महिला आरोग्य : 'मी माझ्या अंगावरचे व्रण लपवणं सोडून दिलं'

फोटो स्रोत, ENA MILLER
जेनी, एमिली आणि लॉरा... ब्रिटनमध्ये राहाणाऱ्या या तीन वेगवेगळ्या वयाच्या, वेगवेगळ्या पार्श्वभूमीच्या महिला. पण तिघींमध्ये एक गोष्ट समान आहे, तिघींच्या अंगावर मोठमोठे व्रण आहेत. चौथी एमी, जिला सोरायसिस आहे, त्यामुळे तिच्या चेहरा लाल चट्ट्यांनी भरून जातो.
सौदर्यांच्या सरधोपट आणि प्रसंगी महिलांना कमी लेखणाऱ्या व्याख्येत या महिला बसत नाहीत. पण तरीही यांनी आपला रस्ता शोधून काढला आहे, आणि आपल्या अस्तित्वावर प्रेम करायला शिकल्या आहेत. या त्यांच्याच प्रेरणादायी कहाण्या.
'माझे पाय असे दिसायचे जणू मी एखादी झोंबी आहे'
मला लायपोएडिमा नावाचा त्रास होता, यामुळे माझं शरीर बेढब झालं होतं. म्हणजे नुसतं वजन वाढलं नव्हतं तर माझ्या शरीराच्या वरच्या भागाच्या तुलनेत कमरेखालच्या भागाची अनैसर्गिक वाढ झाली होती. मला सांगितलं गेलं की यावर काही औषध नाही.

फोटो स्रोत, ENA MILLER
मग एक दिवस मी ऑपरेशन करून या त्रासावर उपचार करण्याचा निर्णय घेतला. मला त्यासाठी खूप हिंमत करावी लागली पण ऑपरेशन झालं. आता मला मनासारखे कपडे घालता येतील, मी चारचौघांसारखी नॉर्मल दिसेन याच आनंदात मी होते. पण ऑपरेशनच्या पाचव्या दिवशी मी खूप आजारी पडले.
मला फ्लेश इटिंग बॅक्टेरियाचं (मांस खाणाऱ्या बॅक्टेरीया) इन्फेक्शन झालं होतं. माझ्या मांडीपासून खाली पायापर्यंत असणारं सगळं मांस या बॅक्टेरियांनी खायला सुरुवात केली. म्हणजे अक्षरक्षः माझ्या पायावर मांस शिल्लक राहिलं नाही. त्वचा नव्हती. भयंकर होतं ते सगळं. माझ्या घरच्यांना वाटलं मी वाचणार नाही.

फोटो स्रोत, ENA MILLER
डॉक्टरांनी सांगितलं माझे पाय कापावे लागतील. माझ्या घरचे तयार झाले. पण सुदैवाने ती वेळ आली नाही. पण माझ्या पायाची त्वचा, मांस सगळंच गेलं होतं. मग डॉक्टरांनी माझी पाठ, नितंब, पोट अशा भागातून त्वचा काढली आणि माझ्या पायांवर लावली. ती अजूनही सरपटणाऱ्या प्राण्यांच्या त्वचेसारखी दिसते.
सर्जरीनंतर जवळपास 7-8 आठवड्यांनी मी माझे पाय पाहिले. मला प्रचंड धक्का बसला होता. मी अक्षरशः झोंबी दिसत होते. याचा माझ्या मनावरही परिणाम झाला. तो काळ प्रचंड कठीण होता, मला पोस्ट ट्रॉमॅटिक मेंटल डिसऑर्डरशी झुंजावं लागलं. अजूनही दवाखाना म्हटला की माझ्या अंगावर काटा येतो.
पण या सगळ्या प्रकाराने मला आयुष्याची किंमत कळाली. मला माझ्या स्वप्नातल्या सगळ्या गोष्टी आता करून पाहायच्या आहेत. मी अजून पॅरिसला गेलेले नाही, किंवा ओरिएंट एक्सप्रेसमधून प्रवास केलेला नाही. मला पेट्राला भेट द्यायची आहे, अॅमस्टरडॅमला जायचंय.
मी नेहमीच आनंदी असते असं नाही, याचा माझ्या मनावर परिणाम झालाय, या व्रणांनी माझं व्यक्तिमत्व बदललं आहे. पण असं काही मनात आलं की मी तो विचार झटकून टाकते आणि म्हणते, 'जे आहे ते आहे, पण मला अजून खूप काही करायचं आहे.'
- जेनिस, 49 वर्षं, श्रॉपशायर.

