जगातलं सर्वात महाग कापड असणारं ढाक्याचं मलमल नामशेष का झालं?

मलमल

फोटो स्रोत, DRIK/ BENGAL MUSLIN

    • Author, झरिया गोर्वेट
    • Role, बीबीसी फ्युचर

ढाक्याचं मलमल हे 200 वर्षांसाठी पृथ्वीतलावरील सर्वात महागडं कापड ठरलं होतं. पण नंतर ते नामशेष झालं. पण हे नेमकं घडलं कसं?

ढाक्याच्या मलमलचा प्रवास अत्यंत मोठा आहे. एकेकाळी जगातील सर्वोत्तम आणि सर्वात महागडं असलेलं हे कापड, काळाच्या ओघात मागं पडलं. पण सध्या पुन्हा एकदा मलमल या कपाडाला त्याची प्रतिष्ठा परत मिळवून देण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

सोळा टप्प्यांमधून गेल्यानंतर ढाक्याचं प्रसिद्ध मलमल तयार व्हायचं. बांगलादेशच्या (तत्कालीन भारतीय बंगाल) मेघना नदीच्या किनाऱ्यावर शेती केल्या जाणाऱ्या दुर्मिळ अशा कापसापासून हे मलमल तयार केलं जात होतं.

हजारो वर्षे या कापडाला जगभरातून पसंती मिळत राहिली आहे. प्राचीन ग्रीसमध्ये देवींच्या मूर्तींसाठी मलमलपासून वस्त्र तयार केली जात होती. अनेक देशांच्या महाराणींची वस्त्रही या मलमलपासूनच तयार केली जात होती.

भारतीय उपखंडावर राज्य असलेल्या मुघल राजांचे आणि त्या काळातील धन-दांडग्यांचे कपडेही याच कापडापासून तयार केलेले असायचे.

संपूर्ण जगाला होतं ढाक्याच्या मलमलचं वेड

हे मलमलचं कापड अनेक प्रकारचं असायचं. शाही दरबारांमध्ये त्या काळी असलेल्या कवींनी या कापडाचं वर्णन करताना 'बफ्त हवा' म्हणजेच विणलेली हवा असं म्हटलं होतं. उत्तम दर्जा असलेलं हे कापड वजनाला हवेपेक्षाही हलकं असायचं, असंही म्हटलं जातं.

मलमलचं हे कापड एवढं तलम (पातळ) असायचं की 300 फुटांचा तुकडा अंगठीमधूनही आर-पार काढता येईल. एका प्रवाशानं याबाबत असंही लिहिलं होतं की, 60 फूट लांब कापड तुम्ही बारीक घडी करून अगदी, मिश्रीच्या डबीतही ठेवू शकता.

मलमल

फोटो स्रोत, Alamy

साधारणपणे त्याकाळी मलमलचं कापड हे साडी किंवा कुर्ता (जामा) तयार करण्यासाठी वापरलं जात होतं. पण पुढे ब्रिटनमध्ये याला उच्चभ्रू किंवा श्रीमंतांचं कापड अशी ओळख मिळाली. हे एवढं पारदर्शी असायचं की, अनेकदा त्याचं वस्त्र परिधान केलेल्या लोकांची चेष्टादेखिल केली जात होती.

श्रीमंतांचं कापड अशी ओळख असली तरीही ढाक्याच्या मलमलची लोकप्रियता कमी झाली नव्हती. ज्या लोकांची ते खरेदी करण्याची ऐपत असेल, ते लोक याची वस्त्र परिधान करायचे. हे त्या काळातील सर्वात महागडं कापड होतं. 1851 च्या सुमारास एक फूट मलमलची किंमत 50 ते 400 पाऊंड दरम्यान (अंदाजे 5000 ते 40,000 रुपये) असायची.

आजच्या काळानुसार हिशेब केला तर हा दर 7 हजार ते लेकर 56 हजार पाऊंड (अंदाजे 7 लाख ते 60 लाख) एवढा होईल. पण या कापडाचे चाहते असलेल्या श्रीमंतांची संख्या मोठी होती. त्यात फ्रान्सच्या क्वीन मेरी अँटोनेट पासून ते महाराणी बोनापार्ट आणि जेन ऑस्टिनपर्यंत अनेकांचा समावेश होता.

पण जेव्हा हे कापड नव्यानं उद्यास येत असलेल्या युरोपात पोहोचलं तेव्हा, ते नामशेष व्हायला सुरुवात झाली.

