'काम करणं' महत्त्वाचं की 'साहेबांसमोर हजर' राहाणं?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, ब्रायन लुफ्किन
- Role, बीबीसी प्रतिनिधी
उत्पादकता टिकवून ठेवण्यासाठी आपण तासन्-तास ऑफिसात बसून राहाण्याची गरज नाही, हे सध्याच्या कोरोना साथीच्या काळात आपल्या लक्षात आलेलं आहे. मग तरीही प्रत्यक्ष उपस्थितीला इतकं महत्त्व का दिलं जातं?
लोक आठवड्याचे किमान 40 तास (किंवा अनेकदा बॉसवर छाप पडण्यासाठी याहून अधिक वेळसुद्धा) प्रत्यक्ष ऑफिसात घालवत होते, असा काळ आता कल्पनेतही येत नाही.
पण कोरोनाची जागतिक साथ उद्भवण्यापूर्वीच्या काळात हे उपस्थितीकेंद्री वातावरण (इंग्रजीत presenteeism- म्हणजे तुम्ही काही उत्पादक काम करत नसाल तरी कामात गढून गेल्यासारखं दाखवण्यासाठी आपल्या जागेवर बसून राहणं) ही कार्यालयीन जीवनातील एक वस्तुस्थिती होती.
साथीपूर्वीच्या काळात, युनायटेड किंगडममध्ये करण्यात आलेल्या एका सर्वेक्षणानुसार, आपल्या कामाच्या ठिकाणी असं उपस्थितीकेंद्री वातावरण असतं, असं 80 टक्के नोकरदारांनी म्हटलं. यातील 25 टक्के जणांनी असंही सांगितलं की, आधीच्या वर्षापेक्षा सर्वेक्षण केलं गेलं त्या वर्षी ही परिस्थिती आणखी खालावलेली होती.

फोटो स्रोत, Getty Images
पण आता दूरस्थ पद्धतीने काम करावं लागत असल्यामुळे स्वतःच्या या उपस्थितीकेंद्री प्रवृत्तीचं पूनर्मूल्यांकन करण्याची संधी वरिष्ठांना आणि त्यांच्या हाताखाली काम करणाऱ्यांनाही मिळाली आहे.
उपस्थितीकेंद्री वातावरण समस्या वाढवणारंच ठरतं, हे आपल्याला आधीपासून माहीत आहे.
आजारी लोक खटपट करून ऑफिसमध्ये येतात आणि इतरांकडे आजार पसरवतात, त्यातून राष्ट्रीय अर्थव्यवस्थेला अब्जावधी डॉलरांचा तोटा सहन करावा लागू शकतो; तासन्-तास ऑफिसात बसून राहणाऱ्या लोकांमुळे इतरांवरही तसंच वागायचा दबाव येऊ शकतो, त्यामुळे अतिकामाच्या दिशेने जाणारं विखारी वातावरण निर्माण होण्याची शक्यता असते.
आपल्या टेबलापाशी किंवा कॉम्प्युटरपाशी खिळून राहणं महत्त्वाचं नाही, तर उत्पादकता महत्त्वाची आहे, याची आपल्याला जाणीव असते. आणि यासंबंधीची चर्चा कित्येक वर्षं सुरू आहे.
कामाच्या नवीन परिस्थितीमध्ये ही उपस्थितीकेंद्री प्रवृत्ती सोडून देण्याची सुवर्णसंधी आपल्याला मिळाली आहे, पण तरीसुद्धा ही प्रथा तितकीच जिवंत आहे.
आता या उपस्थितीकेंद्री वृत्तीची डिजिटल आवृत्ती पाहायला मिळते: आधीपेक्षा कितीतरी जास्त वेळ लोक काम करत आहेत, दिवसाच्या कोणत्याही वेळी ई-मेल व मेसेजना उत्तरं देत आहेत. आपण कामात किती 'गुंतलो आहोत' हे दाखवण्यासाठी असं वागलं जातं.

