अॅमेशिया : महासागर नष्ट होणार? सगळे खंड एकमेकांना चिकटणार?

पृथ्वी, निसर्ग, पर्यावरण

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, खंडांचा नकाशा

पृथ्वीवरील सागर-भूखंडांची रचना सतत बदलत असते.

ऑस्ट्रेलियन संशोधकांनी व्यक्त केलेल्या अंदाजानुसार 200 ते 300 दशलक्ष वर्षांच्या काळात पॅसिफिक समुद्र नष्ट होईल, सर्व खंड एकमेकांच्या जवळ येऊन उत्तर ध्रुवाजवळ अॅमेशिया नावाचा एकच महाखंड (सुपरकॉन्टिनेंट) तयार होईल.

ऑस्ट्रेलियातलं कर्टिन विद्यापीठ आणि चीनमधलं पेकिंग विद्यापीठ यांमधील संशोधकांच्या मते दोन्ही अमेरिका खंडांचं अधिकाधिक पश्चिमेला सरकणं, आशियाचं पूर्वेला सरकणं, अंटार्क्टिका दक्षिण अमेरिकेजवळ येणं, आशियाला एका बाजूने अफ्रिका तर दुसऱ्या बाजूने युरोप चिकटणं असे बदल होतील.

नॅशनल सायन्स रिव्ह्यूमध्ये हे संशोधन प्रसिद्ध झालं आहे.

अॅमेशिया नावाचा एकच महाखंड

पृथ्वी हळूहळू थंड होते आहे, समुद्रांची एकूण ताकद कमी होते आहे. पॅसिफिक समुद्र आक्रसतो आहे. तो लहान होऊन अटलांटिक आणि भारतीय समुद्रापेक्षाही कमी होईल असं प्रमुख लेखक डॉ. च्युआन हुआंग यांनी सांगितलं.

कर्टिन विद्यापीठातील 'अर्थ डायनॅमिक्स रिसर्च ग्रुप अँड द स्कूल ऑफ अर्थ अँड प्लॅनेटरी सायन्स'मध्ये ते कार्यरत आहेत.

पृथ्वी, निसर्ग, पर्यावरण
फोटो कॅप्शन, डॉ. च्युआन हुआंग

अॅमेशिया हे नाव कसं पडलंय याचीही कहाणी आहे. अमेरिका आणि आशिया खंडांच्या घुसळणीमधून या खंडाची निर्मिती होणार आहे.

180 दशलक्ष वर्षांपूर्वी पॅन्जिआ नावाचा सुपरकॉन्टिनंटची निर्मिती झाली. या खंडाने पृथ्वीवरचा बराचसा भूभाग व्यापला होता. या खंडाला पँथाल्सा नावाच्या महासागराने व्यापलं होतं.

संशोधकांच्या गटाने सुपरकॉन्टिनंटची निर्मिती कशी होती हे समजून घेण्यासाठी सुपरकम्प्युटरचा उपयोग केला. या संगणकाने दाखवलं की पॅसिफिक दरवर्षी काही सेंटीमीटरने आक्रसत आहे.

अॅमेशिया : महासागर नष्ट होणार? सगळे खंड एकमेकांना चिकटणार?

डॉ. ह्युआंग यांच्या मते ऑस्ट्रेलिया खंड आशियाला धडकेल. पॅसिफिक समुद्र गायब झाल्यानंतर आशिया खंड अमेरिकेशी जोडला जाईल.

अन्य शक्यता

इतिहासात संशोधकांनी अमेशिया व्यतिरिक्त शक्यता वर्तवल्या होत्या. यामध्ये नोव्होपानेगा, पानेगा अल्टिमा आणि अयुरिका यांचा समावेश होता.

विज्ञानात 100 टक्के खात्री असं अभावानेच म्हटलं जातं. भूतलाच्या जटिल निर्मितीसंदर्भात तर खात्रीने काही म्हणणं अवघड आहे. पृथ्वीसंदर्भात आपल्याला आता थोडं कळू लागलंय असं या संशोधनाचे सहलेखक झेंग झिआंग ली यांनी सांगितलं.

