मेहुल चोकसींचं अपहरण करून त्यांना अँटिगाहून डॉमिनिकाला नेण्यात आलं होतं?

फोटो स्रोत, PRIYANKA PARASHAR/MINT VIA GETTY IMAGE
- Author, विशाल शुक्ला
- Role, बीबीसी प्रतिनिधी
27 मे 2021 रोजी कॅरिबियन बेटांमधल्या डॉमिनिका या देशातून भारतातून पसार झालेले उद्योगपती मेहुल चोकसी यांना अटक करण्यात आली आणि अनेकांना याचं आश्चर्य वाटलं.
पंजाब नॅशनल बँकेत 13,578 कोटींचा घोटाळा केल्याचा मेहुल चोकसींवर आरोप आहे आणि याच केसमधील आणखी एक आरोपी असणाऱ्या नीरव मोदींच्या लंडनमधून भारतातल्या प्रत्यपर्णाबाबतची चर्चा गेल्या काही काळापासून सुरू आहे.
यादरम्यानच मेहुल चोकसींच्या अटकेची बातमी आली. पण आपलं अजून चोकसी यांच्याशी बोलणं होऊ शकलं नसल्याचं भारतातले त्यांचे वकील विजय अगरवाल यांनी म्हटलं. चोकसींना अँटिगाहून डॉमिनिकाला कसं नेण्यात आलं, याविषयी त्यांच्याशी बोलल्यानंतर समजू शकणार असल्याचं त्यांच्या वकीलांनी म्हटलं, तेव्हा त्याकडे फारसं कोणी लक्ष दिलं नाही.
चोकसी क्युबाला पळून जाण्याच्या प्रयत्नांत असल्याचं अँटिगाच्या सूत्रांचा दाखला देत सांगत राहण्यात आलं. चोकसी हे बेकायदेशीर पद्धतीने डॉमिनिकामध्ये घुसण्याच्या प्रयत्न करत असल्याने त्यांना अटक करण्यात आल्याचं डॉमिनिका पोलिसांनी म्हटलं, तर चोकसींचं अपहरण करून त्यांना डॉमिनिकाला नेण्यात आल्याचं चोकसींच्या बाजूने सांगण्यात आलं.
चोकसी आरोपी असल्याने त्यांच्या बाजूने सांगण्यात येत असलेल्या गोष्टींवर फारसा विश्वास ठेवण्यात आला नाही. पण याला 10 दिवस उलटल्यानंतर चोकसींच्या वकिलांनी अँटिगा पोलिसांकडे अपहरणकर्त्यांच्या नावानिशी अपहरणाबद्दलची तक्रार दाखल केली आणि अँटिगाच्या पंतप्रधानांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतलं.
चोकसींच्या अपहरणाचं प्रकरण काय आहे?
मेहुल चोकसींची पत्नी प्रीती चोकसी यांनी याविषयी भारतातली अनेक माध्यमं आणि IANS वृत्तसंस्थेला मुलाखत दिली. मेहुल चोकसींची बाजू मांडताना 23 मे रोजी चोकसी गायब होण्यापासून ते 26 मे रोजी त्यांच्याबद्दल समजेपर्यंत काय काय घडलं, हे त्यांनी सांगितलं.

फोटो स्रोत, ANI
प्रीती यांच्यानुसार, "23 मे रोजी एका महिलेसोबत डिनर करण्यासाठी मेहुल घरुन कारने निघाले. त्या महिलेने आमच्या समोरचं घर भाड्याने घेतलं होतं आणि गेले 8 महिने ती इथे येत-जात होती. आम्ही तिला बार्बरा जोसेफ, बार्बरा जेसिक आणि बार्बरा जाराबिक या नावाने ओळखत होतो. ती वॉकदरम्यान माझ्या पतीला भेटत असे. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये आपलं शिक्षण झालं असून आपण घरांच्या रेनोव्हेशनचं काम करत असल्याचं तिने सांगितलं होतं."
प्रीती पुढे सांगतात, "बार्बरा मे महिन्यात परतली. आपल्या बॉसला अँटिगामध्ये संपत्ती विकत घेण्याची इच्छा असल्याचं सांगतं तिने मेहुलना जेवायला येण्याचं निमंत्रण दिलं. मेहुल तिच्या घरी गेले तेव्हा तिच्या घराचा पुढचा आणि मागचा असे दोन्ही दरवाजे उघडे होते.
काही मिनिटांतच तिथे युनिफॉर्म घातलेले 8-10 जण आले. चौकशीसाठी त्यांना मेहुलला घेऊन जायचं होतं. त्यांनी मेहुलला बोटीत बसवलं. अँटिगाच्या जॉली हार्बरला एक मोठी बोट वाट पाहत उभी होती. ती त्यांना डॉमिनिकाला घेऊन गेली."
प्रीती यांच्या म्हणण्यानुसार, "या बोटीमध्ये भारतीय वंशाचे दोन जण असल्याचं मेहुलने मला सांगितलं. ते कोणासाठी काम करत होते, माहिती नाही. त्यांची नावं गुरजीत आणि गुरमीत होती. आपण पंजाबी म्युझिक व्हिडिओ बनवत असल्याचं एकाने सांगितलं तर दुसरा बर्मिंघममध्ये राहत होता." कॅलिओप ऑफ आय आणि लेडी AN या दोन बोटींनी मेहुलना अँटिगाहून डॉमिनिकाला नेण्यात आलं असण्याची शक्यता प्रीती वर्तवतात.
मेहुल यांना अँटिगाहून बळजबरीने डॉमिनिकाला नेण्यात आल्याचा थेट आरोप चोकसींचे वकील विजय अगरवाल यांनी केलाय.
"त्यांच्यासोबत बळजबरी झाल्याचं त्यांच्या शरीरावरच्या खुणा सांगतात. मला वाटतं भारतात आणण्यासाठी त्यांना योजनाबद्ध रीतीने दुसरीकडे नेण्यात आलं. हा कट कोणी रचला हे मला माहिती नाही."
चोकसींना बळजबरीने एका ठिकाणाहून दुसरीकडेनेण्याबाबत आपल्याला माहिती नसल्याचं अँटिगाचे पोलिस कमिशनर अॅटली रॉडनी यांनी म्हटलं होतं.
अँटिगा सरकारचं म्हणणं काय?
चोकसींना डॉमिनिकामध्ये अटक करण्यात आल्यानंतर आपल्याला चोकसींना परत घ्यायचं नसून डॉमिनिकाने चोकसींचं भारताला थेट प्रत्यापर्ण करावं अशी अँटिगाच्या पंतप्रधानांनी डॉमिनिकन प्रशासनाला विनंती केली होती.