फोटो स्रोत, Getty Images
एवढं सगळं असतानाही उपस्थितीकेंद्री प्रवृत्तीवर भर का दिला जातो? कर्मचारी काम करत असताना वरिष्ठ अधिकारी त्यांच्यावर नजर ठेवून असतात, एवढंच यामागचं कारण नाही.
किंबहुना, अबोध पातळीवरच्या काही पूर्वग्रहांमुळे ही पद्धत सुरू राहिली आहे. या पद्धतीचे तोटे कबूल केले जात नाहीत आणि अशा पद्धतीला परावृत्त करणारी कामाची ठिकाणी निर्माण होत नाहीत, तोपर्यंत आपण उपस्थितीकेंद्री प्रवृत्तीचे गुलाम होऊन राहू.
व्यवस्थापकीय मंडळी अजूनही उपस्थितीकेंद्री प्रवृत्तीला का धरून असतात?
'लवकर येण्यासाठी आणि उशिरा जाण्यासाठी खूप वेळ हाताशी असलेल्यां"नाच ही उपस्थितीकेंद्री पद्धत सोयीची असते, असं ब्रँडी एव्हन सांगतात.
त्या कार्नेजी मेलॉन विद्यापीठाच्या टेपर स्कूल ऑफ बिझनेसमध्ये संघटनात्मक सिद्धान्त, व्यूहरचना व उद्योजकता या विषयांच्या सहायक प्राध्यापक आहेत. उपस्थितीकेंद्री पद्धतीमुळे काही कर्मचाऱ्यांपेक्षा अन्याय्यरित्या दुसऱ्या कर्मचाऱ्यांना जास्त पसंती दिली जाण्याची शक्यता असते.
उदाहरणार्थ, पालक असणाऱ्या कर्मचाऱ्यांना ऑफिसातून लवकर बाहेर पडणं अनिवार्य असतं.
काही वेळा तर स्वतःचा चेहरा जास्त वेळ न दाखवणाऱ्या लोकांना दंड होतो, अशा आणखी वाईट शक्यताही या पद्धतीमध्ये असतात. उदाहरणार्थ, आता हे पचायला जड जात असलं तरी, सर्वसाधारणतः दूरसंदेशनाद्वारे काम करणाऱ्यांवर बेजबाबदारपणाचा ठपका ठेवला जातो, आणि अशा कर्मचाऱ्यांना मागे ठेवलं जातं. उदाहरणार्थ, 2019 सालच्या एका अभ्यासानुसार, दूरस्थ कामाची पद्धत न रुजलेल्या कंपन्यांमध्ये दूरसंदेशनाद्वारे कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पगारात संथ गतीने वाढ झाल्याचं दिसून आलं.
अशा गोष्टींमुळे कर्मचारी बिचकू शकतात. प्रत्यक्ष ऑफिसात कमी वेळा उपस्थित राहिलं तर आपल्या यशाला मर्यादा पडतील, अशी भीती कर्मचाऱ्यांना वाटू शकते. जागतिक साथीच्या काळात दूरस्थ पद्धतीने काम करणं अधिक सहजपणे रूढ झालं असलं, तरी उपस्थितीकेंद्री प्रवृत्ती कमी झालेली नाही.
एडीपी या मानव संसाधनविषयक सॉफ्टवेअर कंपनीतील अभ्यासकांनी केलेल्या सर्वेक्षणानुसार, 2020 साली कोरोना साथीच्या काळातही कोणत्या तरी वेळी ऑफिसात प्रत्यक्ष जाऊन येणं 54टक्के ब्रिटिश कर्मचाऱ्यांना बंधनकारक वाटलं होतं. विशेषतः कारकीर्दीची सुरुवात होत असणाऱ्या किंवा मधल्या टप्प्यावर असणाऱ्या कर्मचाऱ्यांना ही भावना जास्त वेळा जाणवली.