मलमल तयार होण्याची 16 टप्प्यांची प्रक्रिया

20 व्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत ढाक्याचं मलमल जवळपास जगाच्या प्रत्येक कोपऱ्यातून जणू नामशेष झालं होतं. जे थोडं-फार कापड शिल्लक होतं ते लोकांच्या खासगी संग्रहात आणि संग्रहालयांमध्येच राहिलं होतं.

नेपोलियन बोनापार्टची पहिली पत्नी जोसेफिन यांना मलमल कापड अतिशय आवडायचं

फोटो स्रोत, Alamy

फोटो कॅप्शन, नेपोलियन बोनापार्टची पहिली पत्नी जोसेफिन यांना मलमल कापड अतिशय आवडायचं

यासाठी लागणारी अत्यंत बारीक कलाकुसर करणारे कारागिरही काळाच्या ओघात लुप्त झाले आणि गोसिपियम आर्बरियम (शास्त्रीय नाव) किंवा 'फुटी करपास' असं स्थानिक नाव असलेल्या कापसापासून तयार होणारं सूत (धागा) देखिल अचानक लुप्त झाला. मलमलचं हे कापड तयार होईल, अशी ती कापसाची एकमेव प्रजाती होती.

पण हे नेमकं कशामुळं घडलं? आणि आता पुन्हा या कापसाची शेती केली जाऊ शकते का? ढाक्याच्या मलमलसाठी वापरल्या जाणाऱ्या या कापसाच्या रोपांची शेती मेघना नदी (बांगलादेश) च्या किनाऱ्यावर होत होती. या रोपांना वर्षातून दोन वेळा डेफोडिलसारखी पिवळी फुलं लागायची.

या पासून अत्यंत पांढरा शुभ्र आणि वजनाने हलका कापूस मिळायचा. पण हा काही सामान्य धागा नव्हता.

दक्षिण अमेरिकेत असलेल्या या प्रजाती सारख्याच गोसेपियम हिरसटम (यापासूनच आज जगातील 90 टक्के सुती कापड तयार होतं) या प्रजातीच्या लांब आणि पातळ सूताच्या तुलनेत फुटी करपास पासून तयार केलेलं सूत गाठी जाणवणारं आणि काहीसं कमकुवत असायचं.

मलमल

फोटो स्रोत, DRIK/ BENGAL MUSLIN

आता ही या सूताची उणीव वाटू शकते, पण सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे तुम्ही त्यापासून नेमकं काय बनवणार हा होता? लांबीला कमी असलेला हा धागा औद्योगिक मशीनद्वारे तयार होणाऱ्या स्वस्त कपड्यासाठी कामी येणारा नव्हता. मशीनमध्ये हा धागा तुटायचा.

याचं वैशिष्ट्य म्हणजे, स्थानिक लोकांनी हजारो वर्षांपासून विकसित केलेल्या अगदी सोप्या पद्धतीचा वापर करून यापासून खास धागा तयार केला जात होता. ढाक्याचं मलमल 16 टप्प्यांतील प्रक्रियेनंतर तयार व्हायचं. या प्रक्रिया एवढ्या खास असायच्या की, प्रत्येक टप्प्यातील प्रक्रिया ढाक्याच्या आजुबाजुला वसलेल्या गावांपैकीच कुणाला तरी येत होती.

हे पूर्णपणे समुदायाच्या माध्यमातून चालणारं काम होतं. त्यात लहान मोठे, महिला, पुरुष, तरुण वृद्ध सर्वांचा सहभाग असायचा. सुरुवातीला कापसाचे छोटे गोळे बोआल नावाच्या माशाच्या दातांपासून तयार केलेल्या कंगव्याने स्वच्छ केले जात होते. त्यानंतर त्यापासून सूत तयार केलं जात होते.

धागा तयार करताना तो ओढला जावा यासाठी आर्द्रता असणं गरजेचं असायचं. त्यामुळं नदीत नावांवर हे काम केलं जात होतं. हे काम अगदी पटाहे किंवा दुपारच्या नंतर, जेव्हा सर्वाधिक आर्द्रता असेल तेव्हा तेव्हा केलं जात होतं.

मलमल

फोटो स्रोत, DRIK/ BENGAL MUSLIN

वृद्ध लोकांना सूत कातण्याचं काम दिलं जात नसायचं, कारण दृष्टी व्यवस्थित नसेल, तर बारीक धागे त्यांना दिसत नसायचे.

