कोरोना लस : फायझर लस नवीन कोरोना विषाणूवरही परिणामकारक?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, जेम्स गॅलघर
- Role, विज्ञान आणि आरोग्य प्रतिनिधी, बीबीसी
कोरोना विषाणूचे दोन नवीन प्रकार (व्हॅरिएंट किंवा स्टेन) आढळले आणि जगभरात पुन्हा एकदा कोव्हिड-19 आजाराविषयी चिंता व्यक्त होऊ लागली.
मात्र, या दोन्ही नवीन प्रकारातल्या एका महत्त्वाच्या म्युटेशनवर म्हणजेच एका महत्त्वाच्या बदलावर फायझरजी लस 'परिणामकारक' असल्याचं प्रयोगाअंती सिद्ध झालंय.
मात्र, इथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की कोरोना विषाणूच्या दोन्ही नवीन प्रकारामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे अनेक म्युटेशन झाले आहेत. त्यापैकी एका महत्त्वाच्या म्युटेशनवर प्रयोगशाळेत अभ्यास करण्यात आला आणि त्यात असं आढळून आलं की फायझरची लस या एका म्युटेशनवर परिणामकारक आहे.
त्यामुळे या नव्या संशोधनाचं जगभर कौतुक होत असलं तरी ही लस कोरोना विषाणूच्या व्हॅरिएंट्सवर कशाप्रकारे काम करेल, याचा ठोस शास्त्रीय पुरावा म्हणून या संशोधनाकडे बघितलं जात नाहीये.
कोव्हिड-19 आजार पसरवणारा SARS-Cov-2 या कोरोना विषाणूने गेल्या वर्षभरापासून संपूर्ण जगात दहशत पसरवली असताना काही दिवसांपूर्वी युके आणि दक्षिण आफ्रिकेत याच विषाणूचे दोन नवीन प्रकार आढळून आले होते.
हे दोन्ही नवे प्रकार मूळ कोरोना विषाणूपेक्षा जास्त वेगाने पसरतात आणि म्हणूनच जगभरात ज्या लशी विकसित करण्यात आल्या त्या नवीन प्रकारच्या विषाणूंवर कितपत प्रभावी ठरतील, असा प्रश्न विचारला गेला.
लस नवीन व्हॅरिएंटवरही परिणामकारक ठरेल, असं व्यापक प्रमाणावर मानलं जातंय. मात्र, शास्त्रज्ञांना ठोस पुरावा हवा आहे आणि त्यामुळेच त्यादिशेने संशोधनंही सुरू झाली आहेत.
असंच एक संशोधन टेक्सास विद्यापीठात करण्यात आलं. यात दोन्ही व्हॅरिएंटमध्ये जे समान म्युटेशन दिसलं त्या N501Y नावाच्या म्युटेशनवर अभ्यास करण्यात आला.
हे म्युटेशन अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं. कारण हे म्युटेशन विषाणूच्या त्या भागात आढळलं जो भाग मानवी शरीराच्या पेशीच्या सर्वप्रथम संपर्कात येतो आणि याच बदलामुळे कदाचित विषाणूची लागण होण्याची क्षमताही वाढत असावी.

फोटो स्रोत, Reuters
'आनंदाची बातमी'
संशोधकांनी विषाणूचे दोन प्रकार तयार केले. एका प्रकारात विषाणूत बदल (म्युटेशन) केले तर दुसऱ्यामध्ये कुठलंच म्युटेशन केलेलं नव्हतं. नंतर या दोन्ही प्रकारच्या विषाणूंना क्लिनिकल ट्रायलमध्ये लस देण्यात आलेल्या 20 रुग्णांच्या रक्ताच्या नमुन्यात टाकण्यात आलं.
लस देण्यात आलेल्या रुग्णांची रोगप्रतिकारक यंत्रणा हे नवीन बदल काढून टाकण्यात सक्षम असल्याचं संशोधनात आढळलं.
मात्र, कोरोना विषाणूचे जे दोन नवीन व्हॅरिएंट आढळून आले आहेत त्यात एकापेक्षा जास्त म्युटेशन्स झालेले आहेत. यापैकी एका म्युटेशनवर फायझरची लस परिणामकारक असल्याचं आढळलं असलं तरी सर्व म्युटेशन्सचा एकत्रित परिणाम म्हणून लस प्रभावी न ठरण्याचीही शक्यता आहे.
यासंदर्भात बोलताना केम्ब्रिज विद्यापीठातील प्रा. रवी गुप्ता म्हणाले, "युकेतल्या व्हॅरिएंटमध्ये एकूण सात म्युटेशन झाले आहेत. या सातपैकी एका म्युटेशनवर अभ्यास करण्यात आला आहे आणि खरंतर अशा एखाद्या म्युटेशनचा फारसा परिणाम होत नसतो."
तर लंडन स्कूल ऑफ हायजीन अँड ट्रॉपिकल मेडिसीनचे प्रा. स्टिफन इव्हान्स म्हणतात, "संशोधनाचा रिझल्ट याच्या उलट आला असता तर ते वाईट आणि चिंता वाढवणारं ठरलं असतं."
"त्यामुळे ही 'आनंदाचीच बातमी' आहे. मात्र, यातून फायझर (किंवा इतर कुठलीही) लस नवीन व्हॅरिएंटविरोधातही संपूर्ण सुरक्षितता प्रदान करते, असं खात्रीशीररित्या सांगता येत नाही."
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








