अफगाणिस्तान : 'ज्या शहरावर मी मनापासून प्रेम केलं ते आता धोकादायक बनलंय'

फोटो स्रोत, Getty Images
अफगाण पत्रकार बिलाल सरवरी यांनी 2001 साली तालिबानची राजवट कशी उलथवली ते पाहिलं. त्यांनी अनेक वर्षं बीबीसीसाठी काम केलंय. पण त्यांना आता वाटतंय की अमेरिकेने या भागात कायमस्वरूपी शांतता प्रस्थापित करण्याची संधी गमावली.
गेल्या दोन आठवड्यात त्यांच्या मातृभूमीत जे बदल घडले ते भयावह आहेत. असे बदल ज्यामुळे त्यांचंही आयुष्य धोक्यात आलं आहे.
2001 साली मी पाकिस्तानमधल्या पेशावरच्या पर्ल कॉन्टिनेंट हॉटेलमध्ये गालिचे विकणाऱ्या सेल्समनचं काम करायचो. तो दिवस काही वेगळा नव्हता.
पुढच्याच क्षणाला जे झालं ते मी कधी विसरू शकणार नाही. मी टीव्हीकडे नजर टाकली तर न्यूयॉर्कमधल्या वर्ल्ड ट्रेड सेंटरवर हल्ला होतानाचं थरारक दृश्य दिसत होतं. आधी एक विमान आदळलं, मग दुसरं विमान आदळतं आणि मग पॅटेगॉनवर आदळलं.
त्या दिवसांनंतर आमचं आयुष्य बदललं ते कायमचंच.
सगळ्या जगाचं लक्ष अफगाणिस्तानकडे लागलं. तिथे राज्य करणाऱ्या तालिबानने या हल्लातला मुख्य आरोपी ओसामा बिन लादेनाला आणि अल-कायदाला आश्रय दिल्याचा आरोप झाला.
दुसऱ्याच दिवशी माझ्या हॉटेलमधल्या लॉबीत शेकडो परदेशी माध्यमांचे प्रतिनिधी दिसायला लागले. इंग्लिश बोलता येईल अशा कोणत्याही व्यक्तीला सोबत घेऊन त्यांना अफगाणिस्तानची सीमा ओलांडायची होती. मी ही संधी स्वीकारली, पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आणि तेव्हापासून मी मागे वळून पाहिलं नाहीये.
मी लहानपणापासून अफगाणिस्तानात राहिलो नव्हतो. 1990 साली रशियाच्या सैन्याने अफगाणिस्तानातून माघार घेतल्यानंतर गृहयुद्ध सुरू झालं त्यानंतर माझ्या कुटुंबाने तिथून पलायन करून पाकिस्तानात आश्रय घेतला.
त्यामुळे मी जेव्हा अनेक वर्षांनंतर पहिल्यांदा काबूलमध्ये पाय ठेवला तेव्हा तिथल्या उद्धवस्त झालेल्या इमारतींचे ढिगारे पाहून मला धक्का बसला. तिथल्या जिवंतपणाचं लक्षण असलेली घाई-गडबड-गोंधळ तिथून नाहीशी झाली होती. लोक अतिशय गरीब होते आणि भयाचं सावट होतं.

फोटो स्रोत, Getty Images
मी सुरूवातीला अबुधाबी टीव्हीसोबत काम करत होतो. मी आणि इतर पाच पत्रकार तिथल्या इंटरकॉन्टिनेंटल हॉटेलमध्ये राहात होतो. अमेरिकेच्या हवाई हल्ल्यांचं मुख्य लक्ष काबूल होतं त्यामुळे मी रोज सकाळी उठायचो ते भीतीच्या दडपणाखालीच.
अल-कायदाचे सदस्य आणि तालिबान आमच्या हॉटेलमथ्ये ये-जा करायचे. आसपासच्या रस्त्यांवरही ते दिसायचे.
