क्रिप्टोकरन्सीचे जडले अनेकांना व्यसन, विळख्यातून सुटण्यासाठी लागतात कोट्यवधी

प्रातिनिधीक फोटो

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, केली एनजी
    • Role, केली एनजी

एक काळ असा होता, जेव्हा डॉन दर आठवड्याला क्रिप्टोकरन्सीच्या व्यवहारात तब्बल 2,00,000 डॉलरपर्यंत गुंतवणूक करत होता.

त्या कालखंडात तो शांतपणे कधीच झोपला नाही. तो कधीही मध्यरात्री उठून तो क्रिप्टोकरन्सीच्या किमतीमधील चढ उतार आणि पोर्टफोलियोमधील शिल्लक तपासून पाहायचा. लांब पल्ल्याचा विमान प्रवास असेल तर डॉनला प्रचंड घाम फुटायचा कारण त्या कालावधीत त्याला इंटरनेटचा ॲक्सेस नसायचा.

सेंट्रल बँक डिजिटल करन्सी (सीबीडीसी) व्यवहारांवर प्रक्रिया करणाऱ्या कंपनीत डॉन काम करत होता. त्याला त्याचे खरे नाव जाहीर करायचे नाही, कारण त्याच्या मताचा गुंतवणूकदारांवर प्रतिकूल परिणाम होऊ शकेल, असे त्याला वाटते.

2022 च्या मध्यामध्ये त्याची मानसिक स्थिती ढासळत चालली होती. त्या वेळी त्याने या संदर्भात मदत घेण्याचे ठरवले.

माजोर्का या स्पॅनिश बेटावरील डझनभर कर्मचारी असलेल्या द बॅलन्स या विस्तीर्ण पुनर्वसन केंद्रात चार आठवड्यांचा मुक्काम करावा आणि उपचार घ्यावे, असे त्याने ठरवले.

डॉन एका प्रायव्हेट व्हिलामध्ये राहत होता आणि त्याचा स्वतःचा बटलर आणि शेफही होता. त्याच्या उपचारांमध्ये मसाज, योगा, सायकल राइड अशा विविध ॲक्टिव्हिटींचा समावेश होते. हे उपचार तितकेच महागडेही होते. याचे बिल साधारण 75,000 डॉलर इतके होते.

या पुनर्वसन केंद्राची स्थापन झुरिकमध्ये झाली. लंडन आणि माजोर्कामध्येही त्यांच्या प्रॉपर्टी आहेत. आरोग्य आणि समाधान देणारे एक सुरक्षित ठिकाण अशी द बॅलेन्स स्वतःची ओळख करून देते.

द बॅलेन्सच्या लँडिंग पेजवर समुद्राचे दृश्य दिसणारा व्हिला, स्पा आणि आधीच्या क्लाएंट्सची टेस्टिमोनिअल्स आहेत.

या केंद्रांच्या यादीत चिंतातुरता, शारीरिक, मानसिक भावनिक थकवा येणे, नैराश्य, पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर (पीटीएसडी - एखाद्या धक्कादायक प्रसंगातून गेल्यानंतर किंवा तो पाहिल्यानंतर येणारा ताण) आणि खाण्यासंदर्भातील आजार या समस्यांवरील उपचारांचा समावेश आहे.

डॉन म्हणतो, क्रिप्टोच्या व्यसनातून बाहेर पडण्यास या केंद्राची त्याला मदत झाली.

कोरोना आणि क्रिप्टोमधील अस्थिर मार्केटमुळे डिजिटल करन्सीचे पेव फुटले. आणि आता क्रिप्टोच्या व्यसनातून बाहेर काढण्याचे वचन देणारी लक्झरी पुनर्वसन केंद्रे जगभरात उगवत आहेत.

