इथियोपिया : तिग्रे प्रांतात गृहयुद्धासारखी परिस्थिती, हा नेमका कसला संघर्ष पेटला आहे?

फोटो स्रोत, Getty Images
गेले काही आठवडे इथियोपियाच्या उत्तर भागातल्या तिग्रे प्रांतात गृहयुद्धासारखी परिस्थिती आहे.
इथियोपिया म्हटलं, की तुमच्या नजरेसमोर काय येतं? एक प्राचीन संस्कृती, कॉफीचा शोध लागला तो देश आणि जगातलं कुठलंही मॅरेथॉन जिंकणारे धावपटू असं उत्तर अनेकजण देतील. पण पूर्व आफ्रिकेतला हा देश एक प्रादेशिक सत्ता आणि व्यापाराचं मोठं केंद्रही आहे.
सध्या मात्र हा देश चर्चेत आहे, तो तिथल्या अंतर्गत संघर्षामुळे. या संघर्षाच्या दोन टोकांशी आहेत इथियोपियाचे पंतप्रधान अॅबी अहमद अली आणि तिग्रेमधली तिग्रे पिपल्स लिबरेशन फ्रंट ही संघटना.
इथियोपियात नेमकं काय होत आहे, सगळं जग या संघर्षावर का नजर ठेवून आहे आणि भारतासाठी तिथली शांतता महत्त्वाची का आहे?
नोबेल पुरस्कार ते यादवी युद्धाचं सावट
अॅबी अहमद अली 2018 साली इथियोपियाचे पंतप्रधान बनले, तेव्हापासूनच त्यांनी शेजारील देश एरिट्रियाशी इथियोपियाचे संबंध सुधारण्यावर भर दिला. परिणामी दोन्ही देशांमधला वीस वर्षांपासूनचा संघर्ष मिटवण्यात त्यांना यश आलं. याच कामगिरीसाठी अॅबी अहमद यांना 2019 साली नोबेल शांतता पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं.

फोटो स्रोत, Reuters
फक्त एरिट्रियाच नाही, तर या प्रदेशातल्या आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये इथियोपिया तेव्हापासून इथियोपियाचं महत्त्व वाढलं आहे.
देशांतर्गत वेगवेगळ्या गटांमधले संघर्ष मिटवण्यासाठीही अॅबी अहमद यांनी काही राजकीय सुधारणा आणल्या. पण काही गटांनी त्याला विरोध केला आहे. याच विरोधाची परिणती तिग्रेमधल्या सशस्त्र संघर्षात झाली आहे.
तिग्रे संकट काय आहे?
इथियोपियात संघराज्य पद्धतीची व्यवस्था आहे, आणि त्या अंतर्गत देशातले महत्त्वाचे समुदाय त्यांच्या स्वतःच्या प्रांतांचा कारभार पाहतात.
तिग्रे हा इथियोपियाच्या उत्तर भागातला प्रांत असून, तिथे तिग्रे पीपल्स लिबरेशन फ्रंट (TPLF) या संघटनेची सत्ता आहे. 2018 साली ओमाहा समुदायाचे अॅबी अहमद पंतप्रधान होईपर्यंत इथियोपियाच्या केंद्र सरकारमध्ये आणि सैन्यातही काळ TPLFचं वर्चस्व होतं.
पण अॅबींनी आणलेल्या बदलांचा या संघटनेवरही परिणाम झाला. त्यात तिग्रेमधल्या निवडणुकीवरून निर्माण झालेल्या मतभेदांची भर पडली.
अॅबी अहमद ज्या आघाडीचं नेतृत्व करतात, ती पाच वर्ष सत्तेत असून, देशात यंदा ऑगस्टमध्ये सार्वत्रिक निवडणुका होणार होत्या. पण कोव्हिडच्या साथीचं कारण देत, अॅबी अहमद यांनी देशातल्या सगळ्या निवडणुका पुढे ढकलल्या.

फोटो स्रोत, AFP
पण अहमद यांचा कार्यकाल संपला असल्याची भूमिका TPLF नं घेतली आणि त्यांचा निर्णय झुगारत सप्टेंबर महिन्यात तिग्रे प्रांतात स्थानिक निवडणुका घेण्यात आल्या.
त्यानंतर अॅबींनी तिग्रे प्रांतात सैन्य कारवाईचे आदेश दिले. केंद्रीय सैन्यदलाच्या एका तळावरील कथित हल्ल्यासाठी TPLF जबाबदार असल्याचा आरोप करत त्यांनी ही कारवाई सुरू केली, पण त्यासाठी कुठले पुरावे दिलेले नाहीत.
आतापर्यंत काय काय घडलं?
4 नोव्हेंबर रोजी तिग्रे प्रांतात आणीबाणी जाहीर करण्यात आली. इंटरनेट आणि फोन लाईन्स बंद करण्यात आल्या आणि बाकीच्या राज्यांशी तिग्रेला जोडणारे रस्ते बंद करण्यात आले.
या लष्करी कारवाईचा आता अखेरचा टप्पा सुरू झाल्यांचं अॅबींनी जाहीर केलं आहे तिग्रे प्रांताची राजधानी मेकेल केंद्रीय फौजांच्या ताब्यात आल्याचा दावा केला आहे. तसंच कुठलं नुकसान टाळण्यासाठी शहरातल्या पाच लाख रहिवाशांना घरातच थांबण्याची विनंती केली आहे.

