हिटलरचे आपल्याच बहिणीच्या मुलीशी संबंध होते? तिच्या मृत्यूचं गूढ का उलगडलं नाही?

अँगेला मारिया रूबल

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, अँगेला मारिया रूबल
    • Author, प्रतिनिधी
    • Role, बीबीसी मुंडो

या 'असामान्य सौंदर्याचा' मृत्यू कसा झाला याचं गूढ उलगडत नाहीये. अँगेला मारिया रूबलचा मृत्यू झाला तेव्हा 'फ्रॅकिशे टागेपोस्ट' या जर्मन वृत्तपत्राने अशा शब्दात तिच्या मृत्यूचं वर्णन केलं होतं.

तिचा मृतहेद अॅडॉल्फ हिटलरच्या म्युनिक अपार्टमेंटमध्ये सापडला होता.

तिचं टोपणनाव 'गेली' होतं. ती हिटलरची सावत्र भाची होती. हिटलरचे चरित्रकार जोखिम फेस्ट यांनी म्हटलं होतं की, गेली हिटलरचं 'खरं प्रेम होती. असं प्रेम जे वर्ज्य होतं, असं प्रेम जे समाजाला मान्य नव्हतं.'

गेली हिटलरच्या सावत्र बहिणीची मुलगी होती.

अर्थात, हिटलर आणि गेलीचे 'प्रेमसंबंध' नक्की कशा प्रकारचे होते याबद्दल अनेक इतिहासकारांमध्ये मतभेद आहेत. पण त्याचं तिच्यावर प्रेम होतं यावर कोणाचं दुमत नाहीये.

गेलीचा मृतदेह 19 सप्टेंबर 1931 हिटलरच्या म्युनिकमधल्या निवासस्थातल्या तिच्या बेडरूममध्ये आढळला होता. ती रक्ताच्या थारोळ्यात पडली होती आणि तिच्या छातीत दोन गोळ्या झाडल्या गेल्या होत्या. तिच्याशेजारीच एक बंदूक पडली होती, जी तिच्या मामाची म्हणजेच हिटलरची होती.

तिच्या मृत्यूची कधीही चौकशी झाली नाही, तिच्या मृतदेहाचं पोस्टमार्टेमही झालं नाही. तिचा मृत्यू कसा झाला याचं गूढ आज 90 वर्षं उलटले तरी कायमच आहे.

जे घडलं त्यात हिटलरचा किती सहभाग होता हे कधी पुढे आलं नाही आणि कधी येणारही नाही. पण या घटनेचा त्याच्यावर खूप परिणाम झाला हे नक्की.

त्याच्या भाचीचा मृत्यू झाल्यानंतर त्याला प्रचंड नैराश्य आलं, तो जवळपास कोमात गेला असं त्याच्या नातेवाईकांनी नंतर म्हटलं. तो आत्महत्या करण्याच्याही गोष्टी बोलायचा.

हिटलर शाकाहारी होता हे सर्वज्ञात आहे. पण असं म्हणतात की, तो गेलीच्या मृत्यूनंतर शाकाहारी झाला कारण मांस पाहिलं की त्याला गेलीच्या रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या मृतदेहाची आठवण व्हायची.

जेव्हा तो नैराश्यातून बाहेर आला तेव्हा त्याने गेलीची बेडरूम सील करायचे आदेश दिले. ती बेडरून तशीच तिची आठवण म्हणून जपली गेली आणि ती रोज ताज्या फुलांनी सजवली जायची.

न्युरेनबर्ग खटल्याच्या वेळी बोलताना नाझी जर्मनीतला दुसरा सगळ्यात महत्त्वाचा माणूस हर्मन गोरिंग याने म्हटलं होतं की, "गेलीच्या मृत्यूचा हिटलरवर प्रचंड आघात झाला होता. तो पूर्ण बदलला, त्याचं इतर लोकांशी वागणं बदललं."

हेन्रिच हॉफमन या नाझी नेत्याचा जवळचा मित्र आणि फोटोग्राफर होता. त्याच्या मते, "गेलीच्या मृत्यूनंतर सगळं बदललं. ती जर जिवंत राहिली असती तर आपल्याला वेगळं चित्र दिसलं असतं. तिच्या मृत्यूनंतर त्याच्यात अमानवी विचारांनी घर केलं."

हिटलरच्या आयुष्यावर एवढा मोठा प्रभाव टाकणारी गेली कोण होती?