लक्झरी पुनर्वसन केंद्र

फोटो स्रोत, THE BALANCE

बीबीसीने ज्या केंद्राने भेट दिली ती बहुतेक पुनर्वसन केंद्रे ही उच्चभ्रू स्वरूपाची आहेत आणि या ठिकाणी अमली पदार्थ, दारू आणि खाण्यासंदर्भातील व्यसनावरही उपचार करतात.

बीबीसीने तीन पुनर्वसन केंद्रे आणि दोन व्यसनमुक्ती क्लिनिक्सशी संपर्क साधला. त्यांनी माहिती दिली की, गेल्या दोन वर्षांत या व्यसनाशी संबंधित शेकडो वेळा चौकशी करण्यात आली. पण क्रिप्टो ट्रेडिंगची ही समस्या इतकी गंभीर आहे का याबद्दल व्यसनतज्ज्ञ साशंक आहेत.

द बॅलेन्ससारख्या पुनर्वसन केंद्रांमध्ये राहण्याचा खर्च हजारो डॉलर असू शकतो. "क्रिप्टोच्या व्यसनावरील उपचार हाही इतर व्यसनांच्या उपचाराप्रमाणेच आहे," असे स्टॅनफोर्ड विद्यापीठातील मानसशास्त्र विषयाच्या प्राध्यापक आणि स्टॅनफोर्ड ॲडिक्शन मेडिसीन ड्युअल डायग्नॉसिस क्लिनिकच्या प्रमुख ॲना लेम्बके म्हणाल्या.

"हा जैवमानससमाजशास्त्रीय आजार आहे. म्हणून यावर जैवमानससमाजशास्त्रीय उपचार करणे आवश्यक आहे. म्हणजे काही प्रकरणांमध्ये औषधे द्यावी लागतील, वैयक्तिक किंवा सामुहिक मानसोपचार, सवयी व वातावरण बदलणे, (किंवा) अधिक आरोग्यदायी कृती करण्यावर भर देणे," अॅना सांगतात.

त्या पुढे म्हणतात की, यासाठी येणाऱ्या खर्चाचे दर वेळी समर्थन देता येतेच असे नाही. त्यांच्यासारख्या तज्ज्ञांच्या मते हे व्यसन जुगारासारखेच आहे आणि त्यावर उपचारही तसेच केले पाहिजे.

"ते उतावीळ लोकांच्या जीवावर पैसे कमवत आहेत," असे रटगईस स्कूल ऑफ सोशल वर्कमधील सेंटर फॉर गॅम्बलिंग स्टडीजच्या संचालक लिया नॉवर म्हणतात.

"तुम्हाला क्रिप्टो ट्रेडिंगचे व्यसन असो, खेळावर सट्टा लावण्याचे व्यसन असो वा लॉटरीचे व्यसन असो, तुमच्यात दिसणारी लक्षणे आणि त्यावरील उपचार हे बहुधा सारखेच असतील," लिया नॉवर सांगतात.

इतर व्यसनांप्रमाणेच क्रिप्टोच्या व्यसनावरील उपचारांची सुरुवात वर्ज्य करणे आणि व्यसन थांबवल्यामुळे उद्भवणाऱ्या लक्षणांच्या व्यवस्थापनाने केली पाहिजे. या लक्षणांमध्ये चिंतातुरता, चिडचिडेपणा, निद्रानाश यांचा समावेश आहे असे अॅना म्हणाल्या.

"क्रिप्टो ट्रेडिंग किंवा पाहणे किमान चार आठवडे वर्ज्य करावे, जेणेकरून मेंदूला रिवॉर्ड पाथवे (असा मार्ग जो मेंदूच्या अशा भागांशी जोडलेला असतो जो वर्तन आणि स्मरणशक्ती नियंत्रित करतो) पुनःस्थापित करण्याची संधी मिळते. विथड्रॉवल सिम्टम्स ही सामान्यपणे मर्यादित काळापुरती असतात आणि ही लक्षणे निघून जातील अशा भावनिक आधार व खात्री देऊन त्यांचे व्यवस्थापन करता येऊ शकते.

