Health : तुमचा थकवा लोहयुक्त आहारामुळे कमी होऊ शकतो का?

आहार थकवा

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, थकवा
    • Author, फिओना हंटर
    • Role, आहारतज्ज्ञ

दर पाचपैकी एका व्यक्तीला दिवसातल्या कोणत्याही वेळी थकवा जाणवतो. हा थकवा नेहमीपेक्षा वेगळा असतो. दर दहापैकी एका व्यक्तीला दीर्घकाळ थकवा जाणवत राहातो. ही दोन्ही निरीक्षणं रॉयल कॉलेज ऑफ सायकायट्रिस्टने नोंदवलेली आहेत. हा थकवा का जाणवतो याचं कोणतंही कारण प्रथमदर्शनी दिसत नाही.

आपल्याला जाणवणाऱ्या थकव्याविषयी आपल्याला फार कमी गोष्टी माहिती आहेत. आता काही नवी संशोधनं थकवा आणि आहार यांचा संबंध उलगडून दाखवत आहेत.

लोहाच्या कमरतेने शरीरावर काय परिणाम होतो?

लोहाची कमतरता असणं ही अगदीच सामान्य बाब आहे. जगातल्या 30 टक्क्यांहून अधिक लोकांमध्ये लोहाची कमतरता असते असं जागतिक आरोग्य संघटनेचं म्हणणं आहे.

भारतात महिलांमध्ये ही लोहाची कमतरता प्रामुख्याने जाणवते आणि भारतातल्या बहुतांश स्त्रिया अॅनिमिक असतात.

अॅनिमिक नसताना आहारातलं लोहाचं प्रमाण वाढवलं तर फायदे होतात का?

अॅनिमिया म्हणजे शरीरातली लाल रक्तपेशींची कमतरता. या रक्तपेशी कमी असल्यास रक्तातून शरीरातल्या स्नायूंना पुरेसा ऑक्सिजन वाहून नेला जाऊ शकत नाही. परिणामी थकवा येतो.

तज्ज्ञांना वाटतं की आहारातलं लोहाचं प्रमाण वाढवलं तर तुम्हाला तरतरी येते, थकवा पळून जातो आणि तुम्हाला अधिक ऊर्जा मिळते. तुमचं हिमोग्लोबिन योग्य पातळीवर असलं आणि तुम्ही आहारातलं लोहाचं प्रमाण वाढवलं तर याचा फायदा होतो.

ज्यांना अॅनिमिया नाही अशांच्या शरीरातही लोहाची कमतरता असू शकते. तज्ज्ञांच्या मते अॅनिमिया असणाऱ्या लोकांच्या तुलनेत ज्यांना अॅनिमिया नाही पण ज्यांच्या शरीरात लोहाची कमतरता आहे अशांचं प्रमाण तिप्पट आहे.

ब्रिटिश मेडिकल जर्नल आणि नॅशनल हेल्थ सर्व्हेच्या मते जननक्षम वयात असणाऱ्या महिलांना जाणवणाऱ्या थकव्याचं लक्षात न आलेलं कारण लोहाची कमतरता हेच आहे.

थकवा

फोटो स्रोत, Getty Images

युकेमधली आकडेवारी हे सिद्ध करते. युकेच्या नॅशनल डाएट अँड न्युट्रिशन सर्व्हेनुसार 15 ते 18 वयोगटातल्या 5 टक्के मुलींना लोहाच्या कमरतेमुळे अॅनिमिया झालाय पण याच वयोगटातल्या 24 टक्के मुलींना अॅनिमिया नसला तरी त्यांच्या शरीरात लोहाची कमतरता आहे.

35-49 या वयोगटातल्या 4.8 टक्के महिलांना लोहाच्या कमरतेमुळे अॅनिमिया झालाय पण याच वयोगटातल्या 12.5 टक्के महिलांच्या शरीरात लोहाची कमतरता आहे.

किशोरवयीन मुलं आणि 64 वर्षांखालच्या पुरुषांमध्येही अॅनिमिया किंवा लोहाची कमतरता दिसून येते पण 65 वर्षांवरच्या पुरुषांना याचा मोठा धोका आहे.

मग तुम्हाला थकवा जाणवायला लागला की लगेच लोहाच्या गोळ्या घ्याव्यात का? नाही. थकवा जाणवत असेल तर डॉक्टरला भेटणं गरजेचं आहे. थकव्याचं कारण काय ते शोधलं पाहिजे कारण अति लोहसेवन आरोग्याला हानिकारक ठरू शकतं.

थकवा कमी करण्यासाठी काय खावं?

हिरव्या पालेभाज्यांमध्ये लोह असतं, त्यांचा आहारात समावेश केला जाऊ शकतो. लाल मांसातही लोह असतं. C जीवनसत्त्व असणाऱ्या लिंबासारख्या फळांचा आहारात समावेश हवा. शरीराला पुरेशा प्रमाणात पाणी मिळायला हवं. आहारात फळं आणि भाज्यांचा समावेश वाढवावा कारण त्यांच्यात पुरेशी जीवनसत्त्वं असतात. प्रक्रिया केलेलं अन्न टाळावं, साखरेचं अतिसेवन करू नये आणि दिवसभरात सतत खाण्यापेक्षा पोट भरून तीनदा व्यवस्थित जेवण करून अधेमध्ये खाणं टाळावं.

इतर जीवनसत्त्वांच्या कमतरतेमुळे थकवा जाणवू शकतो का?

जीवनसत्त्वं: या ड जीवनसत्त्वाची म्हणजेच व्हिटॅमिन D ची कमतरता अनेकांमध्ये असते. सकाळच्या कोवळ्या उन्हात बसणं किंवा सप्लिमेंटस् घेणं याने ही कमतरता दूर करता येऊ शकते.

B12 जीवनसत्त्वं: सगळ्याच प्रकारच्या वयोगटांमध्ये या जीवनसत्त्वाची कमतरता असते. थकवा हे या जीवनसत्त्वाच्या कमतरतेचं एक लक्षण आहे.

झिंक : 11 ते 18 वयोगटातल्या मुलांमध्ये झिंकची कमतरता असू शकते. पण यासाठी बाहेरची सप्लीमेंट्स घेताना सावधान कारण शरीरात झिंकचं प्रमाण वाढलं तर अॅनेमिया होऊ शकतो.

जीवनसत्त्वं: 11 ते 18 वयोगटातल्या मुलांमध्ये या अ जीवनसत्त्वाची म्हणजेच व्हिटॅमिन ए ची कमतरता आढळते.

डॉक्टरांचा सल्ला घ्या

तुम्हाला सतत थकवा जाणवत असेल तर डॉक्टरांचा जरूर सल्ला घ्या. कदाचित या थकव्यामागे काही दुसरं गंभीर कारण असू शकतं. सप्लीमेंट, गोळ्या घेण्याआधी तुमच्या फॅमिली डॉक्टरला जरूर विचारा कारण त्यांच्या अतिसेवनाचे गंभीर परिणाम होऊ शकतात.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)