गेली 17 वर्षांची होती तेव्हा हिटलरच्या आयुष्यात आली. त्यावेळी त्याचं वय 36 होतं. गेली हिटलरला 'अंकल एल्फ' म्हणायची. तिची आई व्हिएन्नात हाऊसकीपर म्हणून काम करायची. हिटलरने आपल्या बहिणीला त्याचा म्युनिकमधल्या घराची काळजी घ्यायला सांगितली. तेव्हा पहिल्यांदा गेली आणि हिटलरची भेट झाली.

हिटलर आणि त्याची सावत्र बहीण

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, हिटलर आणि त्याची सावत्र बहीण

हिटलर तेव्हा नॅशनल सोशालिस्ट पक्षाचा नेता झाला होता. अल्पावधीच गेलीच्या सौंदर्याने हिटलरला भुरळ घातली. तिचं वर्णन तो 'असामान्य सौंदर्य' असं करायचा.

त्यावेळी एक व्यावसायिक आणि हिटलरचा जवळचा मित्र असलेल्या अर्न्स हान्फस्टँगल याने म्हटलं होतं की, "गेली सोबत असताना हिटलर प्रेमात पडलेल्या एका किशोरवयीन मुलासारखा वागायचा."

हिटलरवर बातम्या करणारा पत्रकार कॉनरॅड हेयडन याने गेलीला वेगवेगळ्या शहरात नेऊन तिचा 'मामा एल्फ' कसा लोकांना भारावून टाकतो हे दाखवल्याचं वर्णन केलं होतं.

रूडॉल्फ हेस याने लिहिलं होतं की, ती एक उंचपुरी, देखणी, सतत खूश असणारी किशोरवयीन मुलगी होती आणि तिच्या मामासारखीच बोलायलाही हुशार होती. अगदी हिटलरही तिला बोलण्यात हरवू शकत नसे.

म्युनिकमध्ये हिटलर तिच्या हातात हात घालून फिरायचा, तिला कॅफेमध्ये घेऊन जायचा, समारंभांना घेऊन जायचा. तिला ऑपरामध्ये गायिका आणि अभिनेत्री व्हायचं होतं, त्यामुळे हिटलरने तिच्या गाण्याच्या क्लासचे पैसेही भरले होते.

जसं जसं हिटलरची ताकद आणि त्याच्याकडची संपत्ती वाढली, तसं त्यांचं नातंही अधिक घट्ट होत गेलं.

जेव्हा हिटलर त्याच्या म्युनिकमधल्या घरात राहायला आला तेव्हा त्याने गेलीच्या आईला त्याच्या बेरचेस्टगेडनमधल्या भल्यामोठ्या बंगल्यात राहायला जायला सांगितलं. पण गेली आईबरोबर न जाता हिटलरसोबत त्याच घरात राहिली.

म्युनिकमधल्या या घरात 9 बेडरूम होत्या, त्यातली एक बेडरूम गेलीची झाली.

तोवर गेली 21 वर्षांची झाली होती. तिची पत 'घर सांभाळणाऱ्या एका हाऊसकिपरची मुलगी' ते 'म्युनिकच्या राजाची राणी' अशी वाढली होती.

हॉफमन (हिटलरचा विश्वासू साथीदार) म्हणाला होता, "फार कमी वेळेस आम्ही कोणत्याही महिलेला आमच्या इनर सर्कलमध्ये सहभागी करून घ्यायचो. गेली कधी कधी आमच्या बैठकांना असायची. तिने फक्त अशा बैठकांमध्ये दिसणं अपेक्षित होतं, बोलणं नाही. फारच क्वचित ती एखादं वाक्य बोलायची. पण हिटलरच्या मतांना विरोध करणं किंवा पाठिंबा देणं, दोन्ही करण्याची तिला परवानगी नव्हती."

अशी परवानगी नंतर इव्हा ब्राऊनही मिळाली नव्हती. इव्हा ब्राऊन हिटलरची प्रेयसी होती आणि त्यांच्या आयुष्यातले शेवटचे काही तास शिल्लक असताना त्यांनी लग्न केलं.

एका निवांत क्षणी फिरताना हिटलर आण गेली

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, एका निवांत क्षणी फिरताना हिटलर आण गेली

हॉफमनने एकेठिकाणी उल्लेख केला होता, " हिटलरसाठी ती (इव्हा) फक्त सुंदर गोष्ट होती. तिच्या बालिशपणात हिटलरला रिलॅक्स वाटायचं पण त्यापुढे नातं नेण्याचा प्रयत्न त्याने कधी केला नाही. त्याच्या बोलण्यात, वागण्यात, नजरेत कधी असं वाटलं नाही की त्याला ते नातं पुढे नेण्यात रस आहे."

