हेपटायटिस सी म्हणजे काय? विषाणूवर संशोधन करणाऱ्या त्रयीला नोबेल पुरस्कार

यंदाचा वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्कार हार्वे जे.अल्टर, मायकेल ह्यूटन आणि चार्ल्स एम.राईस यांना जाहीर झाला आहे. हेपटायटिस- सी या विषाणूच्या शोधासाठी या त्रिकुटाला प्रतिष्ठेच्या पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. नोबेल पुरस्कार समितीने याची घोषणा केली.

रक्तालील हेपटायटिस सी विषाणूमुळे सिरोसिस आणि यकृताच्या कर्करोगासारखे आजार होतात. या आजारांशी लढा देण्यासाठी या तिन्ही वैज्ञानिकांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले.

या वैज्ञानिकांच्या योगदानामुळे इतिहासात पहिल्यांदाच हेपटायटिस सी विषाणूंमुळे होणारे आजार बरे होऊ शकतात.

मानवजातीसाठी वरदान ठरलेल्या या संशोधनामुळे यासंबंधीच्या आजारांसाठी संभाव्य रक्त चाचण्या करता येणे शक्य झाले आणि लाखो लोकांचं जीवन वाचवू शकतील अशी औषधं तयार केली गेली.

11 लाख 20 हजार डॉलर्स असं या पुरस्कारासाठीच्या बक्षीस रकमेचं स्वरुप आहे.

भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, साहित्य आणि शांततेच्या क्षेत्रातील नोबेल पुरस्कारांचीही घोषणा करण्यात येणार आहे. अर्थशास्त्राचं नोबेल पुढील आठवड्यात जाहीर होईल. यंदाच्या शांततेसाठीच्या नोबेल पुरस्कारांच्या शर्यतीत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांचाही समावेश आहे.

हेपटायटिस सी म्हणजे काय?

  • रक्ताचा घटक असलेला विषाणू यकृतावर आक्रमण करतो. यामुळे यकृताच्या कामकाजात अडथळा निर्माण होतो आणि वेळीच उपचार झाले नाहीत तर कर्करोगाचा धोका संभवतो.
  • हा रक्तातून रक्तात संक्रमित होणारा विषाणू आहे. ड्रग्सचं सेवन करणारी माणसं, बेघर माणसं, आपापसात शरीरसंबंध ठेवणारे पुरुष यांना या हा आजार होण्याची शक्यता असते.
  • दूषित रक्त आणि रक्ताशी संल्गन गोष्टीतून असंख्यजणांना या आजाराचा संसर्ग झाला होता.
  • हेपटायटिस सी विषाणूने संक्रमित झालेल्या रुग्णांमध्ये थोडी लक्षणं आढळतात किंवा काहीच लक्षणं आढळत नाहीत. त्यामुळे अनेक वर्षं ते या विषाणूसह जगत असतात. या आजाराचं निदान होत नाही त्यामुळे उपचार सुरू होऊ शकत नाहीत. यकृतावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता असते.
  • हेपटायटिस सी हा बरा होणारा आजार आहे तसंच त्याचा प्रसार रोखता येऊ शकतो. या आजाराच्या संसर्गातून बरं होण्याचं प्रमाण 95 टक्के इतकं आहे.
  • युकेत स्कॉटलंडमध्ये हेपटायटिस सीचे सर्वाधिक रुग्ण आढळून येतात.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)