कमला हॅरिस यांच्या विजयानंतर अमेरिकेत भारतीयांचं प्रस्थ वाढेल का?

कमला हॅरिस, अमेरिका, भारतीय

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, अमेरिकेत भारतीयांचं प्रमाण खूप आहे.
    • Author, सलीम रिझवी
    • Role, न्यूयॉर्कहून, बीबीसी हिंदीसाठी

अमेरिकेतील 2020 सालच्या निवडणुकीमध्ये डेमॉक्रेटिक पक्षाचे उमेदवार जोसेफ बायडन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आले आहेत, तर कमला हॅरिस उपराष्ट्राध्यक्ष पदावर निवडून आल्या आहेत.

भारतीय वंशाच्या कमला हॅरिस यांनी या विजयासह इतिहास घडवला आहे. त्या अमेरिकी उपराष्ट्राध्यक्षाच्या पदावर विराजमान होणाऱ्या पहिल्या स्त्री, पहिल्या भारतीय वंशाची व्यक्ती आणि पहिल्या श्वेतवर्णीय नसलेल्या व्यक्ती असणार आहेत.

कॅलिफोर्नियातील ऑकलंडमध्ये जन्मलेल्या कमला हॅरिस यांची आई श्यामला गोपालन मूळ भारतातील चेन्नईच्या होत्या आणि त्यांचे वडील डोनाल्ड हॅरिस मूळचे जमैकाचे.

हॅरिस त्यांच्या आईसोबत भारतात येत-जात असत. अजूनही त्यांचे काही नातलग भारतात आहेत.

अमेरिकेत राहणाऱ्या आणि भारतीय मुळं असलेल्या बहुतेक लोकांची कथा कमला हॅरिस यांच्यासारखीच आहे. त्यांचे आईवडील शिक्षण व मेहनत करून जीवनात पुढे जात राहण्याची उमेद देत आले आहेत.

अमेरिकेमध्ये वर्ण व वंश यांवरून भेदभावाचा इतिहास राहिलेला आहे. आपल्या रंगावरून आपल्याला भेदभावाने वागवलं जातं, अशी भावना अजूनही काही प्रमाणात श्वेतवर्ण नसलेल्या लोकांमध्ये आहे.

अमेरिकेमध्ये 1960 च्या दशकात श्वेतवर्णीय नसलेल्या लोकांना वर्ण व वंश या आधारावर सातत्याने भेदभावाला सामोरं जावं लागत होतं, परंतु त्या भयावह कालखंडापासून अमेरिका आता बरीच दूर आली आहे.

बराक हुसेन ओबामा 2008 साली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाले, हा याचा सर्वांत मोठा दाखला होता.

कमला हॅरिस, अमेरिका, भारतीय

फोटो स्रोत, AFP

फोटो कॅप्शन, कमला हॅरिस

अशा वातावरणात कमला हॅरिस यांनी ऐतिहासिक विजय मिळवून भारतीय वंशाच्या लोकांना, विशेषतः नवीन पिढीसमोर दाखला घालून दिला आहे. अमेरिकेमध्ये कष्ट केलं तर सर्वाधिक उंचीच्या पदांवरही पोहोचणं शक्य आहे, अशी उमेद त्यांच्या निमित्ताने या पिढीला मिळाली.

अमेरिकेत भारतीयांची कर्तबगारी

भारतातून अमेरिकेत येऊन स्थायिक होणाऱ्यांची संख्या 1960च्या दशकात वाढली होती. मग पुढच्या चार दशकांमध्ये हळूहळू लाखो भारतीय लोक अमेरिकेत स्थायिक झाले.

अमेरिकेतील जनगणना विभागाच्या 1980 सालच्या आकडेवारीनुसार अमेरिकेमध्ये जवळपास 3 लाख 60 हजार भारतीय वंशाचे लोक राहत होते.

1990 साली त्यांची संख्या वाढून 10 लाखांपर्यंत पोचली आणि भारतीय वंशाच्या लोकांनी अमेरिकेतील माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये प्रवेश केला, तेव्हा 2000 साली ही संख्या 20 लाखांपर्यंत पोचली.

अमेरिकी जनगणना विभागाच्या आकडेवारीनुसार, 2010साली अमेरिकेतील भारतीय लोकांची संख्या 70 टक्क्यांनी वाढून जवळपास 28 लाख 43हजारांपर्यंत पोचली होती.

एका अंदाजानुसार, अमेरिकेत राहणाऱ्या मूळच्या भारतीय लोकांची संख्या आता सुमारे 40 लाख आहे.

अमेरिकेतील माहिती-तंत्रज्ञान, वैद्यक, व्यवसाय, राजकारण व शिक्षण अशा महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये भारतीय लोकांनी आपली कर्तबगारी गाजवली आहे.

