‘मुलांना सर्रास चिखलात उड्या मारू द्या, झाडावर चढू द्या, मातीत खेळू द्या’

फोटो स्रोत, Getty Images
- Author, अलेशिया फ्रँको आणि डेवीड रॉबसन
- Role, बीबीसी प्रतिनिधी
लहान मुलांना मातीत किंवा चिखलात खेळायला आवडत असतं. त्यामुळे बूट, चप्पल किंवा कपडे-त्यांचे रंग खराब होतील याचा काहीही विचार न करता ते पाणी साचलेल्या किंवा चिखलाच्या डबक्यांकडे अक्षरशः चुंबकासारखे खेचले जातात. पण अशा प्रकारे चिखल किंवा मातीत खेळण्याचा-मळण्याचा त्यांच्या आरोग्यावर चांगला परिणामही होऊ शकतो बरं का.
एकेकाळी मुलांना मोठ्यांकडून कायम "कपडे घाण करू नका!" किंवा "चिखलात खेळू नका!" असा ओरडा ऐकावा लागायचा. मुलांनी कपडे खराब करू नये म्हणून त्यांच्यावर असं ओरडलं जायचं. कारण शेतांमधून धावत खेळणं असो किंवा झाडांवर चढणं असो, यामुळं दिवस संपण्यापूर्वी मळल्यामुळं कपड्यांचा रंग बदलणं हे तेव्हा अगदी सामान्य होतं.
पण आज कदाचित अनेक पालकांच्या मनात अशी भावना असेल की, त्यांच्या मुलांना एकदा तरी असा अनुभव घेता यायला हवा होता. कारण वाढतं शहरीकरण आणि व्हीडिओ गेम्स तसंच सोशल मीडियाच्या वाढत्या प्रभावामुळे पूर्वीप्रमाणं मुलांचा निसर्गाबरोबर संपर्क येणं जवळ-जवळ बंद झालंय. अनेकांना तर कधीही चिखलात माखण्याची संधीच मिळण्याची शक्यता नसते.
एका ताज्या संशोधनानुसार बाहेरच्या मातीत किंवा धुळीमध्ये काही चांगले सूक्ष्मजीवही असतात. ते अगदी अॅलर्जी, दमा, नैराश्य आणि चिंता (एन्झायटी) अशा आजारांपासून संरक्षण करणारी रोगप्रतिकारक यंत्रणा मजबूत करण्यास मदत करू शकतात.
या निष्कर्षांवरून एक बाब स्पष्ट होते की, निसर्गाच्या सान्निध्यात व्यायाम केल्यानं केवळ खुल्या हवेत फिरण्याची संधी हा एकच फायदा होतो असं नाही. तर माती आणि चिखलासारख्या नैसर्गिक गोष्टींमध्ये असे काही आश्चर्यकारक आणि प्रभावी सूक्ष्मजीवदेखील असतात, ज्याचा मुलांच्या आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतो, हेही आता लक्षात येण्यास सुरुवात झाली आहे.

फोटो स्रोत, Getty Images
मानसिक सुधारणा
मैदानी खेळांचे मानसशास्त्रीय दृष्टीकोनातून असलेले अनेक फायदे यापूर्वीच समोर आलेले आहेत आणि ते सर्वांना माहितीही आहेत. आपल्या मेंदूचा विकास हा नैसर्गिक अधिवासात होतो, तसंच आपल्या संवेदनादेखील विशेषतः खुल्या जागांतील क्रियांसाठी अधिक प्रतिसाद देत असतात.
याचा अर्थ असाही होतो की, निसर्गाची सुंदर दृश्यं ही खास प्रकारची उत्तेजना निर्माण करत असतात. आपला थकलेला आणि थकव्यामुळं सहज विचलित होऊ शकणारा मेंदू हा पुन्हा रिचार्ज होण्यास किंवा थकवा दूर करण्यास ही उत्तेजना मदत करत असते असं म्हटलं जातं.
याच सिद्धांला बळ देणारा एक अभ्यास 2009 मध्ये समोर आला आहे. त्यानुसार अटेंशन डेफिशिट हायपरअॅक्टिव्ह डिसऑर्डर (ADHD-अवधान अस्थिरता आणि अतिक्रियाशीलता विकृती) असलेल्या मुलांनी 20 मिनिटं चांगली वर्दळ असलेल्या शहरी भागातील रस्त्यावरून वॉक केल्यामुळं ते जेवढे एकाग्र होऊ शकतात, त्यापेक्षा अधिक एकाग्र ते 20 मिनिटे बागेत वॉक केल्यानंतर होऊ शकतात.
