कोरोना व्हायरसः व्हिएतनाममध्ये विषाणूचा शिरकाव पुन्हा कसा झाला?

व्हिएतनाम

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, प्रीती झा
    • Role, बीबीसी न्यूज

जुलैमधली गोष्ट. व्हिएतनामनं कोरोनावर मात केली वगैरे बातम्या जगभर पसरल्या. कौतुकही झालं. अर्थात, ते होणारच होतं. कारण महिनाभर जवळपास कोरोनामुळे कुणाचा मृत्यू नाही की स्थानिक लोकांमध्ये कुठला संसर्ग आढळला नाही.

आता देश कोरोनामुक्त झालाच म्हटल्यावर फुटबॉलचे सामने सुरू झाले. फुटबॉलची मैदानं क्रीडाप्रेमींनी भरून गेली. शाळा पुन्हा उघडल्या. लोकही आपापल्या आवडत्या कॅफेमध्ये जाऊ लागले. एकूणच सर्व सुरळीत झाल्यासारखं वातावरण व्हिएतनाममध्ये दिसू लागलं होतं.

आमचं आयुष्य पूर्ववत झालं होतं, असं 27 वर्षीय माय शॉन टू सांगत होती. ही तरुणी मध्य व्हिएतनाममधील दा नांग इथली आहे.

दा नांग या व्हिएतनाममधील समुद्रकिनाऱ्याकडील भागात देशातील बरीच मंडळी पर्यटनासाठी येतात. माय शॉन टू सांगते, या भागात येण्यासाठी हळूहळू बुकिंगही सुरू झालं होतं. माय शऑन टू ही पर्यटन एजन्सीतच काम करते.

व्हिएतनाम

फोटो स्रोत, Getty Images

मात्र, जुलै महिना संपता संपता म्हणजे शेवटच्या आठवड्यात दा नांगमध्ये अचानक कोरोना व्हायरसच्या नव्या उद्रेकाचं केंद्र बनलं. तेथील शास्त्रज्ञांनाही हा मोठा धक्का आहे. 99 दिवसांनंतर अचानक कोरोनाच्या रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढली.

व्हिएतनामचं कौतुक

काही आठवड्यांपूर्वीच व्हिएतनामनं कोरोनावर मात केली म्हणून जगभर कौतुक झालं.

व्हिएतनाममधील कम्युनिस्ट पक्षानं अत्यंत वेगानं आणि निर्णायक पद्धतीनं कोरोनाविरोधात लढा दिला. इतर देश गोंधळलेल्या अवस्थेत असताना व्हिएतनाम अत्यंत लक्षपूर्वक सामना करत होता. परदेशातून येणाऱ्या प्रत्येकाची तपासणी केली जात होती.

देशात प्रवेश करणाऱ्या प्रत्येकाला सरकारी विलगीकरण कक्षात ठेवले जात होते, काँटॅक्ट ट्रेसिंग केली जात होती आणि देशव्यापी चाचणी मोहीम राबवली गेली.

व्हिएतनाम

फोटो स्रोत, Getty Images

आता एवढं सारं व्हिएतनामं केलं, मग चुकलं कुठे?

काही चुकीचं झालंय, याची मलाच खात्री वाटत नाही, असं प्रा. मायकल टूल म्हणतात. प्रा. टूल हे साथरोगतज्ज्ञ आहेत. शिवाय, ते मेलबर्न येथील बर्नेट इन्स्टिट्युटमध्ये वरिष्ठ संशोधक म्हणूनही कार्यरत आहेत.

स्पेन, ऑस्ट्रेलिया आणि हाँगकाँग यांसारख्या अनेक देशांना वाटलं की, हे आरोग्य संकट आपल्या नियंत्रणात आलंय आणि तिथे विषाणूचा पुन्हा उद्रेक पाहायला मिळाला, असं प्रा. टूल सांगतात.

दा नांगमध्ये बरेचजण बिनधास्त होते. कारण त्यांना वाटत होतं की, कोरोना आता नियंत्रणात आलाय. मात्र, नवीन रुग्ण सापडू लागल्यानंतर दा नांगमध्ये फिरण्यासाठी आलेले लोक लगेच आपापल्या घरी परतू लागले. दा नांग शहरात बाहेरील पर्यटकांना येण्यास बंदी घालण्यात आली आणि पूर्ण लॉकडाऊन लागू करण्यात आलं.

व्हिएतनामवरून एक लक्षात येऊ शकतं की, थोडी तरी चूक झाली असेल, तरी विषाणू वेगानं पसरू शकतो, असं प्रा. टूल म्हणतात.

देशात पुन्हा विषाणूचा उद्रेक कसा झाला, याचा शोध घेण्यासाठी व्हिएतनाममधील शास्त्रज्ञ आणि संशोधकांमध्ये एकप्रकारे स्पर्धा सुरू झाली आहे.

व्हिएतनामची राजधानी हनोई येथील ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या वैद्यकीय संशोधन पथकाचे संचालक प्रा. रॉजर व्हान डूर्न म्हणतात, व्हिएतनाममध्ये पुन्हा झालेल्या कोरोना उद्रेकाचा मूळ स्रोत 'मोठं रहस्य' आहे.

प्रा. डूर्न यांचं पथक व्हिएतनामच्या सरकारसोबत कोरोनाच्या काळात काम करत आहे. या पथकातील काहीजण विशेषत: हे काम करत आहेत की, ज्यातून विषाणू नेमका कसा आणि कुठून पसरत आहे. 'जेनेटिक डिटेक्टिव्ह वर्क' असं या कामाला त्यांनी नाव दिलंय.

