बायकोला वाचवण्यासाठी तो शार्कला मारत राहिला...

फोटो स्रोत, Getty Images
शार्कच्या तावडीत सापडलेल्या बायकोला मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढणाऱ्या नवऱ्याची जोरदार चर्चा आहे. ऑस्ट्रेलियात ही घटना घडली आहे. ऑस्ट्रेलियातील स्थानिक रिपोर्ट्सनुसार, शार्कने एका माणसाच्या पत्नीवर हल्ला केला.
त्यावेळी सर्फ बोर्डवरून त्या माणसाने शार्कवर उडी मारली. बायकोला सोडेपर्यंत तो शार्कला मारत राहिला.
35 वर्षीय शानटेल डॉयल न्यू साऊथ वेल्समध्ये पोर्ट मेकवोरी शेली समुद्रकिनाऱ्यावर सर्फिंग करत होत्या. त्यावेळी शार्कने त्यांच्यावर हल्ला केला. त्यांच्या नवऱ्याने शार्कवर प्रतिआक्रमण केलं. शार्कची पकड ढिली होईपर्यंत तो शार्कला मारत राहिला.
शार्कने पिच्छा सोडल्यानंतर तो शानटेला यांना घेऊन किनाऱ्यापर्यंत पोहोचला. त्यानंतर एअर अम्ब्युलन्सने त्यांना हॉस्पिटलला नेण्यात आलं. त्यांच्या डाव्या पायाला गंभीर दुखापत झाली होती. तज्ज्ञांच्या मते शार्कच्या पिल्लाने शानटेल यांच्यावर हल्ला केला असावा.
ऑशार्कचं पिल्लू 3 मीटर लांब म्हणजे दहा फूट एवढं असतं. सर्फ लाईफ सेव्हिंग एनएसडब्ल्यूचे प्रमुख स्टीव्हन पीयर्स यांनी शानटेल यांच्या पतीची म्हणजेच मार्क रैपले यांचं कौतुक केलं आहे.

फोटो स्रोत, Reuters
स्टीव्हन यांनी सिडनी मॉर्निंग हेराल्डशी बोलताना सांगितलं की, मार्कने सर्फबोर्डवरून शार्कच्या अंगावर झेप घेतली. पत्नीची सुटका केल्यानंतरच तो मारायचा थांबला. त्यानंतर त्याने तातडीने शानटेल यांना किनाऱ्यापर्यंत आणलं. एखाद्या हिरोप्रमाणे त्यांनी शानटेल यांची शार्कच्या तावडीतून सुटका केली.
अॅम्ब्युलन्स एनएसडब्ल्यूचे इन्स्पेक्टर अॅंड्यू बेवर्ली यांनी सांगितलं की डॉक्टरांकडे नेण्यापूर्वी किनाऱ्यावरील लोकांनी शानटेल यांच्यावर प्रथमोपचार केले. स्थानिकांनी ज्या पद्धतीने मदत केली ते प्रशंसेस पात्र आहेत. त्यांनी मोलाचं काम केलं.
गेल्या काही महिन्यात किनाऱ्याजवळ येऊन शार्कने केलेला हा तिसरा हल्ला आहे असंही त्यांनी सांगितलं. दरम्यान शानटेल यांना न्यूकॅसल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. तिथे त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. आता त्यांची प्रकृती स्थिर आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