"दीर्घकालीन विचार करता, या उपचारांमध्ये आर्थिक गुंतवणुकीचे अधिक चांगल्या पर्यायांचा समावेश असेल," असे त्या पुढे म्हणाल्या.

क्रिप्टो व्यसनावर उपचार करणे हा व्यवसाय अगदी नवा आहे. त्यामुळे त्यासाठी विशिष्ट प्रमाणपत्रांची आवश्यकता नाही.

बीबीसीने ज्या थेरपिस्ट किंवा पुनर्वसन केंद्रांशी संवाद साधला त्यांनी मानसिक आजारांसाठी व इतर विविध प्रकारच्या व्यसनांसाठी म्हणजेच दारूच्या व्यसनापासून ते अमली पदार्थ, गेमिंग व जुगार यासारखी व्यसने असलेल्यांसाठी मान्यताप्राप्त समुपदेशक असल्याचे सांगितले.

या केंद्रांनुसार क्रिप्टोचे व्यसन हे जुगारासारखे वाटत असले तरी त्याचे व्यसन अधिक लागू शकते. कारण एक म्हणजे ते अत्यंत अस्थिर आहे आणि क्रिप्टो ट्रेडिंग 24 तास सुरू असते.

"क्रिप्टो ट्रेडिंग कायदेशीर असल्याची नेहमी कायदेशीर असल्याचे भासवले जाते तर जुगार हा कायम समस्या ओढवून घेणारा प्रकार समजला जातो," असे झुरिक येथील पॅरासेल्स रिकव्हरीचे चीफ एक्झिक्युटिव्ह जॅन गेबर म्हणाले.

बिटकॉइन

फोटो स्रोत, Getty Images

यासाठी वैद्यकीय मदत घेण्याचे प्रमाणही कमी आहे, असे ते पुढे म्हणतात. कारण क्रिप्टो ट्रेडिंग हे बहुधा अनियंत्रित असते.

या उलट, काही देशांमध्ये गॅम्बलिंग प्लॅटफॉर्म्स आणि कॅसिनो यांना जुगाराचा आजार असलेल्या जुगाऱ्यांना ओळखून त्यांना व्यसन ओळखण्याविषयी माहिती व साधने उपलब्ध करून द्यावी लागतात.

क्रिप्टोच्या व्यसनाची लक्षणेही काही वेगळी नसतात.

ज्यांना क्रिप्टो ट्रेडिंगचे व्यसन लागले आहे ते याकडे त्यांच्या आयुष्यातील रोमांच व आनंदाचा स्रोत म्हणून पाहतात असे न्यूयॉर्कमधील कुटुंब व्यसन उपचारतज्ज्ञ ॲरन स्टर्नलिश्ट म्हणाले. ते त्यांच्या पत्नीसह हे काम करतात.

ते म्हणतात, "साधारणपणे खोटे बोलणे, चोरी करणे, कर्ज; आराम करणे व झोपणे कठीण होणे, सतत क्रिप्टोच्या किमती पाहणे आणि नाती, करिअर व शैक्षणिक संधी डावलून ट्रेडिंग करणे ही या व्यसनाची लक्षणे आहेत."

क्रिप्टो मार्केटमधील अस्थिरतेमुळे याचे व्यसन जडण्याची शक्यता अधिक आहे, असे तज्ज्ञ म्हणतात. उदा. 2022 मध्ये क्रिप्टो मार्केटमध्ये मंदी आल्यावर डॉनला जे प्रचंड आर्थिक नुकसान झाले ते समजल्यानंतर त्याच्या प्रेयसीने डॉनशी संबंध तोडले. त्यानंतर तो उपचारांकडे वळला.

जेन (नाव बदलले आहे) म्हणाली की, ती सतत तीन-चार दिवस ट्रेडिंगमध्ये व्यस्त होती. त्यामुळे तिचे प्रेमप्रकरण सुरू असल्याची खात्री तिच्या जोडीदाराला झाली होती.