अमेरिकेतील नॉर्थवेस्टर्न विद्यापीठाच्या केलॉग स्कूल ऑफ बिझनेसमध्ये व्यवस्थापन व संघटना या विषयाच्या प्राध्यापक लेह थॉम्पसन यांच्या मते, उपस्थितीकेंद्री प्रवृत्तीला दोन महत्त्वाचे मानसिक घटक खतपाणी घालतात.
पहिला घटक आहे- 'केवळ समोरासमोर असण्याचा परिणाम' (mere-exposure effect). एखादी व्यक्ती कोणा माणसासमोर किंवा कोणत्यातरी गोष्टीसमोर जास्त वेळ राहिली, तर त्यांना एकमेकांबद्दल अधिक जवळीक वाटू लागते. "समजा मी एखाद्या व्यक्तीला इतर माणसांपेक्षा 10 पट जास्त वेळा भेटत असेन, तर स्वाभाविकपणे मला त्या व्यक्तीबद्दल जास्त जवळीक वाटते," असं थॉम्पसन म्हणतात. एखादा विशिष्ट कर्मचारी स्वतःला अधिक दृश्यमान ठेवत असेल, तर निव्वळ समोर उपस्थित राहण्यातून तो कर्मचारी इतरांच्या आवडीचा ठरू शकतो. इतरांच्या हे लक्षातही येणार नाही कदाचित, किंवा आपल्याला संबंधित उपस्थित असणाऱ्या माणसातील नक्की काय आवडतं हे लोकांना सांगताही येणार नाही. "महीत नाही, मला त्याचं हसणं आवडतं, मला त्यांचा स्वभाव आवडतो, त्याच्यात नेतृत्वाची क्षमता आहे, वगैरे काहीही उत्तरं यावर मिळू शकतात," असं थॉम्पसन म्हणतात. आणि कोणाच्या लक्षात येण्याच्याही आधी संबंधित उपस्थितीवाल्या कर्मचाऱ्याला पगारवाढ किंवा बढतीही मिळून जाईल.

फोटो स्रोत, Getty Images
या पूर्वग्रहाला कारणीभूत ठरणारा दुसरा घटक आहे- 'वलय-प्रभाव' (halo effect). एखाद्याची सकारात्मक छाप पडली की त्याचा संबंध त्या व्यक्तीच्या प्रत्यक्ष चारित्र्याशी जोडला जातो. "तुम्हाला कॉफी आणून देणारी किंवा तुमचा आठवड्याच्या सुट्टीचा वेळ कसा गेला असं विचारणारी व्यक्ती 'गोड माणूस' प्रकारात मोडणारी आहे, असं तुम्हाला वाटायला लागतं. आणि मग त्याचा पुढचा टप्पा म्हणून ती व्यक्ती उत्पादक कर्मचारी आहे असंही वाटायला लागतं," असं थॉम्पसन सांगतात.
"कोणी कॉफी आणून दिली म्हणून ती व्यक्ती कष्टाळू असेलच असं नाही. तिच्या कष्टाळू असण्याचा पुरावा आपल्याला मिळालेला नसतो, तरीही आपल्याला तसं वाटायला लागतं." अशा वेळी प्रत्यक्ष उपस्थितीवर भर देणाऱ्या कर्मचाऱ्यांना बढत्या मिळण्याची किंवा इतर लाभ मिळण्याची शक्यता असते.
केवळ दिसण्यापुरतं ऑफिसात यायची प्रवृत्ती
ऑफिसात स्वतःचा चेहरा दाखवत राहण्याचे काही संभाव्य लाभ असले, तरी असा चेहरा दाखवणारे कर्मचारी जास्त उत्पादक असतीलच असं काही नाही किंवा ते जास्त वेळ काम करत असतीलच असंही नाही.
आपले कर्मचारी प्रत्यक्षात काही वाढीव काम करत नसल्याचं व्यवस्थापकांना माहीत असेलच असं नाही, त्यामुळे कर्मचाऱ्यांना प्रत्यक्ष अथवा आता डिजीटल पातळीवर कामगिरी करून दाखवणं गरजेचंच वाटतं.
