Whatsapp : व्हॉट्सॲपला पर्याय म्हणून समोर आलेले सिग्नल आणि टेलिग्राम किती सुरक्षित आहेत?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, ऋजुता लुकतुके
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
व्हॉट्सअॅपने प्रायव्हसी नियमांसाठीच्या अटी स्वीकारण्याची तारीख पुढे ढकललीय. 8 फेब्रुवारीवरून वाढवून आता ही तारीख 16 मे 2021 करण्यात आलीय.
प्रायव्हसीसाठीच्या अटी आणि नियमांमध्ये बदल केल्यानंतर व्हॉट्सअॅपवर मोठी टीका झाली होती. त्यानंतर हे पाऊल उचलण्यात आलं.

फोटो स्रोत, Facebook
अनेकांनी व्हॉट्सअॅपला पर्याय म्हणून सिग्नल आणि टेलिग्रामसारख्या अॅप्सचा पर्याय स्वीकारला.
पण यादरम्यान लाखो युजर्सनी एकाचवेळी सिग्नल डाऊनलोड केल्याने यामध्ये तांत्रिक अडचणी आल्या आणि जगभरातल्या लोकांना हे अॅप वापरण्यात अडचणी येतायत. तांत्रिक अडचणी आल्याचं सिग्नलने ट्विटरवर म्हटलंय.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
दरम्यान व्हॉट्सअॅपच्या नव्या नियमांमुळे अनेक युजर्सनी आपला मोर्चा सिग्नल आणि टेलिग्राम अॅपकडे वळवला. हे लक्षात घेऊन बीबीसी मराठीनं सिग्नल आणि टेलिग्राम अॅप किती सुरक्षित आहेत, हे तपासलं. त्यासाठी जाणकारांशी चर्चा केली.
तुमच्या फोनमध्ये काय आहे? व्हॉट्सॲप, टेलिग्राम की सिग्नल? अगदी गेल्या आठवड्यापर्यंत तुम्ही डोळे झाकून व्हॉट्सॲप असं उत्तर दिलं असतं. पण अलीकडे त्यांचं गोपनीय माहितीचं धोरण बदललंय. म्हणजे तुमचे अगदी कामाचे मेसेजही कंपनी उघड करू शकते, अशी भीती निर्माण झालीय. त्यामुळे लोकांनी टेलिग्राम, सिग्नल अशा पर्यायी ॲपकडे आपला मोर्चा वळवलाय.
पण सिग्नल आणि टेलिग्राम हे नवीन ॲप तरी वापरायला सुरक्षित आहेत का? आपण याच प्रश्नाचे उत्तर आता शोधणार आहोत.
व्हॉट्सॲपचं नवं गोपनीयताविषयक धोरण काय आहे?
व्हॉट्सॲपशी मागची सात-आठ वर्षं आपलं एक नातं तयार झालं होतं. तिथल्या ग्रुपमध्ये एकाच वेळी शंभर जणांशी बोलता येणं, कामाच्या महत्त्वाच्या गोष्टी शेअर करता येणं हे सगळं खूप सोयीचं होतं. पण आता व्हॉट्सॲपच्या बदललेल्या गोपनीयता धोरणानंतर सगळंच बदललंय.
ॲमेझॉन या ईकॉमर्स कंपनीचे मालक जेफ बेझॉस यांचा आयफोन गेल्यावर्षी जानेवारी महिन्यात हॅक झाला होता. त्यानंतर त्यात असलेली महत्त्वाची माहिती इंटरनेटवर उघड झाली. यात त्यांचं फेसबुक आणि व्हॉट्सॲप अकाऊंटचा मोठा वाटा असल्याचं बोललं गेलं होतं.
आताही टेलिग्राफचे संस्थापक पेव्हेल ड्युरोव्ह यांनी बेझोस यांनी टेलिग्राम वापरलं असतं तर माहिती फुटली नसती, असा शेरा मारला आहे.
एकंदरीतच व्हॉट्सॲपच्या सुरक्षिततेविषयी अनेक शंका वेळोवेळी व्यक्त करण्यात आल्या. आताच्या बदललेल्या धोरणामुळे व्हॉट्सॲपवर तुम्ही केलेली देवाण-घेवाण अगदी गूगल सर्चवरही मिळू शकेल, असं बोललं जात आहे.