पण त्याच्या भाचीला कोणतेच नियम लागू होत नव्हते.

हॉफमन लिहितो, "जेव्हा गेली टेबलावर बसायची, सगळं जग तिच्या भोवती फिरायचं आणि हिटलरने त्यावेळी होणाऱ्या संभाषणात कधीही आपलं महत्त्व ठसवण्याचा प्रयत्न केला नाही."

"गेली जादूगर होती. तिच्या निरागसपणामुळे प्रत्येकातला चांगुलपणा बाहेर यायचा. तिच्याविषयी सगळे बोलायचे, विशेषतः तिचा मामा हिटलर."

अर्न्स हान्फस्टँगलने मात्र तिचं वर्णन, 'अक्कलशून्य, आणि जंगली रानफुलं असतात त्याप्रमाणे वाढलेली' असं केलं होतं.

त्याने पुढे म्हटलं होतं की, "तिला हिटलरकडून मिळणाऱ्या ऐशोआरामी आयुष्याची चांगलीच सवय झाली होती. पण तिने हिटलरच्या मनात जे होतं त्याला प्रतिसाद दिला असं वाटत नाही. "

हॉफमनची मुलगी हेन्रिएटा गेलीची मैत्रीण होती. तिने गेलीचं वर्णन करताना म्हटलं, "ती उद्धट होती, भांडखोर होती आणि अतिउत्साही होती. तिच्यात खूप आत्मविश्वास होता."

हेन्रिटा पुढे म्हणते, "तिचं खरं रूप माझ्या वडिलांनी काढलेल्या तिच्या फोटोंमध्ये पुढे येत नाही."

हिटलरचा पुतण्या पॅट्रिक हिटलरने म्हटलं होतं की तिच्यात एक वेगळाच डौल होता.

"ती खूप सुंदर नव्हती. ती बाहेर जातानाही हॅट घालायची नाही किंवा दागिने घालायची नाही. फक्त तिच्या 'एल्फ मामा'ने दिलेलं एक सोन्याचं स्वस्तिक घालायची. तिचे कपडेही साधे असायचे, एक स्कर्ट आणि वर पांढरा टॉप," पॅट्रिक म्हणतो.

हिटरलच्या ड्रायव्हर इमिल मॉरिसच्या दृष्टीने गेली म्हणजे एक राजकन्या होती. "तिचे डोळे कवितेसारखे होते आणि तिचे केस सर्वोकृष्ट होते. ती जिथे जाईल तिथे लोकांच्या नजरा तिच्याकडे वळत," असं इमिलने 'इव्हा ब्राऊन : हिटलर्स मिस्ट्रेस' या पुस्तकाच्या लेखकाला सांगितलं होतं.

सोन्याच्या पिंजऱ्यात कैद?

हिटलरसारख्या वादग्रस्त व्यक्तिमत्वाच्या आयुष्यात घडलेल्या गोष्टींबद्दल संपूर्ण सत्य कळणं कठीण आहे. एकतर लोकांनी त्याच्यावर डोळे बंद ठेवून विश्वास ठेवला, प्रेम केलं, नाहीतर टोकाचा तिरस्कार केला. त्यामुळे निष्पक्ष सत्य कळणं कठीण पण तरीही अनेक लोकांनी सांगितलं की या नाझी सर्वेसर्वाला त्याच्या भाचीला घेऊन मिरवायला आवडायचं.

तो तिच्यावर स्वामित्व गाजवायला पाहायचा.

एका पक्षाशी खेळताना किशोरवयीन गेली

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, एका पक्षाशी खेळताना किशोरवयीन गेली

हॉफमनने आपल्या 1955 साली 'हिटलर वॉज माय फ्रेंड' या पुस्तकात लिहिलं आहे की, "हिटलर म्हणाला मला गेलीच्या भविष्याची काळजी वाटते, मला तिच्यावर लक्ष ठेवायलाच हवं."

"माझं गेलीवर प्रेम आहे आणि मी तिच्याशी लग्न करू शकतो, पण तुला माहितेय त्या बाबतीत माझी मतं काय आहेत. मला लग्न करायचं नाहीये. पण जोवर गेलीसाठी सुयोग्य मुलगा मिळत नाही तोवर मी तिच्या जवळ कोण येईल, तिचे मित्रमैत्रिणी कोण असतील यावर नियंत्रण ठेवायला हवं."