"मी काय करते हे मी त्याला सांगू शकत नव्हते. त्यामुळे स्थिती अधिक वाईट झाली. आता सत्य सर्वांना समजले आहे, पण आमचे नाते अजूनही पूर्णपणे जोडले गेलेले नाही."

जेनने 2014 पासून क्रिप्टो खरेदी करायला सुरुवात केली. "सुरुवातीला मी काही हजार गुंतवत होते, पण शेवटी शेवटी मी एकाच ट्रेडमध्ये लाखो गुंतवू लागले.", असे ती म्हणते.

लक्झरी पुनर्वसन केंद्र

फोटो स्रोत, Getty Images

अखेर तिने पॅरासेलस रिकव्हरीकडून मदत घेण्याचे ठरविले. हा क्रिप्टो व्यसनातून बाहेर पडण्यासाठीचा चार ते सहा आठवड्यांचा कार्यक्रम आहे. याचा साप्ताहिक खर्च 104,000 डॉलर इतका आहे. ऑनलाइन थेरपी सत्रांचा खर्च ताशी 650 डॉलर आहे.

या उपचारांमध्ये रक्ताची तपासणी, कस्टमाइझ्ड आहार नियोजन, योगा, ॲक्युपंक्चर आणि आवश्यकतेनुसार औषधे यांचा समावेश आहे, असे तिने सांगितले. मानसिक आरोग्याकडे सर्वांगाने पाहण्याचा हा दृष्टिकोन आहे, असे ती म्हणाली.

क्रिप्टोचे व्यसन असलेल्यांना अनेकदा मर्यादा निश्चित करण्यासाठी मदत लागते. म्हणजे ट्रेडिंगसाठी कालमर्यादा ठरविणे, एका मर्यादेपर्यंत नुकसान झाल्यास (स्टॉप लॉस) थांबणे, एका निश्चित किमतीला क्रिप्टो पोहोचल्यावर संपूर्ण विक्री करून अकाउंट बंद करणे (क्लोज आउट), जेणेकरून गुंतवणूकदारांना अति प्रमाणात नुकसान होणार नाही, यासाठी ही मदत लागते.

केंद्रामधील थेरपिस्ट त्यांना अशा मर्यादा निश्चित करण्यास मदत करतात, असे द बॅलेन्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि संस्थापक अब्दुल्ला बौलाद म्हणाले. पण ते क्लायंटला पूर्णपणे थांबण्याची सक्ती करत नाहीत किंवा त्यांची डिव्हाइसेस पूर्ण डिसकनेक्ट करण्यास सांगत नाहीत.

तज्ज्ञांच्या मते क्रिप्टोचे व्यसन हे बहुधा इतर आजारांमुळे समजते व त्याचे निदान होते.

कीथ (नाव बदलले आहे) म्हणाला की, झोपेसाठी उपचार घेण्यासाठी तो पॅरासेलस रिकव्हरीमध्ये गेला होता. पण नंतर समजले की, क्रिप्टोचे व्यसन हे त्याचे मूलभूत कारण आहे.

51 वर्षीय कीथ म्हणतो कोव्हिड-19 नंतर झालेल्या लॉकडाऊनमध्ये त्याला क्रिप्टो ट्रेडिंगची सवय लागली.

"आपण एकटे झालो होतो. त्यामुळे गुप्तपणे ट्रेडिंग करणे सोपे झाले होते," तो म्हणतो.

"जेव्हा माझी मुले ख्रिसमसमध्ये माझ्यासोबत राहायला आली तेव्हा मी किती चिडचिडा झालो आहे, याची मला जाणीव झाली. मी त्यांच्याशी तुसडेपणाने वागत होतो आणि मी अनेक दिवस झोपून असतो, याची त्यांना चिंता वाटत होती. पण माझे ट्रेडिंग हे समस्येचे मूळ कारण होते, हे आमच्या कधी मनातही आले नाही," कीथ म्हणतो.

ISWOTY

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)