गवत आणि झाडांच्या सान्निध्यात राहिल्यानं त्यांच्या मनावर सकारात्मक परिणाम होऊ शकतो, हे दिसून आलं. त्यामुळं ADHD नं ग्रस्त असलेल्या मुलांना इतर गोष्टी किंवा उपचारांबरोबरच निसर्गाचे असे डोस देणं हेदेखील सुरक्षित आणि अधिक फायदेशीर असू शकतं, अशी शिफारस संशोधकांनी केली आहे.
या महत्त्वाच्या परिणामांशिवाय मैदानी खेळांमुळं मुलांना अत्यंत मौल्यवान असे अनुभव आणि जीवनाचे धडे मिळत असतात. उदाहरण द्यायचं झाल्यास, चिखल हातानं मळल्यामुळं किंवा वाळू खेळताना मुलांमध्ये संवेदना आणि हालचाली यांच्यात समन्वय साधण्याची प्रक्रिया विकसित होण्यास मदत होऊ शकते.
त्याला सेन्सोरीमोटर डेव्हलपमेंट म्हणतात अशी माहिती, इटलीच्या पालेर्मो विद्यापीठातील बाल मानसोपचारतज्ज्ञ आणि व्याख्याते फ्रान्सिस्को वित्रानो यांनी दिली. यामुळं मुलांना त्यांचे शारीरिक संकेत समजण्यास मदत होत असते, असं ते सांगतात.
घरी, शाळेच्या वर्गात किंवा इतर वातावरणांत मुलांना ज्या भावनांना सामोरं जाणं किंवा सामना करणं कठिण जाऊ शकतं, त्यासाठी मुलांना अशा कृतींची मदत होऊ शकते.
ज्या मुलांना त्यांच्या भावना शब्दांत मांडणं कठिण जात असतं, त्यांच्या समुपदेशनासाठी अशाच प्रकारची एक सँड ट्रे थेरपीदेखील वापरली जाते. त्यात मुलं वाळू आणि लहान प्रतिकृतींच्या माध्यमातून त्यांचे विचार आणि भावना मांडत असतात.
मुलांच्या मानसिक आरोग्याचा विचार करता मैदानी खेळांचा सर्वांत मोठा फायदा व्यायाम हा ठरू शकतो. अमेरिकेतील ऑस्टिनमधील टेक्सास विद्यापीठातील मानवविकास आणि कुटुंब शास्त्र विभागाच्या एलिजाबेथ गरशॉफ यांच्या एका अभ्यासानुसार, लहान मुलांना मोठ्या आणि खुल्या जागेमध्ये क्षमता आणि शक्ती वाढवण्यासाठी व्यायाम करणं अधिक फायदेशीर वाटतं. तसंच त्यामुळं लठ्ठपणाचा धोकाही टळतो.
मात्र, त्याचबरोबर काही नव्या निष्कर्षांनुसार नैसर्गिक वातावरणात खेळण्याचे इतरही फायदे असू शकतात आणि त्यापैकी काही खास फायदे चिखलात दडलेले असू शकतात.

फोटो स्रोत, Getty Images
जुने मित्र
1980च्या दशकात मांडण्यात आलेल्या स्वच्छतेसंबंधिच्या गृहितकावर नव्या संशोधनानंतर वेगळ्या पद्धतीचा विचार समोर आलाय. त्यानुसार बालपणी होणाऱ्या संसर्गांमध्ये 20 व्या शकतात प्रचंड घट झाल्यामुळं, लोकांच्या रोगप्रतिकारक शक्तीवर त्याचा दुष्परिणाम झाल्याचं पाहायला मिळालं.
त्यामुळं त्यांच्यात अगदी सामान्य उत्तेजनांसाठीही प्रतिक्रिया वाढू लागल्या. परिणामी दमा, पराग ज्वर (हे फिव्हर) आणि अन्नातून होणाऱ्या अॅलर्जींमध्ये वाढ झाल्याचं मानलं जातं.