रात्रभर स्फोटांचे आवाज यायचे. मी विचार करायचो, पुढचा हल्ला आपल्या हॉटेलवर तर होणार नाही ना?
मग डिसेंबरमध्ये कधीतरी तालिबानचा काबूलमधून तालिबान नाहीसं झालं.
ही बातमी आल्याच्या तासाभरात लोक सलुनच्या बाहेर गर्दी करायला लागले. रांगा लागल्या. या लोकांना त्यांच्या दाढ्या कमी करायच्या होत्या. त्या दिवशी सकाळी अफगाणिस्तानचा पुनर्जन्म झाला होता.

फोटो स्रोत, Getty Images
त्या क्षणानंतर मी एक दुभाषा म्हणून नाही तर एक पत्रकार म्हणून सर्वसामान्य अफगाण माणसाचं आयुष्य जवळून पाहायला लागलो. अफगाणिस्तानात हळूहळू सामान्य परिस्थिती होत होती, मी वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन तिथे घडणाऱ्या घटना माझ्या डोळ्याने पाहात होतो.
पूर्वेतल्या टोराबोरापासून ते पाक्तियामधल्या शाई कोटपर्यंत तालिबानचा पाडाव होताना मी पाहात होतो.
तालिबानासाठी लढणारे ग्रामीण भागातल्या डोंगरांमध्ये जाऊन लपले तर त्यांचे नेते पाकिस्तानात गेले. आता मागे वळून बघताना वाटतं की ही वाया घालवलेली संधी होती. एक अशी संधी ज्यात अमेरिकेला तालिबानशी चर्चा करून शांतता करार करणं शक्य होतं.
मी अनेक तालिबानी सदस्यांमध्ये आणि नेत्यांमध्यही शस्त्र खाली टाकून शांतता करार करून आपल्या सामान्य आयुष्याकडे परतण्याची इच्छा पाहिली.

फोटो स्रोत, Bilal sarwary
पण अमेरिकनांना ते नको होतं. माझ्या बातम्यांमधून मला आणि इतर अनेक अफगाण लोकांना प्रकर्षाने जाणवलं की त्यांचा हेतू 9/11 च्या हल्ल्याचा सूड घेणं हा होता.
येत्या काही वर्षांत चुकांवर चुका होत राहिल्या.
गरीब आणि निरपराध अफगाण लोकांवर बॉम्बहल्ले झाले, त्यांना बंधक बनवलं गेलं. अफगाण सरकारने परकीय लोकांना आपल्या भूमीवर युद्धाचे निर्णय घेऊ दिल्यामुळे सर्वसामान्य लोक आणि सरकार यांच्या दरी निर्माण झाली होती.
मला एक घटना स्पष्ट आठवते. अमेरिकन लोकांनी एका टॅक्सी ड्रायव्हरला काबूल आणि गार्देजमधल्या हायवेवर विनाकारण अटक केली होती.
त्याचं नाव सईद अबासीन होतं. त्याचे वडील रोशन अरिआना एअरलाईन्सचे वयाने जेष्ठ आणि अतिशय प्रसिद्ध कर्मचारी होते. जेव्हा आम्ही त्यांची चूक उघडकीला आणली तेव्हा अबासिन यांना सोडून देण्यात आलं पण अनेक जणांच्या ना इतक्या उच्चपदस्थ लोकांशी ओळखी होत्या ना ते इतके सुदैवी ठरले.
अमेरिकांनी कठोर धोरण स्वीकारलं होतं, त्यामुळे निरपराध अफगाण लोकांचे जीव जात होते. त्यांना अमेरिकन लोकांचे जीव वाचवायचे होते, त्यामुळे त्यांनी बॉम्बहल्ले आणि ड्रोन्सला प्राथमिकता दिली. हे ड्रोन्स जमिनीवरच्या गटांवर हल्ले करायचे.
