ओरल सेक्समुळे घशाचा कर्करोग होतो?

प्रेमी युगुल

फोटो स्रोत, Getty Images

आपण आजपर्यंत ऐकत आलोय की घशाचा कर्करोग होण्यासाठी धूम्रपान किंवा मद्यपान कारणीभूत असतं. पण एका संशोधनात आता विचित्र बाब समोर आली आहे. तोंडावाटे केलेला संभोग आणि घशाचा कर्करोग होण्याचा स्पष्ट असा संबंध असल्याचं या संशोधनात सांगण्यात आलंय.

बऱ्याच संशोधकांनीही या गोष्टीची पडताळणी केली असून ANI वृत्तसंस्थेने यासंदर्भात बातमी दिली आहे.

अलिकडच्या वर्षांत जो रिसर्च झाला आहे त्यातून नवीन निष्कर्ष काढण्यात आले आहेत. या निष्कर्षानुसार, HPV संक्रमित व्यक्तीशी तोंडावाटे संभोग केल्यास किंवा एकापेक्षा अधिक लैंगिक जोडीदार असल्यास घशाचा कर्करोग बळावू शकतो.

ब्रुसेल्स कॅन्सर रेजिस्ट्री फाउंडेशनच्या मते, 2019 मध्ये 2,766 लोकांना डोक्याचा आणि मानेचा कर्करोग झाल्याचं निदान झालं आहे. दरवर्षी 100,000 लोकसंख्येमागे 24.2 नवे कॅन्सरचे रुग्ण आढळतात. या 2,058 निदान झालेल्या लोकांपैकी बहुसंख्य पुरुष रुग्ण आहेत. तर 708 महिला रुग्ण आहेत.

UZ ल्यूवेन इथं प्राध्यापक असलेले डॉ. पियर डेलार सांगतात की, "HPV विषाणूमुळे घशाच्या कर्करोगाची संख्या अलीकडच्या काही वर्षांत वाढली आहे." ह्युमन पॅपिलोमा व्हायरस (HPV) हा लैंगिक संबंधातून संक्रमित होणारा संसर्ग आहे. जो स्त्री आणि पुरुष या दोघांमध्ये ही आढळतो. या संसर्गामुळे तोंडाचा संसर्ग होण्याची शक्यता असते.

डॉ. डेलार पुढे सांगतात की, "घशाचा कर्करोग तोंडावाटे संभोग केल्यावर संक्रमित होतो. बहुतेक प्रकरणांमध्ये HPV ची कोणतीच लक्षणं नसतात आणि बरेचदा तुमची रोगप्रतिकारक क्षमताच हा संसर्ग दूर करते. मात्र जननेंद्रिय आणि तोंडाच्या भागातील त्वचेचा त्वचेशी स्पर्श झाल्यास हा घशाचा कर्करोग होऊ शकतो."

'घशाचा कर्करोग झालेल्या लोकांमध्ये पुरुष मोठ्या संख्येने आहेत. स्त्री आणि पुरुष यांचे तुलनात्मक प्रमाण काढल्यास ते 70पुरुषांमागे 30 स्त्रिया असं आहे. पुरुषांचं प्रमाण अधिक असण्याचं मुख्य कारण म्हणजे पुरुष जास्त धूम्रपान आणि मद्यपान करतात. पण अलीकडच्या काही वर्षात स्त्रियाही धूम्रपान मद्यपान करताना दिसतात. घशाचा कर्करोग हा घशात आणि त्याच्या सभोवतालच्या भागात जसं की तोंडात, नाकात असणाऱ्या पोकळी मागे, टॉन्सिलमध्ये किंवा जीभेच्या खाली सुद्धा होऊ शकतो.' अशी माहिती डॉ. डेलार देतात.

प्रेमी युगुल

फोटो स्रोत, Getty Images

या कॅन्सरची लक्षणं सांगताना डॉ. डेलार सांगतात की, या कॅन्सरची लक्षणे सहसा समजून येत नाहीत. जेव्हा हा कॅन्सर पुढच्या टप्प्यावर जातो तेव्हाच त्याच निदान होत. पण काहीवेळेस स्पष्ट अशी लक्षण आढळून येतात. यात सातत्याने घसा खवखवणे, घशातील खवखव दूर न होणे, खोकताना तोंडावाटे रक्त येणे, आवाज कर्कश होणे, घास गिळताना त्रास होणे अशी काही लक्षण आढळतात. जेव्हा कॅन्सर ऍडव्हान्स स्टेजला जातो तेव्हा घशात असणाऱ्या ग्रंथी सुजतात ज्यातून ट्युमर झाल्याचं समजतं.

पण संशोधनाचा एक फायदा म्हणजे हा कोणत्या स्टेजचा ट्युमर आहे हे समजल्यावर यावर असंख्य उपचार उपलब्ध आहेत. "HPV मुळे घशाचा कर्करोग झाल्यास, केमोथेरपीसह रेडिएशन थेरेपी घेतल्यास पुरेशी असते." तंबाखू आणि अल्कोहोलच्या सेवनामुळे जो घशाचा कॅन्सर होतो त्यावरही हेच उपाय लागू होतात.

डॉ. डेलार सांगतात की, "मानेच्या ग्रंथींमध्ये जर हा कॅन्सर वाढत असेल तर बऱ्याचदा ऑपरेशन करून ही गाठ काढली जाते. आता तर ही गाठ रोबॉटिक सायन्सद्वारे काढली जाते. जर ऑपरेशन करणं गरजेचचं असेल तर आम्ही काही केसेसमध्ये घशाचा काही भाग काढून टाकतो. याचे परिणाम गंभीर असतात. जसं की बोलताना, गिळताना रुग्णांना त्रास होऊ शकतो."

सुदैवाने जर कॅन्सरचं निदान प्राथमिक अवस्थेत झालं तर तो बरा होण्याची शक्यता 90 टक्क्यांपर्यंत असते. पण हेच निदान जर उशीरा झालं तर तो बरा होण्याची शक्यता जवळपास 60 टक्के राहते.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)