झुकरबर्गने फेसबुक आमच्याकडून चोरलं म्हणणारे हे भाऊ असे झाले बिटकॉईन अब्जाधीश

फोटो स्रोत, Getty Images
- Author, अनघा पाठक
- Role, बीबीसी मराठी
आज सकाळपासून तुम्ही किती वेळा फेसबुक चेक केलंत असा प्रश्न विचारला तर कोणीच खरं उत्तर देणार नाही. खरंतर हा लेख तुम्ही फेसबुकवर वाचत असण्याची शक्यता सगळ्यात जास्त आहे.
मीही लिहिता लिहिता चारवेळा फेसबुकवर जाऊन आलेय. या फेसबुकचे जन्मदाते आणि आपल्या सगळ्यांचे लाडके 'मार्कभाऊ' झुकरबर्ग उर्फ 'झुक्या' यांना आपण ओळखतोच. त्यांच्या वॉलवर जाऊन आपली मराठी मंडळी अधूनमधून कमेंट करत असतात.
पण याच मार्क झुकरबर्गला शिंगावर घेणारे आणि फेसबुकची आयडिया आमच्याकडून चोरली असं म्हणत त्यांना कोर्टात खेचणारे दोन भाऊ होते. फेसबुक त्यांच्या हातातून गेलं पण तरीही ते प्रचंड यशस्वी झाले.
विंकलवॉस ब्रदर्स या नावाने ही जोडी प्रसिद्ध आहे. हे जुळे भाऊ तुम्हाला माहिती असतील तर तुम्ही 2010 आलेला 'द सोशल नेटवर्क' हा पिक्चर पाहिला असेल किंवा 2008 चे बीजिंग ऑलिम्पिकची स्पर्धान् स्पर्धा पाहिली असेल.
ऑलिम्पिक, फेसबुक आणि पिक्चर या तीन गोष्टींचा काहीतरी संबंध आहे का असा विचार करत असाल तर त्याचसाठी ही स्टोरी आहे.
या विंकलवॉस भावंडांनी आयुष्यात अनेक उद्योग केलेत. त्यातला सगळ्यात फेमस उद्योग म्हणजे त्यांनी मार्क झुकरबर्गच्या आधी कथितरित्या फेसबुकसारख्या सोशल नेटवर्किंग साईटची स्थापना केली. त्यांचा तर आरोप होता की फेसबुकची मुळ कल्पना त्यांचीच पण ती मार्क झुकरबर्गने त्यांच्याकडून चोरली.
फेसबुक कोणाचं?
मार्क झुकरबर्ग, कॅमरून विंकलवॉस आणि टायलर विंकलवॉस एकाच वेळेस हार्वर्ड विद्यापीठात शिकत होते.
2003 साली मार्कने आपल्या विद्यापीठातल्या विद्यार्थ्यांसाठी एक साईट सुरू केली. तिचं नाव फेसमॅश. यावर विद्यार्थी जाऊन आपल्याच सहकाऱ्यांच्या आकर्षक दिसण्यावर पॉईंट देऊ शकत होते. पण या साईटवरची माहिती मार्क झुकरबर्गने हॅक करून मिळवलेली असल्यामुळे दोनच दिवसात ती साईट बंद पडली.

फोटो स्रोत, facebook
त्याच्या पुढच्याच वर्षी, 2004 साली फेसबुक सुरू झालं. पण जन्मापासून ते वादातच अडकलं.
मार्क यांचे हार्वडमधले तीन सीनियर्सनी त्याला कोर्टात खेचलं. त्यांचं म्हणणं होतं की फेसबुकची आयडिया मार्कने त्यांच्याकडून चोरली आहे.
या तिघांपैकी दोघं होते टायलर आणि कॅमरून विंकलवॉस हे बंधू आणि तिसरा होता भारतीय वंशाचा विद्यार्थी दिव्या नागेंद्र. या तिघांनी मार्क झुकरबर्ग यांना कोर्टात खेचलं. तेव्हा विंकलवॉस बंधू 23 वर्षांचे होते.
पण वातावरण विंकलवॉस बंधूंच्या विरोधातलं तयार झालं. गंमत म्हणजे त्यानंतर मार्क झुकरबर्ग किंवा फेसबुकवर जितके पिक्चर्स आले, पुस्तकं आले त्यात विंकलवॉस बंधुंना व्हिलन म्हणूनच दाखवलं गेलं.
मग ते डेव्हिड क्रिकपॅट्रीक यांचं 'द फेसबुक इफेक्ट असो' किंवा याच पुस्तकावर आलेला 'द सोशल नेटवर्क' हा पिक्चर असो.