त्यामुळे अमेरिकन लोकांविषयीचा अफगाणांच्या मनातला विश्वास हरवत चालला होता आणि शांतता चर्चा होतील अशी कुठलीही चिन्हं दिसत नव्हती.

फोटो स्रोत, Getty Images
अफगाणिस्तानात काय होऊ शकेल याची झलक अधून मधून दिसायची. मी आता हजारो किलीमीटर गाडी चालवत जाऊ शकत होतो, मला मृत्यूचं भय नव्हतं.
मी संपूर्ण देशात गाडीने प्रवास केलाय. काबूलपासून खोस्त आणि पाक्तिका भागातल्या दुर्गम खेड्यात गेलो. रात्री उशिरा किंवा पहाटे लवकर अफगाणिस्तानातून प्रवास करणं आता शक्य होतं.
2003 ला सगळं बदललं.
कट्टरवाद्यांनी नव्याने कमावलेल्या क्षमतेने पुन्हा हल्ला केला. तो दिवस मला लख्ख आठवतो. एक भलामोठा ट्रकने भरलेला बॉम्ब काबूल शहराच्या मधोमध घुसला. त्याच्या स्फोटाने अख्खं शहर हादरलं.
तिथे पोहचणाऱ्या काही पहिल्या पत्रकारांपैकी मी एक होतो. त्या दिवशी मी जे पाहिलं त्या धक्क्यातून मी अजूनही सावरलेलो नाहीये. भविष्यात ज्या घटना न्यू नॉर्मल होणार होत्या त्यातली ही पहिली घटना होती. स्फोटात झालेले मानवी शरीरांचे तुकडे, आणि रक्तपात.
परिस्थिती चिघळत गेली. निशस्त्र नागरिक, अफगाण आणि परदेशी सैन्यावर सतत होणाऱ्या ट्रक बॉम्ब आणि आत्मघाती हल्ल्यांनी या संघर्षातलं रक्तरंजित प्रकरण लिहिलं जात होतं. अमेरिकनांनी त्यांच्या हल्ल्यांची तीव्रता वाढवली.

फोटो स्रोत, Getty Images
तालिबानचा जिथे जिथे संबंध असेल तिथे तिथे असे हल्ले व्हायला लागले. मग यात लग्नसमारंभ आणि अंत्यसंस्कारही आले.
सर्वसामान्य माणूस आकाशाकडे भयाने पाहायला लागला. सूर्योदय, सूर्यास्त किंवा ताऱ्यांकडे पाहात प्रेरणा घेण्याचे दिवस संपले होते.
एकदा मी कंदहारजवळच्या अर्घंदाब नदी खोऱ्यातल्या एका खेड्यात गेलो होतो. इथल्या हिरव्यागार जमिनीच्या कुशीतली डाळिंबं फार प्रसिद्ध होती.
ती पाहायची माझी फारच इच्छा होती, पण इथे आल्यावर आरक्त डाळिंबं दिसायच्याऐवजी इथल्या रहिवाशांचं रक्त दिसलं. रक्ताचे पाट वाहात होते.
अफगाणिस्तानातल्या खेड्यापाड्यात काय घडत होतं याचा हा एक नमुना होता.
तालिबानकडून लढणारे खोऱ्यांमध्ये शिरले होते. सरकारी फौजा त्यांना परतवून लावण्यासाठी शक्य ते करत होत्या. या भागात दोन्हीकडून वार-पलटवार होत होते पण यात अडकले होते सर्वसामान्य अफगाण नागरिक.
त्या दिवशी मी 33 हवाई हल्ले मोजले. या हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून तालिबानकडून किती आत्मघाती हल्ले झाले किंवा कार बॉम्बचे स्फोट झाले याची गणनाच नाही.
घरदारं, शेती-बागायती, पूल सगळं उद्धवस्त होत होतं.
