुरू होण्याची शक्यता असते.
जर तुमचं वजन अपेक्षित प्रमाणापेक्षा जास्त असेल तर, तुम्ही भरपूर मीठ खात असाल आणि फळं-भाज्या कमी प्रमाणात खात असाल तर, तुमची जीवनशैली बैठी असेल आणि व्यायाम करत नसाल तर रक्तदाब वाढण्याची शक्यता असते. तसेच तुम्ही भरपूर दारू, कॉफी आणि कॅफिन असलेली पेयं पित असाल, धूम्रपान करत असाल, तुमच्यावर फार ताण असेल, तुमचे नातलग किंवा कुटुंबातील आधीच्या पिढ्यांमध्ये हा त्रास असेल तर हायपरटेन्शनचा धोका संभवतो.
तसेच वय वाढण्यानुसारही रक्तदाब वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे वाढतं वय हासुद्धा एक घटक त्याला कारणीभूत आहे.
उच्च रक्तदाबावर उपाय काय?
उच्च रक्तदाब म्हणजेच हायपरटेन्शन कमी करण्यासाठी काय करायचा असा प्रश्न आम्ही मुंबई सेंट्रल येथिल वोकहार्ट हॉस्पिटलमध्ये कार्यरत असणाऱ्या डॉ. ऋतुजा उगलमुगले यांना विचारला.
त्या म्हणाल्या, रक्तदाब नियंत्रणात राहावा आणि पुढील गुंतागुंत टळावी यासाठी जीवनशैलीत मोठे बदल आणि औषधं घ्यावी लागतात. यामझ्ये सर्वात महत्त्वाचा भाग येतो तो आहार आणि व्यायामाचा.
आहारामध्ये डॅश म्हणजे डाएटरी अप्रोचेस टू स्टॉप हायपरटेन्शनचा समावेश करतात म्हणजे त्यात भरपूर फळं, भाज्या, धान्यं आणि कमी मेदयुक्त डेअरी पदार्थावर भर असतो.
आठवड्यातून मध्यम तीव्रतेचा एरोबिक व्यायाम किमान 150 मिनिटं करणं आवश्यक आहे. लठ्ठ असाल किंवा वजन जास्त असेल तर वजन कमी करणं आवश्यक आहेत. जेवणामध्ये सोडियम कमी करण्यासाठी मिठावर नियंत्रण हवे. दारू आणि धूम्रपान बंद केले पाहिजे.
डॉ. ऋतुजा पुढे सांगतात, तुमच्यावर असलेला ताण कमी करण्यासाठी माइंडफुलनेस, ध्यान किंवा डिप ब्रिदिंग केलं पाहिजे. तसेच जर तुम्हाला याचा त्रास होत असेल तर तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधंही घेता येतील.
गेल्या काही वर्षांमध्ये भरपूर प्रमाणात मीठ वापरलेले पदार्थ बाजारात दिसून येतात.
घरी जेवणात असलेलं मीठ आणि बाहेर खाल्ले जाणारे हे पदार्थ तसेच पाकिटबंद पदार्थ यामुळे लोकांच्या आहारातलं मिठाचं प्रमाण फारच वाढल्याचं दिसतं. वेळोवेळी यावर चिंता व्यक्त केली जाते.
इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशनने (एनआयएन) यावर्षी सादर केलेल्या नव्या मार्गदर्शक सूचनांमध्ये मीठ जास्त खाऊ नये असं म्हटलं आहे.
आय़सीएमआर आणि एनआयएननेही दररोज पाच ग्रॅमपेक्षा जास्त मीठ खाऊ नये असं म्हटलं आहे.
- आयोडाइज्ड मीठ वापरावं.
- सॉस-केचप, बिस्किटं, चिप्स, चिज, खारवलेले मासे यांचं प्रमाण कमी करावं असं म्हटलंय.
- भाज्या आणि फळांतून पोटॅशियम मिळवा.
- अतिप्रक्रिया केलेल्या पदार्थांत भरपूर साखर-मीठ आणि मेदयुक्त पदार्थ असतात. त्यात पोषणमूल्यं आणि तंतुमय पदार्थ म्हणजेच फायबर्स कमी असतात.
- या पदार्थांमध्ये कॅलरी मात्र भरपूर असतात. त्यामुळे या सुचनांमध्ये एक महत्त्वाची सूचना आहे ती म्हणजे सर्वांनी , सॉस, चिज, मेयोनिज, जॅम, फ्रुट पल्प, ज्युस, कार्बनयुक्त पेयं, पाकिटबंद रस असे पदार्थ कमी खावेत.
- घरातही भरपूर तेल-तूप, साखर, मीठ वापरुन पदार्थ केल्यास तेही चांगलं ठरणार नाही. बाहेर खाताना तर जास्त काळजी घेतली गेली पाहिजे. तळलेले, गोड, खारट, बेकरीतले पदार्थ टाळा.
भरपूर मीठ असलेल्या पदार्थांमुळे हायपरटेन्शनचा त्रास होतो आणि किडनीवरही परिणाम होतो असं या सूचनांमध्ये म्हटलं आहे.