पाकिस्तानात एवढा मोठा पूर का आलाय?

फोटो स्रोत, Anadolu Agency/Getty Images
- Author, जॉर्जिना रेनार्ड, बीबीसी न्यूज, क्लायमेट अँड सायन्स
- Role, जान्हवी मुळे, बीबीसी मराठी प्रतिनिधी
भारताचा शेजारी देश पाकिस्तानला सध्या पुरानं वेढलं आहे. इथे विक्रमी पाऊस पडला आहे आणि सिंधू नदीला जणू महापूरच आला आहे. पाकिस्तानवर ही वेळ का ओढवली?
पाकिस्तानात यंदा न भूतो न भविष्यती असा पूर आला. देशाचा जवळपास एक तृतियांश भाग अजून पाण्याखालीच असल्याचं तज्ज्ञ सांगतायत.
लाखो लोक त्यामुळे बेघर झाले आहेत. रस्ते, पूल वाहून गेल्यानं अनेक गावांचा, शहरांचा संपर्क तुटला आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी मदत पोहोचवण्यातही अडचणी येत आहेत.
पंजाब, सिंध, बलुचिस्तान, खैबर पख्तुंख्वा आणि पाकिस्तान प्रशासित काश्मिरलाही पुराचा तडाखा बसला आहे. म्हणजे जवळपास सर्वच देशभर अतिवृष्टीचा परिणाम जाणवतो आहे.
पाकिस्तानात पुरामुळे किती नुकसान झालं?
संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरस यांनी देशातल्या 50 लाख लोकांना अन्न, पाणी, औषधं आणि अन्य मदतीसाठी मोठ्या निधीची आवश्यकता असल्याचं बोलून दाखवलं होतं.
सरकारी आकडेवारीनुसार आतापर्यंत हजारहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे तर सोळाशेहून अधिक जण जखमी झाले आहेत.

फोटो स्रोत, BBC Sport
देशभरात 3 लाख 25 हजाराहून अधिक घरं नष्ट झाली आहेत तर 7 लाख 33 हजार घरांचं नुकसान झालं आहे. 7.35 लाख गुरांचा मृत्यू झाला आहे.
सर्वांत चिंतेची बाब म्हणजे 36 लाख एकरावरच्या शेतीचं नुकसान झालं आहेत. गहू, कापूस, भाज्या आणि फळांचा यात समावेश आहे.
जवळपास निम्म्याहून अधिक ठिकाणी पीकं नष्ट झाल्यामुळे देशात अन्नटंचाई जाणवू शकते अशी भीती पाकिस्तानच्या हवामान मंत्री शेरी रहमान यांनी व्यक्त केली आहे. त्या सांगतात की पुरानं सगळ्या सीमा ओलांडल्या आहेत आणि आम्ही याआधी असं कधी पाहिलं नव्हतं.
पाकिस्तानात यंदा जून ते ऑगस्टमध्ये सरासरीपेक्षा 190% टक्के अधिक पाऊस झाला आहे. संयुक्त राष्ट्रांच्या अंदाजानुसार सुमारे 3.3 कोटी पाकिस्तानी नागरिकांना पुराचा थेट फटका बसला आहे.
याआधी 2010 साली पाकिस्तानात आलेल्या पुरात 2000 हून अधिक जणांचा जीव गेला होता. पण यावेळेला त्याहीपेक्षा भीषण स्थिती निर्माण होऊ शकते, अशी भीती व्यक्त केली जाते आहे.

फोटो स्रोत, BANARAS KHAN/Getty Images
पाकिस्तानातल्या प्रलयामागची कारणं
सर्वांत पहिलं कारण आहे पाकिस्तानचं भौगोलिक स्थान. पाकिस्तानात आणि वायव्य भारतात दोन मोठ्या हवामान प्रणाली काम करतात. एकामुळे उष्णतेच्या लाटा आणि दुष्काळ येऊ शकतो तर दुसरी प्रणाली म्हणजे मॉन्सूनमुळे पाऊस पडतो.
यंदा पाकिस्तानात उष्णतेच्या लाटेनं विक्रम मोडले. मार्च आणि एप्रिलमध्ये काही ठिकाणी तर पारा 49 अंश सेल्सियसपर्यंत वर चढला.

