कोरोना निर्बंध: फेब्रुवारीअखेरीस मुंबई अनलॉक होणार-महापौरांची घोषणा

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने मुंबई शहर महिनाअखेरीस अनलॉक केलं जाईल असं महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितलं.

"मुंबईकरासाठी चांगली बातमी. येत्या महिनाअखेरीस मुंबई अनलॉक केलं जाईल. आम्ही यासंदर्भात विचार केला, पण लोकांनी मास्क परिधान करणं आणि सोशल डिस्टन्सिंग पाळणं आवश्यक आहे". असं मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितलं.

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने राज्य सरकारने नागरिकांवरील निर्बंध शिथिल केले आहेत. 1 फेब्रुवारी पासून नवे नियम अमलात आले होते.

30 डिसेंबरपासून राज्यात निर्बंध कठोर करण्यात आले होते. 10 जानेवारीपासून दिवसा जमावबंदी तर रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली होती. मात्र आता कोरोनाचे आकडे आटोक्यात असल्याने नियम शिथिल करण्यात आले आहेत.

तर मुंबई महानगरपालिकेनेही मुंबईतील अनेक निर्बंध शिथिल केले आहेत. मुंबईत रात्रीची संचारबंदी हटवण्यात आली आहे.

राज्य सरकारच्या परिपत्रकानुसार, मुंबई, पुणे, भंडारा, सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरी, सातारा, सांगली, गोंदिया, कोल्हापूर आणि चंद्रपूर या 11 जिल्ह्यांचा 'अ' वर्गात समावेश करण्यात आला आहे.

18 वर्षांवरील 90 टक्के नागरिकांनी लशीचा पहिला डोस आणि 70 टक्के नागरिकांनी लसीचे दोन्ही डोस घेतले असतील अशा जिल्ह्यांचा 'अ' वर्गात समावेश करण्यात आला आहे.

काही दिवसांपूर्वी नियमांमध्ये याप्रकारे बदल करण्यात आला होता-

1. अंत्यसंस्कारांना उपस्थित राहण्याची मुभा

अंत्यसंस्कारासाठी 20 व्यक्तींची मर्यादा हटविण्यात आली असून, आता कितीही लोकांना उपस्थित राहता येईल.

2.थिएटर, नाट्यगृहं, थीम पार्कमध्ये उपस्थितीत सूट

करमणूक पार्क, थिमपार्क, जलतरण तलाव, वॉटर पार्क 50 टक्के क्षमतेने, उपाहारगृह, नाटय़गृह, चित्रपटगृहे स्थानिक प्राधिकरणाने निर्धारित केलेल्या वेळेत 50 टक्के क्षमतेने, मनोरंजनात्मक कार्यक्रम 50 टक्के क्षमतेने, खुल्या मैदानात किंवा सभागृहात क्षमतेच्या 25 टक्के किंवा 200 लोकांना प्रवेश देण्यास परवानगी देण्यात आली आहे. विशिष्ट भागातील कोरोनाची आकडेवारी लक्षात घेऊन स्थानिक प्रशासन हॉटेल, रेस्टॉरंट आणि नाट्यगृहांची वेळ ठरवणार आहे.

3. राष्ट्रीय उद्यानं, सफारी सुरू होणार

राज्यातील राष्ट्रीय उद्यानं, सफारी नियमित वेळेनुसार सुरू होणार आहे. ज्या पर्यटनस्थळांवर तिकीट आहे तीदेखील सुरू होणार आहेत. लशीचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांना तिथे प्रवेश असेल.

4.लग्नासाठी 200 जणांना उपस्थित राहता येणार

लग्न समारंभासाठी देखील २०० जणांना निमंत्रण देता येणार आहे. याआधी लग्नसोहळ्याला 50 जणांच्या उपस्थितीची परवानगी होती.

5.स्पा सेंटर, ब्युटी पार्लर, सलून 50 टक्के क्षमतेत सुरू होणार

वेलनेस इंडस्ट्रीचा भाग असलेले स्पा सेंटर्स नव्या नियमांनुसार 50 टक्के क्षमतेने सुरू राहतील.

मुंबईतही निर्बंध शिथिल

मुंबई महानगरपालिकेने जारी केलेल्या परिपत्रकानुसार, मुंबईतील रात्रीची संचारबंदी हटवण्यात आली आहे. तसंच चित्रपटगृह, नाट्यगृह 50 टक्के क्षमतेने सुरू ठेवण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. 1 फेब्रुवारीपासून या नवीन नियमांची अंमलबजावणी होणार आहे.

1. मुंबईतील समुद्र किनारे, उद्यान नियमित वेळेनुसार सुरू करण्यात येणार आहेत.

2. थीम पार्क, स्वीमिंग पूल, वॉटर पार्क 50 टक्के क्षमतेने सुरू ठेवता येणार.

3. सांस्कृतिक कार्यक्रमात आसन क्षमतेच्या 50 टक्के उपस्थितीला परवनागी असणार आहे.

4. लग्न समारंभात मोकळ्या मैदानात 25 टक्के आणि हॉलमध्ये 200 जणांना उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली आहे.

पुण्यातही निर्बंध शिथिल

  • पालिका हद्दीतील राष्ट्रीय उद्याने तसेच पर्यटनस्थळे त्यांच्या नियोजित वेळेत सुरू राहतील.
  • स्पा, सलून, ब्युटी पार्लर 50 टक्के क्षमतेने सुरू राहातील
  • अंत्यविधी, अंत्यसंस्कारासाठी उपस्थित नागरिकांच्या संख्येस कोणतेही निर्बंध नसतील.
  • पालिका हद्दीतील उद्याने सकाळी 6 ते 9 आणि संध्याकाळी 5 ते 8 या वेळेत सुरू राहातील
  • स्विमिंग टॅंक 50 टक्के क्षमतेने सुरू राहातील
  • रेस्टॉरंट, हॉटेल, सिनेमागृह, नाट्यगृह आसन क्षमतेच्या 50 टक्के क्षमतेने सुरू राहतील
  • सामाजिक, धार्मिक कार्यक्रम 50 क्षमतेने सुरू राहतील
  • लग्न समारंभ खुल्या जागेत असेल तर त्या ठिकाणच्या 25 टक्के क्षमतेने तर बंदिस्त जागेत असेल तर 200 लोकांच्या उपस्थितीत करता येईल
  • पालिका हद्दीतील आठवडे बाजार सर्व दिवस सुरू राहील

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)