फोटो स्रोत, Getty Images
अँटिगाच्या संसदेतही चोकसींच्या मुद्द्यावर चर्चा झाली. चोकसी अँटिगासाठी लाजेची बाब ठरल्याचं पंतप्रधान गॅस्टन ब्राऊन यांनी म्हटलं होतं.
पण चोकसींच्या वकिलांनी पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर ही गंभीर बाब असल्याचं अँटिगाचे पंतप्रधान गॅस्टन ब्राऊन यांनी म्हटलंय.
अँटिगा न्यूजरूम या अँटिगाच्या वृत्तसंस्थेनुसार अँटिगाचे पंतप्रधान गॅस्टन ब्राऊन म्हणाले, "चोकसीच्या वकिलांनी पोलीस आयुक्तांकडे दाखल केलेल्या तक्रारीत या कथित अपहरणात सहभागी असलेल्यांची नावं सांगितली आहेत. पोलीस आणि सरकार या आरोपांचा गांभीर्याने तपास करत आहेत. जर खरंच असं झालं असेल, तर ती चिंतेची बाब आहे."
चोकसींच्या वकिलांनी ही तक्रार दाखल करताना कोणाचं नाव घेतलं, ते अजून समोर आलेलं नाही.
कोर्टात काय झालं?
बेकायदेशीर पद्धतीने डॉमिनिकामध्ये शिरल्याचा आरोप चोकसींना डॉमिनिकन हायकोर्टात सादर करण्यात आल्यानंतर त्यांच्यावर ठेवण्यात आला. त्यांचा जामीन अर्ज फेटाळण्यात आलाय आणि त्यांच्या सुटकेच्या याचिकेवरची सुनावणी स्थगित करण्यात आली आहे.

फोटो स्रोत, Getty Images
चोकसींनी डॉमिनिकाच्या कोर्टात एक अॅफिडेव्हिट सादर केल्याचं वृत्त 7 जून रोजी आलं होतं. यानुसार ते कायद्याचं पालन करणारे नागरिक असून त्यांचं अपहरण करण्यात आलं होतं, असं या हमीपत्रात म्हटलंय.
डॉमिनिकन कोर्टाच्या कारवाईपासून पळ काढण्याचा आपला हेतू नसून जामीन मिळवण्यासाठी पैसे देण्याची आपली तयारी असल्याचं आणि स्वतःचे पैसे वापरून डॉमिनिकामध्ये सुरक्षा व्यवस्था घेण्याची तयारी असल्याचं चोकसींनी म्हटलंय. भारतीय तपास यंत्रणाही आपली कधीही चौकशी करू शकतात, असं या अॅफिडेव्हिटमध्ये चोकसींनी म्हटलंय.
डॉमिनिकाचे विरोधी पक्षनेते आणि राजकारण
कोर्टामध्ये चोकसींच्या प्रकरणाची सुनावणी सुरू असताना डॉमिनिकाचे विरोधी पक्ष नेते लेनक्स लिंटन यांना मेहुल यांचा भाऊ चेतन चोकसींसोबत पाहण्यात आल्याचा दावा डॉमिनिकाची न्यूज वेबसाईट 'असोसिएट टाईम्स'ने केलाय. मेहुलचे कोणी नातेवाईक वा मित्रांना आपण ओळखत नसल्याचं यापूर्वी लिंटन यांनी म्हटलं होतं.

फोटो स्रोत, Getty Images
30 मे रोजी चेतन चोकसींनी लिंटन यांना दोन लाख डॉलर्सची निवडणूक प्रचारासाठीची देणगी देण्याचं कबूल केलं आणि याच्या मोबदल्यात लिंटन आणि त्यांच्या पक्षाने चोकसींनी डॉमिनिकामध्येच ठेवण्याची मागणी करण्याचं कबूल केल्याचा दावाही 'असोसिएट टाईम्स'च्या एका वृत्तात करण्यात आला होता.
लिंटन यांनी या वृत्ताचाही इन्कार केलाय.
दरम्यान चोकसींच्या प्रत्यापर्णासाठी डॉमिनिकाला गेलेल्या विविध भारतीय तपास यंत्रणांची पथक 7 दिवस तिथे राहून भारतात परतली आहेत.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








