कोरोना व्हायरसः कोव्हिड-19 विरोधात लढायला गुगल-अॅपल कसे आले एकत्र?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, लिओ केलिन
- Role, टेक्नॉलॉजी डेस्क एडिटर
कोरोना विषाणूचा वाढता फैलाव बघता तंत्रज्ञान क्षेत्रातल्या गुगल आणि अॅपल या दोन दिग्गजा कंपन्यांनी एकत्र येत मोठी घोषणा केली आहे. या दोघांनी एकत्रितपणे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग टूल तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. तुम्ही कोरोनाग्रस्त रुग्णाच्या संपर्कात आला असाल तर हे तंत्रज्ञान तुम्हाला तुमच्या फोनवर याची माहिती देईल. यात युजरजी ओळख पूर्णपणे गुप्त ठेवली जाणार आहे.
या दोन्ही कंपन्या मिळून ब्लूटुथवर आधारित कोरोना विषाणू कॉन्टॅक्ट ट्रेसिंग अॅप तयार करणार आहेत.
ब्लूटूथ सिग्नलच्या माध्यमातून मोबाईल वापरणारी व्यक्ती गेल्या काही दिवसात सर्वात जास्त वेळा कुणाच्या संपर्कात आली होती याचा रेकॉर्ड ठेवला जाईल. यापैकी कुणाचीही कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यास यूजरच्या मोबाईलवर अलर्ट पाठवण्यात येईल. असा अलर्ट आल्यावर चाचणी करायची की घरात क्वारंटाईन राहायचं, याचा निर्णय युजरला घेता येईल. यासाठी तुमचं गुगल लोकेशन किंवा तुमची इतर कुठलीही खासगी माहिती मागितली जाणार नाही, अशी खात्री देण्यात आली आहे.
यासंबंधी अॅपल आणि गुगल यांनी एक पत्रक प्रसिद्ध केलं आहे. या पत्रकात म्हटलं आहे, "आमच्या या प्रयत्नात खासगी माहितीची गुप्तता, पारदर्शकता आणि युजरची सहमती यांना सर्वाधिक महत्त्व असेल. आमच्या कामाची इतरांनाही समीक्षा करता यावी, यासाठी कामासंबंधीचे तपशील आम्ही सार्वजनिक करणार आहोत."

- वाचा- महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं कोणती आणि त्याच्यापासून कसं संरक्षण करता येतं?
- वाचा - कोरोना व्हायरसबद्दलच्या तुमच्या मनातील 11 प्रश्नांची उत्तरं जाणून घ्या
- वाचा - क्वारंटाईन, आयसोलेशन किंवा विलगीकरण म्हणजे नेमकं काय?
- वाचा -लहान मुलांना कोविड 19 चा धोका किती?
- वाचा - व्हेंटिलेटर्स काय असतात? कोरोनाच्या लढ्यात ते इतके महत्त्वाचे का आहेत?
- वाचा - कोरोनाच्या तडाख्यामुळे भारतीय अर्थव्यवस्था अजूनच संकटात?

मात्र, यावर विचार करण्यासाठी वेळ हवा, असं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे.
व्हाईट हाऊसमधल्या पत्रकार परिषदेत बोलताना ट्रम्प म्हणाले, "हा प्रयत्न चांगला आहे. मात्र, अनेकांना खासगी माहिती उघड होण्याची भीती वाटते. त्यामुळे आम्ही या उपक्रमाचा सखोल अभ्यास करू आणि लवकरच तुम्हाला कळवू."
युरोपीय महासंघाच्या डेटा प्रोटेक्शन सुपरव्हाईझरची भूमिका मात्र बरीच सकारात्मक होती. ते म्हणाले, "यावर अजून बरंच काम करावं लागेल. मात्र, पहिल्या नजरेत युजरची सहमती, डेटा सुरक्षितता आणि पॅन युरोपीनयन पोर्टिबिलीटी या सर्व बाबींची पूर्तता होताना दिसते."
मात्र, जास्तीत जास्त लोकांची चाचणी झाली तरच या कॉन्टॅक्ट ट्रेसिंग टूलचा लोकांना फायदा होणार आहे.
अॅपलने iOS ऑपरेटिंग सिस्टिम डेव्हलप केली आहे तर गुगल अँड्रॉइड बेस्ड आहे. जगातले बहुतांश स्मार्टफोन याच दोन ऑपरेटिंग सिस्टिमवर चालतात.
सिंगापूर, इस्राईल, दक्षिण कोरिया आणि पोलंड यासारखे देश आधीपासूनच कोरोना विषाणुच्या संसर्गाविषयीचे अपडेट देण्यासाठी स्मार्टफोनचा वापर करत आहेत.