2012 मध्ये मलमलवर पुस्तक लिहिणाऱ्या लेखिका आणि डिझाईन इतिहासकार सोनिया आशमोर सांगतात की, सूती धाग्यावर मधे-मधे अगदी लहान लहान गाठी असायच्या. त्या गाठींनी धागा जोडलेला राहायचा. तसंच त्यामुळं धाग्यावर एकप्रकारचा कोरडेपणा जाणवायचा, त्याना अनुभव अत्यंत खास असायचा.

आशियातील चमत्कार

ढाक्याचं मलमल एवढं खास असायचं की या भागात येणाऱ्या पर्यटकांना ते कारागिरांनी हाताने तयार केलं आहे, यावर विश्वासच बसत नव्हता. काही लोक तर हे कापड जलपऱ्या, पऱ्या किंवा भूत तयार करत असतील, असंही म्हणायचे.

मलमल

फोटो स्रोत, DRIK/ BENGAL MUSLIN

बांगलादेश नॅशनलिस्ट क्राफ्ट काऊन्सिलच्या अध्यक्षा रूबी गजनवी सांगतात की, मलमल एवढं हलकं आणि मऊ असतं की, त्याची सर कशालाही येणार नाही. आज असं कापड कुठंही आढळत नाही.

युनेस्कोनं 2013 मध्ये जामदानी (दमास्क) विणकामाला सांस्कृतिक वारसा म्हणून जतन केलं होतं.

फोटो एजन्सी चालवणारे सैफुल इस्लाम सांगतात की, "सध्या जे मलमल येत आहे त्याचा थ्रेड काऊंट 40 ते 80 असतो. ढाका मलमलचा थ्रेड काऊंट हा 800 ते 1200 दरम्यान असायचा. त्याची गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी ही माहिती पुरेशी आहे."

जवळपास एका शतकापूर्वीच हे दुर्मिळ मलमल नामशेष झालं आहे.

मलमलचा व्यापार कसा ठप्प झाला?

आशमोर सांगतात की, मुघलांच्या काळामध्ये मलमलच्या कापडाला राजप्रतिष्ठा मिळाली होती. त्याकाळी मुघल बादशाह आणि त्यांच्या राण्यांनी या कापडाला प्रचंड पसंती दिली. तेव्हा फारस (आताचे इराण) इराक, तुर्की आणि मध्य पूर्वेच्या देशांपर्यंत मलमलचा व्यापार पोहोचलेला होता.

मलमल

फोटो स्रोत, DRIK/ BENGAL MUSLIN

ढाक्याचं मलमल एवढं पातळ असायचं की, अनेक पदर एकावर एक चढवल्यानंतरही त्यातून शरिर दिसायचं. असं सांगितलं जातं की, औरंगजेबानं एकदा मलमल परिधान करून दरबारात आलेल्या त्याच्या मुलीला रागावलं होतं. त्याच्या मुलीनं तर, तेव्हा सात थर असलेल्या मलमलचं वस्त्र परिधान केलं होतं, असंही सांगतात.

पण ज्या काळामध्ये लंडमध्ये उच्चभ्रू लोक मलमल परिधान करून अभिमानानं मिरवत होते, त्यावेळी ते मलमल तयार करणारे कामगार, कारागिर कर्जात बुडालेले असल्यानं आर्थिकदृष्ट्या उध्वस्त होत होते.

'गुड्स फ्रॉम द ईस्ट 1600-1800' नावाच्या एका पुस्तकात असं म्हटलं आहे की, ईस्ट इंडिया कंपनीनं 18व्या शतकाच्या अखेरीस मलमल तयार करण्याच्या नाजूक प्रक्रियेमध्ये लुडबूड सुरू केली होती.

सर्वात आधी तर कंपनीनं मलमल खरेदी करणाऱ्या स्थानिक व्यापाऱ्यांना बाजुला करत स्वतः खरेदी सुरू केली. आशमोर सांगतात की, याच्या उत्पादनावर त्यांनी नियंत्रण मिळवलं आणि नंतर संपूर्ण व्यवसाय ताब्यात घेतला. त्यानंतर विणकाम करणाऱ्या कारागिरांना ते कमी मोबदल्यात अधिक कापड तयार करायला सांगू लागले.

इस्लाम यांच्या मते, " हे अत्यंत कठीण होतं. कारण फुटी करपास प्रजातीच्या कापसापासून कापड तयार करणं हे अत्यंत कौशल्याचं काम होतं. ती अत्यंत खर्चिक, वेळखाऊ आणि मेहनतीची अशी प्रक्रिया असते. अनेकदा तर दिवसभर काम करूनही केवळ आठ ग्रॅम एवढं कापड तयार होतं."