या पुस्तकात पुढे हिटलर म्हणतो, "गेलीला जी जबरदस्ती वाटतेय, ती काळजी आहे. तिच्या आयुष्यात चुकीच्या व्यक्ती येऊ नयेत म्हणून मी काळजी घेतोय."

हॉफमनची मुलगी हेन्रिएटा म्हणाली होती, "हिटलर जसा जसा तिच्याबद्दल अधिक भावनिक, उत्कट होत गेला, तशी तशी गेली त्याच्यापासून लांब गेली. तो तिला नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करायचा."

आणि मग ती एका अशा माणसाच्या प्रेमात पडली जो हिटलरच्या दृष्टीने अगदीच चुकीचा होता - हिटलरचाच ड्रायव्हर इमिल मॉरिस.

इमिलने एका ठिकाणी म्हटलं की, तो गेलीवर 'वेड्यासारखा' प्रेम करायचा.

हेन्रिएटाच्या म्हणण्यानुसार गेलीला हिटलरशी काहीही संबंध ठेवायचे नव्हते आणि तिला त्या ड्रायव्हरसोबत जायचं होतं.

गेली हेन्रिएटाला म्हणाली होती, "कोणीतरी आपल्यावर एकतर्फी प्रेम करतंय हे किती कंटाळवाणं आहे, पण तुम्ही कोणावर तरी प्रेम करताय आणि तो माणूसही तुमच्यावर तितकंच प्रेम करतोय ही भावना म्हणजे स्वर्ग आहे."

जेव्हा हिटलरला या नात्याबद्दल कळलं तेव्हा तो प्रचंड चिडला. पण तरीही त्याने गेलीला सांगितलं की, तुम्हाला साखरपुडा करायचा असेल तर 2 वर्षं थांबा.

डिसेंबर 1928 ला इमिलला लिहिलेल्या पत्रात गेली म्हणते, "अडोल्फ मामा म्हणतोय की दोन वर्षं थांबा, पण इमिल विचार कर, दोन वर्षं मी फक्त तुला कधीतरी चुंबन देऊ शकेन आणि मामा माझ्या आयुष्यात सगळ्या गोष्टी नियंत्रित करेल. इमिल मी फक्त आणि फक्त तुझ्यावरच प्रेम करते आणि तुझ्याशीच एकनिष्ठ राहीन."

इमिल मॉरिसला थोड्याच दिवसात हिटलरने नोकरीवरून काढून टाकलं.

पण गेलीवरचं हिटलरचं प्रेम जराही कमी झालं नाही. त्या प्रेमाने आता कोणतं स्वरूप घेतलं होतं हे कधी समोर आलं नाही.

पण तिच्या जवळच्या अनेक लोकांनी नंतर सांगितलं की गेलीला मिळणारं ऐशोआरामाचं आयुष्य किंवा तिला मिळणारं सेलिब्रिटी स्टेटस तिच्यासाठी पुरेसं नव्हतं. तिला सोन्याच्या पिंजऱ्यात अडकल्यासारखं वाटत होतं.

आणि तिच्या आयुष्यातल्या शेवटच्या काही महिन्यात ती त्या सोन्याच्या पिंजऱ्यातून उडून जाण्याचा आटोकाट प्रयत्न करत होती.

शेवटचा दिवस

18 सप्टेंबर 1931 गेलीच्या आयुष्यातला शेवटचा दिवस होता. दोघे मामा-भाची प्रवासाला निघणार होते.

हिटलरची दुसऱ्या दिवशी हॅम्बुर्गमध्ये प्रचारसभा होती. तिथून त्याचा राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीचा प्रचार सुरू होणार होता.

गेलीला व्हिएन्नाला जायचं होतं. काहींचं म्हणणं आहे की तिला कायमचं म्युनिक सोडून व्हिएन्नाला जायचं होतं.

गेली आणि हिटलर

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, गेली आणि हिटलर

हिटलर वगळता सगळ्या सुत्रांच्या तेव्हाच्या कथनात, लिहिण्यात त्या दिवशी गेली आणि हिटलरमध्ये जोरदार भांडण झाल्याचे उल्लेख येतात. मी नसताना तू घर सोडून जायचं नाहीस, असं हिटलरनं तिला सुनावलं असं म्हटलं जातं.