फोटो स्रोत, Getty Images
दुसरीकडे तिग्रे पीपल्स लिबरेशन फ्रंट (TPLF) या स्थानिक संघटनेनं सरकारविरुद्ध शेवटपर्यंत लढा देण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
तिग्रे प्रांतावर केंद्रसरकारचं नियंत्रण मिळवण्यासाठी अॅबींनी कारवाई सुरू केलेली असून, त्याचा परिणाम दीर्घकाळच्या संघर्षात होण्याची भीती व्यक्त केली जाते आहे.
पूर्व आफ्रिकेत अशांततेचं सावट
युद्धाचं सावट दिसू लागताच हजारोजण तिग्रे प्रदेशातून सीमा ओलांडून शेजारच्या सुदानमध्ये आश्रयासाठी गेले आहेत. कोव्हिडच्या साथीच्या काळात झालेलं स्थलांतर निर्वासितांसाठी आणखी धोक्याचं ठरू शकतं.

फोटो स्रोत, Getty Images
घरात संघर्षाचे ढग जमा होताच इथियोपियानं सोमालियामधून आपलं सैन्य माघारी बोलावलं आहे. हे सैनिक सोमालियात संयुक्त राष्ट्रांचा पाठिंबा असलेल्या सरकारला अल-शबाब या इस्लामिक कट्टरतावादी संघटनेविरूद्धच्या लढाईत मदत करत होते. साहजिकच त्यांच्या नसण्याचा परिणाम म्हणून या प्रदेशात कट्टरतावाद आणखी डोकं वर काढू शकतो, अशी भीती व्यक्त केली जाते आहे.
इथियोपियातल्या गोंधळाचा इजिप्तला मात्र. फायदा होऊ शकतो. कारण इथे उगम पावणाऱ्या ब्लू नाईल नदीवरील मोठ्या धरणावरून दोन्ही देशांमध्ये वाद आहे. या धरणाचा परिणाम इजिप्तमध्ये वाहात येणाऱ्या नाईलच्या प्रवाहावर होणार आहे.
जगासाठी इथियोपिया महत्त्वाचा का आहे?
आफ्रिका आणि पश्चिम आशियातील अनेक देशांप्रमाणेच भारताशीही इथियोपियाचं सांस्कृतिक नातं आहे. या देशात आजही भारतीय नागरीक आणि भारतीय वंशाचे लोक राहतात. त्यांना या प्रदेशात प्रवास न करण्याच्या सूचना इथियोपियातील भारतीय दूतावासानं दिल्या आहेत.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 1
जागतिक व्यापाराच्या दृष्टीनंही इथियोपिया महत्त्वाचं प्रगतीशील राष्ट्र आहे. आफ्रिकन युनियनचं मुख्यालय इथियोपियातच आहे.
आफ्रिका खंडाच्या नकाशात एडनच्या आखाताजवळ गेंड्याच्या शिंगासारख्या आकाराचा जो भूप्रदेश दिसतो, त्याला 'हॉर्न ऑफ आफ्रिका' म्हणून ओळखलं जातं. इथियोपिया या हॉर्न ऑफ आफ्रिकामधलं महत्वाचं राष्ट्र आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 2
हॉर्न ऑफ आफ्रिकाजवळच्या समुद्रातूनच युरोप आणि आशियाला जोडणारा जगातला एक अतिशय महत्त्वाचा व्यापारी मार्ग जातो. सुवेझ कालव्यातून तांबड्या समुद्रामार्गे जहाजं एडनच्या आखातातून अरबी समुद्रात येतात. भारताच्या दृष्टीनं म्हणूनच या प्रदेशात शांतता असणं गरजेचं आहे.
आणखी एक गोष्ट म्हणजे WHOचे विद्यमान अध्यक्ष टेड्रोस अधानोम घेब्रेयेसुसहे इथियोपियाच्या तिग्रे प्रांतातले आहेत, जिथे युद्धाचे ढग जमा झाले आहेत. अर्थात आपण या युद्धात कुणा एकाची बाजू घेत असल्याचे आरोप त्यांनी आधीच नाकारले आहेत आणि शांततेसाठी देशवासियांना विनंती केली आहे.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