यामुळं अनेक शास्त्रज्ञांना आता स्वच्छतेसंबंधीचं गृहितकच अमान्य आहे. पण त्यामुळं हात धुण्यासारख्या महत्त्वाच्या वर्तनाकडे दुर्लक्षही त्यांना नको आहे. तसंच प्रत्येकवेळी संसर्ग हा मुलांसाठी फायदेशीरच असू शकतो, असंही ते मानत नाहीत.
"सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीनं विचार केल्यास, हे काहीसं अडचणीचे ठरू शकते," असं मत अमेरिकेतील कोलोराडो विद्यापीठाच्या बिहेवियरल न्यूरोएन्डोक्रिनोलॉजी लॅबोरेटरीचे संचालक आणि एकात्मिक शरिरविज्ञान विषयाचे प्राध्यापक क्रिस्टोफर लॉरी यांनी मांडलं.
आपली मुलं आजारी पडण्यासाठी खऱ्या अर्थाने जे कारणीभूत आहेत, त्याऐवजी अशा असंसर्गजन्य सूक्ष्मजीवांना दोष दिला जातो. त्याउलट हे "जुने मित्र" आपल्या ऐतिहासिक उत्क्रांतीदरम्यान कायम आपल्या आसपास होते. प्रामुख्यानं ते निरुपद्रवी असतात. आपल्या शरिरावर आक्रमण करणाऱ्या संभाव्य सूक्ष्मजीवांवर अधिक आक्रमक होण्याऐवजी ते रोगप्रतिकार यंत्रणेला त्यांचा सामना करण्यासाठी अधिक सज्ज करत असतात.
महत्त्वाचं म्हणजे, जेव्हाही आपण निसर्गाच्या सान्निध्यात वेळ घालवत असतो, तेव्हा हे जुने मित्र आपल्याला भेटतात. पण वाढलेलं शहरीकरण आणि मैदानी खेळांचं घटलेलं प्रमाण यामुळं अनेक मुलं यापासून वंचित राहतात. याचाच अर्थ असाही होतो की, त्यांची रोग प्रतिकारक यंत्रणा ही कोणत्याही संभाव्य धोक्यासाठी अधिक संवेदनशील आणि त्याच्या जाळ्यात अडकण्याची शक्यता अधिक असते.
आपल्या आतड्यांमधील काही फायदेशीर सूक्ष्मजंतूदेखील आपलं आरोग्य सुधारण्यास मदत करू शकतात. ते आपल्या त्वचेच्या माध्यमातूनही त्यांचं कार्य करू शकतात.
या कल्पनेला विविध प्रकारच्या अभ्यासांद्वारे पाठिंबाही मिळाला आहे. साधारणपणे, ग्रामीण भागात किंवा शेती असलेल्या परिसरात वाढलेल्या लोकांना दमा, अॅलर्जी किंवा कोन्स डिसीज सारख्या रोगप्रतिकारक शक्तीशी संबंधिक विकार होण्याची शक्यता कमी असते.
त्यांच्या बालपणी ग्रामीण वातावरणामुळं विविध प्रकारच्या सूक्ष्मजंतुंशी त्यांचा संपर्क येतो आणि त्यामुळं त्यांची रोगप्रतिकारक शक्ती अधिक प्रभावी बनण्यास मदत झाली, हे त्यामागचं कारण असू शकतं.
या बगद्वारे मिळणारी बरीचशी आरोग्यदायी उत्तेजना ही प्रामुख्यानं पचनसंस्थेतून मिळते असं मानलं जातं. तसंच आतड्यांमधील फायदेशीर सूक्ष्मजंतू आपल्या आरोग्यासाठी अनेकप्रकारे लाभदायक असतात हेही आता जवळपास सर्वमान्य आहे.
पण त्याचबरोबर हे सूक्ष्मजंतू आपल्या त्वचेवरून किंवा त्वचेद्वारेदेखील त्यांचं कार्य करू शकतात, असं मत इटलीच्या रेगिओ इमलिया येथील डॉक्टर मायकल अँटोनली यांनी व्यक्त केलं. चिखलाद्वारे केल्या जाणाऱ्या उपचार पद्धतींचा आरोग्यावर कसा परिणाम होतो, याबाबत त्यांनी संशोधन केलं आहे.