फोटो स्रोत, Getty Images
युके, फ्रान्स आणि जर्मनी स्वतः काही ट्रेसिंग टूल बनवण्याच्या विचारात आहेत. तर अमेरिकेतले काही प्रांतं थर्ड पार्टी अॅप घेण्याच्या तयारीत आहेत.
याद्वारे कॉन्टॅक्ट ट्रेसिंगच्या वेगवेगळ्या थर्ड पार्टी अॅप्समध्ये सुसंगतता आणली जाईल. त्यामुळे हे अॅप्स इंटरपोर्टेबल होतील. या इंटरपोर्टेबिलिटीमुळे एखादी व्यक्ती कामानिमित्त परदेशात जरी गेली आणि तिथे कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचं वेगळं अॅप वापरणाऱ्या व्यक्तीच्या संपर्कात आली, तरीदेखील तुम्हाला कोरोना विषाणुच्या संसर्गाविषयीचे अलर्ट मिळत राहतील.
या दोन्ही कंपन्या गेल्या दोन आठवड्यांपासून यावर काम करत आहेत. अशा प्रकारचं इंटरपोर्टेबल टूल तयार करण्यात यश मिळालं तर अनेक देशांना लॉकडाऊन शिथील करता येईल, आंतरराष्ट्रीय सीमाही काही प्रमाणात खुल्या करता येतील, असं गुगल आणि अॅपलचं म्हणणं आहे.
सर्व प्रक्रिया फोनवरच होणार
कॉन्टॅक्ट ट्रेसिंगसाठी या दोन कंपन्या एक API आणणार आहेत. हा API मे महिन्याच्या मध्यापर्यंत पूर्ण होईल, अशी आशा या कंपन्यांनी व्यक्त केली आहे.
हा API आयोएस आणि अँड्रॉईड या दोघांना माहिती शेअर करण्यास मदत करेल. शिवाय, इतर अॅप्सदेखील या API वर चालू शकतील.
युजरचे डिजीटल आयडी रिमोट कॉम्प्युटर सर्व्हर्सवर सेव्ह होतील. मात्र, त्याचा उपयोग एखाद्याची ओळख उघड करण्यासाठी करता येणार नाही.
इतकंच नाही तर कॉन्टॅक्ट मॅचिंगची प्रक्रिया केंद्रीय म्हणजेच सेंट्रलाईज्ड नसेल. ही प्रक्रिया स्मार्टफोनवरच होईल. म्हणजे तुम्ही एखाद्या कोरोनाग्रस्ताच्या संपर्कात आला असाल तर ते शोधून काढण्याची प्रक्रिया ही तुमच्या फोनवरच होईल आणि त्याचा अलर्ट हा केवळ तुमच्या फोनवर येईल. इतर कुणालाही याची माहिती मिळणार नाही. म्हणजे तुम्हाला क्वारंटाईन होण्याचा अलर्ट आला असेल तर ते इतर कुणाला कळणार नाही. तुमची ओळख पूर्णपणे गुप्त राहील.