या भांडणानंतर तिने स्वतःला आपल्या खोलीत कोंडून घेतलं.

मरणापूर्वी तिने शेवटची कृती केली. तिने एक पत्र लिहायला घेतलं, "मी जेव्हा व्हिएन्नाला जाईन आणि मला वाटतं तो दिवस लवकरच येईल, आम्ही सेमरिंग शहराला भेट द्यायला जाऊ आणि..."

तिने पत्रातलं पहिलं वाक्यही पूर्ण लिहिलेलं नाही. तिचं हे पत्र आजवर गूढ बनून राहिलेलं आहे. दुसऱ्याच दिवशी तिचा मृतदेह आढळला. तिने आत्महत्या केली असं म्हटलं गेलं.

गेलीने पत्र लिहिता लिहिता अर्धवट का सोडलं? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणतीही व्यक्ती आत्महत्या करण्याआधी इतकं आशादायी पत्र का लिहिल?

काही लोकांनी म्हटलं की हा अपघात होता. हिटलरनेही असंच घडलं असेल याला दुजोरा दिला कारण या प्रकरणामुळे त्याच्या निवडणूक प्रचारावर परिणाम होईल, त्याला सत्ता हस्तगत करता येणार नाही अशी भीती होती.

हिटलरने म्युन्शेनर पोस्टमध्ये लिहिलं, "माझी भाची गेली रूबल आणि माझं भांडण झालं हे खोटं आहे. मी तिला व्हिएन्नाला जाऊ देत नव्हतो हेही खोटं आहे. ती व्हिएन्नाला साखरपुडा करायला जात होती आणि मी तिला ते करू देणार नव्हतो हेही खोटं आहे. तिला व्हिएन्नात एका आवाज शिक्षकाकडून तिच्या आवाजाची परीक्षा करून घ्यायची होती."

पुढे हिटलरने म्हटलं, "मी 18 सप्टेंबर घराबाहेर पडलो तेव्हा आमचं कोणतंही भांडण झालेलं नव्हतं. कोणताही राग नव्हता, भावनातिरेक नव्हता."

त्या दिवशी काय झालं याची अनेक लोकांनी वेगवेगळी वर्णनं केली आहेत.

कोणी म्हणतं हिमलरने तिला आत्महत्या करायला सांगितली, कारण तिने हिटलरला धोका दिला होता. कोणी म्हणतं तिला हिटलरने आत्महत्या करायला सांगितली कारण तिच्या ज्यू प्रियकराशी ठेवलेल्या संबंधांमुळे ती गरोदर राहिली होती तर कोणी म्हणतं या कारणामुळे हिटलरनेच स्वतः तिचा खून केला.

पण एकच गोष्ट नक्की आहे ती म्हणजे 18 सप्टेंबरची संध्याकाळ ते 19 सप्टेंबरची सकाळ या काळात कधीतरी गेलीचा गोळी लागून मृत्यू झाला होता.

एका महिन्यानंतर जोसेफ गोबेल्सने, ज्याने नंतर नाझी प्रपोगंडा सर्वदूर नेला, म्हटलं की हिटलरने त्याला गेलीबद्दल सांगितलं. त्याचं तिच्यावर खूप प्रेम होतं, त्याच्या डोळ्यात पाणी आलं.

हिटलर गेली

फोटो स्रोत, Getty Images

गोबेल्सने म्हटलं, "या माणसाला स्वतःसाठी काहीच इच्छा-आकांक्षा नव्हत्या."

हिटलरने त्याचा सल्लागार ऑटो वॅगनरला म्हटलं की, "त्याला गेलीची खूप आठवण येते. तिचं हास्य मला मनापासून आनंद द्यायचं. तिची उत्साहाने भरलेली बडबड ऐकताना मजा यायची."

"पण आता मी संपूर्णपणे मोकळा आहे, मनातूनही स्वतंत्र झालोय. आता मी फक्त जर्मन लोकांचा आहे. माझ्यापुढे फक्त माझं ध्येयं आहे."

पण गोबेल्स आणि वॅगनरला तेव्हा एक गोष्ट माहिती नव्हती. आपल्या भाचीच्या मृत्यूनंतर काही काळातच हिटलरच्या आयुष्यात महत्त्वाची भूमिका बजवणाऱ्या एका महिलेसोबत त्याचे संबंध गहिरे होणार होते. तिचं नाव होतं - इव्हा ब्राऊन.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)