नुपूर शर्मा प्रकरणावरून अल-कायदाची भारतावर हल्ल्याची धमकी

फोटो स्रोत, NUPURSHARMABJP
अल-कायद्याच्या साऊथ एशिया शाखेने भारतावर हल्ले तसंच बॉम्बस्फोट करण्याची धमकी दिली आहे. अल-कायदाने म्हटलं की प्रेषित मोहम्मदांचा 'अपमान' करणाऱ्या कोणावरही आम्ही बॉम्ब हल्ले करू किंवा त्यांचे खून करू.
भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा आणि इतर एका वरिष्ठ पदाधिकाऱ्याने मोहम्मद पैंगबरांबद्दल केलेल्या वक्तव्यावर प्रतिक्रिया म्हणून अल-कायदाने ही धमकी दिली आहे.
भारतीय उपखंडात स्वतःला अल-कायदा म्हणवणाऱ्या या जिहादीस्ट गटाने उर्दू आणि इंग्रजी भाषेत पत्रक काढलं आहे. हे पत्रक त्यांनी त्यांचा वेबसाईट तसंच टेलिग्राम, रॉकेटचॅट आणि चिर्पवायर या सोशल मीडिया साईटवर टाकलं आहे.
या पत्रकात म्हटलंय की काही दिवसांपूर्वी, "हिंदुत्वाचा झेंडा खांद्यावर घेणाऱ्या काही व्यक्तींनी प्रेषित मोहम्मद आणि त्यांच्या पत्नी आयेशा यांचा भारतीय टीव्ही चॅनलवर अपमान केला."
यात पुढे म्हटलंय की, "अशा अपमानकारक गोष्टी बोलणाऱ्या लोकांना, विशेषतः भारत व्यापणाऱ्या हिंदुत्ववादी दहशतवाद्यांना आम्ही कंठस्नान घालू."
प्रेषित मोहम्मदांचा 'अपमान' करणाऱ्या लोकांना कोणत्याही प्रकारची 'दयामाया' दाखवली जाणार नसल्याचं यात म्हटलं आहे.
"अशा लोकांचा शाब्दिक निषेध करणं पुरेसं नाही, किंवा या बद्दल खेद व्यक्त करूनही उपयोग नाही. याला हिंसक मार्गानेच उत्तर दिलं पाहिजे."
"मुंबई, दिल्ली, उत्तर प्रदेश आणि गुजरातमधल्या या भगव्या दहशतवाद्यांचा अंत जवळ आलाय. ते ना त्यांच्या घरात सुरक्षित आहेत ना सैनिकी भागात सुरक्षित आहेत," असं या पत्रकात लिहिलंय.

फोटो स्रोत, Getty Images
या गटाने स्वतःला भारतातले मुस्लीम आणि इस्लामचा संरक्षक आहोत असं दाखवण्याचा प्रयत्न केलाय. प्रेषित मोहम्मदांच्या नावाने सांगितली जाणारी भविष्यवाणी - गझवा-ए-हिंद'चाही उल्लेख केला. याचा अर्थ असा होती की भारत भूमीसाठी जेव्हा युद्ध होईल तेव्हा ते मुस्लीम जिंकतील.
काय होतं नुपूर शर्मांचं वक्तव्य?
भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी इस्लाम धर्मियांचे प्रेषित पैगंबर मोहम्मद यांच्या विवाहासंबंधी आक्षेपार्ह विधान केलं आणि त्याचे पडसाद आता जगभरात उमटतायत. ईशनिंदा केल्याप्रकरणी नुपूर शर्मा यांचं भाजपमधून निलंबन झालं असलं तरी हा वाद पेटलेलाच आहे.
पैगंबरांचा विवाह आणि इस्लाम धर्मातल्या काही मान्यतांबाबत हे वक्तव्य आहे. टाइम्स नाऊ या वृत्तवाहिनीवर ज्ञानवापी मशिदीच्या मुद्द्यावरून बोलताना शर्मा यांनी अत्यंत आक्रमकपणे पैगंबरांविषयी हे उद्गार काढले होते. त्यांच्या विधानांची री भाजपचे दिल्लीतले नवीन जिंदाल यांनी ओढली आणि हा वाद वाढला.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कानपूर दौऱ्यापूर्वी याचे पडसाद कानपूरमध्ये उमटले आणि दोन गटांमध्ये या मुद्द्यावरून तणाव निर्माण झाला. मात्र, हा वाद भारतातच न थांबता देशाच्या सीमेपलिकडे गेला.
नुपूर यांचे कार्यक्रमातील उद्गार, पत्रकार आणि फॅक्ट चेकिंग वेबसाईट Alt newsचे सहसंस्थापक मोहम्मद जुबैर यांनी ट्वीटर अकाऊंटवरून शेअर केले. यानंतर नुपूर यांच्यावरील टीकेचा जोर वाढत गेला.
तर यावर प्रतिक्रिया देताना, "भारतात सर्व धर्मांचा आदर राखला जातो. एखाद्या व्यक्तीने कुठल्याही धर्माबद्दल केलेली आक्षेपार्ह टिपण्णी भारत सरकारचं अधिकृत मत नाही. संबंधित संस्थेनं त्या वक्तीवर कडक कारवाई केली आहे. ओआयसीने घेतेलली भूमिका दुर्दैवी आणि दुटप्पी आहे," असं भारतीय परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलंय.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