"अनेकदा कारागिरांना एखाद्या विशिष्ट पद्धतीचं कापड तयार करण्यासाठी आगाऊ पैसे दिले जात होते. पण त्या पद्धतीचं कापड तयार झालं नाही, तर पैसे परतही करावे लागायचे. घाई-घाईत अशा प्रकारचं दर्जेदार काम शक्य होत नव्हतं, कारण जास्तीत जास्त कापड तयार करण्याचा दबावही असायचा."

पुढे ब्रिटिश व्यावसायिकांनी यंत्रांद्वारे याचं मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेण्याचा निर्णय घेतला. अधिक नफा कमावण्याचा त्यामागं हेतू होता. पण साध्या कापसापासून तयार केलेलं मलमल हे ढाक्याच्या हाताने विणलेल्या मलमलच्या तुलनेत टिकणं शक्यच नव्हतं.

मलमल

फोटो स्रोत, DRIK/ BENGAL MUSLIN

त्यामुळं अखेर अनेक दशकं संघर्षाचा सामना केल्यानंतर आणि आयात होणाऱ्या कपड्यांची मागणी घटल्यानं ढाक्याचा मलमल उद्योग बंद पडला. त्यानंतर या परिसरात युद्ध, गरिबी आणि भूकंप यामुळं उरलेल्या मोजक्या विणकरांनीही कमी दर्जाचं कापड तयार करणं सुरू केलं. तर काहीजण हे पूर्णपणे शेतीकडं वळाले अखेर मलमलचा संपूर्ण व्यवसायच अधोगतीला गेला.

ढाक्याच्या मलमलला नव्याने ओळख देण्याचा प्रयत्न

बांगलादेशमध्येच जन्मलेले इस्लाम 20 वर्षांपूर्वी लंडनला निघून गेले होते. 2013 मध्ये त्यांना ढाका मलमलबाबत माहिती मिळाली. पण फुटी करपास ही कापसाची प्रजाती नष्ट होणं हा ढाक्याच्या मलमलला पुनरुज्जीवन मिळण्याच्या मार्गातील सर्वात मोठा अडथळा ठरला.

इस्लाम यांनी कीवच्या रॉयल बॉटॅनिकल गार्डनमधील एक बूकलेट शोधलं. त्यात फुटी करपास ची पानं वाळवून ठेवण्यात आली होती. त्यापासून त्यांनी याचं डीएनए सिक्वेन्सिंग तयार केलं. इस्लाम बांग्लादेशला परतले आणि मेघना नदीच्या जुन्या नकाशांचा त्यांनी अभ्यास केला.

या अभ्यासातून दोनशे वर्षांमध्ये नदीचा प्रवाह कसा बदलत गेला हे त्यांच्या लक्षात आलं. त्यानंतर त्यांनी एक नाव घेतली आणि जवळपास 12 किलोमीटर परिसरातील सर्व रोपांचा शोध घेतला. बुकलेटमधील चित्रांशी मिळत्या जुळत्या रोपांचा त्यांनी अभ्यास केला.

या सर्वानंतर त्यांना फुटी करपास रोपाशी 70 टक्के साम्य असलेलं रोप मिळालं. ती फुटी करपासच्या प्रकारातीलच प्रजाती असावी. इस्लाम आणि त्यांच्या टीमने फुटी करपासची शेती करण्याचा प्रयत्न केला पण त्यांना यश मिळालं नाही.

अखेर ते भारतीय विणकाम करणाऱ्यांना भेटले आणि साधा कापूस आणि फुटी करपास यांच्या संकरातून त्यांनी नवीन संकरित धागा तयार करण्यात यश मिळवलं. या हायब्रिड मलमलपासून त्यांच्या टीमनं आतापर्यंत अनेक साड्याही तयार केल्या आहेत.

या नव्या हायब्रिड मलमलपासून तयार केलेल्या साड्यांचं जगभरात प्रदर्शन झालं. काही साड्यांची तर हजारो पौंडांमध्येही विक्री झाली आहे. इस्लाम यांच्या मते, ज्या पद्धतीनं या मलमलचं स्वागत झालं, त्यावरून या भविष्यात याला मोठी मागणी असू शकते.

कदाचित नवी पिढी पुन्हा या कापडाच्या निर्मितीत लक्ष घालेल आणि हे दुर्मिळ असं मलमल भूतकाळाच्या काळोखातून पुन्हा उभारी घेत गतवैभवही परत मिळवू शकेल.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)