त्यातूनच जगभरात लोकांनी व्हॉट्सॲपला सोडचिठ्ठी देऊन टेलिग्राम आणि सिग्नलचा वापर सुरू केला आहे. एका जागतिक सर्वेक्षणातून असं समोर आलंय की, मागच्या दोन दिवसांत एक लाख लोकांनी सिग्नल डाऊनलोड केलं तर 20 लाख लोकांनी टेलिग्राम. याउलट व्हॉट्सॲप डाऊनलोड 11 टक्क्यांनी कमी झाले.
सिग्नल, टेलिग्राम तरी सुरक्षित आहेत का?
आताच्या घडीला अगदी सेलिब्रिटी किंवा बडे उद्योजकही या दोन ॲपची भलामण करतायेत. जसं की इलॉन मस्क यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून सिग्नल ॲप वापरण्याचं आवाहन लोकांना केलं. तर टेलिग्रामच्या संस्थापकांनी थेट जेफ बेझॉस यांना टेलिग्राम वापरायला सांगितलं.
आपण या दोन ॲपची सुरक्षितता किती आहे, हे जाणून घेऊया.
सिग्नल अॅप किती सुरक्षित आहे?
सिग्नल हे ना नफा, ना तोटा तत्त्वावर चालणारं ॲप आहे. त्यामुळे तुमच्या डेटाशी कंपनीचा काही स्वार्थ असण्याचा धोका नाही. अमेरिकन क्रिप्टोग्राफर मॉक्सी मार्लिनस्पाईक यांनी ते बनवलंय.

फोटो स्रोत, Signal
सिग्नलची सुरक्षितता - यात एन्ड टू एन्ड एन्क्रिप्शन आहे. म्हणजे तुमचा मेसेज अगदी सिग्नल कंपनीही पाहू शकत नाही. शिवाय तुम्ही शेअर केलेली माहिती फक्त आणि फक्त त्याच फोनवर साठवली जाते. आय-क्लाऊड, गूगल ड्राईव्ह अशी कुठेही नाही. त्यामुळे माहिती सुरक्षित राहण्याची शक्यता वाढते.
सिग्नलची उपलब्धता - आयओएस, गूगल, विंडोज आणि अगदी लिनक्सवरही सिग्नल उपलब्ध आहे आणि तुम्ही अकाऊंट सुरू केल्यावर तुमचे इतर कोणी मित्र सिग्नलवर असल्याचंही ते तुम्हाला सांगतं.
सिग्नल फ्री आहे का? - सिग्नल फ्री तर आहेच. शिवाय यात जाहिराती नाहीत आणि ऑनलाईन जाहिरातदारांना तुमची माहिती विकलीही जात नाही.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 1
सिग्नलवर काय-काय आहे? - तुम्ही 150 लोकांचा ग्रुप बनवू शकता. ग्रुप व्हीडिओ किंवा ऑडिओ कॉलही करू शकता. असे कॉलही एनक्रिप्टेड म्हणजे सुरक्षित आहेत.
टेलिग्राम अॅप किती सुरक्षित आहे?
टेलिग्राम हे वापरायला सगळ्यात सोपं मानलं जातं. रशियन क्रिप्टोग्राफर पेव्हेल ड्युरोव्ह यांनी ते तयार केलंय.
टेलिग्रामची सुरक्षितता - टेलिग्रामचे सगळेच मेसेज एनक्रिप्टेड नसतात. पण, त्यासाठी सिक्रेट चॅटची सोय त्यांनी करून दिलीय. असे चॅट गोपनीय आणि फक्त त्या मोबाईल फोन किंवा कम्प्युटरमध्ये साठवले जातात. ठरावीक कालावधीनंतर असे सिक्रेट चॅट डिलिटही करता येतात. पण, यापूर्वी टेलिग्रामच्या मेसेज गुप्त ठेवण्याच्या क्षमतेबद्दल प्रश्न विचारले गेले आहेत.

फोटो स्रोत, Getty Images
टेलिग्रामची उपलब्धता - अँड्रॉईड, आयओएस, मॅक, विंडोज असलेले फोन किंवा उपकरणांमध्ये तुम्ही टेलिग्राम वापरू शकता. पण, तुम्ही मध्येच फोन बदलला किंवा दुसऱ्या उपकरणात नवं लॉगइन केलं तर तुमचे आधीचे मेसेज तुम्हाला उपलब्ध होतात. कारण तुमचे मेसेज साठवण्यासाठी क्लाऊड स्टोरेज वापरलं जातं आणि ते सुरक्षित असल्याचा दावा संस्थापक ड्युरोव्ह यांनी वारंवार केला आहे.
