'मी निवडून नाही आलो तर माझी हत्या होईल,' असं का म्हणताहेत ब्राझीलेच अध्यक्ष बोल्सोनारो

फोटो स्रोत, AFP
आगामी राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत मला तुरुंगवास, मृत्यू अथवा पुन्हा विजय हे भविष्यातील तीन पर्याय समोर दिसत आहेत, असं ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष जेअर बोल्सानारो यांनी म्हटलं आहे.
उजव्या विचारसरणीचे नेते असलेले बोल्सानारो हे निवडणुकीत सध्या डाव्या विचारांचे नेते आणि माजी राष्ट्राध्यक्ष लुईझ इनासिओलुला दा सिल्व्हा यांच्याकडून पछाडले गेलेले आहेत.
"माझ्या भविष्यासाठीचे माझ्यासमोर तीन पर्याय आहेत : अटक होणं, हत्या किंवा पुन्हा एकदा विजय,'' असं त्यांनी नेत्यांशी बोलताना म्हटलं.
पण त्याचवेळी "जगात मला कोणीही घाबरवू शकत नाही," असं म्हणत माजी लष्करी अधिकारी असलेल्या बोल्सानारो यांनी तुरुंगात जाण्याची शक्यता नसल्याचंही म्हटलं.
2018 मध्ये निवडणूक प्रचारादरम्यान बोल्सानारो यांना चाकूनं भोसकून ठार करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. बोल्सानारो आणि ब्राझीलमधील न्याय व्यवस्था आणि निवडणूक यंत्रणा यांच्यात सध्या प्रचंड तणावाची स्थिती आहे. त्यामुळं या तणावातून त्यांनी अशाप्रकारचं वक्तव्य केलं आहे.
ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष असलेल्या 66 वर्षीय बोल्सानारो यांना पुढल्या वर्षी दुसऱ्यांदा विजय मिळवण्याची आशा आहे. मात्र सध्या सुरू असलेल्या ब्राझीलच्या निवडणुकीतील इलेक्ट्रॉनिक मतदान पद्धतीवर त्यांनी प्रश्नचिन्हं उपस्थित केलं आहे. तसंच राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीचा पुढच्या वर्षी येणारा निकाल स्वीकारणार नसल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

फोटो स्रोत, Reuters
ब्राझीलमधील निवडणूक न्यायालयाच्या प्रमुखांनी बुधवारीच मतदान प्रक्रियेत काहीही अडचण नसल्याचं स्पष्टपणे सांगितलं होतं. मात्र, शनिवारी ख्रिश्चन नेत्यांबरोबर झालेल्या बैठकीत बोल्सानारो यांनी केलेली टीका मागं घेणार नसून त्यावर ठाम असल्याचं म्हटलं.
"फूट निर्माण व्हावी किंवा परस्थिती बिघडावी अशी इच्छा नसलेले राष्ट्राध्यक्ष आपल्याला मिळाले आहेत. पण जीवनात प्रत्येक गोष्टीची मर्यादा असते. मी अशाप्रकारे जगू शकत नाही," असंही ते म्हणाले.
7 सप्टेंबरला होणाऱ्या देशव्यापी निदर्शनांमध्ये सहभागी होऊन त्यांना पाठिंबा दर्शवण्याची विनंती बोल्सानारो यांनी धार्मिक नेत्यांना केली आहे.
150 आदिवासी नागरिकांनी शुक्रवारी राष्ट्राध्यक्षांच्या निवासासमोर निदर्शनं केली. या आदिवासींच्या वडिलोपार्जित जमिनीबाबत देशाच्या सर्वोच्च न्यायालयात होणाऱ्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर ही निदर्शनं झाली.
बोल्सोनारो यांनी या आदिवासींचे हक्क मागं घेण्याच्या निर्णयाचं समर्थन केलं. कृषी क्षेत्राच्या विकासात ते अडथळा असल्याचंही ते म्हणाले.
ब्राझीलला कोरोना विषाणूनं चांगलाच वेढा घातला आहे. कोरोनामुळं ब्राझीलच्या जवळपास पाच लाख नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तसंच देश सध्या प्रचंड महागाई, भूक आणि बेरोजगारी अशा समस्यांचाही सामना करत आहे.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