फोटो स्रोत, HINDUSTAN TIMES
युजरची प्रायव्हसी सुरक्षित राहावी, यासाठी जे क्रिप्टोग्राफी स्पेसिफिकेशन्स वापरण्यात येणार आहेत, त्याचे तपशील आणि ब्लूटूथची काय भूमिका असेल, याचे तपशील कंपन्यांनी सार्वजनिक केले आहेत. कंपन्यांची विश्वासार्हता जपण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
याचा एक फायदा असाही आहे की यामुळे आयओएस किंवा अँड्रॉईडमध्ये अपडेट्स आले तरी त्याचा अॅपवर परिणाम होणार नाही. अॅप नव्या अपडेट्सना इनकम्पॅटिबल होणार नाहीत.
इतकंच नाही तर कॉन्टॅक्ट ट्रेसिंगसाठी सध्या ज्या पद्धती वापरल्या जातात त्यापेक्षा या पर्यायासाठी बॅटरीही कमी वापरली जाईल.
अॅपचीही गरज उरणार नाही
गुगल आणि अॅपल दोन टप्प्यात या पर्यायाची अंमलबजावणी करणार आहेत. पहिल्या टप्प्यात ते API जारी करून अॅपच्या माध्यमातून कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करणार आहेत. मात्र, दुसरा टप्पा जास्त विश्वासार्ह असणार आहे.
दुसऱ्या टप्प्यात आयओएस आणि अँन्डॉईड या ऑपरेटिंग सिस्टिम्समध्येच कॉन्टॅक्ट ट्रेसिंग इनबिल्ट करण्याचा कंपन्यांचा विचार आहे. जेव्हा ऑपरेटिंग सिस्टिममध्येच कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचा पर्याय उपलब्ध होईल, तेव्हा वेगळा अॅप डाऊनलोड करण्याची गरज नाही. नुसतं सेटिंगमध्ये कॉन्टॅक्ट ट्रेसिंग पर्याय ऑन किंवा ऑफ करून ही सुविधा वापरता येईल.
असं असलं तरी मान्यता मिळालेले थर्ड पार्टी अॅप्ससुद्धा ही सुविधा वापरू शकतील.
भविष्यात स्वॉफ्टवेअर अपडेटच्या माध्यमातून ही सुविधा देण्यात येईल. मात्र, यासाठी किती काळ लागेल. हे नवे अपडेट कधी येतील, हे आत्ताच सांगता येत नाही, असं कंपन्यांचं म्हणणं आहे.
कॉन्टॅक्ट ट्रेसिंगमध्ये युजरची ओळख उघड होणार नाही, याची सर्व काळजी घेत असल्याचं कंपन्यांनी सांगितलं असलं तरी अॅप डाऊनलोड केल्यास आपली माहिती सार्वजनिक होते, अशी भीती काहींना असते. असे लोक अॅप डाऊनलोड करायला कचरतात. तेव्हा ऑपरेटिंग सिस्टिममध्येट कॉन्टॅक्ट ट्रेसिंगची सुविधा मिळाल्यास जास्तीत जास्त लोक त्याचा वापर करतील, असं कंपन्यांना वाटतं.

फोटो स्रोत, Reuters
शिवाय जेव्हा हे आरोग्य संकट टळेल तेव्हा प्रांतनिहाय कॉन्टॅक्ट ट्रेसिंग डिसेबल म्हणजे बंद करणं, कंपन्यांनाही अधिक सोपं होणार आहे.
गुगल आणि अॅपलने मिळून तंत्रज्ञानाच्या सहाय्याने कोरोनावर मात करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. तसेच प्रयत्न इतरत्रही सुरू आहेत.
1 एप्रिल रोजी पॅन-युरोपीयन प्रायव्हसी-प्रिझर्व्हिंग प्रॉक्झिमिटी ट्रेसिंग (PEPP-PT) या उपक्रमाची घोषणा करण्यात आली. यातही तुम्ही संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात आला होता का, याची माहिती देणारं टूल तयार करण्यात येत आहे.
130 तंत्रज्ञ आणि शास्त्रज्ञ याकामी लागेल आहेत आणि या टीमने युरोपातल्या अनेक देशांशी संपर्कही केला आहे.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