अमेरिकेने केलेले अनेक हवाई हल्ले खोट्या माहितीवर आधारित होते. वैयक्तिक रागातून अशी माहिती दिलेली असायची. गावातल्या गावात कोणाला तरी कोणाची तरी खुन्नस काढायची असायची, जमिनीचा वाद असायचा त्यातून अशी माहिती दिली जायची.

फोटो स्रोत, Getty Images
अफगाण सैन्य आणि सर्वसामान्य अफगाण माणूस यांच्या अविश्वासाची भिंत उभी राहिली होती. त्यामुळे अमेरिकन सैन्याला काय खरं काय खोटं हेच कळत नव्हतं. अशा हल्लांचा फायदा घेत तालिबानने सर्वसामान्य अफगाणी माणसाला स्वतःच्याच सरकारविरूद्ध भडकवलं आणि आपले सदस्य वाढवले.
2001 ते 2010 या काळात अफगाणिस्तानची 9/11 पिढी - ती पिढी ज्यांना भारत, मलेशिया, अमेरिका आणि युरोपमध्ये शिक्षण पूर्ण करण्याची संधी मिळाली - ते आपल्या देशाच्या उभारणीसाठी परत येत होते. त्यांना आशा होती की त्यांच्या प्रयत्नांनी देशाला नव्याने वैभव प्राप्त होईल.
पण त्यांच्यासमोर नवी आव्हानं उभी राहिली. त्यांना दिसलं गुंडांच्या हातात ताकद आलीये. अमेरिकेने त्यांनाच भरती करून घेतलंय. सगळीकडे भ्रष्टाचार बोकाळलाय. कोणालाच कसलाच धरबंद नव्हता.
आमच्या देशात जे दिसतं तसं असेलच याची शक्यता नाही.
नयनरम्य खोरी, झळाळती शिखरं, खळाळत्या नद्या, आणि लहान लहान टुमदार खेडी यामुळे कोणालाही हा देश मोहक वाटेल. पण प्रत्यक्षात या सौंदर्याचा सर्वसामान्य अफगाण माणसाला काय फायदा जर त्याच्या देशात शांतताच नांदत नसेल? तुम्हाला सुरक्षितच वाटत नसेल, तर शांत कसं वाटेल?

फोटो स्रोत, us army
चार वर्षांपूर्वी मी वार्डक प्रांतातल्या एका लहानशा खेड्यात लग्नासाठी गेलो होतो. रात्र झालं तसं लोक जमा झाले. चांदण्या रात्री पंक्ती बसल्या. आकाश स्वच्छ होतं. पण अचानक ड्रोन आणि विमानांचे आवाज घोंघावायला लागले. जवळच्या कुठल्यातरी भागात मोहीम राबवली जात होती. सगळ्या वऱ्हाडात मरणप्राय शांतता पसरली.
त्या रात्री मी एका तालिबानकडून लढणाऱ्या मुलाच्या वडिलांसोबत जेवायला बसलो होतो. त्यांनी मला त्यांच्या मुलाच्या मृत्यूची दुःखद कथा सांगितली. त्यांचा मुलगा फक्त 25 वर्षांचा होता आणि हेलमंदमध्ये मारला गेला होता. त्याच्या मागे त्याची विधवा बायको आणि दोन लहान मुलं होती.
त्याच्या वडिलांच्या दुःखातही अभिमान होता. ते एका साधे शेतकरी होते पण आपला मुलगा लढवय्या होता आणि एका वेगळ्या आयुष्याचं स्वप्न पाहात असताना मारला गेला याचा त्यांना अभिमान होता. पण मला त्यांच्या चेहऱ्यावर वेदना आणि दुःखच दिसलं.
तालिबानच्या राज्यात संगीताला परवानगी नव्हती. लग्नातही नाही. गावातल्या सगळ्या समारंभांमध्ये संगीताऐवजी दुःखद कथा ऐकवल्या जायच्या.