टायलर, कॅमरून विंकलवॉस आणि दिव्या नरेंद्र यांचं म्हणणं होतं की, त्यांनी मार्कला अशीच वेबसाईट डेव्हलप करायला सांगितलं होतं आणि त्यासाठी करार केला होता. पण मार्कने त्यांच्या वेबसाईटचं काम नीट केलं नाही, त्यात वेळकाढूपणा केला आणि त्यांची आयडिया घेऊन स्वतःची साईट काढली.
या खटल्यातही विंकलवॉस बंधूंच्या बाजूने गोष्टी घडत नव्हत्या. 2007 साली मॅसाच्युसेट्स कोर्टाचे न्यायाधीश डग्लस पी वुडलॉक यांनी त्यांचे आरोप 'टिश्यू पेपरइतके पातळ' (तकलादू) आहे असं म्हटलं होतं.

फोटो स्रोत, Getty Images
विंकलवॉस बंधूंनी आरोप केला होता की, त्यांनी मार्कसोबत सोशल नेटवर्किंग साईट डेव्हलप करायला करार केला होता. पण न्यायाधीश वुडलॉक यांनी म्हटलं की, 'हॉस्टेलच्या खोलीत ज्या गप्पा मारल्या जातात त्यांना करार म्हणता येणार नाही.'
कॅमरून आणि टायलरचे वडील हावर्ड विंकलवॉस यांनी बीबीसी रेडियोच्या बेकी मिलगनशी बोलताना म्हटलं होतं की, "खटल्याची पाच वर्षं खूप भयानक होती. त्यांच्यावर खूप प्रेशर होतं. याकाळात त्यांनी रोईंगवर (नौकायन) भर दिला."
"आसपास जे घडतंय त्यापासून लक्ष विचलित करण्याचा हा त्यांचा रस्ता होता."
याच रस्त्याने त्यांना ऑलिम्पिकपर्यंत नेलं. 2008 साली बिजिंगमध्ये झालेल्या ऑलिम्पिकमध्ये रोईंग स्पर्धेत त्यांनी अमेरिकेचं प्रतिनिधीत्व केलं होतं आणि त्या स्पर्धेत ते सहाव्या क्रमांकावर राहिले होते.
दुसऱ्या बाजूला फेसबुकचा खटला चालूच होता. फेसबुकने विंकलवॉस बंधूंची केस फेटाळून लावावी याचिका केली होती, पण टायलर-कॅमरूनच्या सुदैवाने वर्षभरानंतर दुसऱ्या एका न्यायधीशांनी फेसबुकचीच याचिका फेटाळून लावली.
यानंतर थोड्याच दिवसात फेसबुकने विंकलवॉस बंधूंशी कोर्टाबाहेर सेटलमेंट केली. या सेटलमेंटचा भाग म्हणून त्यांना 6.5 कोटी डॉलर्स मिळाले.
आता सुरू होतो खरा पिक्चर.
वेगवेगळे व्यवसाय करणं विंकलवॉस बंधूंच्या रक्तातच होतं. त्यांच्या आजोबांचं ऑटोपार्ट्सचं मोठं दुकान होतं. ते आधी खाणकामगार होते पण त्यांनी आपला व्यवसाय उभा केला.
कॅमरून आणि टायलरचे वडील हार्वड विंकलवॉसही उद्योगी होते. त्यांनीही वेगवेगळे व्यवसाय केले. कुटुंब अब्जाधीश नसलं तरी बऱ्यापैकी पैसा राखून होतं.
त्यांच्या रात्रीच्या जेवणाच्यावेळी व्यवसायाच्याच चर्चा व्हायच्या. टीव्ही पाहण्याची या भावंडांना परवानगी नव्हती.
अशा परिस्थितीत मोठ्या झालेल्या विंकलवॉस बंधूंना फेसबुककडून कोट्यवधी रूपये मिळाले खरे पण पुढे काय करायचं हा प्रश्न होता.
बेन मेझरिक अमेरिकेतले लेखक आहेत आणि त्यांनी बिटकॉईन बिलिनिअर्स हे पुस्तक लिहिलं आहे. यात या विंकलवॉस भावंडांचा प्रवास मांडला आहे. त्यांनीच 'द अॅक्सिडेंटल बिलिनिअर्स' हे पुस्तक लिहिलं आहे. 'द सोशल नेटवर्क' हा पिक्चर काही अंशी याही पुस्तकावर बेतलेला आहे.