कमला हॅरिस, अमेरिका, भारतीय

फोटो स्रोत, THOMAS B. SHEA/GETTY IMAGES

फोटो कॅप्शन, अमेरिकेत भारतीय मोठ्या प्रमामावर राहतात.

गुगल, मायक्रोसॉफ्ट यांसारख्या माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांचे सीईओ असोत किंवा पेप्सीसारख्या बहुराष्ट्रीय कंपन्यांमधील महत्त्वाची पदं असोत, भारतीय वंशाच्या लोकांनी अशा ठिकाणी आपली क्षमता सिद्ध केली आहे.

याच प्रमाणे वैद्यकीय क्षेत्रासह शिक्षण क्षेत्रातही भारतीय वंशाचे लोक महत्त्वाच्या पदांवर असल्याचं दिसतं.

यात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्या कोव्हिड कृतिपथकाचे प्रमुख विवेक मूर्ती यांचाही समावेश आहे.

यापूर्वी भारतीय वंशाचे बॉबी जिंदाल लुइसियाना आणि निकी हेली दक्षिण कॅरोलिनामध्ये गव्हर्नर पदावर राहिलेले आहेत. जिंदाल अमेरिकी प्रतिनिधीगृहाचेही सदस्य होते आणि निकी हेली संयुक्त राष्ट्रांमध्ये अमेरिकेच्या प्रतिनिधी होत्या.

चित्रपट व कला क्षेत्रामध्ये ऑस्कर, ग्रॅमी पुरस्कारांसह हॉलिवूडमध्ये आत्तापर्यंत अनेक भारतीय कलाकारांनी आपला ठसा उमटवला आहे.

राजकारणातही भारतीय पुढे येत आहेत

अमेरिकेत भारतीय समुदाय आर्थिक बाजूने बळकट अवस्थेत आहे आणि विविध राजकीय समूहांच्या निवडणुकीय निधीमध्येही या समुदायाचा सहभाग अधिकाधिक राहिलेला आहे.

आता भारतीय वंशाचे लोक अमेरिकेत प्रत्येक स्तरावरील राजकारणात सहभाग घेत आहेत. शालेय मंडळाची निवडणूक असो की शहर मंडळाची निवडणूक असो, शहराचं महापौर पद असो की प्रांतिक सभेतील सदस्यत्व असो, भारतीय वंशाचे लोक पुढाकार घेऊन निवडणूक लढवत आहेत.

सध्या अमेरिकेत प्रतिनिधीगृहामध्ये चार सदस्य भारतीय वंशाचे आहेत.

कमला हॅरिस, अमेरिका, भारतीय

फोटो स्रोत, MOHAMMED JAFFER

फोटो कॅप्शन, अमेरिकेच्या माजी परराष्ट्र मंत्राी हिलरी क्लिंटन यांच्यासह अमेरिकास्थित भारतीय सत सिंह चतवाल

या वेळी 2020 च्या निवडणुकीमध्ये डोनाल्ड ट्रम्प व जो बायडन या दोघांनीही प्रचारमोहिमांमध्ये भारतीय समुदायाला आकर्षित करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. या संदर्भात काही ठिकाणी टीव्हीवर जाहिरातीदेखील दाखवण्यात आल्या.

गेल्या काही निवडणुकांपासून भारतीय वंशाचे लोक दोन्ही पक्षांच्या प्रचारमोहिमांसाठी निधी जमवण्याच्या कार्यक्रमांचंही आयोजन करत आहेत.

न्यूयॉर्कमध्ये डेमॉक्रेटिक पक्षाच्या प्रचारमोहिमेसाठी निधी जमवण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात संत सिंह चटवाल यांच्यासारखे अनेक भारतीय वंशाचे उद्योजक बरेच सक्रिय राहिले होते.

संत सिंह चटवाल यांच्या निधीसंकलनाच्या कार्यक्रमामध्ये जो बायडन व हिलरी क्लिंटन यांच्यासह डेमॉक्रेटिक पक्षाचे अनेक दिग्गज नेते सहभागी झाले होते.

जो बायडन व कमला हॅरिस यांच्या विजयावर संत सिंह चटवाल म्हणाले, "भारतासाठी व भारतीय वंशाच्या लोकांसाठी ही अतिशय आनंदाची बाब आहे. आता अमेरिका व भारत यांच्यातील संबंध अधिक घनिष्ठ होतील. जो बायडन आमचे मित्र आहेत, ते भारतीय भारताचेही मित्र आहेत आणि भारतीय वंशाच्या लोकांचेही मित्र आहेत."

तेव्हापासून आत्तापर्यंत अनेक बदल

तीन-चार दशकांपूर्वी भारतातून अमेरिकेत आलेले अनेक भारतीय वंशाचे अमेरिकी त्यांच्या सुरुवातीच्या दिवसांच्या आठवणी काढतात तेव्हा त्यांना आता जग बरंच बदलल्याचं जाणवतं.