टेलिग्राम फ्री आहे का? - हो. सध्या टेलिग्राम फ्री असलं तरी कंपनीने अलीकडेच पैसे उभे करण्यासाठी काही बदल करण्याचं सुतोवाच केलं आहे. येणाऱ्या दिवसांमध्ये टेलिग्रामवर जाहिराती दिसू शकतील आणि कंपनी पैसे कसे उभारणार हे त्यांनी अजून स्पष्ट केलेलं नाही. म्हणजे वॉट्सअॅप प्रमाणे ते ही डेटा इतर कंपन्यांना विकणार का हे स्पष्ट नाही.
टेलिग्रामवर काय-काय आहे? - टेलिग्रामवर तुम्ही चांगल्या दर्जाचा व्हीडिओ पाठवू शकता आणि एका ग्रुपमध्ये दोन लाख लोक असू शकतात. या फिचरमुळे टेलिग्राम जगभर प्रसिद्ध आहे. ऑडिओ-व्हीडिओ कॉलही इथं शक्य आहेत.
व्हॉट्सअॅप, टेलिग्राम की सिग्नल?
तर अशी आहेत व्हॉट्स्अॅपला पर्याय ठरू पाहणारी ही ॲप. पण, आपला प्रश्न उरतोच. यातलं सगळ्यात सुरक्षित ॲप कुठलं? कारण, सिग्नल सुरक्षित म्हणावं तर एका इस्त्रायली कंपनीने ते हॅक केल्याचा दावा केला आहे. मग आपण नेमकं वापरायचं काय आणि कसं?
हा प्रश्न आम्ही सायबर सुरक्षा तज्ज्ञ आणि ब्लॉकचेन प्रणालीचा अभ्यास असलेले समीर धारप यांना विचारला. धारप यांनी व्हॉट्स्अॅपच्या बदललेल्या धोरणाविषयी अधिक माहिती दिली.

फोटो स्रोत, Twitter/@signalapp
"मार्क झुकरबर्ग यांनी स्पष्ट केलं आहे की, वैयक्तिकरित्या व्हॉट्स्अॅप वापरणाऱ्यांवर नवीन धोरणाचा कुठलाही परिणाम होणार नाही. फक्त ज्यांची बिझिनेस अकाऊंट आहेत, ती माहिती वितरित केली जाईल आणि व्हॉट्स्अॅपने अलीकडे ऑनलाईन पेमेंट सुविधा सुरू केली. त्या अकाऊंटची माहिती जाहिरातदारांबरोबर शेअर केली जाईल. त्यामुळे नियमित व्हॉट्स्अॅप वापरणाऱ्यांवर फारसा परिणाम होणार नाही," असं धारप यांनी स्पष्ट केलं.
त्यामुळे व्हॉट्स्अॅप लोकांच्या वापरातून पूर्णपणे जाणार नाही, असं धारप यांना वाटतं. पण, सगळ्यात सुरक्षित ॲप कुठलं याविषयी बोलताना ते म्हणाले की, "वापरायला सगळ्यात सुरक्षित ॲप सिग्नल म्हटलं पाहिजे. कारण, ते ओपन सोर्स म्हणजे कुणाचाही त्यावर हक्क नसलेलं ॲप आहे. त्यातले मेसेज फोन किंवा कम्प्युटर खेरीज कुठेही साठवले जात नाहीत. त्यामुळे फक्त ॲप वापरणाऱ्यांकडेच ते राहतात. टेलिग्राम हे खाजगी संभाषणासाठी जगभरात वापरलं जातं. त्यातल्या सिक्रेट चॅटचा वापर अनेक जण करतात. पण, वॉट्सॲपची लोकप्रियता अजूनही कायम आहे."
मेसेंजर अॅप ही अलीकडे आपली गरज बनलीय. पण, इथून पुढे ती वापरताना आपल्यालाही सावधानता बाळगायला हवी, हे मात्र निश्चित.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 2
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