फोटो स्रोत, Getty Images
त्यांच्या मते, आपल्या शरिराच्या बाह्य भागावर अनेक प्रकारचे सूक्ष्मजंतू असतात. ज्यांना एटोपिक डरमाटिटिस आणि सोरायसिस सारखे विकार असतात, अशा लोकांमध्ये या सूक्ष्मजंतूचं प्रमाण कमी असतं.
या सूक्ष्मजीवांच्या प्रमाणातील वैविध्याचा संबंध संधिवातासारख्या आजारांशीही असू शकतो. "अनेक जुनाट आजारांवर हे सूक्ष्मजंतू अत्यंत मोलाची भूमिका पार पाडू शकतात," असंही ते म्हणाले.
निरोगी शरीर, निरोगी मन
अधिक आश्चर्यकारक बाब म्हणजे, निसर्गातून मिळणारे हे फायदेशीर बग्ज (सूक्ष्मजंतू) हे तणावाच्या स्थितीत शरिरानं कशी प्रतिक्रिया द्यावी यातही सुधारणा घडवू शकतात.
जेव्हा आपल्यात प्रचंड असुरक्षितचेची आणि भीतीची भावना निर्माण होते, त्यावेळी रोगप्रतिकारक यंत्रणा ही शरिराची जळजळ (inflammation) वाढवायला सुरुवात करते.
आपल्याला होणाऱ्या संभाव्य धोक्यासाठी (संसर्ग) आपल्या शरिराला तयार करण्याचं काम त्याद्वारे होत असतं. पण आजच्या काळात लोक ज्या प्रकारच्या तणावांचा सामना करत आहेत, त्यासाठी हे फारसं उपयोगी ठरत नाही.
उल्लेखनीय बाब म्हणजे, ग्रामीण भागांत बहुतांश बालपण घालवलेले लोक हे शहरात वाढलेल्या लोकांच्या तुलनेत तणावाच्या परिस्थितीत अधिक शांतपणे आणि कमी भावना व्यक्त करत प्रतिक्रिया देत असतात.
म्हणजेच इंटरल्युकीन-6 सारख्या दाह निर्माण करणाऱ्या रेणुंचा हा परिणाम असतो. शास्त्रांनी वेगवेगळ्या सामाजिक-आर्थिक परिस्थितीनुसार संशोधन केल्यानंतरही हे कायम राहिलं.
पण दीर्घकाळाचा विचार करता याचा शरिरावर गंभीर परिणाम होऊ शकतो. शारीरिक जळजळ अनेक बाबतीत अडचणीची ठरू शकते. उदाहरण द्यायचं झाल्यास, यामुळं नैराश्याचा धोकाही वाढतो.
"लोकांमधील शारीरिक दाह किंवा जळजळ याचा विचार करता शहरांत वाढलेले लोक हे चालते फिरते टाईम बॉम्ब असतात," असं मत या संशोधनातील सहसंशोधक लॉरी यांनी मांडलं आहे.
नाट्यमय परिणाम
या जुन्या मित्राच्या गृहितकाला पाठिंबा दर्शवणारे निष्कर्ष सातत्यानं समोर येऊ लागल्यानं काही संशोधकांनी अशाप्रकारचे फायदे करणाऱ्या विशिष्ट सूक्ष्मजंतूंचा शोध घ्यायला आणि ते कशाप्रकारे हे बदल घडवून आणतात ते शोधायला सुरुवात केली.
लॉरी यांना विशेषतः 'मायकोबॅक्टेरियम व्हॅके' यात रस आहे. प्रामुख्यानं ते मातीमध्ये आढळतात. जेव्हा याचा उंदराशी संपर्क आला तेव्हा त्यात टी पेशींच्या प्रतिक्रियांमध्ये वाढ पाहायला मिळाली. ते नावाप्रमाणं रोगप्रतिकार यंत्रणेची क्रिया तसंच शारीरिक दाह नियंत्रणात ठेवण्यास मदत करतं.
त्यामुळं ते दुसऱ्या उंदराबरोबर संघर्षासारख्या संभाव्य तणावपूर्ण घटनांसाठी अधिक लवचिक किंवा सज्ज बनतात. "अखेरचं इंजेक्शन दिल्यानंतरही आम्हाला तणावाबाबत अत्यंत नाट्यमय असा परिणाम पाहायला मिळाला," असं लॉरी म्हणाले.
उंदीर हे नक्कीच मानवाप्रमाणे नसतात. पण तरीही या सूक्ष्मजंतूंच्या वर्तनाबद्दल त्यातून काही संकेत नक्कीच मिळतात.
