फेसबुक आणि अॅपलमधल्या वादाची ही आहेत खरी कारणं...

टिम कूक आणि मार्क झुकरबर्ग

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, जेम्स क्लेंटन
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

कोका कोला वि. पेप्सी, बोईंग वि. एअरबस, मॅकडोनल्ड वि. बर्गर किंग ही काही मोठी कॉर्पोरेट युद्ध सर्वांच्याच परिचयाची आहेत. या कॉर्पोरेट युद्धांमध्ये एक गोष्ट समान आहे : प्रतिस्पर्धा असणाऱ्या कंपन्या एकाच व्यवसायात आहेत.

आणि म्हणूनच फेसबुक आणि अॅपल या दोन कंपन्यांमधलं वैर अनाकलनीय आहे. या दोन तंत्रज्ञान कंपन्या आहेत, एवढं साम्य वगळलं तर त्यांचा व्यवसाय वेगवेगळा आहे.

फेसबुकचा सर्व महसूल हा जाहिरातीतून येतो तर अॅपलला जाहिरातीतून मिळणारा महसूल अत्यल्प आहे. अॅपलला जो पैसा मिळतो तो प्रामुख्याने डिव्हाईसेस आणि अॅप स्टोरमधून येतो. त्यामुळे या दोन कंपन्यांमध्ये थेट स्पर्धा नाही.

फेसबुक जाहिरातींच्या माध्यमातून पैसा कमवत असल्यामुळे फेसबुक आपल्या यूजर्सला ग्राहक मानतो, असं अॅपलचे टिम कुक यांचं म्हणणं आहे. इतकंच नाही तर फेसबुक यूजर्सच्या गोपनीयतेशी खेळत असल्याचंही त्यांचं म्हणणं आहे.

तर अॅपलची उत्पादनं महागडी आहेत आणि फेसबुकवर टीका करण्याचा त्यांचा छुपा हेतू आहे, असं फेसबुकच्या मार्क झकरबर्ग यांचं म्हणणं आहे.

या दोन कंपन्यांच्या भांडणात गेल्या आठवड्यात नव्या वादाची भर पडली.

जखमेवर मीठ

यावर्षीच्या सुरुवातीला अॅपलने एक नवीन फिचर आणणार असल्याची घोषणा केली होती. 'अॅप ट्रॅकिंग ट्रान्स्पेरंसी' असं या फिचरचं नाव आहे. लोकांना त्यांच्या खाजगी डेटावर अधिक नियंत्रण ठेवता यावं, हा या फिचरचा उद्देश आहे.

फेसबुक किंवा इतर कुठलंही अॅप वापरण्यासाठी पूर्वी यूजरची जी माहिती न विचारता घेतली जायची ती माहिती घेण्यासाठी यूजरची परवानगी आवश्यक करणारं हे फिचर आहे.

मात्र, टार्गेटेड जाहिराती दाखवून बक्कळ नफा कमावणाऱ्या फेसबुकसाठी ही मोठी अडचण आहे. या फीचरमुळे आपल्या व्यवसायाचं मोठं नुकसान होईल, असं फेसबुकने जाहीरपणे म्हटलं आहे.

तिकडे अॅपलनेही डेव्हलपर्सना तयारी करण्यासाठी हा प्रस्ताव पुढच्या वर्षीपर्यंत लांबणीवर टाकला आहे. अॅपलने गेल्या आठवड्यात एक पत्र जारी करत नवे बदल वर्षभर लांबणीवर का टाकले, याचं कारण सांगितलं.

"शक्य तेवढा डेटा गोळा करण्याचा त्यांचा इरादा असल्याचं फेसबुकने स्पष्ट केलं आहे. मात्र, यामुळे यूजरच्या गोपनीयतेकडे दुर्लक्ष होत आहे", असं या पत्रात म्हटलं आहे.

याला फेसबुकनेही उत्तर दिलं आहे. "मार्केटमधलं स्वतःचं वर्चस्व वापरून केवळ स्वतःलाच डेटा मिळावा, यासाठीचा हा प्रयत्न आहे. मात्र, यामुळे त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांना तोच डेटा मिळवणं जवळपास अशक्य होईल."