भारतीय वंशाचे अमेरिकी उपेंद्र चिवुकुला आंध्र प्रदेशातील नेल्लोर इथे जन्मले आणि 1970च्या दशकात अमेरिकेत आले.

1980च्या दशकात न्यूयॉर्कमध्ये इलेक्ट्रिकल इंजीनियरिंगची मास्टर्स पदवी मिळवल्यानंतर चिवुकुला एटी-अँड-टी कंपनीमध्ये इंजीनियर म्हणून काम करत होते.

कमला हॅरिस, अमेरिका, भारतीय

फोटो स्रोत, UPENDRA CHIVUKULA

फोटो कॅप्शन, भारतीय वंशाचे उपेंद्र चिवुकुला

चिवुकुला 1990च्या दशकात न्यू जर्सीमधून राजकारणात सहभागी झाले. त्यांनी स्थानिक पातळीवर काम सुरू केलं.

त्या काळी भारतातून आलेल्या खूपच कमी लोकांचा राजकारणाकडे कल होता.

त्या आरंभिक दिवसांची आठवण सांगताना चिवुकुला म्हणतात, "सुरुवातीच्या काळात मी एकटाच स्थानिक राजकारणात काम करत होतो. त्या काळी भारतीय वंशाच्या कमी लोकांकडे ग्रीन कार्ड किंवा अमेरिकी नागरिकत्व असायचं."

"न्यू जर्सीमध्ये 1992 साली एकदा मी भारतीय वंशाच्या लोकांची मतदानासाठी नोंदणी करण्याकरिता एका स्थानिक मंदिरात गेलो. तिथे चार तास बसून राहिल्यानंत केवळ एका व्यक्तीने नोंदणी केली," असं चिवुकुला सांगतात.

मग काही वर्षांनी ते फ्रँकलिन टाउनशिपचे महापौर म्हणून निवडून आले. त्यानंतर 2001 साली चिवुकुला न्यू जर्सीच्या प्रतिनिधीसभेची निवडणूक जिंकले. सौरऊर्जा, ऑफशोअर विंड, कॅप अँड ट्रेड यांसारखी काही प्रमुख विधेयकं त्यांनी मांडली. इंजीनियरिंगची पार्श्वभूमी असल्यामुळे ते तांत्रिक विषयांमध्ये विशेष सहभाग घेऊ लागले, परिणामी त्यांचे सहसदस्य त्यांना 'टेक असेम्ब्लीमॅन' असं म्हणत असत.

चिवुकुला 2014 सालपर्यंत न्यू जर्सी प्रतिनिधीसभेचे सदस्य होते. त्या सहा वर्षांच्या काळात ते सभागृहाचे उपाध्यक्षदेखील होते.

2012 व 2014 या काळात चिवुकुला न्यू जर्सी क्षेत्रातून अमेरिकी प्रतिनिधीगृहाच्या निवडणुकीलाही उभे राहिले, पण डेमॉक्रेटिक पक्षाच्या प्राथमिक निवडणुकीत त्यांचा पराभव झाला.

सध्या चिवुकुला न्यू जर्सीमध्ये युटिलिटी बोर्डाचे आयुक्त आहेत.

भारतीय वंशाचे लोक आता प्रत्येक स्तरावर वर चढून राजकारणामध्ये सहभागी होत आहेत, असं चिवुकुला सांगतात.

कमला हॅरिस उपराष्ट्राध्य झाल्या, त्या संदर्भात ते म्हणतात, "आपल्या भारतीय वंशाची एक स्त्री देशाची उपराष्ट्राध्यक्ष झाली, याचा आम्हाला खूप आनंद आहे. हॅरिस खूप महत्त्वाकांक्षी आहेत आणि त्यांना अनेक संधी उपलब्ध आहेत. आता त्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदापर्यंत कशा पोचतील याचा विचार करावा लागेल."

भारत-अमेरिका आण्विक करारामधील भूमिका

इंडियानामध्ये राहणाऱ्या एका भारतीय अमेरिकी डॉक्टरने अनेक दशकं तिथे वास्तव्य केलं आहे आणि भारतीय समुदायाचा अमेरिकेतील विकास पाहिला आहे.

गुजरातमधील बडोद्यात जन्मलेले अमेरिकी डॉक्टर भारत बराई गेली 45 वर्षं अमेरिकेत राहत आहेत. 1970च्या दशकात त्यांनी भारतातच वैद्यकीय शिक्षण पूर्ण केलं आणि मग ते अमेरिकेत आले. भारत बराई यांनी अमेरिकेत मेडिकल इंटर्नशिप करून स्वतःच्या कारकीर्दीची सुरुवात केली आणि काही दशकांनी ते इंडियाना प्रांताच्या बोर्ड ऑफ फिजिशियन्सचे अध्यक्ष म्हणून नियुक्त झाले. आजघडीला ते या मंडळाचे सर्वांत दीर्घ काळ सक्रिय राहिलेले सदस्य आहेत.