काही शास्त्रज्ञांनी मातीत राहणाऱ्या गांडुळासारख्या हेल्मिंथ्स या परजीवींच्या भूमिकेबाबतही कमालीची उत्सुकता व्यक्त केलीय. त्याचं कारण म्हणजे त्यांच्यामुळं तयार होणारी रोग प्रतिकार यंत्रणा. हेल्मिंथ्सचा संसर्ग झालेल्यांना क्रोन्स डिसीज (पचनसंस्थेशी संबंधित एक आजार) सारखा आतड्यांत जळजळ होण्याचा धोका कमी असतो.
काही रुग्णांचा या जीवांशी संपर्क आणून करण्यात आलेल्या काही चाचण्यांत संमिश्र यश मिळाल्याचं समोर आलं आहे. पण अळ्यांचा समावेश असल्यानं या पद्धतीचे काही दुष्परिणाम असू शकतात. तसंच अळयांबाबत असलेली किळस यामुळं लोक यापासून दूर जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.
एकूणच अँटोनली यांच्या मते, मड बाथ आणि थर्मल मिनिरल वॉटर बाथ यासह अनेक स्पा थेरपीमुळं आरोग्यास फायदेशीर सूक्ष्मजंतुंशी संपर्क आल्यानं आपल्या आरोग्यात सुधारणा होऊ शकते. दाहरोधक परिणाम असलेल्या स्टेफिलोकोकस एपिडर्मिडिससह अशा सूक्ष्मजंतूच्या अनेक प्रजाती या फायदेशीर ठरू शकतात.

फोटो स्रोत, Getty Images
निसर्गाकडे चला
चांगल्या जीवाणूंच्या लवकर संपर्कात येण्याचं महत्त्व अधोरेखित होऊ लागलं आहे. त्यामुळं आता अनेक संशोधक आता बालपणी निसर्गाशी अधिकाधिक संपर्क कसा येऊ शकतो त्यासाठी काय करता येईला याचा शोध घेण्याचा प्रयत्न करतायत.
अँटोनली यांच्या मते फॉरेस्ट बाथिंग म्हणजे जंगलांमध्ये हळूवारपणे निसर्गाचा आनंद घेत ध्यान लावत चालल्यानंदेखील त्वचारोग असलेल्या काही लहान आणि किशोरवयीन मुलांमध्ये सकारात्मक सुधारणा पाहायला मिळाली.
पानं आणि मातीचा स्पर्श झाल्यामुळं त्यांच्या त्वचेचा चांगल्या किंवा शरिरासाठी फायदेशीर सूक्ष्मजंतूशी संपर्क येऊन त्वचा अधिक समृद्ध झाली असेल, असं ते म्हणतात.
अशाप्रकारे मुलांचा निसर्गाशी संबंध यावा यासाठी फिनलँडमध्ये दरम्याच्या काळात एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबवण्यात आला. संशोधकांनी शाळेच्या आवारात असलेलं खडी आणि डांबराचं साहित्य काढून टाकलं आणि त्याठिकाणी जंगलातील माती आणि काही रोपं लावण्यात आली.
तसंच त्यांनी मुलांना बागकाम करण्यासाठी साहित्यदेखील दिलं. "त्यामुळं मुलांचा मातीशी अधिक संपर्क येण्यास मदत झाली," असं हेल्सिंकी विद्यापीठातील अकी सिंकोनेन यांनी म्हटलं. सिंकोनेन हे चिखलातील मायक्रोबायोमबाबतच्या शोधनिबंधाचे सहलेखकही आहेत.
एका महिन्यानंतर मुलांच्या त्वचेवर आणि आतड्यांमध्ये अधिक वैविध्य असलेल्या मायक्रोबायोमचे प्रमाण वाढलेले दिसले. तसंच त्यांच्या प्रतिकार शक्तीतही सुधारणा झाल्याचे समोर आले. आपल्या शरिराला धोका निर्माण करणाऱ्या जंतूंच्या विरोधात लढणाऱ्या टी सेल्समध्येही वाढ झाल्याचं पाहायला मिळालं. तसंच रक्ताच्या प्लाझ्मामध्येदेखील दाहकता कमी करणाऱ्या तत्वांमध्ये वाढ झाली, तेही चांगल्या रोगप्रतिकार शक्तीचं प्रतिक होतं.