इतकंच नाही तर "आपण गोपनीयतेसाठी हे फिचर आणत असल्याचं त्यांचं म्हणणं असलं तरी यामागचा मूळ उद्देश नफा कमावणे हाच आहे", असंही फेसबुकने म्हटलं आहे.

फेसबुकपेक्षा आपलं बिझनेस मॉडल उत्कृष्ट असल्याचा अभिमान बाळगणाऱ्या अॅपलसाठी फेसबुकचं हे उत्तर म्हणजे भळभळत्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार आाहे.

अॅपल आणि फेसबुकमधला हा वादा गेल्या एक-दोन वर्षातला नाही. अॅपलचे संस्थापक स्टिव्ह जॉब्ज यांनी 2010 सालीच फेसबुकला गोपनीयतेवरून खडे बोल सुनावले होते.

तर 2018 साली अॅपलचे विद्यमान मालक टीम कुक यांनी "फेसबुकच्या पावलावर पाऊल ठेवून नफा कमावण्यासाठी जाहिराती दाखवण्याचा मार्ग अॅपललाही स्वीकारता आला असता मात्र आम्ही तसं न करण्याचा निर्णय घेतला", असं म्हटलं होतं.

सिलिकॉन व्हॅलीमधले गुंतवणूकदार रॉजर मॅकनॅमी हेसुद्धा फेसबुकचे टीकाकार आहे. त्यांनी फेसबुकवर 'Zucked' हे समिक्षात्मक पुस्तक लिहिलं आहे.

ते म्हणतात, "ग्राहकांना अधिकाधिक सक्षम करणं, ही अॅपलची संस्कृती आहे. याउलट फेसबुकची संस्कृती यूजरचं शोषण करते."

"ऐतिहासिकरित्या अॅपलकडे इतरांवर टीका करण्याची अनेक कारणं होती. मात्र, त्यांनी तसं केलं नाही. पण फेसबुकवर जाहीर टीका केली. यावरूनच फेसबुकची वर्तणूक त्यांना किती अपमानास्पद वाटली असावी, याचा अंदाज येतो."

असं असलं तरी फेसबुकच्या आरोपांमध्ये तथ्य आहे का? अॅपल मार्केटमधल्या वर्चस्वाचा वापर करत प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम करण्याचा प्रयत्न करत आहे का?

फेसबुक

फोटो स्रोत, Reuters

अॅपलला या घडीला जाहिरातींमधून मिळणारा पैसा कमी असला तरी येत्या काही वर्षांत त्यात मोठी वाढ होईल, असं मॉर्गन स्टेनलीचं म्हणणं आहे.

याचा अर्थ केवळ स्वतःचा फायदा व्हावा, यासाठी फेसबुकला यूजरचा डेटा गोळा करण्यापासून रोखण्याचा अॅपलचा डाव आहे का?

तर हेदेखील बुद्धीला पटणारं नाही.

गोपनीयतेची जाहिरात

अमेरिकेतल्या टीव्हीवर सध्या अॅपलची एक जाहिरात दाखवली जात आहे. यूजरची गोपनीयता अॅपलसाठी किती महत्त्वाची आहे, असा या जाहिरातीचा विषय आहे.

या जाहिरातीची टॅग लाईन आहे, "काही गोष्टी शेअर करायच्या नसतात आणि यात अॅपल तुमची मदत करेल."

यावरूनच 'गोपनीयता' लोकप्रिय असल्याचा विश्वास अॅपलला असल्याचं स्पष्ट होतं. आणि याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.

डेव्हलपर्ससाठी अन्यायकारक

दरम्यान, अॅपलवर एकाधिकारशाहीचे आरोप होत आहेत. अॅप स्टोअरच्या माध्यमातून अॅपल डेव्हलपर्सवर अन्यायकारक अटी लादत असल्याच्या आरोपांवरून अॅपलवर अनेक कायदेशीर कारवाया सुरू आहेत.

इतकंच नाही तर अॅपल कर भरत नसल्याचेही आरोप त्यांच्यावर करण्यात येतात. अॅपलने मात्र, या आरोपांचा कायमच इन्कार केला आहे.

