सॅटेनिक व्हर्सेस : सलमान रश्दी यांची 'ती' कादंबरी, जिच्यामुळे त्यांना 9 वर्षे लपून राहावं लागलं होतं...

सलमान रश्दी

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, सलमान रश्दी

ज्येष्ठ साहित्यिक सलमान रश्दी यांच्यावर अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये हल्ला झाला आहे. रश्दी हे न्यूयॉर्कमधील शिटाक्वा इन्स्टिट्यूशन येथील एका कार्यक्रमात असताना त्यांच्यावर हल्ला झाला.

सलमान रश्दी यांच्यावर स्थानिक हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत, तर रश्दींवर हल्ला करणाऱ्याला न्यूयॉर्क पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

'द सॅटेनिक व्हर्सेस' कादंबरीनंतर सलमान रश्दींना सातत्याने जीवे मारण्याच्या धमक्या येत होत्या.

एखाद्‌या पुस्तकावरून होणारे वाद नवे नाहीत. पण बहुतेकदा असे वाद एखाद्या भाषेपुरते किंवा देशापुरते मर्यादित असतात. मात्र ज्येष्ठ साहित्यिक सलमान रश्दी यांच्या एका कादंबरीवरून उठलेलं वादळ जगभर पसरलं. ते तीन दशकांहून अधिक काळ घोंघावत राहिलं.

'सॅटेनिक व्हर्सेस' हे त्या कादंबरीचं नाव. 1988 साली ही कादंबरी प्रकाशित झाली आणि लगेचच वादात सापडली.

एकीकडे इराण आणि भारतासह अनेक देशांमध्ये या कादंबरीवर बंदी घालण्यात आली, त्यासाठी निदर्शनंही केली गेली, कादंबरीच्या प्रती जाळल्या गेल्या. तर दुसरीकडे अनेकजण पुस्तकं जाळणं आणि सेन्सॉरशिपविरोधात रश्दींच्या बाजूनं उभे राहिले.

Salman Rushdie holding a copy of Midnight's Childrem
PA Media
सलमान रश्दी - आकड्यांमध्ये

  • 1947बाँबे (आताच्या मुंबई) मध्ये जन्म

  • 14कादंबऱ्या 1975 ते 2019 दरम्यान लिहिल्या, यात लहान मुलांसाठीच्या दोन कादंबऱ्यांचाही समावेश

  • 5वेळा बुकर पुरस्कारांसाठी नामांकन, 1981 मध्ये मिडनाइट्स चिल्ड्रन या कांदबरीसाठी गौरव

  • 9वर्षं अज्ञातवासात घालवली कारण इराणच्या नेत्याने द सॅटेनिक व्हर्सेस पुस्तकावर ईशनिंदेचा आरोप ठेवत त्यांना धमकी दिली होती

  • 2007साली साहित्यातील योगदानासाठी नाईट हा किताब प्रदान

स्रोत: BBC रिसर्च

1989 च्या फेब्रुवारीपर्यंत गोष्टी आणखी टोकाला गेल्या आणि इराणचे सुप्रीम लीडर आयातुल्ला खोमेनींनी रश्दींना तसंच हे पुस्तक प्रकाशित करणाऱ्या प्रकाशकांनाही ठार करण्याचा फतवा काढला. आंतरराष्ट्रीय राजकारणापर्यंत त्याचे पडसाद उमटले.

या वादामध्ये पुस्तकाचं भाषांतर करणाऱ्यांसह 59 जणांचा वेगवेगळ्‌या हल्ल्यांत मृत्यू झाला आणि स्वतः रश्दींना नऊ वर्ष अज्ञातवासात काढावी लागली.

सॅटेनिक व्हर्सेसवरून वाद का?

कुराणमध्ये प्रेषित मोहम्मद यांच्या तोंडच्या काही ओळी या सैतानानं वदवून घेतल्या, असा उल्लेख आहे. इस्लामच्या अभ्यासकांमध्ये या आयतविषयी वेगवेगळ्या कालखंडात चर्चा झाली आहे.