फोटो स्रोत, ENA MILLER
'हे व्रण वेदना दर्शवतात आणि त्यावर केलेली मातही'
माझ्या उजव्या हाताच्या मनगटावर तो व्रण आहे. माझ्या आयुष्यात तीन वेळा मी स्वतःला इजा करून घेतली आहे. तिन्ही वेळा एकाच ठिकाणी जखम करून घेतली. का? कारण मला माझ्या शरीराच्या इतर कुठल्या भागावर दुसरा व्रण नको होता.
मी स्वतःला शेवटची इजा केली त्याता दीड वर्ष लोटलंय. माझ्या हातावर हा व्रण गेल्या 10 वर्षांपासून आहे. हा व्रण माझ्या आयुष्यातल्या वेदनेचं प्रतीक आहे, पण तो हेही दर्शवतो की मी त्यावर मात कशी केलीये. मी खूप पुढे आलेय त्या दुःखापासून आणि आता माझ्या चेहऱ्यावर हसू फुलू शकतं.
मी अजूनही मानसोपचार घेतेय. माझ्या स्वतःला इजा करून घेण्याच्या वृत्तीबद्दल आम्ही बोलतो. मी आत्महत्या करण्याचा प्रयत्न करतेय असं मला वाटतं नाही. मला वाटतं माझ्या आतमध्ये खूप तीव्र वेदना आहे, आणि तिचं काय करावं मला कळत नाही, म्हणून माझ्याकडून हे घडतं.

फोटो स्रोत, ENA MILLER
मी स्वतःला पहिल्यांदा इजा केली तेव्हा तो व्रण लपवायला खूप कष्ट घेतले. मी भर उन्हाळ्यात पूर्ण बाहीचे कपडे घालायचे. मी का लपवायचे तो व्रण? कारण मला वाटायचं की तो पाहून लोक मला उगाच प्रश्न विचारत बसतील, माझ्या मानसिक स्थितीविषयी भलतेसलते तर्क लावतील, मला अगदी त्यांची 'ती पाहा बिचारी' असं म्हणत येणारी सहनुभूती पण नको होती.
पण गेल्या काही वर्षांत मी बदललेय. स्वतःकडे सतत हीन नजरेने पाहणं मी सोडून दिलंय. लोक काय विचार करतात यापेक्षा मला काय हवंय हे माझ्यासाठी जास्त महत्त्वाचं आहे आता.
मी स्वतःशी जास्तीत जास्त प्रामाणिक राहाण्याचा प्रयत्न करतेय. आणि म्हणूनच मी आता म्हणू शकते, "खरं सांगू का, मला माझ्या व्रणाची लाज वाटत नाही. तो आहे तसा, आहे तिथे राहाणार आहे. लोक तो पाहतील आणि त्याविषयी काही ना काही विचारतील. हरकत नाही. आहे हे असं आहे."
- एमिली, 25 वर्षं, लंडन

फोटो स्रोत, ENA MILLER
'माझे व्रण कसे दिसतात माहितेय? चुरगळलेल्या चुडीदार सारखे'
मला जळीत पीडिता म्हटलेलं आवडत नाही, मी सर्व्हायवर आहे. त्यातून वाचलेय, लढलेय आणि पुढे आलेय. पूर्वी होते त्यापेक्षा जास्त कणखर झालेय.
मी एक वर्षाची असेन, जेव्हा मला कोणीतरी बाथटबमध्ये ठेवलं. त्यातलं पाणी उकळतं होतं. माझ्या जन्मदात्या आईने ते पाहिलं, मला टबमधून बाहेर काढलं आणि 999 ( आपातकालीन सेवा) ला फोन केला. या घटनेनंतर बालकल्याण विभागाला मला माझ्या जन्मदात्या कुटुंबात राहू देणं योग्य वाटलं नाही. काही काळाने मला दोन खूप चांगल्या व्यक्तींनी दत्तक घेतलं. तेच माझे आईबाबा.
लहानपणापासून माझ्या अंगावर हे व्रण होते, आणि लहान मुलं क्रूर असतात कधी कधी. मला लहानपणी सोबती नेहमी काहीबाही बोलायचे. मी अगदी पहिली-दुसरीत असेन तेव्हा एक मुलगा मला म्हणाला होता, "शी, किती घाण दिसतेस तू. तुझे पाय अगदी झोंबीसारखे आहेत. तू त्या बाथटबमध्येच मरायला हवं होतंस."
या घटनेने माझ्या मनावर आघात केला. मी लांबलचक सॉक्स, टाईट्स घालायला लागले. मी आतल्या आत कुढत गेले, पंधरासोळा वर्षांची झाले तेव्हा कधीही स्कर्ट न घालता जीन्स घालायचे. माझे पाय कोणाच्या नजरेला पडू नये याची काळजी घ्यायचे.
पण विशीत आले तेव्हा ठरवलं, खूप झालं जगापासून लपणं. मी ही आहे अशी आहे. भाजलेल्या आणि त्यातून वाचलेल्या अनेक व्यक्तींशी, लहान मुलांशी मी बोलले आणि माझ्या लक्षात आलं की माझं आयुष्य यांच्यापेक्षा खरंच चांगलं आहे.