किंबहुना, कोरोनाच्या जागतिक साथीदरम्यान जगभरातील कामाची वेळ वाढली आहे. 2020 या वर्षामध्ये सरासरी दैनंदिन कामाची वेळ अर्ध्या तासाने वाढली.
इतर सर्व जण ऑनलाइन असतील, तर मीही ऑनलाइन असणं गरजेचं आहे, या भावनेतून हे घडतं. अनेक वरिष्ठ अधिकारी केवळ सर्वाधिक दृश्यमान असणाऱ्या लोकांकडे पाहतात, आणि हेच कर्मचारी सर्वाधिक उत्पादक आहेत, असं ते गृहित धरतात.
ही तुलनेने नवीन समस्या आहे. अर्थव्यवस्था अधिक उत्पादनकेंद्री होती, तेव्हा त्यातील मूर्त उपलब्धींचं मोजमाप करणं सोपं होतं- अमुकएक बरोबर जोडलं गेलंय, अमुकएक बरोबर जोडलं गेलेलं नाही, हे जोखता येतं. पण "आपण आता ज्ञानाधारित अर्थव्यवस्थेकडे वळलो आहोत, त्यामुळे उपलब्धी नक्की कशी मोजायची हे अधिक गुंतागुंतीचं होतं," असं स्कॉट सॉनेन्शेईन म्हणतात. ह्यूस्टन, टेक्सास इथल्या राइस विद्यापीठाच्या जोन्स ग्रॅज्युएट स्कूल ऑफ बिझनेसमध्ये ते संघटनात्मक वर्तन या विषयाचे प्राध्यापक आहेत. त्यामुळे ज्ञानाधारित अर्थव्यवस्थेमध्ये कर्मचारी त्यांच्या टेबलापाशी बसलेले आहेत म्हणजे काहीतरी उत्पादन करत आहेत, असं मानण्याकडे व्यवस्थापकांचा कल असतो.
व्यवस्थापकांना या दृश्यमानतेची किंमत वाटते, हे कर्मचाऱ्यांना माहीत असतं. त्यामुळे ते या उपस्थितीकेंद्री वृत्तीच्या जाळ्यात अडकतात.
विशेषतः आपल्या आसपासचे सर्व जण तेच करत असल्याचं पाहून कोणताही कर्मचाही हे करण्याला भरीस पडतो. आर्थिक अस्थिरतेच्या काळात हे जास्त खरं होताना दिसतं.
सध्या कोव्हिड-19मुळे कर्मचाऱ्यांना त्यांच्या नोकऱ्यांच्या स्थैर्याविषयी भीती वाटत असल्यामुळे, त्यांना आपण ताणाला सामोरं जाऊन उत्तम व विश्वासूरित्या काम करू शकतो, हे सिद्ध करायचं असतं.
पण याचा शेवटी विपरित परिणाम होतो. काहीतरी कामगिरी करून दाखवायच्या नादात कर्मचाऱ्यांच्या उत्पादनाची गुणवत्ता घटते. उदाहरणार्थ, युनायटेड किंगडममध्ये अशा उपस्थितीकेंद्री वृत्तीमुळे वर्षाकाठी प्रत्येक कर्मचाऱ्यामागे ३५ कामाचे दिवस वाया गेले. एका संशोधनानुसार, एका आठवड्यात ५० तासांहून अधिक काम केल्यावर उत्पादकता रोडावते.
उपस्थितीकेंद्री वृत्ती कशी बाजूला सारायची?
कामाच्या पद्धतींमध्ये आमूलाग्र बदल झालेल्या काळात उपस्थितीकेंद्री वृत्तीवर दिला जाणारा भर तत्काळ कमी करण्याची गरज आहे. अधिकाधिक कर्मचाऱ्यांना प्रत्यक्ष उपस्थित राहण्याइतका अवकाश सध्या उपलब्ध नसला, तरी अनेकांना अजूनही आभासी- डिजिटल अवकाशात आपली उपस्थिती सदासर्वकाळ दिसावी असं वाटत असतं.