त्यांनी एका मुलाखतीत म्हटलं होतं, "खरं सांगू का, ती माझीच चूक होती. मी जेव्हा त्यांना पहिल्यांदा भेटलो, तेव्हा माझ्यासाठी ते लगेचच खलनायक ठरले. मी जेव्हा 'द अॅक्सिडेंटल बिलिनिअर्स' हे पुस्तक लिहिलं तेव्हा ते सहा फुट उंच, श्वेतवर्णीय, श्रीमंत कुटुंबातून आलेले गुंड वाटत होते. मार्क झुकरबर्गला सहानभुती मिळाली. त्याच्याकडे सगळे अभ्यासू, गोंधळलेला पण सगळ्यांना आवडेल असा मुलगा म्हणून पाहायचे आणि हे भाऊ त्याच्यावर दादागिरी करत आहेत असं चित्र उभं राहिलं होतं. पण ते 100 टक्के चुकीचं होतं."
विंकलवॉस बंधूंना जेव्हा फेसबुककडून नुकसानभरपाई मिळाली तेव्हा त्यांनी ती शेअर्सच्या स्वरुपात घेतली. लवकरच त्या 6.5 कोटी डॉलर्सचे 10 कोटी डॉलर्स झाले. त्यांनी या पैशाची गुंतवणूक करायची ठरवली. पण अजबच गोष्ट झाली. कोणी त्यांचा पैसाच घेईना.
"कॅमरून आणि टायलर विंकलवॉस दोन अशा व्यक्ती होत्या ज्यांनी जाहीरपणे मार्क झुकरबर्गशी भांडण केलं होतं. कोणालाच आपल्या कंपनीचं नाव त्यांच्याशी जोडायचं नव्हतं, स्पष्ट शब्दात सांगायचं तर मार्क झुकरबर्गला नाराज करायचं नव्हतं," बेन मेझरिक म्हणतात.
'खोटा' पैसा झाला मोठा
पण स्वस्थ बसतील ते विंकलवॉस भाऊ कसले. कोणी त्यांच्याकडचा खरा पैसा घेत नव्हतं ना, मग त्यांनी 'खोट्या' पैशाच्या नंतर अवाढव्य होणाऱ्या व्यवसायात उडी घेतली. वर्षं होतं 2013.
याच वर्षी एप्रिल महिन्यात या भावंडांनी जाहीर केलं की, त्यांनी 1.1 कोटी डॉलर्स त्यांच्या विंकलवॉस कॅपिटल्स या कंपनीमार्फत बिटकॉईनमध्ये गुंतवले.
काही लोकांचं असंही म्हणणं आहे की त्यांना सुरुवातीचे काही बिटकॉईन अगदी 10 डॉलरला एक या भावात पडले. म्हणजे ही घोषणा करण्याच्या बऱ्याच आधीपासून त्यांनी बिटकॉईनमध्ये गुंतवणूक करायला सुरूवात केली होती.
अज्ञानी (त्यात मी पण आले) लोकांसाठी टीप - सध्या एका बिटकॉईनची बाजारात किंमत जवळपास 45 हजार डॉलर्स एवढी आहे.
त्याही पुढे जाऊन बिटकॉईन म्हणजे काय हाच प्रश्न तुम्हाला पडला असेल तर बीबीसी मराठीची ही सर्वसमावेश स्टोरी नक्की वाचा
त्यावेळी, म्हणजे 2013 मध्ये, सर्क्युलेशनमध्ये असलेल्या सगळ्या बिटकॉईनपैकी 1 टक्के बिटकॉईन कॅमरून आणि टायलरकडे होते असं म्हणतात.
ही घोषणा केल्यानंतर काहीच दिवसात या भावंडांना फटका बसला. बिटकॉईनची किंमत 180 डॉलर्स वरून 80 डॉलर्सवर आली. पुढे अनेकदा ही किंमत नाट्यमय पद्धतीने वरखाली होणार होती.
बिटकॉईनच का याचं उत्तर देताना कॅमरून बीबीसी रेडियो 4 च्या डॉक्युमेंट्रीत म्हणतात, "तुम्ही कधी प्रेमात पडणार हे तुम्हाला माहिती नसतं. अनेकदा तुम्हाला कल्पनाही नसताना ते अचानक तुमच्या समोर येतं. बिटकॉईनचं तसंच झालं. हे प्रेमासारखंच होतं. एखादी गोष्ट तुमची इच्छा आहे म्हणून किंवा तुम्ही जबरदस्ती करताय म्हणून तुम्हाला मिळत नाही. ती जेव्हा यायची तेव्हा बरोबर समोर येते."
ते पुढे म्हणतात, "बिटकॉईन आमची पॅशन बनली. आम्ही त्याबद्दल अभ्यास करायला सुरुवात केली आणि बिटकॉईन विकत घ्यायला सुरुवात केली. काही काळातच ते आमचं आयुष्य बनलं."