फोटो स्रोत, ENA MILLER
अशा लोकांचे क्लब असतात, तिथे जायला लागले. त्यांच्यात मला खूप बरं वाटायचं कारण तिथे मला स्वतःला लपवावं लागत नव्हतं, त्यांच्याशी मोकळेपणाने बोलता येत होतं, माझे अनुभव शेअर करता येत होते.
मी पंचवीस वर्षांची असताना आम्ही आठ जणींनी, ज्यांच्या अंगावर भाजल्याचे व्रण होते, स्वीमिंगसुटमध्ये फोटोसेशन केलं. ते फोटो आम्ही इन्स्टाग्रामवर टाकले. आम्हाला लोकांना दाखवायचं होतं की आम्ही किती धीराच्या आहोत, आणि तुमच्या अंगावरच्या व्रणांविषयी बोलायला हवं.
मग मी सौदर्यस्पर्धेत भाग घेतला. इतरांपेक्षा वेगळ्या दिसणाऱ्या लोकांसाठी ती सौदर्यस्पर्धा होती. माझी इच्छा आहे की मी तरूणांसाठी रोल मॉडेल बनावं. माझ्याकडे बघून त्यांनी विचार करावा, "तिला जमू शकतं तर मला का नाही."
- लॉरा, 27 वर्षं, केअरफिली

फोटो स्रोत, ENA MILLER
'मी माझं आरशातलं प्रतिबिंब कधी विसरू शकत नाही'
मला सोरायसिस नावाचा आजार आहे. त्यामुळे अधून मधून माझ्या संपूर्ण अंगावर लालेलाल चट्टे उठतात आणि त्यांची प्रचंड आग होते. जेव्हा असा सोरायसिसचा अॅटक येतो तेव्हा माझा चेहरा डागांनी भरून जातो. इतर वेळेस माझा चेहरा, माझी त्वचा छान दिसते.
पण असे सोरायसियचे चट्टे उठल्यानंतर मी माझे अनेक फोटो काढलेत. काही प्रिंट करून घेतलेत, म्हणजे माझ्या कायम लक्षात राहावं की कशी दिसते.
एखाद्या वेळेस परिस्थिती हाताबाहेर जाते. माझ्या कपाळावर चट्टे उठायला लागतात. आधी लहान लहान असणारे चट्टे मोठे होत जातात. दोन्ही भुवया पोटात घेतात, मग नाक, गाल, या कानापासून त्या कानापर्यंत सगळंच लालेलाल होऊन जातं. शरीरावर पसरलेले असतातच.
या चट्टयांची प्रचंड आग होत असते. अगदी कपड्यांचा स्पर्श पण सहन होत नाही त्याला. मला खरंतर छान छान फॅशनेबल कपडे आवडतात. पण या दिवसात मला मऊ अस्तर असलेले सैल कपडे घालावे लागतात. मी ब्रा-पॅन्टी सारखी घट्ट अंतर्वस्त्र तर घालूच शकत नाही. कपड्याच्या आत मला सायकल पॅन्ट घालाव्या लागतात.
आता अशा परिस्थितीत माझ्याकडे बघून लोक काय म्हणत असतील याचा विचार तुम्ही करू शकताच. कामाच्या ठिकाणी मला ग्राहक म्हणतात, "आम्हाला दुसरी सेल्सगर्ल हवी." त्यांना वाटतं मला कुठलातरी संसर्गजन्य रोग झालाय.
मी कपड्यांच्या दुकानात काम करते. सुरुवातीला मला कोणी म्हणालं की त्यांना मी नको दुसरी सेल्सगर्ल हवीये, तर मी निमूटपणे हो म्हणायचे. पण आता मी ठामपणे म्हणायला शिकलेय की, "मला काहीही रोग झालेला नाही. माझ्यामुळे तुम्हाला त्रास होणार नाही, त्यामुळे तुम्हाला ज्या गोष्टी हव्या त्या मीच दाखवणार नाहीतर या दुकानात तुम्हाला काही मिळणार नाही."
मी माझे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले होते, त्यानंतर काही लोकांनी मला येऊन सांगितलं की "माझ्यामुळे त्यांना प्रेरणा मिळते." मी कोणासाठी प्रेरणादायी बनू शकेन असा विचारच मी कधी केला नव्हता.
- एमी, 34 वर्षं, केन्ट
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