कामाच्या ठिकाणी कोणत्या गोष्टींना मूल्यवान मानलं जातं आणि तसं का मानलं जातं, याचा वरपासून खालपर्यंत सर्व स्तरांवर पुनर्विचार करून मोठ्या प्रमाणात बदल केले, तर उपस्थितीकेंद्री वृत्ती बाजूला सारणं शक्य आहे.
याची सुरुवात म्हणून कर्मचाऱ्यांनी, विशेषतः नेतृत्वस्थानी असलेल्यांनी अधिक निरोगी वर्तनाचा दाखला घालून द्यायला हवा, असं सोनेन्शेईन म्हणतात.
दिवसाचं कम झालं की लोकांनी ऑफिसातून बाहेर पडावं, किंवा लॉग-ऑफ करावं. केवळ आपण काम करतोय असं दाखवण्यासाठी आसपास रेंगाळत राहणारे कर्मचारी इतरांवरही तसंच करण्याचा दबाव आणत असतात, त्यातून विखारी चक्र निर्माण होतं.
हे अर्थातच बोलणं सोपं आहे आणि प्रत्यक्षात आणणं अवघड आहे. उपस्थितीकेंद्री पद्धत का दिसून येते, याबद्दल व्यवस्थापकांनी जागरूकता दाखवली, तर या बदलाच्या प्रक्रियेला चालना मिळू शकते. त्यासाठी व्यवस्थापकांनी स्वतःच्या पूर्वग्रहांचा विचार करावा आणि 'केवळ समोरासमोर असण्याचा प्रभाव' आणि 'वलय-प्रभाव' यांचाही विचार करायला हवा.
'ऑफिसातून सर्वांत शेवटी कोण बाहेर पडलं' किंवा 'पहाटेसुद्धा ई-मेलला कोण उत्तर देतंय' अशा निकषांवर उत्पादकता मोजली जाणार नाही, याची खातरजमा करायला हवी.
"माझी टीम पुढच्या महिन्यात किंवा पुढच्या तिमाहीमध्ये अमुकएका गोष्टीवर काम करणार आहे, तर माझ्या प्राथमिक अपेक्षा काय आहेत आणि कोण या अपेक्षांपलीकडे जातंय, असा एक साधा प्रश्न वरिष्ठांनी स्वतःला विचारायला हवा, असं मला वाटतं," असं थॉम्पसन सुचवतात.
दुर्दैवाने कामाच्या नवीन पद्धती राबवाव्या लागणाऱ्या आजच्या जगातही उपस्थितीकेंद्री वृत्ती शाबूत आहे. "पण ती टिकून राहणार नाही. अखेरीस लोकांची क्षमता मंदावेल. गेली15महिने लोक याबाबतीत प्रचंड खटपट करत आहेत," असं सोनेन्शेईन म्हणतात. कोण सर्वाधिक काम करताना दिसतंय, यावर भर दिला जातो. कामाचा अवकाश प्रत्यक्ष ऑफिसातल्या टेबलांवरून घरोघरी व ऑनलाइन पातळीवर गेला, तरीसुद्धा ही वृत्ती कायम आहे, यावरून ती आपल्या जगण्यात किती रुजलेय, याचा अंदाज येतो.
"जागतिक साथ आल्यावर तरी यात बदल होईल, अशी आशा वाटत होती." पण आपल्या मनात रुजलेल्या पूर्वग्रहांचा कठोर पुनर्विचार केल्याशिवाय, हे परिवर्तन होणं अवघड आहे. "दुर्दैवाने. या गोष्टी खरोखरच बदलतील का, याविषयी मला खात्री वाटत नाही," असे सोनेन्शेईन शेवटी म्हणतात.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