गेल्या 45 वर्षांवर दृष्टिक्षेप टाकून डॉक्टर बराई म्हणतात, "गेल्या अनेक दशकांमध्ये भारतीय समुदाय सक्षम झाला आहे आणि अमेरिकेत मेहनत करून त्यांनी आपला प्रभाव वाढवला आहे."

कमला हॅरिस, अमेरिका, भारतीय

फोटो स्रोत, BHARAT BARAI

फोटो कॅप्शन, जो बायडन अमेरिकेतील भारतीय लोकांबरोबर

70-80च्या दशकांच्या आरंभकाळात भारतीय वंशाच्या डॉक्टरांना अमेरिकेत भेदभावाला सामोरं जावं लागत होतं. भारतीय समुदायातील लोक व डॉक्टर अमेरिकी राजकारण्यांना भेटून अधिकारांसंदर्भात मदतही घेत राहिले आहेत.

हळूहळू भारतीय समुदायाचा प्रभाव इतका वाढला की भारत व अमेरिका यांच्यातील संबंध आणखी घनिष्ठ होण्यामध्ये या समुदायाची भूमिका मोलाची राहिली आहे.

भारत व अमेरिका यांच्यात आण्विक करारासंबंधी चर्चा सुरू होती, तेव्हा अमेरिकी प्रतिनिधीगृहामध्ये या आण्विक करारासंबंधी विधेयक सादर करण्याकरिता प्रायोजक म्हणून डेमॉक्रेटिक सिनेटर जोसेफ बायडन यांची वॉशिंग्टनमध्ये भेट घेतली होती, अशी आठवण भारत बराई सांगतात.

2007 साली बाडयन यांच्याशी झालेल्या या भेटीची आठवण सांगताना बराई म्हणतात, "आण्विक करार आणि भारत-अमेरिका यांच्यातील सहकार्याबाबत आम्ही त्यांना विस्ताराने सांगितलं, त्यावर बायडन यांनी तत्काळ होकार दिला, आणि भारत व अमेरिका यांच्यातील आण्विक करारासंबंधीचं विधेयक सहज मंजूरही झालं."

'बायडन व मोदी यांचीही मैत्री होईल'

भारत बराई यांनी 2014 साली भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा न्यूयॉर्कमधील मेडिसन स्क्वेअर गार्डनमध्ये कार्यक्रम आयोजित केला. त्या वेळी जवळपास 19 हजार लोक उपस्थित होते.

परंतु, 2019 साली ह्यूस्टनमध्ये झालेल्या 'हाउडी मोदी' कार्यक्रमात पंतप्रधान मोदींनी 'अब की बार ट्रम्प सरकार'ची घोषणा द्यायला नको होती, असं भारत बराई म्हणतात. "त्यांनी दुसऱ्या देशाच्या निवडणुकीत हस्तक्षेप करायला नको होता, असं मला वाटतं. त्यांनाही ही गोष्ट चांगलीच कळते."

कमला हॅरिस, अमेरिका, भारतीय

फोटो स्रोत, SAUL LOEB/AFP VIA GETTY IMAGES

फोटो कॅप्शन, बायडन आणि पंतप्रधान मोदी यांचीही मैत्री होईल अशी आशा आहे.

ट्रम्प निवडून आल्यानंतर 2017 साली मोदी यांनी, ट्रम्प विजयी कसे काय झाले, असा प्रश्न आपल्याला विचारल्याचंही बराई सांगतात.

बराई यांनी डेमॉक्रेटिक व रिपब्लिकन या दोन्ही पक्षांना समर्थन दिलं आहे, पण 2020च्या निवडणुकीत त्यांनी ट्रम्प यांना मत दिलं नाही. ट्रम्प यांचं आचरण आणि त्यांची भाषा वायफळ आहे, त्यामुळे त्यांना समर्थन देणं शक्यच नव्हतं, असं बराई सांगतात.

त्यांच्या मुली व कुटुंबातील इतर सदस्य बायडन यांचे समर्थक असल्याचंही ते सांगतात. त्यांची मुलगी इंडियाना प्रांतामध्ये बायडन यांची प्रचारप्रमुख होती.

कमला हॅरिस उपराष्ट्राध्यक्ष झाल्यामुळे आपल्या मुलींची उमेद वाढली असल्याचं बराई म्हणतात.

जो बायडनदेखील अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून भारताशी चांगलं संबंध टिकवून ठेवतील आणि पंतप्रधान मोदींशीही त्यांची चांगली मैत्री होईल, असं भारत बराई म्हणतात.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)