आयुष्य बनलं म्हणजे गेल्या 10 वर्षांत काय केलं त्यांनी? एकेक करून सांगते.
2013 साली त्यांनी बिटइन्संट नावाच्या कंपनीत गुंतवणूक केली. बिटकॉईन खरेदी विक्री करण्याची ही पहिली अमेरिकन जागा (अर्थातच ऑनलाईन) होती.
पण या कंपनीचे माजी सीईओ चार्ली श्रेम यांनी पैशांचे बेकायदेशीर व्यवहार केल्याबद्दल अटक झाली. पुढच्याच वर्षी ही कंपनी बंद पडली. विंकलवॉस बंधूंनी 2018 साली चार्ली श्रेम यांना कोर्टात खेचलं. त्यांचं म्हणणं होतं की श्रेम यांनी विंकलवॉस बंधूंकडून बिटकॉईन चोरले.
2019 साली त्यांनी कोर्टाबाहेर सेटलमेंट केली.
पुढचा टप्पा जेमिनाय या कंपनीच्या स्थापनेचा. 2014 साली कॅमरून आणि टायलर व्दयींनी क्रिप्टोकरन्सीचा एक्स्चेंज स्थापन केला. स्टॉक मार्केट एक्स्चेंज असतो ना, जिथे शेअर खरेदी विक्री करता येतात, तसा.
बिटकॉईन किंवा क्रिप्टोकरन्सीची खरेदी विक्री करण्यासाठी जेमिनाय ही जगातल्या सगळ्यात सुरक्षित एक्स्चेंजपैकी मानली जाते.
2017 साली बिटकॉईनची किंमत प्रचंड वाढली. म्हणजे त्या एका वर्षांत एका बिटकॉईनची किंमत 18 हजार डॉलर्सला पोहचली. किंमत कितीही वरखाली झाली तरी विंकलवॉस बंधूंनी आपल्याकडचे बिटकॉईन विकले नाहीत.
2019 साली त्यांनी ब्लॉकफाय कंपनी स्थापन केली. ही कंपनी काय करते? तर बिटकॉईन कर्जाने देते आणि इथे आपले बिटकॉईन ठेवणाऱ्या लोकांना बऱ्यापैकी व्याजही देते. एक प्रकारची बिटकॉईन बँक म्हणा ना.
2019 साली त्यांनी निफ्टी गेटवे ही कंपनी विकत घेतली. ही कंपनी नॉन-फंजिबल-टोकन्सची खरेदी विक्री करते. आता ही नवी काय भानगड? मलाही प्रश्न पडला मग मी गुगल केलं. तुमचे गुगल करण्याचे कष्ट वाचवते आणि इथे सांगून टाकते.
नॉन-फंजिबल-टोकन म्हणजे डिजीटल स्वरुपातली कला. यात चित्र असतील, शिल्प असतील, संगीत असेल, गाणी असेल. पण सगळं डिजीटल. याची विक्री किंवा सबस्क्रिप्शनमधून कलाकारांना पैसे मिळतात.
गंमत पहा, त्यांच्याच जानी दुश्मन मार्क झुकरबर्गने मेटाव्हर्सची सुरुवात केली. आता मेटाव्हर्समध्ये तुम्हाला एखादा गाण्याचा कार्यक्रम ऐकायचा असेल तर त्याचं तिकीट तुम्हाला विंकलवॉस बंधूंच्या कंपनीतून विकत घ्यावं लागेल.
विंकलवॉस बंधू क्रिप्टो क्रेडिट कार्ड आणण्याच्या बेतात आहेत.
मार्क झुकरबर्ग आणि विंकलवॉस बंधू यांच्यात जे भांडण झालं त्यानंतर पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं आहे. आज विंकलवॉस बंधूंची संपत्ती अब्जावधी डॉलर्स आहे असं म्हणतात. मार्क झुकरबर्ग पुढे असतील पण ही भावंडही खूप मागे नाहीयेत.
आता त्यांच्यात पुर्वीसारखी दुश्मनी पण नाहीये म्हणे. त्यांनी फेसबुकच्या बिझनेस मॉडेलचं एकदा कौतुकही केलं होतं.
कॅमरून आणि टायलर विंकलवॉस भावंडांचा दावा आहे की येत्या काही काळात क्रिप्टोकरन्सीचा पसारा इतका अवाढव्य होणार आहे की तो फेसबुकलाही मागे टाकेल.
असं झालंच तर सूड शांत डोक्याने आणि विचार करून घ्यायचा असतो हे पुन्हा सिद्ध होईल नाही का?
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