इंग्लिशमध्ये या आयतचा उल्लेख 'सटॅनिक व्हर्सेस' म्हणूनही केला जातो. त्यावरूनच रश्दींनी आपल्या कादंबरीचं नाव ठरवलं.

'सॅटेनिक व्हर्सेस' या कादंबरीविषयी जगभरात अनेक मतमतांतरं आढळून येतात. अनेक समीक्षकांना हे पुस्तक म्हणजे मॅजिकल रिअलिझम (जादूई वास्तववाद) किंवा सरियलिझम (अतिवास्तववाद) यांचं उत्तम उदाहरण वाटतं. तर कुणी त्यातल्या साहित्यिक मूल्याविषयीही प्रश्न उपस्थित करतात.

सलमान रश्दी

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, सॅटेनिक व्हर्सेस

पण एका गोष्टीविषयी अनेकांचं एकमत आहे की, निषेध करणाऱ्या बहुतांश लोकांनी ही कादंबरी वाचलेली नाही आणि या पुस्तकावर लागलेले निर्बंध पाहता आता अनेकांना ती वाचता येणं शक्य नाही.

सॅटेनिक व्हर्सेस हे थेट धर्माची चर्चा करणारं पुस्तक नाही. पण त्यात दोन व्यक्तीरेखांमधून काही धर्माविषयी भाष्यही आहे.

त्यातला एक, जिबरील फरिश्ता चित्रपटसृष्टीतला सुपरस्टार अभिनेता आहे. तर दुसरा व्हॉईस ओव्हर करणारा सलादीन चमचा.

सलमान रश्दी

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, सलमान रश्दींच्या 'सॅटेनिक व्हर्सेस'विरोधातील आंदोलन

दोघं मुंबईहून लंडनला जात असताना त्यांच्या विमानात स्फोट होतो. पण आश्चर्यकारकरित्या दोघांचा जीव वाचतो. अपघातानंतर त्यांच्या आयुष्यात उलथापालथी घडत जातात. जिबरीलला आभास होत राहतात, तो वेडाकडे झुकतो, त्याला प्रेषित मोहम्मदांच्या आयुष्यातले प्रसंग दिसू लागतात.

या व्यक्तीरेखा प्रेषित मोहम्मदांना भेटलेल्या देवदूतावर आणि सैतानावर आधारीत असल्याचं दिसतं.

पण ही कादंबरी ईशनिंदा करणारी असल्याची टीका होऊ लागली आणि मुस्लीम धर्मगुरूंनी तिला विरोध करायला सुरुवात केली.

'सॅटेनिक व्हर्सेस' आणि इराण

1988 साली 'सॅटेनिक व्हर्सेस' कादंबरी प्रकाशित झाली. वर्षभरातच इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्लाह खोमेनींनी 'सॅटेनिक व्हर्सेस'विरोधात फतवा जारी केला.

वरिष्ठ पत्रकार चंद्रभूषण यांच्या मते, "इराण आणि इराकदरम्यानची लांबलचक युद्ध 1988 साली संपलं. या युद्धादरम्यान आणि त्यापूर्वीही इस्लामी क्रांतीत इराणच्या प्रत्येक घरातील एक ते दोन जण मारले गेले होते. आर्थिक विवंचनेतील लोकांचं दुःख दर दिवशी वाढत होतं. अयातुल्ला खोमेनी आपल्या थकल्या-हरल्या राष्ट्रात उत्साहाची लाट आणण्याचा प्रयत्न करत होते. त्याचं निमित्त त्यांना 'सॅटेनिक व्हर्सेस'च्या माध्यमातून मिळालं."

सलमान रश्दी

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, सलमान रश्दी

त्यावेळी रश्दी यांचं पाकिस्तानाच्या आवती-भोवती विणलेल्या 'शेम' या कादंबरीचा फारसी अनुवाद खूप विकला गेला होता.

चांगली पुस्तकं, चांगले चित्रपट पाहण्याची इराणची संस्कृती आधीपासूनच होती. 'सॅटेनिक व्हर्सेस'संदर्भातही चांगलं वातावरण होतं. पण त्यादरम्यानच हा वाद पुढे आला.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)