पृथ्वी, निसर्ग, पर्यावरण

फोटो स्रोत, ZHENG-XIANG LI

फोटो कॅप्शन, झेंग झिआंग ली

पृथ्वीच्या निर्मितीसंदर्भात ज्या ज्या शक्यता वर्तवण्यात आल्या आहेत (ज्यामध्ये आमच्या कामाचाही समावेश आहे) त्या शक्यता स्वरुपातच आहेत. आम्ही वर्तवलेली शक्यता सध्या उपलब्ध ज्ञानावर आणि काही गृहितकांवर बेतलेलं आहे.

पृथ्वी 4.5 अब्ज वर्षं जुनी आहे. पृथ्वीची जैविक चक्र, वेगाने होणारी हालचाल, खंडांचं विघटन ही सर्वसाधारण प्रक्रिया आहे.

महासागरांखालच्या टेक्टॉनिक प्लेट्समधल्या उलथापालथीमुळे खंडांच्या संरचनेत बदल होतो.

सुपरकॉम्प्युटरचा वापर करून आम्ही पृथ्वीच्या परिघासारखी आभासी व्यवस्था निर्माण करतो. पृथ्वीचं अंतर्गत स्वरुप कसं असेल याचं प्रारुप मांडतो. पृथ्वीच्या पोटातील टेक्टॉनिक प्लेट्स, बाकी घटक, पृथ्वीचं आवरण हे सगळं मांडलं जातं.

महाखंडाची निर्मिती होऊ शकताना कोणते घटक नियंत्रणात राहू शकतात हे पाहण्यासाठी आम्ही मॉडेल सिम्युलेशनची एक मालिकाच आखली.

समुद्राखालच्या हालचाली

मॉडेलच्या निष्कर्षांमधून हे दिसलं की महासागरातील लिथोस्फिअरची ताकद हा महाखंड कसं तयार होतो यावर सर्वात जास्त परिणामकारक असते.

काही अब्ज वर्षांमध्ये पृथ्वीची अंतर्गत उष्णता कमी होत आहे. महासागरातील 7-8 किमीचं जाड कवच वितळण्याची पातळी कमी झाल्याने जेथे नवीन महासागरातील कवच आणि लिथोस्फियर तयार होतात ते हळूहळू पातळ झाल्याचं दिसतं.

पॅसिफिक महासागर नामशेष झाल्यानंतरच अमेशिया महाखंडाची निर्मिती होऊ शकते. सुपरकॉन्टिनंटची निर्मिती किंवा विघटन यामुळे हवामान आणि पर्यावरण मोठा परिणाम होतो.

पृथ्वीची रचना

महाखंडाच्या निर्मितीमुळे समुद्राची पातळी कमी होते. जैवविविधतेचं आवरण विरळ होतं, विस्तीर्ण अशा प्रदेशात जमीन कोरडवाहू होण्याचं प्रमाण वाढतं.

अशा महाखंडाच्या निर्मितीमध्ये सागराची पातळी कमी होत जाते, जैवविविधता नष्ट होते आणि कोरड्या रुक्ष भूमीचं प्रमाण जास्त होतं.

तर याच्या उलट महाखंडांचे तुकडे होताना समुद्राची पातळी वाढते, जैवविविधता वाढीला लागते आणि विविध जीव वाढण्यासाठी सागरमग्न भूखंड म्हणजेच कॉन्टिनेंटल शेल्फही भरपूर तयार होतात.

काही दशलक्ष वर्षांनंतर मनुष्य कसा असेल हे सांगता येणार नाही पण पृथ्वीच्या जीवावरणाचा एक भाग म्हणून आजवर माणूस उत्क्रांत होत गेलाय. तसाच तो उत्क्रांत होत जाईल., असं डॉ. ली सांगतात.

आजवर आपण जसं बदलांशी जुळवून घेतलं तसंच पुढेही माणूस या बदलांशी जुळवून घेईल असा विश्वास ते व्यक्त करतात.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)