मर्बर्ग व्हायरस म्हणजे काय? त्यामुळे खरंच मृत्यू होतो का?

मर्बर्ग व्हायरसमुळे घानात दोन जणांचा मृत्यू झाला आहे आणि 98 जणांना विलगीकरणात ठेवण्यात आलं आहे. त्यामुळे या विषाणूची साथ पसरण्याचा धोका निर्माण झाला आहे.

या विषाणूचा संसर्ग झाल्यास ताप, स्नायू दुखणं, डायरिया, उलट्या, आणि काही वेळेस भरपूर रक्तस्रावामुळे मृत्यू होण्याची शक्यता आहे.

अफ्रिकेत या रोगाच्या प्रादुर्भावामुळे शेकडो लोक मरण पावल्याच्या घटना घडल्या आहेत.

मर्बर्ग विषाणू म्हणजे काय?

मर्बर्ग विषाणू हा इबोला विषाणूइतकाच धोकादायक आहे, असं जागतिक आरोग्य संघटनेनं सांगितलं आहे.

1967 मध्ये जर्मनीतील मर्बर्ग आणि सर्बियामधील बेलग्रेड भागात हा विषाणू पहिल्यांदा आढळला होता. तेव्हा 31 लोकांचा मृत्यू झाला होता.

युगांडामधील माकडांकडून ही साथ पसरली होती. तेव्हापासून हा विषाणू इतर प्राण्यांमध्ये आढळला होता.

जे लोक दीर्घकाळात गुहेत राहिले त्यांना आणि वटवाघळांच्या आसपास असलेल्या खाणीत राहणाऱ्या लोकांना या रोगाचा मोठा प्रादुर्भाव झाला होता.

सध्या झालेला उद्रेक हा घानामधील झालेला पहिला उद्रेक आहे. मात्र या पूर्वी अनेक आफ्रिकन देशात या रोगाचा प्रादुर्भाव झाला होता. त्यात काँगो, केनिया, दक्षिण अफ्रिका, युगांडा, झिम्बाब्वे या देशांचा समावेश होता.

अंगोला मध्ये 2005 साली झालेल्या साथीत 300 पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला होता.

मात्र युरोपात गेल्या 40 वर्षांत फक्त एका जणाचा मृत्यू झाला आहे. ही व्यक्ती युगांडामधून आली होती.

यापूर्वी पसरलेल्या साथी

2017- युगांडा- 3 बाधित, 3 मृत्यू

2012 युगांडा- 15 बाधित, 4 मृत्यू

2005- अंगोला- 374 बाधित, 329 मृत्यू

1998-2000- डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगो- 154 बाधित, 128 मृत्यू

1967- जर्मनी- 29 बाधित, 7 मृत्यू

(स्रोत- जागतिक आरोग्य संघटना)

मर्बर्ग व्हायरसच्या प्रादुर्भावाची लक्षणं

मर्बर्ग विषाणूचा प्रादुर्भाव होताच ताप, तीव्र डोकेदुखी, स्नायु दुखणं, ही लक्षणं आढळतात. तीन दिवसानंतर, डायरिया, पोटदुखी, मळमळ, उलट्या ही लक्षणं आढळतात.

WHO च्या मते, "या टप्प्यावर रुग्णाचा चेहरा अगदी भुतासारखा दिसतो. डोळे खोल जातात, चेहरा निस्तेज होतो आणि प्रचंड आळस येतो."

काही रुग्णांना शरीराच्या विविध भागातून रक्तस्राव होतो. त्यानंतर आठ ते दहा दिवसांनी त्यांचा मृत्यू होतो.

ज्या रुग्णांना या विषाणूची लागण होते त्यापैकी अर्ध्याहून अधिक लोकांचा मृत्यू होतो. पण या विषाणूचा जो सगळ्यांत धोकादायक प्रकार आहे त्यात जवळजवळ 88 टक्के रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

हा विषाणू कसा पसरतो?

वटवाघळामुळे हा विषाणू वेगाने पसरतो. अफ्रिकन ग्रीन माकड आणि डुकरावाटेही पसरतो. माणसांमध्ये शरीरातील स्रावांद्वारे आणि दुषित रक्ताद्वारे पसरतो.

रुग्ण बरा झाल्यानंतरही रक्त आणि वीर्याद्वारे पुढचे अनेक महिने हा रोग पसरू शकतो.

रोगावर उपाय काय?

या विषाणूसाठी कोणतंही औषध किंवा लस उपलब्ध नाही. मात्र त्यासाठी ड्रग थेरेपी विकसित केल्या जात आहेत, असं जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं आहे.

भरपूर द्रव्य पदार्थ देऊन आणि वाहून गेलेल्या रक्ताचं नुकसान भरून काढणं हे दोन उपाय सध्या आहेत.

या रोगाचा प्रादुर्भाव कसा टाळता येईल?

आफ्रिकेतील लोकांनी रानटी प्राण्यांचं मांस खाऊ नये, असं गावी या संस्थेने सांगितलं आहे. ज्या भागात प्रादुर्भाव झाला आहे तिथल्या डुकरांशी संपर्क टाळावा.

ज्या पुरुषांना या विषाणूची लागण झाली आहे त्यांनी वर्षभर काँडोमचा वापर करावा. किमान दोनदा तरी विषाणूची टेस्ट निगेटिव्ह यायला हवी.

ज्या रुग्णांचा मृत्यू झाला आहे त्यांना पुरणाऱ्या लोकांनी मृतदेहाला स्पर्श करू नये.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहि61890597ले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)