त्यानंतर मान्सूननंही नवा उच्चांक नोंदवला आहे. सिंध प्रांतात एका ठिकाणी ऑगस्टमधल्या पावसाची सरासरी होती 46 मिलीमीटर, पण यंदा तिथे 1,288 मिलीमीटर पाऊस पडला. म्हणजे इथे सरासरीपेक्षा 508 % अधिक पाऊस पडला.
इतक्या पावसात नद्यांना पूर येणं स्वाभाविक आहे. पाकिस्तानातून सिंधू नदी वाहते जिला दरवर्षी पावसाळ्यात पूर येतो. पण एरवी काहीशा कोरड्या राहणाऱ्या दक्षिण सिंध आणि बलुचिस्तानच्या भागांतही यंदा पूर आला आहे.
यामागे क्लायमेट चेंज किंवा हवामान बदलाचाही हात आहे. पाकिस्तान आणि भारतात यंदा आलेली उष्णतेची लाट हा मानवजन्य हवामान बदलाचाच परिणाम असल्याचं वैज्ञानिक सांगतात. आताच्या पूरस्थितीलाही हीच गोष्ट कारणीभूत आहे.
भारतीय उपखंडात मान्सूनच्या काळातल्या सरासरी पावसाचं प्रमाण हवामान बदलामुळे वाढत असल्याचं पोस्टडॅम इन्स्टिट्यूट फॉर क्लायमेट इंपॅक्ट रिसर्च च्या आन्या कॅटझेनबर्गर सांगतात.
जागतिक तापमानवाढीमुळे समुद्राचं तापमान वाढलं की आणखी जास्त बाष्पाची निर्मिती होते. उष्ण हवा जास्त वाफ धरून ठेवते आणि त्यामुळे मान्सूनच्या पावसाची तीव्रता वाढते.
पाकिस्तानच्या उत्तरेला हिमालय आणि हिंदूकुश पर्वतराजी आहेत. या भागाला कधीकधी थर्ड पोल किंवा तिसरा ध्रुव म्हणूनही ओळखलं जातं, कारण ध्रुवीय प्रदेशाबाहेर सर्वाधिक हिमनद्या इथेच आहेत.
जागतिक तापमानवाढीमुळे गिलगिट बाल्टिस्तान आणि खैबर पख्तुंख्वा भागातल्या हिमनद्या वेगानं वितळत असून त्यातून 3,000 हिमतलाव तयार झाले आहेत. त्यातले 33 कधीही फुटून लाखो क्युबिक मीटर पाणी आणि ढिगारा खाली वाहून येऊ शकतो आणि त्यामुळे 70 लाख लोकांचं अस्तित्व धोक्यात आहे, असा इशारा यूएन डेव्हलपमेंट प्रोग्रॅमच्या तज्ज्ञांनी दिला आहे.

फोटो स्रोत, ABDUL MAJEED/Getty Images
पुराचा सामना कसा करणार?
पाकिस्तानात 2010 साली आलेल्या पुरानंतरही अशा आपत्तींचा सामना करण्यासाठी सरकारनं काहीच तयारी केली नव्हती का असा प्रश्न विचारला जातो आहे.
अशी आपत्ती ओढवू नये यासाठी संयुक्त राष्ट्रे आणि पाकिस्तान सरकार इथे वॉर्निंग सिस्टिम, संरक्षक रचना उभारत आहे.
क्लायमेट सायंटिस्ट फहाद सईद यांच्या मते अगदी श्रीमंत देशांनाही एवढ्या मोठ्या आपत्तीचा सामना करता येणं शक्य होणार नाही. "हे काहीतरी वेगळंच संकट आहे. पुराचा आवाका एवढा मोठा आहे आणि पाऊस इतका जास्त पडला आहे की अगदी कितीही मजबूत असलेली यंत्रणा त्यासमोर टिकाव धरू शकणार नाही. "
गेल्या वर्षी बेल्जियम आणि जर्मनीतही पुरानं धुमाकूळ घातला होता, याची आठवण ते करून देतात.
गरिबीचं प्रमाणही मोठं आहे अशा पाकिस्तानसारख्या देशांत वाढत्या पुरांचा सामना करू शकतील अशा दर्जाची घरं बांधणं इथे सर्वांनाच परवडणारं नाही.
आर्थिक आणि राजकीय असमानतेमुळे या संकटात भरच पडली असल्याचं युसूफ बलुच सांगतो. 17 वर्षांचा युसूफ बलुचिस्तानमधला पर्यावरण कार्यकर्ता आहे. तो सहा वर्षांचा असताना त्याचं घरही पुरात वाहून गेलं होतं.
शहरात राहणारे आणि श्रीमंत लोक यांचं पुरामुळे फारसं नुकसान होत नाही. झालं तरी त्यांना मदत मिळते, असं युसूफ नमूद करतो.

"लोकांना राग येणं स्वाभाविक आहे. कंपन्या अजूनही बलुचिस्तानातून जीवाष्म इंधन गोळा करतायत. पण तिथे राहणाऱ्या लोकांनी पुरामुळे आपली घरं गमावली आहेत, त्यांच्याकडे ना अन्न आहे ना आसरा."
ज्यांची कार्बन फूटप्रिंट कमी आहे, म्हणजे हवामान बदलासाठी कारणीभूत वायूंचं उत्सर्जन जे फारसं करत नाहीत अशा लोकांनाच क्लायमेट चेंजमुळे येणाऱ्या पुरासारख्या आपत्तींचा भार सोसावा लागतोय.
अगदी देश म्हणून पाहिलं, तरी जगातल्या एकूण कार्बन उत्सर्जनाच्या 1 टक्क्याहूनही कमी उत्सर्जन पाकिस्तानातून होतंय. पण इथे अतीतीव्र आपत्ती पाहायला मिळत आहेत.
क्लायमेट सायंटिस्ट फहाद सईद सांगतात की जगभरातील सरकारांनी वेगवेगळ्या परिषदांमध्ये क्लायमेट चेंजला आळा घालण्याचं वचन तर दिलं होतं, पण आता त्यांचे डोळे उघडतील अशी अपेक्षा आहे.
"जगाचं तापमान 1.2 सेल्सियसनं वाढल्यावर ही परिस्थिती आहे. यापेक्षा जास्त तापमान वाढ म्हणजे पाकिस्तानसारख्या देशांसाठी मृत्यूदंडच ठरेल. आताच जागं व्हायची वेळ आली आहे."
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)