तालिबानकडून लढणाऱ्या लोकांच्या घराच्यांचं काय झालं याकडे कुणाचंच लक्ष नसतं. विधवा बायका, अनाथ मुलं, मुलांना गमावलेल वृद्ध आईबाप आणि विकलांग झालेले तरूण
मी त्या पित्याला विचारलं, तुम्हाला काय हवंय? त्यांचे डोळे भरून आले आणि ते म्हणाले, "मला हा संघर्ष संपलेला हवाय. बस झालं आता. मुलगा गमावण्याचं दुःख काय असतं ते मला माहितेय. अफगाणिस्तानात शांतता प्रस्थापित व्हायला हवी. हे युद्ध थांबायला हवं."
माझं काबूलमधलं ऑफिस तिथून फक्त काही किलोमीटरवर होतं, एका मोठ्या सैनिकी इस्पितळात.
माझा प्रांत कुनारमधले अनेक मित्र, कुटुंबातले काही सदस्य किंवा परिचित मला त्यांच्यासोबत मृतांची ओळख पटवायला हॉस्पिटलमध्ये सोबत घेऊन जायचे. मृत व्यक्ती अफगाण सैन्यात असलेले त्यांच्या नातेवाईक असायच्या. कधी कधी मला वाटायचं की माझा प्रांत या शवपेट्यांच्या ओझ्याखाली चिरडला जातोय.
जेव्हा अमेरिकने दोह्यात तालिबानशी चर्चा करण्याची तयारी दाखवली तेव्ही सुरुवातीला आम्हाला प्रचंड आनंद झाला. देश कधीपासून या शांतता कराराची वाट पाहात होता. लाखो अफगाण लोकांसारखीच मीही कधी माझ्या देशात शांतता नांदताना पाहिली नव्हती.
पण अल्पावधीच आमच्या स्वप्नांचा चक्काचूर झाला. तालिबान आणि अमेरिका या दोघांमध्ये झालेल्या चर्चा फक्त आपापल्या फायद्यावर लक्ष केंद्रित करणाऱ्या होत्या. सामान्य अफगाण माणसांसाठी त्या निरर्थक होत्या.
अमेरिकेने 6000 तालिबानचे सैनिक आणि त्यांचे नेते तुरुंगातून मुक्त केले. हे कृत्य म्हणजे शांतता कराराच्या दिशेने उचललेलं मोठं पाऊल आहे असा गाजावाजा करण्यात आला पण शांतता आलीच नाही.
यानंतर सुरू झालं मोठमोठ्या लोकांच्या हत्यांचं सत्र. आमच्या देशातल्या माध्यमं, कायदा आणि न्यायव्यवस्थेतल्या काही कर्तुत्ववान लोकांचे खून झाले. देशभरात अशा घटना घडत होत्या.
जेव्हा अमेरिका आणि तालिबान यांच्यात बोलणी होत होती, मला आठवत एक स्थानिक पोलीस प्रमुख भर सभेत उठून उभे राहिले आणि त्यांनी अमेरिकेवर आरोप केले की अमेरिकेने अफगाण लोकांना शत्रुशी चर्चा करून वाऱ्यावर सोडलंय.
"त्यांनी आपल्या पाठीत खंजीर खुपसलाय," ते त्वेषाने बोलत होते. अनेक अफगाण नागरिकांसारखंच त्यांच्याही वाटेला अमेरिकेकडून दुःखच आलं होतं.
माझा एक माजी शाळासोबती तालिबानचा सदस्य आहे आणि आम्ही सारख्याच वयाचे आहोत. आम्ही वेगवेगळ्या विचारधारांचे असलो तरी गेल्या 20 वर्षांत अनेकदा एकमेकांशी संवाद साधला. नुकताच तो मला एका लग्नात भेटला. मला जाणवलं की तो अजूनच कट्टर झालाय.
