इंटरनेट ते विमान : जेव्हा नेते विज्ञान नव्यानं लिहितात!

फोटो स्रोत, Getty Images
- Author, आयेशा परेरा
- Role, बीबीसी न्यूज, नवी दिल्ली
सत्यता न पडताळत कोणतेही वैज्ञानिक दावे करणाऱ्यांमध्ये आता भाजप नेते आणि त्रिपुराचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री बिप्लब देव यांचाही समावेश झाला आहे.
महाभारत काळापासून इंटरनेट अस्तित्वात होतं, असा दावा बिप्लब देब यांनी आगरतळामध्ये सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या एका कार्यक्रमात बोलताना केला.
देव यांनी गेल्याच महिन्यात त्रिपुराची धुरा हाती घेतली आहे.
"महाभारत काळात आणखी बऱ्याच तांत्रिक सोयीसुद्धा उपलब्ध होत्या. महाभारतात जे युद्ध झालं ते संजयने धृतराष्ट्राला सांगितलं. संजय हे युद्ध दूरवरून पाहू शकले कारण तेव्हा इंटरनेट उपलब्ध होतं," असं ते म्हणाले.
"त्या काळात इंटरनेट आणि उपग्रह होते. युरोप आणि अमेरिका ही तांत्रिक प्रगती आपल्यामुळे झाल्याचा दावा करत असले तरी या तांत्रिक यशाचा जनक भारतच आहे. अशा देशात जन्माला आल्याचा मला अभिमान आहे," असं ते पुढे म्हणाले.

फोटो स्रोत, Twitter
पण असे दावा करणारे ते पहिले भारतीय मंत्री नाहीत. याआधीही विमानाचा शोध किंवा विज्ञानाला प्राचीन भारताने दिलेल्या इतर योगदानाबद्दल अनेक वक्तव्यं करण्यात आलेली आहेत. अशाच काही शंकास्पद वैज्ञानिक दाव्याकडे एक नजर टाकूया.
1. विमानाचा शोध भारतात लागला
विमानाचा शोध भारतात लागला होता, आणि अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना प्राचीन भारतीय संशोधनांची माहिती द्यायला हवी, अशी विधानं करून केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री सत्यपाल सिंग यांनी अनेकांच्या भूवया उंचावल्या होत्या.

फोटो स्रोत, Hulton Archive/GETTYIMAGES
दिल्लीत एका अभियांत्रिकी महाविद्यालयात बोलताना सिंग म्हणाले होते, "राईट ब्रदर्स यांनी विमानाचा शोध लावण्याच्या आठ वर्षांआधी भारतात शिवाकर बाबुजी तळपदे यांनी उडू शकणारं विमान तयार केलं होतं."

फोटो स्रोत, Getty Images
तळपदे यांच्या तथाकथित कामगिरीच्या दाव्यातील सत्यता अद्याप पडताळण्यात आलेली नाही. असं असताना सत्यपाल सिंग यांनी केलेल्या वक्तव्याची सोशल मीडियावर थट्टा करण्यात आली होती.
2015 मध्ये एका प्रतिष्ठित विज्ञान संमेलनात एका वक्त्यानं म्हटलं होतं की एक हजार वर्षांपूर्वी भारद्वाज ऋषीनं विमानाचा अविष्कार केला होता.
निवृत्त पायलट आणि पायलट प्रशिक्षण केंद्राचे प्रमुख कॅप्टन आनंद बोडस यांनीही दावा केला होता की प्राचीन भारतातल्या अंतराळ विमानांमध्ये आजच्या यंत्रणेपेक्षा जास्त आधुनिक रडार यंत्रणा होत्या.
2. प्लास्टिक सर्जरी आणि देव
गणपतीचं गजमुख सांगतं की प्राचीन भारतातही प्लास्टिक सर्जरी होत होती, असं 2014 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबईत डॉक्टरांच्या एका कार्यक्रमात म्हणाले होते.

फोटो स्रोत, Getty Images
"आपण श्री गणेशाची पूजा करतो. त्या काळात नक्कीच एखादा प्लास्टिक सर्जन असावा ज्यानं हत्तीचं डोकं एका मानवी शरीरावर लावलं असावं, आणि प्लास्टिक सर्जरीची प्रॅक्टीस सुरू केली असावी," असं ते म्हणाले होते.
हिंदू पुराणांनुसार भगवान शंकराने हत्तीचं डोकं गणेशाच्या शरीरावर जोडलं होतं.
3. दैवी अभियांत्रिकी
गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणी यांनी ऑगस्ट 2017 मध्ये एकदा रामायणाचा संदर्भ देत भगवान राम यांच्या अभियांत्रिकी कौशल्याची स्तुती केली होती.

फोटो स्रोत, Getty Images
रावणाच्या तावडीतून सीतेची सुटका करण्यासाठी रामानं भारत ते लंका असा समुद्रसेतू बांधल्याचं रामायाणात म्हटलं आहे.
"विचार करा, भगवान राम यांचे अभियंते किती कमालीचे असतील, ज्यांनी भारत आणि श्रीलंका यांना जोडणारा राम सेतू बांधला," असं ते अहमदाबादच्या इन्स्टिट्युट ऑफ इन्फ्रास्ट्रक्चर टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट मध्ये बोलताना म्हणाले होते.
"खारू ताईंनीसुध्दा या सेतूच्या बांधकामात हातभार लावला होता. आजही तिथं राम सेतूचे अवशेष असल्याचं लोक म्हणतात," असं ते बोलले होते.
भारत आणि श्रीलंका हे खरं तर जमिनीच्या एका निमुळत्या पट्ट्यानं जोडले गेले आहेत, ज्याला पाल्क स्ट्रेट म्हणून ओळखलं जातं. पण हिंदू मान्यतेनुसार, तो रामायणातील राम सेतू आहे.
4. गाय प्राणवायू सोडते

फोटो स्रोत, Getty Images
राजस्थानच्या शिक्षणमंत्र्यांनी जानेवारीत असं म्हटलं होतं की गाय जगातलं एकमेव असं पशू आहे जे प्राणवायू आत घेतं आणि सोडतंही.
सध्याच्या विज्ञानाला चुकीचं ठरवू शकतील, असं कुठलाही पुरावा मात्र वासुदेव देवणानी सादर करू शकले नाहीत.
माध्यमांमध्ये याविषयी चर्चेत आल्यानंतर त्यांची मोठ्या प्रमाणावर चेष्टा करण्यात आली होती.
(ही बातमी प्रथम 24 सप्टेंबर 2017 ला प्रसिद्ध करण्यात आली होती.)
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








