म्यानमार : आँग सान सू ची यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप

आंग सान सू की

फोटो स्रोत, Reuters

फोटो कॅप्शन, आंग सान सू की

म्यानमारच्या लष्करी राजवटीनं पदच्युत नेत्या आँग सान सू ची यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले आह. हे आरोप त्यांच्या कारकिर्दीतले आजवरचे सगळ्यात गंभीर आरोप आहेत.

त्यांनी रोख रक्कम आणि सोन्याची लाच घेतल्याचं म्हटलंय. जर हे आरोप सिद्ध झाले तर सू ची यांना 15 वर्षांपर्यंतची कैदेची शिक्षा होऊ शकते.

त्यांच्यावर इतर सहा आरोपही लावले आहेत ज्यात वॉकी-टॉकींची बेकायदेशीर आयात आणि लोकांमध्ये हिंसा भडकवणे या आरोपांचाही समावेश आहे.

म्यानमारच्या या माजी नेत्यांना 1 फेब्रुवारीला अटक झाली होती जेव्हा देशात सैन्याने बंड करून सत्ता हस्तगत केली होती.

तेव्हापासून सू ची यांच्याविषयी ना फारशी माहिती समोर आली ना त्या सार्वजनिकरित्या दिसल्या. फक्त कोर्टात नेताना त्यांचं दर्शन झालं.

म्यानमारच्या लष्करी सरकारने जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकानुसार सू ची यांनी 6 लाख डॉलर्सची लाच स्वीकारली आहे. ही लाच त्यांनी रोख रक्कम आणि 7 सोन्याची बिस्कीटं या स्वरूपात स्वीकारली आहे.

लष्करी सत्तेच्या आधी सत्तेत असणाऱ्या नागरी सरकारने म्हणजेच लीग फॉर डेमॉक्रसी या पक्षाच्या सरकारने जमिनीच्या व्यवहारांमध्ये प्रचंड पैसे गमावल्याचाही आरोप केला जातोय. सू ची आधीच्या लष्करी सत्तेच्या काळात कित्येक वर्षं नजरकैदेत होत्या. त्यांच्या सोबत लोकशाही सरकार स्थापन करणाऱ्या अनेक नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले गेलेत.

याआधी सू ची यांच्यावर गुप्ततेच्या कायद्याचा भंग करण्याचाही आरोप लावला गेलाय. या गुन्ह्यासाठी जास्तीत जास्त 14 वर्षांपर्यंत शिक्षा होऊ शकते.

म्यानमारमध्ये गेल्या वर्षी झालेल्या निवडणुकांमध्ये अफरातफर झाल्याचं म्हणत लष्कराने सत्ता हस्तगत केली होती.

पण स्वतंत्र निवडणूक निरीक्षकांच्या मते या निवडणुका बऱ्याच अंशी मुक्त आणि न्याय्य होत्या. आंग सान सू ची यांच्यावर केलेले आरोप राजकीय हेतूने प्रेरित आहेत, असं म्हणत लष्कराच्या कृतीवर जगभरातून टीका होत आहे.

म्यानमार

फोटो स्रोत, REUTERS/Stringer

लष्करी सत्ता आंग सान सू ची यांच्या पुढच्या निवडणुका लढवण्यावर बंदी घालेल अशी चिन्हं आहेत. यामुळे सू ची यांच्या लोकप्रियतेत अधिकच वाढ होणार आहे.

सू ची यांचे वकील खिन माऊंग झॉ यांनी भ्रष्टाचाराचे हे आरोप खोडून काढलेत. या आरोपांसाठी त्यांना कित्येक वर्षांची कैद होऊ शकते असंही म्हटलंय.

"म्हणूनच त्यांच्यावर आरोप केले जात आहेत. म्हणजे त्या सत्तेपासून आणि राजकारणापासून दूर राहातील," असं झॉ यांनी एएफपी या वृत्तसंस्थेला सांगितलं.

म्यानमारमध्ये लष्कराने सत्ता हस्तगत केल्यानंतर म्यानमानमध्ये लोकशाहीवादी कार्यकर्त्यांची सतत निदर्शनं होत आहेत. पण लष्करी सत्तेने ही आंदोलनं क्रूरपणे चिरडून लावण्याचा सपाटा लावलाय.

असिस्टंन्स असोसिएशन फॉर पॉलिटीकल प्रिझनर्स या संस्थेनुसार, म्यानमारमध्ये लष्कराने सत्ता ताब्यात घेतल्यापासून आजवर 800 लोकांची हत्या केलीये तर 5000 लोकांना अटक केली आहे.

आंग सान सू ची यांच्यावर केलेले आरोप

  • भ्रष्टाचार. यासाठी 15 वर्षांपर्यंत कैदेची शिक्षा होऊ शकते.
  • गोपनीयतेच्या कायद्याचा भंग, ज्यासाठी 14 वर्षांपर्यंतच्या कैदेची शिक्षा होऊ शकते.
  • वॉकी-टॉकीची बेकायदेशीर आयात करून आयात-निर्यातीच्या कायद्यांचा भंग करणं. यासाठी जास्तीत जास्त 3 वर्षांची कैद होऊ शकते.
  • वॉकी-टॉकी आयात करून संदेशवहन कायद्याचं उल्लंघन करणं. यासाठी 1 वर्षाची कैद होऊ शकते.
  • नैसर्गिक आपत्ती कायद्याचं उल्लंघन केल्याचे दोन आरोप. यातल्या प्रत्येक गुन्ह्यासाठी 3 वर्षांची शिक्षा होऊ शकते.
  • लोकांमध्ये हिंसा भडकवणे. यासाठी 3 वर्षांची शिक्षा होऊ शकते.
म्यानमारमधील निदर्शनं

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, म्यानमारमधील निदर्शनं

म्यानमारविषयी थोडक्यात

म्यानमारला पूर्वी बर्मा म्हणून ओळखलं जायचं. 1948 साली म्यानमार ब्रिटीशांपासून स्वतंत्र झाला. स्वातंत्र्यानंतर म्यानमार बहुतांश काळ लष्करी सत्तेच्या अधिपत्याखाली राहिला आहे.

सैन्याचे निर्बंध 2010 पासून कमी व्हायला लागले. 2015 मध्ये म्यानमारमध्ये मुक्त निवडणुका झाल्या. त्याच्या पुढच्या वर्षी आँग सान सू ची यांच्या नेतृत्वाखाली लोकशाही सरकार स्थापन झालं.

2017 साली म्यानमारमधल्या रोहिंग्या कट्टरतावाद्यांनी पोलिसांवर हल्ले केले. या हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून म्यानमारच्या सैन्याने रोहिंग्या मुस्लिमांच्या विरोधात कारवाई सुरू केली. यामध्ये 5 लाख रोहिंग्या मुस्लिमांना शेजारच्या बांगलादेशात निर्वासित व्हावं लागलं.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)