मी बघितलं की या संघर्षाने अफगाण लोकांमध्ये कशी उभी फूट पडलीये. आम्ही एकमेकांच्या डोळ्यात डोळे घालून बघू शकलो नाही, संवाद तर लांबची गोष्ट.
पेशावरच्या गल्ल्यांमध्ये माझ्यासोबत क्रिकेट खेळणारा आणि संत्र्याच्या फोडी तोंडात कोंबणारा माझा तो शाळासोबती हरवला होता.
इतक्या वर्षांनी आम्ही एकमेकांच्या विरोधात उभे राहू हे मला कसं कळणार होतं?
त्याची कहाणीही दुःखदच आहे.
त्याचा भाऊ, वडील आणि काका एका हवाई हल्ल्यात मारले गेले. हा हल्ला खोट्या माहितीवर आधारित होता. कुणीतरी परस्पर वैमनस्यातून कोणीतरी अमेरिकन सैन्याला खोटी माहिती दिली आणि हा हल्ला झाला.
आज आम्ही वेगवेगळे झालो असलो तर भविष्यात एखादा मध्यममार्ग निघावा अशी आशा मी सोडली नाही, ती मला सोडवत नाही.
पण ती शक्यता आता धुसर वाटते. मी वेगवेगळ्या प्रांताच्या राजधान्या तालिबानच्या ताब्यात जात होत्या ते कव्हर करत होतो. मोठालं सैन्य त्यांच्यापुढे शरणागती पत्कारत होतं. कोणी त्यांच्याशी लढत नव्हतं. हे सगळं डोळ्यांनी पाहिलं तरी मला वाटलं नाही की ते काबूलमध्ये शिरतील किंवा काबूल पडेल.
काबूल पडण्याच्या आदल्या दिवशी मी काही अधिकाऱ्यांशी बोललो. त्यांनी सांगितलं की अमेरिकेच्या हवाई हल्ल्यांच्या मदतीने ते तालिबान्यांना अटकाव करू शकतात. शांततामय सत्तांतराची बोलणी होणार असंही कानावर आलं. सर्वसमावेश सरकार स्थापन होणार असंही म्हटलं गेलं पण तेव्हाच (माजी) राष्ट्राध्यक्षांनी देश सोडला. तालिबान शहरात घुसलं होतं.
सगळीकडे भयाचं वातावरण होतं. त्यांना परत आलेलं पाहून लोक प्रचंड घाबरलेले होते.
मग मला सांगितलं गेलं की माझाही जीव धोक्यात आहे.
मी कपड्यांचे दोन जोड बांधले आणि बायको, तान्ही मुलगी आणि आईवडिलांना घेऊन निघालो. आम्हाला एका अज्ञात स्थळी नेण्यात आलं.
हे माझं शहर होतं, इथला इंच न इंच मला माहिती होता. मी या शहराचा होतो आणि हे शहर माझं पण आता मला या शहरात जागा नव्हती.
माझ्या मनात माझ्या मुलीचा विचार आला. तिचं नाव सोला आहे. सोला म्हणजे - शांतता. तिच्यासाठी ज्या भविष्याचं स्वप्न आम्ही पाहिलं होतं ते भविष्य आता अंधकारमय होतं.
मी विमानतळाच्या दिशेने निघालो तेव्हा मला लक्षात आलं, मी दुसऱ्यांदा माझ्या अफगाणिस्तानला मागे सोडून चाललोय. माझ्या मनात आठवणींचा कल्लोळ दाटला. मी पत्रकार म्हणून केलेलं काम, माझे दौरे, माझं इथलं आयुष्य.
विमानतळावर लोकांच्या रांगा होत्या. इतकी सगळी माणसं, इतकी सगळी कुटुंब... एक अख्खी पिढी आपल्या स्वप्नांना आणि आकांक्षांना दफन करून निघाली होती.
पण यावेळी मी तिथे बातमी कव्हर करायला नव्हतो. मीच ती बातमी होतो.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








