You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
मुस्लीमबहुल देशातल्या चलनी नोटेवर गणपतीचं चित्र कसं?
- Author, अनंत प्रकाश
- Role, बीबीसी मराठी
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी बुधवारी, 26 ऑक्टोबरला भाजप आणि काँग्रेसला आश्चर्याचा धक्का देत भारतीय चलनी नोटांवर हिंदू देवी-देवता गणपती आणि लक्ष्मीचे फोटो लावण्याचं आवाहन केलं.
हे अपील करताना अरविंद केजरीवालांनी म्हटलं की जर जगातला सगळ्यांत मोठा मुस्लीम देश इंडोनेशिया असं करू शकतो तर भारतात हे का होऊ शकत नाही.
आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल इतकंही म्हणाले की इंडोनेशियाच्या लोकसंख्येत 85 टक्के जनता मुस्लीम आहे आणि दोन टक्के जनता हिंदू आहे तरीही त्यांच्या चलनी नोटेवर गणपतीचं चित्र आहे.
अरविंद केजरीवालांच्या वक्तव्यानंतर टीव्ही चॅनल्स आणि सोशल मीडियात सगळीकडे याबद्दल चर्चा सुरू झाली.
गुगल ट्रेंड्स नुसार केजरीवाल यांच्या प्रेस कॉन्फरसनंतर 'इंडोनेशिया करन्सी' हा कीवर्ड सर्वाधिक सर्च केला गेला.
इंटरनेटच्या युझर्सला खरंच इंडोनेशियाच्या चलनी नोटांवर गणपतीचं चित्र आहे का? आणि असलं तर का असा प्रश्न पडलेला आहे.
इंडोनेशियाच्या नोटेवर गणपतीचं चित्र का?
बीबीसीला आपल्या पडताळणीत आढळून आलं की ज्या नोटेची चर्चा होतेय ती नोट इंडोनेशियाने एका खास मालिकेअंतर्गत 1998 साली जारी केली होती. आता ही नोट चलनात नाहीये.
सोशल मीडियावर व्हायरल झालेली ही नोट काळजीपूर्वक पाहिली तर त्यावर एका बाजूला हिंदू देवता गणपती आणि एका व्यक्तीचं चित्र छापलेलं दिसून येतं.
दुसऱ्या बाजूला काही विद्यार्थी अभ्यास करत आहेत असं चित्र दिसतं.
बीबीसी इंडोनेशिया सर्व्हिससाठी काम करणाऱ्या जेष्ठ पत्रकार अस्तूदेस्त्रा अजेंगरास्त्री म्हणतात की इंडोनेशियात गणपतीचा फोटो असणं इथल्या सांस्कृतिक विविधतेचं प्रतीक आहे.
त्या म्हणतात, "ही नोट 1998 साली जारी केली गेली होती. ज्या मालिकेअंतर्गतच ही नोट छापली होती तिचा विषय 'शिक्षण' असा होता. इंडोनेशियात गणपती कला, बुद्धी आणि ज्ञानाचे देव समजले जातात. त्यामुळे अनेक शैक्षणिक संस्थांमध्येही गणपतीच्या फोटो लावलेला आढळून येतो."
या नोटेवर इंडोनेशियाचे राष्ट्रीय नायक 'की हजार देवंतरा' यांचाही फोटो आहे. त्यांनी त्या काळात इंडोनेशियन लोकांच्या शिक्षणाच्या अधिकारासाठी संघर्ष केला होता जेव्हा हा देश डेन्मार्कची वसाहत होता. त्या काळात फक्त डच समुदायातली मुलं किंवा श्रीमंतांच्या मुलांनाच शाळेत जाण्याची परवानगी होती.
अर्थात, इंडोनेशियात आजही एक नोट चलनात आहे ज्यावर इंडोनेशियाचं बेट बालीमध्ये असलेल्या एका मंदिराचं चित्र आहे.
अस्तूदेस्त्रा याला दुजोरा देताना म्हणतात की, "पन्नास हजाराच्या नोटेवर बालीतल्या एका मंदिराचं चित्र आहे. बालीत हिंदू समुदाय बहुसंख्यांक आहे."
पण इंडोनेशियात फक्त हिंदू धर्मांचीच प्रतिकं दिसतात असं नाहीये तर इतर धर्मांच्या प्रतिकांनाही स्थान दिलेलं आढळतं.
इंडोनेशियात गणपती लोकप्रिय का?
इंडोनेशियाच्या एकूण लोकसंख्येपैकी हिंदू फक्त 2 टक्के असले तपी बाली बेटावरची 90 टक्के लोकसंख्या हिंदू आहे.
एका अहवालानुसार 1960 आणि 70 च्या दशकात जावा बेटावर हजारो लोकांनी हिंदू धर्माचा स्वीकार केला होता.
इंडोनेशियाचा समाज आणि संस्कृतीवर एक नजर टाकली तर अनेक क्षेत्रांमध्ये इंडोनेशियाच्या हिंदू इतिहासाची झलक दिसते. इंडोनेशियात भूतकाळात अनेक हिंदू राजघराण्यांनी राज्य केलं.
सातवं शतक ते सोळावं शतक या काळात इंडोनेशियाच्या बहुतांश भागावर हिंदू-बौद्ध धर्माच्या राजांचंच राज्य होतं.
यात मजापहित साम्राज्य आणि श्रीविजय साम्राज्य सर्वात मोठे होते. यांच्या काळात इंडोनेशियाच्या बेटांवर हिंदू धर्माची भरभराट झाली.
या साम्राज्यांमध्ये हिंदू धर्माखेरीज बौद्ध, एनिमिज्म अशा अनेक धर्मांचाही विकास झाला. पण धार्मिक भाषा संस्कृतच होती. श्रीविजय साम्राज्याच्या काळ सातवं शतक ते बारावं शतक असा होता. या काळात इथल्या मुख्य भाषा संस्कृत आणि जूनी मलय होत्या.
सध्याच्या युगातही इंडोनेशियाच्या इतिहासात उदयास आलेल्या लोककथा आणि प्रतिकांची प्रतिमा दिसून येते.
इंडोनेशियाचा राष्ट्रीय पक्षी गरूड आहे ज्याचा सरळ संबंध हिंदू पौराणिक ग्रंथाशी आहे. रामचरितमानसनुसार गरुडानेच (जटायू) सीतेला श्रीलंकेतून परत आणण्यासाठी रामाची मदत केली होती.
इंडोनेशियाच्या सर्वात प्रतिष्ठित शैक्षणिक संस्थांपैकी एक बांदुंग इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजीमध्येही गणपतीचं चित्र लोगो म्हणून वापरलं जातं.
इंडोनेशियाच्या एअरलाईन्सचंही नाव गरूड एअरलाईन्स आहे आणि याच्या लोगोतही गरूडाच्या चित्राचा वापर केला जातो.
इंडोनेशियात एका ठिकाणी 1961 पासून आजपर्यंत सतत रामाणयाचं सादरीकरण होतं. यात हिंदुंसह वेगवेगळ्या धर्मांचे कलाकार सादरीकरण करतात.
इंडोनेशियात हिंदू नाव ठेवण्याचीही पद्धत बरीच प्रचलित आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)