अशा प्रकारच्या बदलांचे दीर्घकालीन काय परिणाम होऊ शकतात याबाबत संशोधन करण्याची सिंकोनेन यांची इच्छा आहे. "त्यामुळं मानवी आजारांचा धोका कमी होऊ शकतो, असं आमचं गृहितक आहे," असं ते म्हणाले.
मड किचन्स
मानसिकदृष्ट्या समोर आलेले फायदे पाहता, अनेक डे केअर सेंटर आणि शाळादेखील मुलांचा निसर्गाशी अधिकाधिक संपर्क येईल यासाठी प्रयत्न करताना दिसतायत. त्यात वर्गाबाहेर शिक्षण, नियमितपणे नेचर वॉकसारखे उपक्रम आणि मड किचन्सच्या माध्यमातून मुलांना मातीत खेळण्यास प्रोत्साहन दिलं जातं.
मुलांना खेळण्यासाठी मोकळ्या जागेची कमतरता असल्याबाबत आता अनेक नर्सरी आणि शाळांमध्ये जागरुकता वाढत असल्याचं मत, मारिलिसा मोडेना यांनी व्यक्त केलं.
मोडेना या शाळांच्या डिझाईनमधील विशेषज्ञ वास्तुविशारद आहेत. तसंच मैदानी खेळांच्या फायद्यांवर लक्ष केंद्रीत करणाऱ्या झिरोसीप्लानेट या इटालियन संशोधन आणि प्रशिक्षण केंद्राच्या संस्थापकही आहेत.
"50 वर्षांपूर्वी लहान मुलांसाठी ज्या क्रिया अगदी सामान्य होत्या त्या पुन्हा सुरू करण्याचा किंवा मुलांपर्यंत पोहोचवण्याचे मार्ग आम्ही शोधत आहोत." मैदानी खेळांबाबत अधिक जागरुकता प्रामुख्यानं उत्तर युरोपात सुरू झाली पण आता ती जगभरात पसरत असल्याचं मोडेना सांगतात.
भविष्यात संशोधनाच्या माध्यमातून घराच्या आवारातील बागा आणि शाळांच्या परिसरातील माती ही अशा फायदेशीर सूक्ष्मजंतूंनी समृद्ध होऊ शकेल. पण तोपर्यंत सध्यातरी पालक आणि शिक्षकांना यासाठी त्यांना शक्य असेल ते करावं लागेल.
त्यातही मड किचन्स हे त्यातल्या त्यात कमी खर्चिक असतात आणि त्याला जागाही कमी लागते. सोप्या भाषेत त्याला अंगणात खेळला जाणारा भातुकलीचा खेळ म्हणता येऊ शकतं.
त्यासाठी तुम्हाला केवळ एक टेबल आणि तुमच्या स्वयंपाक घरातील काही जुनी लहान भांडी यांची गरज असेल. त्या भांड्यांमध्ये माती आणि पाणी भरावं. त्यातही आधुनिकपणा हवा असल्यास ड्रॉवर असलेलं कपाट, त्यात दगड, माती, वाळू आणि विविध वनस्पतीची रोपं भरलेली असू शकतात.
हे छोटे शेफ कदाचित खेळताना त्यांच्या कल्पना आणि सृजनशीलता प्रत्यक्ष साकारताना अंग मातीनं-चिखलानं भरवत असतील, पण या माध्यमातून ते त्यांना हवं ते करून त्या माध्यमातून रोग प्रतिकार यंत्रणादेखील सुधारत असतील. कदाचित आगामी महिन्या, वर्षांमध्ये त्यांना त्याचे लाभ मिळू शकतात.
* डेवीड रॉबसन हे लंडनमधील लेखक आहेत. त्यांचं 'द एक्सपेक्टेशन इफेक्ट : हाऊ यूवर माइंडसेट कॅन ट्रान्सफॉर्म यूवर लाईफ' हे पुस्तक 2022 च्या सुरुवातीला प्रकाशित झालं आहे. Twitter - @d_a_robson
* अॅलेशिया फ्रँको या लेखिका आणि पत्रकार असून इतिहास, संस्कृती, समाज, कथाकथन आणि त्याचा लोकांवर होणारा परिणाम याबाबत प्रामुख्यानं काम करतात. Twitter - @amasognacredi
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)