अॅपलचे मालक कुक यांनी सर्वप्रथम 2014 साली झकरबर्ग यांच्यावर सार्वजनिकरित्या टीका करत फेसबुक आपल्या ग्राहकांना उत्पादन समजत असल्याचं म्हटलं होतं.

या आरोपाला टाईम मॅगझिनशी बोलताना फेसबुकने प्रत्युत्तर दिलं. त्यात ते म्हणतात, "अॅडव्हर्टाइझिंग बिझनेस मॉडल म्हणजे ग्राहकांची पिळवणूक आहे, अशी जी तुलना केली जाते, हे अत्यंत निराशाजनक आहे."

"आणि तुम्हाला काय वाटतं अॅपलला ग्राहकांची काळजी आहे. अॅपलला ग्राहकांची काळजी असती तर त्यांनी त्यांची उत्पादनं खूप स्वस्त केली असती."

खरंतर हा युक्तीवाद बरोबरही आहे. अॅपल जगातल्या सर्वात श्रीमंत कंपन्यांपैकी एक आहे.

आवाजी युद्ध (Phoney War)

या दोन कंपन्यांच्या भांडणातला आणखी एक विचित्र पैलू म्हणजे या दोन्ही कंपन्या एकमेकांवर अवलंबून आहेत.

आयफोनवर फेसबुक आणि फेसबुकच्याच मालकीचे व्हॉट्सअॅप आणि इन्स्टाग्राम हे अॅप नसतील तर ग्राहकांचा अॅपलकडे ओढा कमी होईल. याउलट आयफोनवर फेसबुक वापरता आलं नाही तर लोक इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मकडे वळतील का?

फेसबुक, अॅपल

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, अॅपलचे चीफ एक्झ्युक्युटीव्ह टिम कुक

यावरून या दोन कंपन्यांमध्ये उत्तम व्यावसायिक संबंध असणं गरजेचं असल्याचं स्पष्ट होतं. मात्र, तशी परिस्थिती नाही.

या दोन्ही कंपन्यांचा जगाकडे बघण्याचा दृष्टीकोन वेगवेगळा आहे आणि यांच्यातला वाद हा सांस्कृतिक आणि वैयक्तिक आहे, असं अॅपल एक्सपर्ट कॅरोलिना मिलॅनेसी यांना वाटतं.

त्या म्हणतात, "तात्विकदृष्ट्या या दोन्ही कंपन्या पूर्णपणे भिन्न आहेत."

"फेसबुक ग्राहकविरोधी वागत असल्याचं अॅपलला प्रकर्षाने वाटत असेल तर त्यांनी आपल्या डिव्हायसेसवर फेसबुक अॅप का ठेवलं आहे?"

आणि हीच खरी मेख आहे. आतापर्यंत या दोन कंपन्या एकमेकांवर फक्त आरोप-प्रत्यारोप करत होत्या. प्रत्यक्षात मात्र दोघांनी कधीही एकमेकांविरोधात कुठलंही पाऊल उचललं नाही. उलट त्या एकमेकांवर अवलंबूनच होत्या.

म्हणजेच आतापर्यंत या दोन कंपन्यांमध्ये 'आवाजी युद्ध' सुरू होतं. आवाजी युद्ध म्हणजे असा काळ ज्यात दोन शत्रूंमध्ये युद्ध सुरू असलं तरी कुणीही प्रत्यक्ष हल्ला करत नाही.

आता मात्र परिस्थिती बदलली आहे. नव्या फिचरच्या घोषणेसह अॅपलने एकप्रकारे युद्धाचं बिगुलच वाजवलं आहे. गोपनीयतेसाठी अॅपलचा अतिआग्रह फेसबुकच्या हिताचा नाही.

अॅपलच्या नव्या नियमांमुळे सोशल नेटवर्कलाच बाधा पोहोचणार आहे. फेसबुकची खरी स्पर्धा गुगलशी आहे तर अॅपलची मायक्रोसॉफ्ट आणि गुगलशी.

मात्र, गोपनीयतेच्या मुद्द्यावरून अॅपल आणि फेसबुकमध्ये वादाची ठिणगी पडली आहे. 2021 मध्ये हा वाद अधिकच चिघळलेला असेल.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)