मात्र, अजूनतरी कुणालाही नेमकं कळलं नाहीय की, दुसऱ्या उद्रेकाचा प्रसार नेमका कुठून झालाय. दुसऱ्या उद्रेकावेळी सापडलेला पहिला रुग्ण अर्थात दा नांगमधील 57 वर्षीय व्यक्ती (पेशंट 416 अशी त्याची ओळख सांगितली जातेय) नेमका कुणाच्या संपर्कात आणि कुठे संपर्कात आला, हेच अद्याप कळलं नाहीय.

काही तर्क लावले जात आहेत. मात्र, निश्चित असं काहीच नाही.

स्थानिक माध्यमांनी विषाणूच्या ताणामुळे नव्याने प्रसाराचा अंदाज लावलाय, तर आणखी कुणी वेगवेगळे अंदाज लावतोय. काहीजण तर म्हणत आहेत की, व्हिएतनाम-चीन सीमेवरून जी मानवी तस्करी होते, त्यातून हा नव्याने विषाणू प्रसार झाला असावा.

मात्र, यातील कुठलेच कारण ठोस असल्याला दुजोरा मिळाला नाहीय.

राष्ट्रीय अभिमान

ज्या भागात महिन्याभरात रुग्ण सापडले नाहीत, तिथे कदाचित काही रुग्ण असूनही त्यांना शोधता आलं नसावं. त्यात लक्षणविरहित रुग्ण असल्यानं आणखी प्रसार झाला असावा. किंवा विलगीकरण कक्षेबाबत काही चुका झाल्या असाव्यात. म्हणजे, विलगीकरण कक्षाची मुदत संपण्याआधीच कुणाला बाहेर सोडलं गेलं असावं. अशा सर्व शक्यता वर्तवल्या जात आहेत.

कोरोना
लाईन

काही लोकांनी सुरक्षेसाठीची साधनं वापरली नसतील, असं डॉ. जस्टीन बिअर्डस्ले म्हणतात. ते सिडनी विद्यापीठात वरिष्ठ व्याख्याते आहेत. मात्र, ते हेही मान्य करतात की, कोरोनाशी लढण्यासाठी व्हिएतनाममधील लोकांनी अभूतपूर्व अशी एकजूट दाखवली.

"कोरोनाच्या उद्रेकाला रोखण्यासाठी तिथे एक प्रकारे राष्ट्राची लढाई म्हणून पाहिली गेली. त्यात राष्ट्राभिमान होता. पाश्चिमात्य देशात नेमकं हेच दिसून आलं नाही," असं डॉ. जस्टीन म्हणतात.

जुलैच्या अखेरीस व्हिएतनाममध्ये केवळ 400 रुग्ण होते. आता 780 च्या वर रुग्णसंख्या गेलीय. ही संख्या आणखी वाढण्याचा अंदाज आरोग्य खात्याच्या उपमंत्र्यांनी वर्तवला आहे. शिवाय, येत्या 10 दिवसात रुग्णांची संख्या वाढेल, असंही ते म्हणत आहेत.

प्रशासन सज्ज

दा नांगमध्ये पर्यटनासाठी आलेले लोक आपापल्या घराकडे परतू लागले आहेत. व्हिएतनाममधील 14 शहरं आणि प्रांतांमध्ये नव्याने कोरोनाचे रुग्ण आढळू लागले आहेत. यात व्हिएतनामची राजधानीचाही समावेश आहे.

प्रा. डूर्न म्हणतात, या नव्या रुग्णांचा संबंध दा नांग शहराशी आहे. बाहेरील कुठल्याच शहरात किंवा प्रांतात समूहप्रसार आढळला नाहीय. याकडेच आता इथला प्रशासन बारकाईन लक्ष देतोय.

व्हिएतनामनं कोरोनाचं संकट यशस्वीपणे हाताळल्यानंतर काहींनी आकडेवारीच्या अचूकतेबाबत शंका व्यक्त केली होती.

व्हिएतनाम

फोटो स्रोत, EPA

"नव्यानं कोरोनाचे रुग्ण आढळले. हे कोरोनाबाबतच्या माहितीत पारदर्शक आहोत, हेच दाखवून देतं आणि आधी मृतांबाबत दिलेल्या माहितीवर शंका उपस्थित करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही," असं डॉ. ह्युआँग ले थू सांगतात. ते ऑस्ट्रेलियन स्ट्रॅटेजिक पॉलिसी इन्स्टिट्युटचे वरिष्ट विश्लेषक आहेत.

व्हिएतनाममध्ये आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांना आधीही काही ना काही आजार किंवा रोग होता.

अनेक शहरात मास्क वापरणं बंधनकारक

आता दा नांगममधील समुद्रकिनारे, रस्ते सर्व ओस पडलेत. लोक आता केवळ अन्न-धान्य खरेदीसाठीच घराबाहेर पडत आहेत. सर्व दुकानं बंद आहेत. कोरोनाविरोधात नव्याने लढाईस सर्वजण सज्ज झालेत. प्रत्येक नागरिकाची चाचणी केली जात आहे. प्रसार रोखण्यासाठी फिल्ड हॉस्पिटलची उभारणी केली गेलीय.

व्हिएतनाममधील ज्या भागात रुग्ण आढळत नाहीत, त्या भागातील लोकांना पूर्णपणे मोकळीक आहे.

राजधानी हनोईमध्ये बार किंवा इतर पार्लर वगैरे बंद करण्यात आले आहेत. आवश्यक त्या खबरदारी घेतल्या जात आहेत. हनोई, हो चि मिन्ह आणि इतर अनेक शहरांमध्ये सार्वजनिक ठिकाणी फिरताना मास्क वापरणं बंधनकारक करण्यात आलंय.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)