श्रीलंका निवडणूक: राजपक्षे बंधूंचा श्रीलंकेत विजय, एक भाऊ राष्ट्राध्यक्ष तर दुसरा पंतप्रधान

फोटो स्रोत, Getty Images
श्रीलंकचे अध्यक्ष गोटाभाया राजपक्षे यांनी सार्वत्रिक निवडणुकीत त्यांच्या पक्षाचा मोठा विजय झाल्याची घोषणा केली आहे.
निवडणूक निकालानंतर राष्ट्राध्यक्ष गोटाभाया राजपक्षे यांचे भाऊ महिंदा राजपक्षे श्रीलंकेचे पंतप्रधान असणार आहेत. नोव्हेंबर 2019 पासूनच ते हंगामी पंतप्रधान आहेत.
श्रीलंकेतल्या सार्वत्रिक निवडणुकीत राजपक्षे बंधुंच्या श्रीलंका पिपल्स फ्रंट पक्षाने दोन-तृतिआंश मतांनी दणदणीत विजय मिळवला. 225 जागांपैकी 145 जागांवर पक्षाला विजय मिळाला तर 5 जागा मित्रपक्षाला मिळाल्या आहेत.
निकाल आल्यानंतर महिंदा राजपक्षे यांनी ट्वीट करत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणुकीतल्या यशाबद्दल फोनवरून अभिनंदन केल्याचं सांगितलं.
आपल्या ट्वीटमध्ये ते लिहितात, "जनतेच्या अभूतपूर्व पाठिंब्यासह श्रीलंकेचे भारतासोबतचे संबंध अधिक दृढ करण्यावर भर असेल."
गेल्या दोन दशकांपासून श्रीलंकेच्या राजकारणावर वादग्रस्त राजपक्षे घराण्याचा पगडा आहे. स्वतः महिंदा राजपक्षे 2005 ते 2015 या काळात पंतप्रधान होते.
या निवडणुकीत माजी पंतप्रधान रनिल विक्रमसिंघे यांच्या पक्षाचा दारून पराभव झालं. मागच्या निवडणुकीत त्यांच्या पक्षाला 106 जागा मिळाल्या होत्या. मात्र, या निवडणुकीत त्यांना फक्त एक जागा जिंकता आली.
निवडणुकीत रनिल विक्रमसिंघे यांच्या पक्षाची धुळधाण उडाल्यानंतर नव्यानेच राजकारणात प्रवेश केलेला एक गट मुख्य विरोधी पक्ष असणार आहे. श्रीलंकेचे माजी पंतप्रधान रनसिंघे प्रेमादासा यांच्या मुलाने हा पक्ष स्थापन केला आहे. 1993 साली प्रेमादासा यांची हत्या करण्यात आली होती.

फोटो स्रोत, Getty Images
कोरोना विषाणूच्या संकटात निवडणूक घेणाऱ्या मोजक्या राष्ट्रांपैकी श्रीलंका एक आहे. श्रीलंकेत कोरोनाची परिस्थिती अजूनतरी गंभीर नाही. सध्या तिथे 2,839 कोरोनाबाधित रुग्ण आहेत. तर 11 जणांचा मृत्यू झाला आहे.
कोरोना संकटामुळे यापूर्वी दोन वेळा मतदान पुढे ढकलण्यात आलं होतं. अखेर बुधवारी मतदान घेण्यात आलं. गुरुवारी मतमोजणी झाली आणि शुक्रवारी सकाळी अधिकृत निकाल जाहीर करण्यात आला.
बीबीसी साउथ एशिया अॅनालिस्ट अंबरासन इतिराजन यांचं विश्लेषण
श्रीलंकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत राजपक्षे बंधुंचा पुन्हा एकदा दणदणीत विजय झाला.
श्रीलंका पिपल्स फ्रंट पक्षाने 9 महिन्यांपूर्वी झालेल्या राष्ट्राध्यक्ष निवडणुकीतही विजय मिळवला होता. त्यानंतर गोटाभाया राजपक्षे यांनी 18 नोव्हेंबर रोजी राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतली होती.

राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीनंतर राजपक्षे यांनी सार्वत्रिक निवडणुकीतही बाजी मारली आहे.
श्रीलंकेतल्या बहुसंख्या सिंहली समाजात गोटाभाय राजपक्षे लोकप्रिय आहेत. संरक्षण सचिव असताना त्यांनी 2009 साली तमिळ बंडखोराचा बिमोड केला होता. तेव्हापासून सिंहली समाजात त्यांची लोकप्रियता वाढली. अनेकजण त्यांना देशात स्थैर्य आणि कोरोनाचं संकट यशस्वीरीत्या हाताळल्याचं श्रेयही देतात.
श्रीलंकेतल्या गृहयुद्धादरम्यान मानवाधिकारांचं उल्लंघन आणि विरोधी आवाजाला बळाचा वापर करून दडपण्याचे आरोप त्यांच्यावर आहेत. त्यांनी कायमच या आरोपांचं खंडन केलं असलं तरी आरोप अजून मिटलेले नाहीत.
निवडणूक काळात श्रीलंकेत सिंहली राष्ट्रवादही उफाळून आला. त्यामुळे तिथल्या अल्पसंख्याक समाजामध्ये भीतीचं वातावरण आहे.
श्रीलंकेत गेल्या वर्षी इस्टर संडेला इस्लामिक दहशतवाद्यांनी घडवलेल्या साखळी बॉम्बस्फोटात 260 जणांचा मृत्यू झाला होता. या हल्ल्यानंतर तिथल्या मुस्लिम समाजाला लक्ष्य करण्यात आलं होतं. या बदनामीपासून आमचा समाज अजूनही बाहेर पडू शकलेला नाही, असं स्थानिक मुस्लिम नेत्यांचं म्हणणं आहे.
राजपक्षे यांना मिळालेल्या प्रचंड बहुमताच्या बळावर ते राज्यघटनेतही बदल करू शकतात. तसं आश्वासन त्यांनी निवडणुकीत दिलं होतं. राष्ट्राध्यक्षांच्या अधिकारात वाढ केली जाऊ शकते. तसं झाल्यास पूर्वीच्या सरकारने घेतलेले निर्णय बदलता येणार आहे.
श्रीलंकेत मतभेद आणि टीकेसाठीची जागा कमी होत असताना राज्यघटनेत बदल झाल्यास देश अधिकाधिक हुकूमशाहीच्या दिशेने जाईल, अशी भीती तिथले मानवाधिकार कार्यकर्ते व्यक्त करत आहेत.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








